रिव्हर्स, विल्यम हॉल्स रिव्हर्स : (१२ मार्च १८६४−४ जून १९२२). ब्रिटिश मानवसास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ. त्याचा जन्म केन्ट परगण्यातील लूटन नावाच्या खेड्यात एका सुखवस्तू कुटुंबात झाला. त्याने टनब्रिज स्कूल आणि सेंट बार्थालोमेऊ रुग्णालयात (लंडन) शिक्षण घेऊन वैद्यकातील पदवी मिळवली. त्यानंतर त्याने देहमनाच्या परस्परावरील परिणामासंबंधीच्या विविध समस्यांवर लक्ष केंद्रित केले. मद्यसेवन व मादक द्रव्यांचा मानसिक प्रभाव आणि त्यांपासून निर्माण झालेला मानसिक ताण यासंबंधी चिकित्सक लेछन केले. पुढे द इनफ्यूअन्स ऑफ अल्कोहोल अँड अदर ड्रग्ज ऑफ फटीग (१९०८) हे त्याचे पुस्तक प्रसिद्ध झाले. मानसशास्त्रज्ञ म्हणून त्यास नावलौकिक मिळाला. तत्पूर्वी लंडन विद्यापीठाने सुरू केलेल्या इंग्लंडमधील पहिल्या प्रायोगिक मानसशास्त्रीय प्रयोगशाळेचे संचालकपद त्यास देण्यात आले (१८९७). त्याच वर्षी केंब्रिज विद्यापीठाने त्याची अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती केली. तेथे त्याने प्रायोगिक मानसशास्त्राच्या अभ्यासाची प्रशाला सुरू केली. १८९८ मध्ये त्याने केंब्रिज विद्यापीठाने आयोजित केलेल्या ए. सी. हॅडनच्या नेतृत्वाखालील टॉरस सामुद्रधुनीच्या सर्वेक्षण सफरीत भाग घेतला (१८९८) आणि मेलानीशियातील लोकसमूहांचा क्षेत्राभ्यास केला. त्यानंतर त्याला केंब्रिज विद्यापीठाने छात्रवृत्ती दिली (१९०२). दक्षिण भारतातील निलगिरी पर्वतराज्यातील तोडा या भ्रातृक बहुपतित्व पाळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण जमातीचा त्याने क्षेत्राभ्यास केला. आपल्या या अभ्यासाचे तपशीलवार विवेचन त्याने अनुक्रमे द तोडाज (१९०६) आणि हिस्टरी ऑफ मेलानीशियन सोसायटी (दोन खंड−१९१४) या ग्रंथांत केले आहे. तोडा ही दक्षिण भारतातील बहुपतित्व पाळणारी, घरगुती दुभत्या जनावरांची सर्व व्यवस्था पुरुषांकडे असलेली व स्त्रियांना त्यात मज्जाव असलेली एक गवळी जमात असल्यामुळे, त्याचे विशेष रिव्हर्सने या ग्रंथात नोंदविले आहेत. मेलानीशियन समाजावर बाहेरून आलेल्या लहान मानव समूहांचा प्रभाव आहे. म्हणून तो समाज वांशिक दृष्टीने संकरजन्य असला, तरीही त्याची पृथगात्म अशी सांस्कृतिक वैशिष्ट्येही आहेत.

रिव्हर्सच्या वितारसरणीचे १९१५ नंतर जी. एलियट स्मिथ आणि डब्ल्यू. जे. पेरी या तत्कालीन उत्क्रांतीवादी तथा प्रसरणवादी विचारवंतांच्या मतांशी साम्य जाणवते. रिव्हर्सर्न आपल्या लिखाणातून सांस्कृतिक प्रसारणवादाचा पुरस्कारही केलेली आहे. त्याने नातेसंबंधांविषयी स्वतंत्र परिभाषा तयार केली. ती प्रामुख्याने किनशिप अँड सोशल ऑर्गनायझेशन (१९१४) या ग्रंथात दिसते. त्यातील काही संकल्पना ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्याची ब्रिटिश शासनाने मनोविकृतितज्ञ म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर उर्वरित आयुष्य त्याने वैद्यकीय मानसशास्त्राच्या संशोधन अभ्यासात व्यतीत केले. त्याचा इन्स्टिक्ट अँड द अनकॉन्शस (१९२०) हा ग्रंथ लक्षवेधक ठरला. शस्त्रक्रियेनंतर त्याचे आकस्मिक निधन झाले. उत्तर आयुष्यात त्याला अनेक मानसन्मान लाभले. त्याला सेंट अँड्र्यूज आणि मँचेस्टर या विद्यापीठांनी सन्मान्य डॉक्टरेट ही पदवी दिली. फोकलोअर सोसायटीचा आणि रॉयल अँथ्रपॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचा तो अध्यक्ष होता. (१९२०−२२).

संदर्भ : 1. Lowie. R. H. The History of Ethnological Theory, New York, 1937.

2. Mitchell, G. Duncan, Ed. A Dictionary of Sociology, London, 1968

देशपांडे, सु. र.