चिता : रशियाच्या मंगोलिया-मॅंचुरिया सीमेजवळील औद्योगिक शहर. लोकसंख्या २,४२,००० (१९७०). हे मॉस्कोपासून ४,८०० किमी. चिता-ईंगडा संगमाजवळ निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. ट्रान्स-सायबीरियन लोहमार्गामुळे व त्याच्या हार्बिन-मूकडेन फाट्यामुळे याची विशेष भरभराट झाली. रेल्वे एंजिने व डबे यांची दुरुस्ती, कातडी कमाविणे, मांससंवेष्टन, अन्नप्रक्रिया, लाकूड कापणे, विजेची यंत्रे बनविणे इ. उद्योग येथे चालतात. जवळपास लिग्नाइटच्या खाणी असून विभागीय संग्रहालय, तांत्रिक शिक्षणाच्या शाळा इ. सोयी येथे आहेत.

लिमये, दि. ह.