लंकावतारसूत्र : विज्ञानवादाचा पुरस्कार करणारा एक बौद्ध ग्रंथ. हा संस्कृतात आहे. निरनिराळ्या विद्वानांची मते विचारात घेता, ह्या ग्रंथाची रचना इ. स. च्या पहिल्या शतकापासून पाचव्या शतकापर्यंत केव्हा तरी झालेली असावी. ह्या ग्रंथात एकूण दहा परिच्छेद असून पहिला परिच्छेद लंकाधिपती रावणाला उद्देशून आहे. सागरातील नागराजभवनातून बाहेर पडल्यानंतर, रावणाला उपदेश करावा, अशी भगवान बुद्धांना इच्छा झाली आणि त्यांनी रावणाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. लंकाधिपती रावणाशी संबंधित असलेल्या ह्या पहिल्या परिच्छेदावरूनच ह्या ग्रंथाला लंकावतारसूत्र हे नाव देण्यात आले आहे. पुढील परिच्छेदाशी मात्र रावणाचा काही संबंध आलेला नाही. ह्या ग्रंथातील आठवा परिच्छेद मांसाशननिपेधाबद्दलचा आहे व दहावा परिच्छेद स-गाथक आहे. हे परिच्छेद नंतरचे असावेत. दहाव्या परिच्छेदात ८८४ गाथा आहेत. त्यांतून भविष्यकाळात जन्माला येणाऱ्या व्यक्तींची म्हणून काही नावे दिलेली आहेत. भारत व्यास, कणाद, कपिल, शाक्यतनय सिद्धार्थ, कौरव-पांडव, राम, नंद, गुप्त, पाणिनी, कात्यायन इत्यादी. ह्यांतील काही नावे-उदा., नंद, गुप्त-प्रक्षिप्त असण्याचाही संभव आहे.

विज्ञान किंवा चित्त ह्यांखेरीज जगात दुसरे काही सत्य नाही. परमार्थतः इतर सर्व गोष्टी अस्तित्वातच नाहीत. निरनिराळ्या प्रकारची याने-श्रावकयान, प्रत्येकबुद्धयान, बोधिसत्त्वयान-वस्तुतः अस्तित्वातच नाहीत. भगवान बुद्धांना बोधिज्ञान प्राप्त झाल्यापासून त्यांच्या निर्वाणप्राप्तीपर्यंत त्यांनी एकही अक्षर उच्चारलेले नाही. सदा समाधीत राहणारे तथागत किंवा बुद्ध ह्यांच्या ठिकाणी वितर्क किंवा विचारदेखील नाही. हा सर्व लोक ख-पुष्पवत, काल्पनिक आहे. काहीही उत्पन्न होत नाही काहीही नष्ट होत नाही. ग्राह्य नाही ग्राहक नाही. ध्याता, ध्यान, ध्येय हे केवळ कल्पनामात्रच आहे, हे जो जाणतो तोच मुक्त होतो.

इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून आठव्या शतकापर्यंत चिनी भाषेत झालेली, ह्या ग्रंथाची तीन भाषांतरे उपलब्ध आहेत. जपानी व इंग्रजी भाषांतही ह्या ग्रंथाचे अनुवाद झालेले आहेत. इंग्रजी अनुवाद डॉ. सुझुकी ह्यांनी केलेला आहे.

बापट, पु. वि.