भट्टाचार्य, कमलाकांत : (१८५३-१९३६), असमिया कवी व निबंधकार. जन्म तेजपूरजवळील गऱ्हेहगा (जि.दरोंग) नावाच्या खेडयात. वडिल वनेश्वर हे ब्रिटिश राजवटीत एक पोलीस अधिकारी होते. हरविलास आगरवाला यांचा हत्ती पकडून ते विकण्याचा व्यापार होता. सुरवातीस कमलाकांतांनी आगरवालांकडे काम केले तसेच इतरही अनेक व्यवसाय केले. नंतर ते गौहाती येथे स्थायिक झाले. अरुणोदय मासिकाच्या कालापासून सु. ६० वर्षे म्हणजे आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यांनी असमियात सातत्याने लेखन केले. ‘महर्षि कमलाकांत’ म्हणून ते ओळखले जात. गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारांत त्यांनी दर्जेदार लेखन केले. १९२२ मध्ये असमिया साहित्य सभेचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले. ब्राम्हो समाजाचे ते अनुयायी होते. आसाम हितेशी ह्या अर्धसाप्ताहिकाचे कमलाकांत आणि कुमार मुखोपाध्याय हे १९२५ ते १९२९ पर्यंत संपादक होते. अरुणोदय, आसाम न्यूज, आसाम बंधू, जोनाकी, वांही, उपा, आवाहन इ. लोकप्रिय व दर्जेदार नियतकालिकांतून त्यांनी सातत्याने लेखन केले.

असमिया साहित्यावर कमलाकांतांनी आपल्या साहित्यिक कर्तृत्वाचा कायम ठसा उमटविला. राजकारण, समाजशास्त्र, तत्वज्ञान, साहित्य इ. विषयावर त्यांनी महत्वपूर्ण लेख लिहिले. गुटिदियेक चिंतार घेऊ या मालेत त्यांनी केलेले वैचारिक निबंधलेखन प्रसिद्ध असून ते त्यांनी सामाजिक व धार्मिक सुधारकाच्या भूमिकेतून केले आहे. त्यांच्या सखोल विश्लेषणशक्तिचा तसेच तर्कशुद्ध विचारांचा व निष्कर्षांचा त्यांच्या कःपंथा (१९३४) मधील लेखांत प्रत्यय येतो. त्यांनी काही बोध-उपदेशपर निबंधही लिहिले. त्यांत त्यांच्या सामाजिक न्याय बुद्धीचा आणि पुरोहितशाहीविरुद्धच्या प्रतिक्रियेचा आढळ होतो. दुष्ट रुढी, जातीयता, जाचक सामाजिक निर्बंध, अंधश्रद्धा, कर्मकांड यांच्यावर त्यांनी कठोर प्रहार करुन पाश्चात्य शिक्षण, उदार धार्मिक दृष्टिकोन, विधवाविवाह इत्यादिंचा हिरिरीने पुरस्कार केला. त्याचे हे सर्व लेखन मौलिक, तर्कशुद्ध व राकट-जोमदार आहे.

असमिया साहित्यात देशभक्तीपर कवितेचे बीजारोपण करणारे आद्य कवी म्हणून त्यांचे नाव चिरंतन स्मरणात राहील. स्वछंदतावादी व देशभक्तिपर कवितेचा प्रवाह असमियात आणणाऱ्या कवींत कमलाकांतांचे नाव प्रथम घ्यावे लागेल. त्यांच्या काव्यात देशभक्ती, तत्वज्ञान व सामाजिक सुधारणा असे तीन पदर कलात्मकरीत्या एकत्र आलेले दिसतात. असमियात सर्वप्रथम त्यांनी उदात्त देशभक्तीची गीते उच्चरवाने गायिली. गॅरिबाल्डी व मॅझिनी यांच्या आदर्शांतून त्यांनी प्रेरणा घेऊन आपली राष्ट्रीय स्वरुपाची कविता लिहिली. भारताचा उज्ज्वल व गौरवशाली भूतकाळ व अंधःकारमय वर्तमानकाळ यांतील विरोध व व्यथा त्यांच्या अनेक कवितांतून व्यक्त होताना दिसतात. भूतकाळातील स्मृती व भविष्याचा वेध त्यांच्या ह्या कवितेत आहे. दुर्दम्य आशावादही त्यांतून ओसंडून वाहतो. चिंतानल (२ भाग-१८९०,१९२२) आणि चितातरंग (१९३३) हे त्यांचे दोन प्रख्यात काव्यसंग्रह होत. देशभक्तीचा एक नवा-विज्ञान-निष्ठ-आदर्श, नविन जीवनमूल्ये आणि उपनिषदकालीन संस्कृतीचा यथोचित गौरव यांचा सुगंध त्यांच्या काव्यातून दरवळतो. भारतीय म्हणवून घेण्यात त्यांना सार्थ अभिमान वाटतो. आसामची गौरव गीते गाताना त्यांची संवेदनशीलता कमालीची तरल बनते. त्यांच्या राष्ट्रीय कवितेने नंतरच्या सुशिक्षित व सुसंस्कृत तरुण पिढीला स्फूर्तिप्रदान केले. ज्वलंत भावना त्यांच्या काव्यात ओसंडून वाहत असली, तरी लयीच्या दृष्टीने त्यांची कवीता फारशी संपन्न नाही. असमिया काव्यातील बदलत्या युगाचे कमलाकांत हे अध्वर्यू होत. तरल संवेदनशीलता, ज्वलंत भावना व समतोलाची उत्कृष्ट जाण हे त्यांच्या काव्याचे विशेष होत. त्यांनी भूत व भविष्य ह्या दोन्ही काळांचे भान ठेवून आपली काव्यरचना करुन असमिया काव्यात नवे युग आणले.

विविध नियतकालीकांतून क्रमशः प्रसिद्ध झालेले त्यांचे गद्यलेखन अद्याप ग्रंथरुपाने प्रसिद्ध व्हावयाचे आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : तुपिर दोकान, अष्टावकार आत्मजीवनी, कसारी जातीर चुरंजी, मॉर मनःतापार कथा इत्यादी.

गोस्वामी, इंदिरा(इं.) मिरजकर, ललिता (म.)