चतुर्भाणी : नाट्यछटेसारख्या संस्कृतातील एकपात्री एकांकिकेस ⇨भाण  म्हणतात. उभयाभिसारिका, पद्मप्राभृतक, धूर्तविटसंवाद  आणि पादताडितक  अशा चार भाणांचा संग्रह चतुर्भाणी  ह्या नावाने १९२२ मध्ये प्रसिद्ध झाला. हे चार भाण अनुक्रमे वररूची, शूद्रक, ईश्वरदत्त आणि श्यामिलक ह्यांच्या नावावर मोडतात. भरताच्या नाट्यशास्त्रानंतर व धनंजयाच्या दशरूपकाच्या आधी, म्हणजे सु. पाचव्या ते आठव्या शतकाच्या दरम्यान किंवा उत्तर गुप्तकालात ह्या चार भाणांची रचना झाली असावी, असे अलीकडील मत आहे.

भाणाचा विषय बहुधा शृंगाराशी, क्वचित वीररसाशी संबद्ध असतो. यात धूर्त किंवा विट हे एकच बोलके पात्र स्वतःचे किंवा इतरांचे अनुभव वर्णन करून सांगत असते. त्याच्याखेरीज इतर पात्रे रंगभूमीवर प्रत्यक्ष दिसत नाहीत. विट त्यांच्याशी आकाशभाषिताने बोलतो आणि ती पात्रे काय बोलतात हे विटाच्या निवेदनातूनच समजते. सामान्यतः नायकाच्या वतीने नायिकेची भेट घेऊन उभयतांचे मीलन घडवून आणण्याचे कार्य विट करतो. काही प्रसंगी केवळ दूताची कामगिरीही त्याच्याकडे असते.

उभयाभिसारिकेत विट रुसलेल्या नायिकेशी मध्यस्थीचे बोलणे करण्यासाठी रमतगमत, कुचाळक्या करीत जातो परंतु तो येथे पोहोचण्यापूर्वीच वसंत ऋतूच्या प्रभावाने प्रेमिकांचे मीलन घडवून आणलेले असते. पद्मप्राभृतकात कार्यसिद्धीचे चिन्ह म्हणून नायिकेने दिलेली कमळाची भेट तो नायकाकडे घेऊन येतो. धूर्तविटसंवादात कामशास्त्राची सूक्ष्म चर्चा आहे. पादताडितकात नायकाच्या (विष्णुनाग) मस्तकावर गणिकेने लत्ताप्रहार केलेला असतो. ह्या संदर्भात नायकाने कोणते प्रायश्चित्त घ्यावे, ह्यासंबंधीच्या चर्चेला विट हजर असतो. गणिकेला हे कृत्य करू दिल्याबद्दल विष्णुनागाने प्रायश्चित्त घेण्याऐवजी गणिकेनेच आपला पाय अशा मूर्खाच्या डोक्याला लावल्याबद्दल प्रायश्चित्त घ्यावे, असे मत काहीजण व्यक्त करतात. तिच्या विटाळलेल्या पायाचे मर्दन विष्णुनागाने करावे, असे काही म्हणतात. गणिकेने पाय धुतलेल्या पाण्याने विष्णुनागाने आपले डोके धुवावे आणि ते पाणी प्यावे, अशीही सूचना होते. अखेरीस सभेच्या अध्यक्षाच्याच डोक्यावर त्या गणिकेने पाय ठेवावा, अशी प्रत्यक्ष सभेच्या अध्यक्षाने केलेली सूचना मंजूर होते. ह्या भाणातील प्रसंगस्थळ उज्जयिनी हे आहे. ह्यातील विट म्हणजे एक मिस्किल कलावंत आहे. विविध प्रसंग, व्यक्ती, स्थळे, सामाजिक व्यवहार इत्यादींचे मार्मिक अवलोकन त्याच्या उद्‌गारांत आढळते. ह्या भाणांची भाषा प्रवाही आहे. तत्कालीन समाजाचे जिते-जागते चित्र रंगवून सामाजिक ढोंगावर मर्मप्रहार करणे, हे ह्या भाणांचे उद्दिष्ट आहे. चतुर्भाणीत अंतर्भूत असलेले सर्वच भाण सूक्ष्म पण व्यापक निरीक्षण, मार्मिक उपहास-उपरोध, काव्यात्म नाट्याला उठाव देणारा नाजूक पण स्पष्ट आणि अवखळ विनोद ह्यांमुळे विलोभनीय व कलात्मक झाले आहेत पण पुढील भाणरचनेस मात्र काव्यजड प्रबंधाचे रूप येत गेले.

संदर्भ : १. कवी, एम्‌ रामकृष्ण शास्त्री, एस. के. रामनाथ, संपा. चतुर्भाणी, शिवपुरी (त्रिचूर), १९२२.

            २. मोतीचंद्र अग्रवाल, वासुदेवशरण, संपा. शृंगार-हाट (चतुर्भाणी  ), मुंबई, १९६०.

भट, गो. के.