मेडलीन : कोलंबियातील बोगोटानंतर दुसऱ्या क्रमांकाचे औद्योगिक शहर आणि आंत्योक्या विभागाची राजधानी. लोकसंख्या १८,१२,००० (१९८०). हे बोगोटाच्या वायव्येस २४० किमी.वर अँडीज पर्वतप्रदेशात सस. पासून सु. १,५२० मी. उंचीवर पॉर्से नदीकाठी वसले आहे.

खाण उद्योगासाठी या नगराची १६७५ मध्ये स्थापना झाली. एकोणिसाव्या शतकात सडका, लोहमार्ग आणि इतर दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने औद्योगिक दृष्ट्या या शहराची झपाट्याने प्रगती झाली. हे शहर हवाई व लोहमार्ग यांनी देशातील महत्त्वाच्या शहरांशी जोडलेले आहे.

कापडउद्योग हा येथील प्रगत उद्योग असून कोलंबियातील एकूण कापडउत्पादनाच्या ७५% कापडनिर्मिती शहरात होते. त्यामुळे या शहराला ‘कोलंबियाचे मँचेस्टर’ म्हटले जाते. अन्य उद्योगांत सिमेंट, पोलाद, काच, मृत्पात्रे, चॉकोलेट आदींचा अंतर्भाव होतो. हे कॉफी-उत्पादनाचे कोलंबियातील प्रमुख केंद्र असून येथे तंबाखूचाही व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. याच्या परिसरातील सोन्याचांदीच्या खाणी प्रसिद्ध आहेत. शहरात अनेक उद्यान तसेच पाच विद्यापीठे आहेत.

मिसार, म. व्यं.