पॅल्मायरा: सिरियाच्या हॉम्स राज्यातील प्राचीन शहर. टॅड्मॉर या प्राचीन नावानेच ते सांप्रत ओळखले जाते. लोकसंख्या १२,७२२ (१९७०). हे गाव सिरियन वाळवंटाच्या उत्तर सरहद्दीलगत मरूद्यानात वसले असून, दमास्कसच्या ईशान्येस सु. २४१ किमी. वर आहे. सिरियन वाळवंटातून पूर्व-पश्चिम जाणाऱ्या मार्गांवरील प्रस्थानक आणि किर्कूक – ट्रिपोली या शहरांदरम्यानच्या तेलनळालगत वसले असल्याने यास महत्त्व प्राप्त झाले आहे.

बायबलच्या ‘जुन्या करारा’ त टॅड्मॉर असाच याचा उल्लेख आढळतो. पॅल्मायरा (ताड वृक्षांचे नगर) हे याचे ग्रीक व लॅटिन नाव होय. याची स्थापना इ. स. पू. दहाव्या शतकात सॉलोमनने केली, असा समज आहे. कॅपाडोशियन इष्टिका-लेखावरील उल्लेखावरून टॅड्मॉर व तेथील वस्ती इ. स. पू. एकोणिसाव्या शतकापासून असावी. इ. स. पू. तिसऱ्या शतकात सेल्यूसिडांनी पूर्व-पश्चिम व्यापारासाठी पॅल्मायरामधून रस्ता काढला आणि दोन शतकांनंतर या व्यापाराला व त्याचबरोबर पॅल्मायराला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. रोमन काळात सेप्टिमीअस ऑडिनेथसने हे एक बलवान राज्य बनविले व त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी झिनोबिआ हिने अल्पकालात त्याचा विस्तार केला. इ. स. २७२ साली रोमन सम्राट ऑरीलिअनशी झालेल्या युद्धात झिनोबिआचा पूर्ण पाडाव झाला व शहर अंशतः नष्ट केले गेले. अशा अवनतीच्या काळातच सातव्या शतकात त्यावर अरबांची सत्ता आली व उत्तरोत्तर शहराचा ऱ्हास झाला.

येथील उत्खननांत सापडलेल्या अवशेषांपैकी स्मारकांच्या कमानी, बेअल या देवतेचे मंदिर (पहिले शतक), ग्रीक सभास्थान (दुसरे शतक), रंगमंच, आयताकृती पथिकशाला इ. उल्लेखनीय आहेत.  

खांडवे, म. अ.