शृंगारप्रकाश : माळव्यातील परमारवंशीय भोजलिखित एक संस्कृत बृहद्ग्रंथ. या ग्रंथाची विभागणी छत्तीस प्रकरणांत केलेली असून तो १,९०८ पृष्ठांचा प्रचंड ग्रंथ होय. ⇨ भोज परमार (कार. १०००–१०५५) हा उदार, कलाभिज्ञ, विद्वान व पराक्रमी राजा होता. धारानगरी (धार) ही त्याची राजधानी. त्याने आपले राज्य खूप वाढविले. वेत्रवती नदीच्या तीरावर तसेच चितोड भागात त्याने देवालये बांधली. ⇨ धार येथे राजमार्तंड नावाचा राजवाडा, भोजशाला, सरस्वतिसदन नावाची पाठशाला इ. इमारती त्याने बांधल्या. सरस्वतीची एक अप्रतिम मूर्ती त्याने निर्मिली. त्याचे अनेक ताम्रपट व शिलालेख उपलब्ध आहेत. अनेक शास्त्रे व कला यांत तो निपुण होता. कनौज हीदेखील त्याची राजधानी होती. त्याने विपुल ग्रंथरचना केली.    

शृंगारप्रकाश या ग्रंथाचा शृंगार हा प्रधान विषय आहे. त्यामुळे तो आकर्षक असला, तरी अहंकार, अभिमान व शृंगार हे त्या रसाचे एक नवेच रूप भोजाने त्यात मांडले असल्यामुळे रसिकांना हा ग्रंथ खूपच वैशिष्ट्यपूर्ण व वेधक वाटतो. सरस्वतीकण्ठाभरण या आपल्या छोटेखानी ग्रंथात भोजाने जे जे संक्षिप्त स्वरूपात मांडलेले आहे, ते ते त्याने शृंगारप्रकाशात खूपच विस्ताराने मांडले. त्यामुळे रसराज शृंगाराची संपूर्ण चिकित्सा करणारा हा एक ग्रंथराजच बनलेला आहे. या ग्रंथाची भाषा अलंकारप्रचुर, लालित्यपूर्ण व ओघवती आहे.                                            

इनामदार, वि. बा.