मिथुन: (जेमिनी). भारतीय राशिचक्रातील तिसरी रास. मृगाचे शेवटचे दोन चरण, आर्द्रा व पुनर्वसूचे पहिले तीन चरण मिळून ही रास होते. या राशीचा स्वामी बुध असून हिच्यात राहू उच्चीचा मानतात. ही रास द्विस्वभावी, वायुतत्त्वाची, अल्पप्रसव आणि शूद्रवर्णी मानतात. सायन मिथुन राशीत सूर्य २१ मे ते २२ जूनपर्यंत असतो. सूर्य २२ जूनला उत्तर संस्तंभी असतो (त्याची उत्तर क्रांती सर्वांत जास्त असते) तेव्हा तो या राशीतील तेजत नावाच्या ताऱ्याजवळ असतो. फेब्रुवारी महिन्याच्या मध्याच्या सुमारास पूर्व रात्री ही रास मध्यमंडलावर येते. या राशीचा मध्य मृगाच्या ईशान्येस होरा ७ तास व क्रांती + २३°[⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धती] येथे आहे. या राशीत ⇨ कॅस्टर व ⇨ पोलक्स हे एकमेकांपासून ४°·७ अंतरावर असलेले दोन ठळक तारे असून यांपैकी पोलक्स अधिक तेजस्वी आहे. त्यामुळे इजिप्तमध्ये दोन बोकड, अरबी ज्योतिषशास्त्रात दोन मोर आणि ग्रीक पुराण कथांमध्ये दोन जुळी मुले अशी या ताऱ्यांविषयी कल्पना केलेली आहे. हे दोन तारे ही या मुलांची डोकी असून नैर्ऋत्येस असलेल्या आकाशगंगेत त्यांचे पाय आहेत. या दोन ताऱ्यांपासून निघून मृग नक्षत्राच्या दिशेने जाणाऱ्या अंधुक दोन समांतर रांगा दिसतात. प्रजापती व कुबेर हे दोन ग्रह प्रथम आढळले तेव्हा ते या राशीत होते. हिच्या क्षेत्रात नुसत्या डोळ्यांनी दिसू शकतील असे सु. १२१ तारे आहेत यांपैकी ३ ऱ्या प्रतीपर्यंतचे [⟶ प्रत] ११ तारे आहेत. या राशीने खगोलाचे ७१३·८ चौ. अंश (अरीयमान) क्षेत्र व्यापिले आहे. बायर यांनी या राशीतील ताऱ्यांना त्यांच्या दृश्य तेजस्वितेनुसार आल्फा, बीटा, गॅमा इ. ग्रीक अक्षरांच्या क्रमाने नावे दिली (१६०३). त्यावेळी कॅ स्टर हा पोलक्सपेक्षा अधिक तेजस्वी असल्याने त्याला आल्फा हे नाव देण्यात आले. मात्र तदनंतर त्याची तेजस्विता कमी झाली आहे.

कॅस्टर हा १७१९ मध्ये त्रिकूट असल्याचे जेम्स ब्रॅड्‌ली व जेम्स पाउंड यांना आढळले. त्याचे सहचर प्रत २·८ वर्णपटीय वर्ग A5 व प्रत२ वर्ग A1असे असून त्यांमधील अधिकतम अंतर ६·५ असले,तरी सध्या ते २आहे. तिसऱ्या ९ व्या प्रतीचा आणखी एक सहचर ७३दूर आढळला. हे सहचर ३५० वर्षे आवर्तकालाचे आहेत. हे तीनही सहचर वर्णपटीय युग्मतारे आहेत. त्यांचे आवर्तकाल ३, ९ व ०·८ दिवस आहेत. या बहुकूटाच्या गुरुत्वमध्यापासून १·२५ मिनिट अंतरावर हे सहचरअसून गुरुत्वमध्याभोवती बहुकूटाचा आवर्तकाल १० लक्ष वर्षांहूनही अधिक असेल. कॅस्टर हा सहा ताऱ्यांचा समूह आहे. कॅस्टरपाशी जेमिनाइड उल्कावृष्टीचे उद्‌गमस्थान असून १३ डिसेंबरला या उल्कावृष्टीची तीव्रता अधिकतम असते. दर तासाला जास्तीत जास्त २० उल्का येथून बाहेर पडतात. पोलक्स हा पृथ्वीचा सर्वांत जवळचा महातारा आहे. मिथु न राशीमध्ये अनेक तारकागुच्छांची मालिका असून साध्या डोळ्यांना दिसणारा व ४० मिनीटे व्यासाचा एम ३५ हा प्रमुख तारकागुच्छ होरा६ तास ४ मिनिटेक्रांती + २४°२०’ या ठिकाणी आहे. यामध्ये १२०तारेअसून ते २,६०० प्रकाशवर्षे दूर आहेत. एप्सायलॉन, जेमिनोरम व झांटा टौरी यांच्यामध्ये तो आहे. सीफाइड चल व झीटा जेमिनोरम हे दोन चल तारे १० दिवस अंतराने तेजस्वितेचे आवर्तन पुरे करतात आणि ईटा जेमिनोरम हा तांबडा असून त्याची तेजस्विता अनियमितपणे बदलते. १९१२ मध्ये मिथुनमध्ये एक नवतारा (ज्याची दीप्ती अचानकपणे प्रचंड प्रमाणात वाढते असा तारा) सापडला होता. त्याची प्रत ३ ते १४ पर्यंत बदलली आहे.

ठाकूर, अ.ना.