एरेनबर्क, क्रिस्तिआन गोटफ्रीट : (१९ एप्रिल १७९५­­­—२७ जून १८७६). जर्मन जीववैज्ञानिक. त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्रात महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्या जन्म सॅक्सनी प्रांतातील डेलिच येथे झाला. त्यांचे शिक्षण लाइपसिक व बर्लिन विद्यापीठांत झाले. तेथे त्यांनी वैद्यकाचा अभ्यास केला. १८२७ मध्ये बर्लिन विद्यापीठात वैद्यकाच्या इतिहासाच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. १८२०­­­–२५ ह्या काळात ईजिप्त, इथिओपिया, अरबस्तान व सिरिया ह्या प्रदेशांत आणि १८२९ मध्ये उरल-अलताई पर्वत प्रदेशात त्यांनी शास्त्रीय संशोधन केले.

सूक्ष्मजीवांसंबंधी त्यांनी केलेल्या कार्यामुळे वर्गीकरणात्मक सूक्ष्मजंतुशास्त्र आणि आदिजीवविज्ञान (अमीबासारख्या एकपेशीय आदिजीवांचे अध्ययन करणारे शास्त्र) या शास्त्रांचा पाया घातला गेला. बर्लिन विद्यापीठात प्राध्यापक असतानाच त्यांनी सूक्ष्मजीवांसंबंधी सखोल अभ्यास केला. स्पोरोडिनियाग्रँडिस या बुरशीच्या संयुग्मनाचे (नवीन जीव निर्माण करण्यासाठी दोन पेशींचा संयोग होण्याच्या क्रियेचे) निरीक्षण करून बुरशीमध्ये लैंगिक युती आढळते, असे त्यांनी १८१८ मध्ये दाखवून दिले. Die Infusionstheircher als Volkommene Organismen हा १८३८ मध्ये प्रसिद्ध झालेला त्यांचा ग्रंथ, हे त्यांचे सर्वांत महत्त्वाचे कार्य समजण्यात येते. या ग्रंथात त्यांनी त्यावेळी माहीत असलेले सर्व सूक्ष्मजंतू व प्रोटोझोआ (आदिजीव संघ) तसेच रोटिफरे [→ रोटिफर], डायाटमे [बॅसिलॅरिओफायसी वर्गातील एकपेशीय किंवा वसाहत करून राहणारी शैवले, → डायाटम] व डेस्मिडे (गोड्या पाण्यातील सूक्ष्मदर्शी शेवाळ) यांचे ‘इन्फ्युझोरिया’ या नावाखाली सचित्र वर्णन दिलेले होते. उच्च प्राणी व वनस्पती यांच्या वर्गीकरणाबाबत लिनीअस यांनी जितके महत्त्वाचे कार्य केले तितकेच महत्त्वाचे कार्य एरेनबर्क यांनी सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणासंबंधी केले. ­­­‘इन्फ्युझोरिया­­­’ (सिलिएटा) या वर्गातील सर्व जीव बहुकोशिक (अनेक कोशिका म्हणजे पेशी असलेले) असून त्यांची अंतर्गत संरचना उच्च प्राण्यांसारखीच आहे असे त्यांनी मानले होते. तथापि हे चुकीचे आहे असे नंतर आढळून आले. त्यांनी दिलेल्या वर्गनामांपैकी काही वर्गनामे अद्यापिही प्रचारात आहेत. सागरात आढळणारी प्रस्फुरता (अल्प उष्णतेसह निर्माण होणारा प्रकाश) ही बऱ्याच सूक्ष्मजीवांमुळे निर्माण होते असेही त्यांनी दाखवून दिले. सूक्ष्मजीवांच्या जीवाश्मांसंबंधीचा (अवशेषरूपांसंबंधीचा) Mikrogeologie (१८५४) हा त्यांचा ग्रंथही महत्त्वाचा मानण्यात येतो.

त्यांनी केलेल्या शास्त्रीय कार्यामुळे बर्लिन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१८२७), लंडनची रॉयल सोसायटी (१८३७) इ. अनेक शास्त्रीय संस्थांच्या सदस्यत्त्वाचा त्यांना बहुमान मिळाला. ते बर्लिन येथे मृत्यू पावले.

कुलकर्णी, नी. बा.