वैफल्यभावना : वैफल्य (फ्रस्ट्रेशन) हा दैनंदिन जीवनात येणारा अटळ व अप्रिय असा अनुभव असून निराशेचेच ते एक तीव्र स्वरूप आहे. एखाद्या महत्त्वाच्या उद्दिष्टाकडे नेणाऱ्या प्रेरणेला (ड्राइव्ह) किंवा क्रियेला (अँक्टिव्हिटी) आलेल्या अडथळ्यामुळे उदभवलेली मन:स्थिती, अशी वैफल्याची मानसशास्त्रीय व्याख्या आहे. ह्या वैफल्यभावनेवर मात करू न शकल्यास वैफल्याची प्रतिक्रिया म्हणून आक्रमकता निर्माण होते किंबहुना डॉलर्ड आणि मिलर ह्यांच्यासारख्या काही मानसशास्त्रज्ञांच्या मते तर वैफल्य हेच आक्रमकतेचे मुख्य कारण होय (‘फ्रस्ट्रेशन-अँग्रेशन हायपॉथिसिस’ १९३९) असे त्यांनी प्राण्यांवरील मानसशास्त्रीय प्रयोगाने सिद्ध केलेले आहे. ⇨सिग्मंड फ्रॉइड ह्यांनी सर्व वैफल्यभावना या अहं, इदम आणि पराहम ह्यांच्यात होणाऱ्या द्वंद्वामुळे निर्माण होतात, असे गृहीत धरले आहे.    

वैफल्यभावना निर्माण करणारे अडथळे-वर दिलेल्या व्याख्येप्रमाणे असे आहेत : (१) प्रतिकूल परिस्थिती वा परिसर, (२) सामाजिक बंधने (नीती), (३) वैयक्तिक उणिवा वा मर्यादा, (४) मनोविग्रह वा मनातला आंतरिक संघर्ष. त्याखेरीज प्रतिकूल परिस्थितीत संकटे, अपघात, मृत्यू, वाईट हवामान-उदा., अचानक वा सतत पाऊस-समाविष्ट आहेत. सामाजिक कारणांमध्ये जड जाणारी धार्मिक वा शैक्षणिक कर्तव्ये त्याचप्रमाणे वारंवार येणारे अपयश, मोठे नुकसान ही कारणे महत्त्वाची आहेत. वैयक्तिक उणिवांत कच्चे व्यक्तिमत्त्व (इनअँडिक्केट पर्सनॅलिटी), कडक पराहम, अनिश्चित उद्दिष्टे, वर्तनावर लादलेले नैतिक नियंत्रण आणि अत्युच्च उद्दिष्टे साधण्यात वास्तवतेचा आलेला अडथळा ही महत्त्वाची आहेत. मनोविग्रहात उद्दिष्टे अथवा मूल्ये परस्परविरोधी असल्यामुळे मन द्विधा होऊन प्रेरणाहीन बनते.    

वैफल्यभावनेचा उगम जन्मापासून होतो, असे बरेच मानसशास्त्रज्ञ मानतात. मातेच्या उबदार, शांत, सुरक्षित अशा उदरातून अचानक बाहेरच्या थंडगार, अपरिचित व घाबरवून टाकणाऱ्या गोंधळात ढकलून दिल्यामुळे मोठ्या भयप्रद निराशेला सुरूवात होते. अर्भकावस्थेत अनेक अप्रिय अनुभवांची सक्ती होते. उदा., आंघोळ, बोचरे कपडे, औषधे, इंजेक्शने तसेच भूक शमण्यास लागणारा अनाकलनीय विलंब इ. कारणांमुळेही वैफल्यभावना मनात सतत उदभवते. पुढे बाल्यावस्थेत नैसर्गिक कुतूहल, प्रेरणा त्याचप्रमाणे समन्वेषक वृत्ती ह्यांना वडीलधाऱ्यांच्या नकारामुळे अनेकदा अडथळे येऊन वैफल्यभावना वारंवार निर्माण होत असते. परंतु अशा अडथळ्यांवर यशस्वी मात केल्याचा प्रभावी अनुभव गोळा होतो आणि वैफल्य सोसण्याची ताकद निर्माण होते.    

वैफल्यभावनेला कारणीभूत असलेली व सर्रास आढळणारी काही उदाहरणे अशी : (१) छोटी छोटी उद्दिष्टे गाठण्यास लागणारा अटळ विलंब. तसेच ती गाठण्यासाठी जवळ नसलेला वेळ, पैसा, ताकद वा संधी. त्याचप्रमाणे गरिबी आणि सामाजिक भेदभाव ह्यांमुळे झालेली गळचेपी. (२) उद्दिष्टे गाठण्याच्या अट्टाहसात धार्मिक बंधने व सामाजिक संकेत न पाळल्यामुळे निर्माण होणारी अपराधी भावना तसेच मनोविग्रह. मनोविग्रह हे एक प्रकारचे वैफल्यच होय कारण मनाचा ठाम निश्चय न झाल्यामुळे जे आंतरिक द्वंद्व उदभवते, ते उद्दिष्टाकडे जाऊच देत नाही. वैफल्य टिकून राहिल्यामुळे दूषित पूर्वग्रहही निर्माण होतात. वैफल्यभावनेचे लगेच दिसणारे परिणाम असे: (1) भावनाक्षोभ- राग, दु:ख, चिंता व भीती ह्या भावना उफाळून येतात. ह्या भावना जेंव्हा सुप्त असतात, तेंव्हा ताणावस्था (टेन्शन स्टेट) निर्माण होते. तिची अप्रिय जाणीव झाली, तरी स्वरूप समजत नाही मात्र त्यामुळे ती ताणावस्था दोर करण्यासाठी व्यक्ती प्रेरित होते. (2) आक्रमकता – ही काही वेळा वेगळ्याच दिशेने म्हणजे ‘वड्याचे तेल वांग्यावर’ ह्या म्हणीप्रमाणे प्रकट होते. (3) काही वेळा उद्दिष्ट तितकेसे महत्त्वाचे नसेल, किंवा प्रेरणा क्षीण असेल, तर माघार घेतली जाते. प्रेरणा तीव्र असल्यास प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. इतरांची मदत घेऊन किंवा नवीन कौशल्य वा मार्ग पतरकरून उद्दिष्ट गाठले जाते आणि समस्या सोडविली जाते. वैफल्य टिकून राहिल्यास मात्र पूर्वदूषित ग्रह किंवा काही गंड निर्माण होतात. बऱ्याच वेळा उद्दिष्ट गाठण्यात वा समस्या सोडविण्यात यश न आल्यास आत्मप्रतिमेला (अहं) धक्का लागू नये, म्हणून संरक्षणयंत्रणांचा वापर केला जातो. अशा संरक्षणयंत्रणांत परागती हा प्रकार जास्त प्रचलित आहे.    

अशा निरनिराळ्या मार्गांनी वैफल्यभावना आटोक्यात आणण्यात यश आल्यास वैफल्य सोसण्याची ताकद निर्माण होते आणि समायोजन यशस्वी होते. ही सोशिकता उपजत मनोबळामुळे, त्याचप्रमाणे लहानपणीच वैफल्यभावनेवर मात करणे शिकल्यामुळे दृढ होते आणि मोठेपणी वैफल्य निर्माण करणाऱ्या समस्या सोडविणे सोपे जाते. त्याचप्रमाणे व्यक्तिविकासालाही मदत होते, तसेच स्वभाव तापट व आततायी बनतो. सामाजिक परिसराशी जुळवून घेणे जड जाते. अतिरेकी महत्त्वाकांक्षा बाळगण्यामुळे काही वेळा तीव्र वैफल्यभावना निर्माण होऊन मनोविकारही जडतात. प्रणालित संभ्रमविकृती (परानोइया) ह्या मार्गाने उदभवते, असा काही मानसचिकित्सकांचा समज आहे.

संदर्भ : 1. Coleman, J. C. Psychology and Effective Behaviour, Bombay, 1971. 

             2. Mckeachie, W. J. Doyle, C. L. Addison, Wesley, Psychology, Mass, 1968.

    शिरवैकर, र. वै.