जमाव : (क्राउड). समूहामधील घटकव्यक्तींच्या विचारसरणीवर, भावनाविष्कारावर तसेच वर्तनावर त्यांच्या या समूहसदस्यत्वाचे परिणाम होत असतात. म्हणून सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी समूहाचे विविध प्रकार–उदा., कुटुंब, जनपद, मंडळे, संघटना यांसारखे कमीअधिक स्थायी स्वरूपाचे समूह, तसेच प्रेक्षकसमुदाय, श्रोतृवृंद, जमाव वा झुंड यांसारखे अल्पकालिक समूह–अवलोकन करून त्या परिणामांचा अभ्यास केला आहे व त्यांची कारणमीमांसाही केली आहे. त्यांपैकी जमाव वा झुंड हा समूहप्रकार अधिक लक्षवेधी होऊन बसला आहे.

ज्यांचे अवधान एकाच विषयावर केंद्रित आहे व त्या अवधानविषयास अनुलक्षून ज्यांच्या वैचारिक, भावनात्मक व शारीरिक प्रतिक्रिया होत आहेत, अशा पुष्कळशा व्यक्तींचा मर्यादित जागेत जमलेला समुदाय म्हणजे जमाव होय. जमावाचे अनेक प्रकार असतात तरीही जमावाची सर्वसामान्य लक्षणे अशी, की जमावातील व्यक्ती एकमेकींना स्पर्श होण्याइतक्या संनिध असतात. त्या सर्वांचा त्या वेळचा रसविषय एकच असतो त्या सर्व एकाच मनोभूमिकेवर आलेल्या असतात त्यांच्या विचारांत समानता आलेली असते त्यांच्या ठिकाणी एकच भावना निर्माण झालेली असते, या अर्थाने सर्वांची मूल्ये त्या क्षणी समान बनलेली असतात आणि सर्वांच्या प्रतिक्रिया एरवीपेक्षा तीव्र प्रमाणात होत असतात.

‘जमावा’चा व्यापक अर्थ घेतला, तर जमावाच्या सदरात पुढील प्रकारांचा समावेश होतो : लक्षवेधक घटना पाहण्यासाठी अचानक जमलेला समुदाय क्रीडा, स्पर्धा वगैरे पाहण्यासाठी आलेल्यांचा प्रेक्षकवृंद मोर्चे, घेराव, जाळपोळ वगैरेंत सामील झालेल्यांचा कृतिप्रवृत्त जमाव भयभीत जमाव भजन-पूजन, नृत्यादीरूपांनी भावनाभिव्यक्ती करण्यासाठी एकत्र आलेल्यांचा समुदाय इत्यादी. काही मानसशास्त्रज्ञांनी विवेचनाच्या दृष्टीने सोईस्कर असे पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले आहे : (१) सापेक्षतया निष्क्रिय जमाव. या सदरात, (अ) बघ्या लोकांचे प्रासंगिक व क्षणिक घोळके व (आ) खेळ पाहण्यासाठी किंवा व्याख्यान, प्रवचनादी ऐकण्यासाठी आलेल्या लोकांचे सहेतुक समुदाय, या प्रकारांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. (२) प्रक्षुब्ध व कृतिप्रवृत्त जमाव. या सदरात, (अ) सामुदायिक रीत्या भजन-पूजनादी भावाभिव्यक्तीत रंगलेल्यांचे मेळावे, (आ) भयभीत झालेले समुदाय, (इ) लुटालूट करणारे जमाव तसेच (ई) मोर्चे, घेराव, विध्वंसक कृत्ये इत्यादींत सामील झालेल्यांचे आक्रमक जमाव अथवा झुंडी यांचा समावेश होतो.

यांपैकी प्रक्षुब्ध व कृतिप्रवृत्त जमावांच्या व त्यातल्या त्यात झुंडींच्या वर्तनाने मानसशास्त्रज्ञांचे लक्ष विशेषकरून वेधून घेतले आहे. झुंडीचे वैशिष्ट्य तिच्यातील सर्व व्यक्तींचे अवधान एकाच गोष्टीवर असते हे नव्हे, किंवा झुंडीतील लोकांची संख्या फार मोठी असते, हेही नव्हे. तिचे वैशिष्ट्य तिच्या मनोवृत्तीत व वर्तनात असते. झुंडीत सामील झालेल्या व्यक्ती कोणी का असेनात चारित्र्यगुणांनी, बुद्धीने, व्यवसायाने वगैरे त्या सारख्या असोत वा भिन्न असोत, त्यांनी एकदा का झुंडीचे रूप धारण केले, की त्यांच्या विचारांत, वृत्तींत व वर्तनांत विलक्षण फरक पडतो इतका की जणू वेड लागलेल्या व्यक्तींप्रमाणे त्या वागू लागतात. त्यांची एरवीची विचारांची तसेच वर्तनाची पातळी सुटते त्यांच्या प्रेरणांवरील सुसंस्कृत बुद्धीचा अंकुश आणि औचित्याचा विवेक लुप्त होतो आणि बेजबाबदारपणा निर्माण होतो. तात्कालिक ऊर्मीच्या आहारी त्या जातात. अशा प्रसंगी चर्चा अथवा विचारविनिमय करण्याच्या किंवा कोणाचे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत त्या असत नाहीत. संमोहित मनुष्याप्रमाणे झुंडीतील माणसे सूचनवश बनलेली असतात. तर्कबुद्धी चालवून कार्याकार्यतेचा किंवा कानावर पडलेल्या अफवांच्या खरेखोटेपणाचा निर्णय करण्याची त्यांची क्षमता त्या वेळी लोपलेली असते. त्यांच्या भावनाक्षोभास कमालीचे उधाण आलेले असते. आपण संख्येने अनेकजण आहोत या विचाराने त्यांच्या ठिकाणी सामूहिक अहंकार, आत्मगौरवाची भावना आणि विरोधकांविषयी द्वेष आणि असहिष्णू वृत्ती तसेच वाटेल ते करण्यास आपण समर्थ असल्याची समजूत, या गोष्टी निर्माण होत असतात. वळण नसलेल्या मुलाच्या वर्तनाप्रमाणे वा रानटी माणसांप्रमाणे आणि कधीकधी तर प्रक्षुब्ध पशूंप्रमाणे झुंडीचे वर्तन असते. सारांश, झुंडीतील व्यक्तींमध्ये त्या वेळी समानधर्मता, भावनेचा प्रकर्ष, आपण सर्वशक्तिमान आहोत असा भ्रम, विवेकबुद्धीचा अभाव, आत्यंतिक सूचनवशता व बेजबाबदारपणाची वृत्ती ही मानसिक व वार्तनिक लक्षणे दिसून येतात. झुंडीतील व्यक्तींचे वर्तन त्यांच्याच एरवीच्या वर्तनाहून इतके विलक्षण व वेगळे असते, की जणू काय एक नवीन समूहमनच निर्माण झाले आहे आणि त्याने प्रत्येक व्यक्तिमनाचा ताबा घेतला आहे, असे वाटावे.

झुंडरूप जमावाच्या वर्तनाची कारणमीमांसा अनेक समाजशास्त्रज्ञांनी केली आहे. ग्यूस्ताव्ह ल बाँ (१८४१–१९३१) याच्या मते जमावामध्ये व्यक्ती अधिक सूचनवश बनते, स्वतःविषयीच्या एरवीच्या कल्पनेला ती पारखी होते व वाढलेल्या सूचनवशतेमुळे इतरांचे भावनाविष्कार पाहून तिचीही भावना पराकोटीस पोहोचते. तसेच संख्याबलामुळे जमावातील व्यक्तींना आपली शक्ती अदम्य आहे, असे वाटू लागते.

विल्यम मॅक्‌डूगल (१८७१–१९३८) याच्या मते जमावातील भावनाप्रकर्षाच्या मुळाशी प्राथमिक कोटीची सहानुभूती असते जमावात पुष्कळ लोक असल्याने प्रत्येकाची भावना अनेकगुणित व तीव्रतर बनत जाते आणि भावनेच्या प्राबल्यापायी व्यक्तीची तर्कबुद्धी आणि योग्यायोग्यतेचा विवेक लोप पावतो.

जमावाच्या वर्तनाच्या मीमांसेत व्यक्तींच्या प्रेरणा व वासना यांची दखल सिग्मंड फ्रॉइड, ई. डी. मार्टिन, एफ्. एच्. ऑल्पोर्ट वगैरेंनी घेतली आहे. फ्रॉइडच्या मते व्यक्तीच्या अबोध मनात ज्या दडपून टाकल्या गेलेल्या अतृप्त, असंस्कृत प्रेरणा असतात, त्यांना जमावामध्ये निरंकुश वाट मिळत असते. मार्टिनने याखेरीज असेही प्रतिपादन केले आहे, की व्यक्तीचा एरवी दबून राहिलेला अहंभाव झुंडीमध्ये सामुदायिक रूप धारण करतो व त्यापोटी कमालीचा दुराग्रह तसेच स्वतःच्या मोठेपणाचा व त्याबरोबरच आपले मोठेपण इतरांना सहन होत नाही, असा संभ्रम जमावातील व्यक्तीच्या ठायी उत्पन्न होतो. त्यातूनच द्वेषाची भावनाही निर्माण होत असते. ऑल्पोर्टच्या मते जमावामध्ये माणसांच्या क्षुधा, काम, स्वरक्षण इ. एरवीच्या मूलभूत व इतर प्रेरणाच पण अधिक प्रकर्षाने आणि भावनातिरेकाने अभिव्यक्त होत असतात. त्या वेळच्या प्रसंगाचे स्वरूप ठाऊक असल्याने अभिव्यक्त होऊ पाहणाऱ्या प्रेरणा सर्वांच्या सारख्याच असतात. प्रेरणांच्या व भावनांच्या प्रकर्षाला, जमावातील व्यक्तींच्या निकट सान्निध्यामुळे होणारे अन्योन्य उद्दीपन अनुकूल ठरत असते. स्वतःच्या वृत्ती इतरांना चिकटवण्याच्या प्रक्षेपण-प्रवृत्तीचीही त्यात भर पडते व जमावातील व्यक्तींचा असा समज होतो, की माझ्याप्रमाणेच सर्वांनाही वाटते आहे व माझ्याप्रमाणेच सर्वजण वागत आहेत.


एन्. जे. स्मेल्सर तसेच मुझफर शेरिफ यांनी समाजशास्त्रीय दृष्टिकोनाची जोड देऊन झुंडरूप जमावांच्या वर्तनाची कारणमीमांसा केली आहे. स्मेल्सरच्या मते जेव्हा समाजातील काही गटांना असे वाटू लागते, की समाजव्यवस्थेत आवश्यक असलेले परिवर्तन प्रचलित संस्थांच्या आणि संघटनांच्या द्वारा अशक्यप्राय आहे, तेव्हा जमाव निर्माण होऊ लागतात व एखादे निमित्तकारण मिळाले, की धुमसत असलेला असंतोष, वैफल्यभाव, द्वेष वगैरे सामुदायिक रूपाने व्यक्त होऊ लागतात. शेरिफने म्हटले आहे, की प्रक्षुब्ध जमावाच्या वर्तनाच्या निमित्ताने जुन्या समाजव्यवस्थेचे आणि तिच्यात अनुस्यूत असलेल्या मूल्यांचे विध्वंसन होत असते व नवीन मूल्यांचे सर्जन होत असते.

संदर्भ :

1. Canetti, Elias Trans. Stewart, Caro, Crowds and Power, London, 1962.

2. Lang, kurt Lang, Gladys, Collective Dynamics, New York, 1961.

3. Le Bon, Gustave, The Crowd, New York, 1947.

4. Smelser, N. J. Theory of Collective Behavior, London, 1963.

5. Turner, R. H. Killian, L. M. Collective Behavior, Englewood Cliffs, N. J., 1957.

अकोलकर, व. वि.