शीआन : (चांगान, शीजिंग). चीनमधील शेन्सी प्रांताची राजधानी व इतिहासप्रसिद्ध शहर. लोकसंख्या २९,९०,००० (१९९५). मध्य चीनमधील लोएस मैदानी प्रदेशात, वे नदीच्या दक्षिण तीरावर आणि पूर्व-पश्चिम जाणार्यार महत्त्वपूर्ण लुंगहाई लोहमार्गावर हे वसले आहे. प्राचीन काळापासून वेगवेगळ्या राजवटीत हे राजधानीचे ठिकाण होते. काही शतके संपूर्ण चीनची ही राजधानी होती. प्राचीन काळी सांप्रतच्या शीआन शहराच्या जवळच, वायव्येस शीएनयांग शहर होते. तेच चीन राज्याच्या (इ. स. पू. २५५-२०६) राजधानीचे ठिकाण होते. पुढे हे शहर चांगान नावाने ओळखले जाऊ लागले. ते दीर्घकाळ राजधानीचे शहर होते. पूर्वी शहराला तटबंदी केलेली होती. वांग मांगच्या राजवटीत (इ. स. ९-२३) या शहराची खूप हानी झाली. थांग राजवटीत (इ. स. ६१८-९०६) या शहराचा विस्तार होऊन ते जगातील सर्वांत मोठ्या व वैभवशाली शहरांपैकी एक बनले. येथील चांगान विद्यापीठ प्रसिद्ध होते. थांग राजवटीच्या अस्तानंतर या शहराचे महत्त्व कमी झाले.
तेराव्या शतकात मार्को पोलोने या शहराला भेट दिली होती. एक वैभवशाली व्यापारी केंद्र म्हणून त्याने या शहराचे वर्णन केले आहे. मिंग वंशाच्या कारकीर्दीत (१३६८-१६४४) शहराला शीआन हे लोकप्रिय नाव देण्यात आले. त्यावेळी शहराभोवती १६ किमी. लांबीची तटबंदी होती. १८४८-१८६५ या काळात झालेल्या ताइपिंग बंडात शहराची बरीच हानी झाली. १९१३ मध्ये चांगान, १९३२ मध्ये शीजिंग तर १९४३ मध्ये पुन्हा शीआन अशी या शहराची नामांतरे झाली. बौद्ध, मुस्लिम, ज्यू आणि नेस्टोरियन ख्रिश्चन मिशनरी या सर्वांची वस्ती असणारे चीनधील हे पहिले मोठे शहर होय. याच शहरात चँग-कै-शेक याचे त्याच्याच हाताखालील मँच्युरियन लष्करप्रमुख चँग स्यू-लिआंग याने व्यपहरण करून त्याला तुरुंगात डांबले (२१ डिसेंबर १९३६). मँचुरियावरील जपानी आक्रमण हटविण्यासाठी राष्ट्रवादी व कम्युनिस्ट यांची संयुक्त आघाडी स्थापन करण्याची मागणी मान्य करून घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. चँग-कै-शेकने ती मान्य केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली (२५ डिसेंबर १९३६). आधुनिक चीनच्या इतिहासातील हे शीआन प्रकरण त्यावेळी बरेच गाजले.
औद्योगिकदृष्ट्या शीआन प्रगत आहे. कापडउद्योग, अन्नप्रक्रिया, यंत्रनिर्मिती, लोह-पोलाद, बांधकाम साहित्य, सिमेंट, खते, रसायने, मोटारी, विद्युत् उपकरणे इत्यादींचे निर्मिती-उद्योग शहरात आहेत. एक मोठा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पही येथे आहे. प्राचीन काळापासून व्यापारीदृष्ट्या हे महत्त्वाचे केंद्र आहे.
थांग राजवटीतील पॅगोडे, मिंग राजवटीतील बेल टॉवर, ड्रम टॉवर, इतिहासकालीन तटबंदी, मशीद (७४२) इ. वास्तू त्यांच्या अवशिष्ट स्वरूपात येथे पहावयास मिळतात. शहराच्या दक्षिणेस शेन्सी प्रांतिक संग्रहालय असून त्यात नेस्टोरियन वसाहतीचा इतिहास कोरलेल्या एक हजारांवर दगडी विटा व इतर स्मारक वस्तूंचा संग्रह आहे. नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अड टेक्नॉलॉजी, नॉर्थ वेस्टर्न इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वैद्यकीय महाविद्यालय, तंत्रशिक्षण व इतर अनेक शैक्षणिक संस्था येथे आहेत.
चौधरी, वसंत