ऑटोक्लेव्ह: पदार्थामधील जंतूंचा नाश करण्यासाठी किंवा रासायनिक प्रक्रिया सुलभ रीतीने घडविण्यासाठी बनविलेले पात्र. डायोनिसियस पेपिन यांनी १६८१ साली अशा पात्राचा उपयोग सुरू केला. हे पात्र मजबूत पोलादी पत्र्याचे किंवा ब्राँझचे बनविलेले असते व त्याचा आकार पिपासारखा असतो. या पात्रात जंतुयुक्त पदार्थ ठेवून दाबयुक्त वाफ भरली म्हणजे काही कालानंतर वाफेतील उष्णतेमुळे पदार्थातील सूक्ष्मजीव व त्यांचे बीजाणू (लाक्षणिक प्रजोत्पादक भाग) यांचा नाश होतो. अशा पात्रास एक मजबूत झाकण असते व त्यावर वाफेचे तपमान व दाब दाखविणारी मापके असतात. दाब मर्यादेबाहेर वाढल्यास आतील वाफ आपोआप बाहेर सोडणारी सुरक्षा झडप असते. निरनिराळ्या औद्योगिक प्रक्रियांसाठी व प्रयोगशाळेतील कामांकरिता निरनिराळ्या आकारमानांची पात्रे बनवितात. पदार्थामधील जंतू मारण्याकरिता १००° से. पेक्षा थोडे जास्त तपमान लागते. याकरिता वाफेचा दाब १ किग्रॅ. प्रति चौ. सेंमी. ठेवून जंतुयुक्त पदार्थ १५ ते ३० मिनिटे पात्रात ठेवतात. रासायनिक प्रक्रियेसाठी ७ किग्रॅ. प्रति. चौ.सेंमी. दाब व ३००° से. तपमान ठेवता येते. लहान आकारमानाचे पदार्थ सु. १२०° तपमानावर १५ मिनिटे ठेवतात व मोठ्या आकारमानाचे पदार्थ २० मिनिटे ठेवतात.

घन व द्रव संवर्धके (जंतू वाढविण्यासाठी वापरण्यात येणारे माध्यम पदार्थ), पाणी, रबरी नळ्या व हातमोजे, शस्त्रक्रियेची उपकरणे, माती  असे पदार्थ निर्जंतुक करण्यास हे पात्र फार उपयोगी पडते. तसेच संघनन (दोन अथवा अधिक रेणू एकत्र करून लांब साखळीची संयुगे बनविणे), कार्‌बॉक्सिल गट व हायड्रोजन यांचा पदार्थात समावेश करणाऱ्या कार्‌बॉक्सिलीकरण व हायड्रोजनीकरण या प्रक्रिया, अमोनियापासून अमाइने तयार करताना करण्यात येणारी अमिनीकरण प्रकिया इ. रासायनिक प्रक्रियांत अशा पात्रांचा नेहमी उपयोग करतात. अशा पात्रात दाबयुक्त वाफ भरण्यापूर्वी आत असलेली हवा पूर्णपणे बाहेर काढून टाकावी लागते.

डब्यामध्ये भरावयाचे खाद्यपदार्थ निर्जंतुक करण्यासाठी ते ऑटोक्लेव्हमध्ये काही काळ ठेवतात. डांबरापासून रंग तयार करताना अशा पात्रांचा चांगला उपयोग होतो.

रासायनिक प्रक्रिया करताना पुष्कळ ठिकाणी पात्रामधील रसायने तापत असताना ती घुसळावी लागतात. याकरिता पात्र तिरपे ठेवून ते यांत्रिक शक्तीने हळूहळू फिरवितात किंवा पात्र स्थिर ठेवून पात्रावर एक व़िद्युत् चलित्र (मोटार) बसवितात व त्याच्या शक्तीने पात्राच्या आत ठेवलेली रवी हळूहळू फिरवितात. पात्रामध्ये दाबयुक्त वाफ पुरविण्याकरिता स्वतंत्र बाष्पित्र (बॉयलर) ठेवतात किंवा पात्रामध्येच पाणी घालून ते बाहेरून तापवितात. उष्णता मिळविण्यासाठी वाफ किंवा उष्ण तेल यांनी भरलेल्या आवरणाचा किंवा विद्युत् शक्तीचाही उपयोग करतात.

स्वयंपाकघरात वापरण्यात येणारी दाबपात्रे (प्रेशर कुकर) ही ऑटोक्लेव्हच्या तत्त्वावरच बनविलेली असतात.

कुलकर्णी, नी. बा.