सोमदेव : (इ. स. अकरावे शतक). एक श्रेष्ठ संस्कृत कवी. काश्मिरी शैव ब्राह्मण. याच्या पित्याचे नाव राम होते. इ. स. च्या अकराव्या शतकात काश्मीरचा राजा अनंत याच्या दरबारात हा कवी म्हणून होता. राणी सूर्यमती हिच्या मनोरंजनासाठी त्याने ⇨ कथासरित्सागर नावाचे २१,३८८ श्लोकांचे कथारूप विशाल काव्य लिहिले. अनंत राजाचा मुलगा कलश गादीवर बसल्यावर, म्हणजे १०६३-८१ या काळात या काव्याची निर्मिती झाली. अनेक अद्भुत व रोमांचक, प्राण्यांच्या तसेच माणसांच्या कथा गुंफलेल्या या काव्याची शैली प्रासादिक आणि ओघवती आहे. अशा रोचक शैलीत लिहिणाऱ्या सोमदेवाला काही विद्वानांनी कविकुलगुरू ⇨ कालिदासाच्या पंक्तीला नेऊन बसवले आहे.
भाटे, सरोजा