शुक्रवार : आठवड्यातील सहावा वार. शुक्र या ग्रहावरून हे नाव पडले. या दिवशी पहिल्या होऱ्याचा अधिपती शुक्र असतो. हिंदूंमध्ये हा देवीचा वार मानला जातो. भाविक लोक श्रावण शुक्रवार अधिक शुभ समजतात. देवीची उपासना म्हणून कोणी अर्धा उपवास करतात. श्रावण शुक्रवारी सुवासिनींना हळदीकुंकू देतात. श्रावण पौर्णिमा शुक्रवारी आली, तर वरलक्ष्मीचे व्रत करतात.

मुसलमान शुक्रवार शुभ मानतात. शुक्रवारी पहिला मानव जन्मला, सूर्य प्रथम शुक्रवारी उगवला, एका शुक्रवारी सगळे मृत जिवंत होतील अशा काही समजुती मुसलमानांत आहेत. हा त्यांच्यात उपवासाचाही दिवस आहे.    

जर्मनीतल्या ओडीन या देवाच्या फ्रिग (प्रेम) या पत्नीच्या नावावरून यास फ्रायडे हे नाव आले. येशू ख्रिस्ताला शुक्रवारी क्रुसावर चढविले म्हणून शुक्रवार हा त्याचा स्मृतिदिन आहे. ईस्टर या सणाच्या अगोदर दोन दिवस येणारा शुक्रवार हा गुडफ्रायडे म्हणून ज्ञात आहे. पोलंड-रशियात ग्रेट फ्रायडे, फिनलंडमध्ये लाँग फ्रायडे, सीरियात सॉरोफुल फ्रायडे अशी गुडफ्रायडेला नावे आहेत. धर्मोपदेशक या दिवशी काळा कपडा वापरतात म्हणून याला ब्लॅक फ्रायडेही म्हणतात. हा त्यांचा उपवासाचाही दिवस असतो. १३ तारीख शुक्रवारी आली, तर अशुभ समजण्यात येते.

ठाकूर, अ. ना.