वॉशिटॉ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी आर्कॅन्सॉ व लुइझिॲना राज्यांतून वाहणारी नदी. लांबी ९७४ किमी. पश्चिम-मध्य आर्कॅन्सॉमधील वॉशिटॉ पर्वतात उगम पावणारी ही नदी प्रथम पूर्वेस व आग्नेयीस वाहत गेल्यानंतर पुढे दक्षिणवाहिनी होऊन लुइझिॲनामध्ये वाहत जाते. एका इंडियन जमातीवरून नदीचे वॉशिटॉ हे नाव आलेले आहे. बेफ, टेन्सॉ, बार्थॉलोम्यू व सलीन ह्या वॉशिटॉच्या प्रमुख उपनद्या आहेत. वॉशिटॉला टेन्सॉ नदी मिळाल्यानंतरचा ९२ किमी. लांबीचा प्रवाह सामान्यपणे ब्लॅक नदी म्हणून ओळखला जातो. वॉशिटॉ (ब्लॅक) नदी लुइझिॲना राज्याच्या पूर्वमध्य भागात रेड नदीला मिळते. वॉशिटॉ-रेड यांचा संयुक्त प्रवाह पुढे मिसिसिपीला मिळतो.

नदीतून ५६३ किमी. अंतरापर्यंत म्हणजे कॅमडेनपर्यंत मोठी जहाजे बारमाही जलवाहतूक करू शकतात. अधिक पाणी असलेल्या साधारण आठ महिन्यांच्या काळात आणखी पुढे ११० किमी. म्हणजेच अर्काडेल्फियापर्यंत जहाजे जाऊ शकतात. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून वॉशिटॉ नदीचा जलवाहतुकीस उपयोग केला जात असल्याचे आढळते. १९२४ पूर्वी या नदीवर सहा जलपाश व धरणे बांधलेली होती. नदीच्या वरच्या टप्प्यात जलविद्युत्निर्मिती, पूरनियंत्रण व मनोरंजन या दृष्टींनी तीन बहूद्देशीय प्रकल्प उभारलेले आहेत. हॉट स्प्रिंग्जजवळील रेमेल (१९२५), कार्पेंटर (१९३१) व ब्लॅकली मौंटन (१९५५) या तीन बहूद्देशीय धरणांमुळे अनुक्रमे कॅथरिन, हॅमिल्टन व वॉशिटॉ ही सरोवरे निर्माण झाली आहेत. यांपैकी ब्लॅक्ली मौंटन धरणाची ७५,००० किवॉ. वीजनिर्मितिक्षमता आहे. हॉट स्प्रिंग्ज, अर्काडेल्फिया, कॅमडेन, मन्रो ही नदीकाठावरील प्रमुख शहरे आहेत.

चौधरी, वसंत.