भयगंड : (फोबिया). भयगंड हे मानसिक विकृतिचे एक सामान्य लक्षण आहे. तिच्यामुळे व्यक्तीला एखाद्या विशिष्ट वस्तूची, प्राण्याची किंवा परिस्थितीची अवास्तव व असंयमित भीती वाटते. भीती ओसल्यावर ती निरर्थक आहे हे व्यक्तीला समजते. परंतु ती भयजनक वस्तू टाळण्याचा आवेग मात्र अनिवार्य होतो. हे लक्षण अनेक मनोविकृतींत आढळते. उदा., भयगंड मज्जाविकृती (फोबिक न्युरोसिस), चिंताजन्य मज्जाविकृती (अँगझायटी न्येरोसिस) भावातिरेकी सक्तियुक्त मज्जाविकृती (ऑबसेसिव्ह कंपल्सिव्ह कंपल्सिव्ह न्यूरोसिस), मज्जाविकृती आभासी छिन्नमानस (स्यूडोन्युरॉटिक स्किझोफ्रेनिया), बालमनोविकृती (चाइल्डहुड डिस्ऑर्डर्स).

भयगंडाच्या संकल्पनेत व मानसचिकित्साशास्त्रीय वर्गीकरणात विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत बराच बदल झालेला आहे. प्येअर झाने ह्या फ्रेंच मानसचिकित्सकाने भयगंडाचे वर्णन ‘सायकेस्थिया’ नामक विकारात केले होते. त्या विकाराची आधुनिक आवृत्ती म्हणजे भावातिरकी सक्तियुक्त मज्जाविकृत्ती. त्यानंतर फ्रॉइड यांनी तशाच लक्षणांच्या विकृतीचे वर्णन चिंतोन्माद (अँगझायटी हिस्टेरिया) ह्या संज्ञेने केले. काही वर्षापूर्वीच भयगंडात्मक लक्षणांचे प्राधान्य असलेल्या विकाराला भयगंडयुक्त मज्जाविकृती ही संज्ञा देऊन त्यांचे स्वतंत्र असितत्व मान्य केले गेले आहे. तोपर्यंत भयगंडात्मक लक्षणसमूह (सिंड्रोम) हा चिंताजन्य विकृती व भावातिरेकी सक्तियुक्त मज्जाविकृती या विकारांचाच एक भाग आहे, असे मानले जाते होते. त्याचे कारण भयगंडाचे स्वरुप विकृती चिंता (मॉर्विड अँगझायटी) व भावातिरेकी विचार (ऑब्‌सेशन) ह्या लक्षणांसारखे आहे. गेल्या दहा वर्षांतच ह्या तीन लक्षणांचे पृथक्करण करण्यात आले आहे.

विकृत चिंता ही बहुधा स्वैर-अधर (फ्री फ्लोटिंग) असते आणि वस्तूशी वा विषयाशी (ऑब्जेक्ट) निवद्ध झालीच तर स्वतःची किंवा स्वकीयांची प्रकृती किंवा एकंदर कल्याण (वेलफेअर) ह्या कल्पनेला ती जोडली जाते. शिवाय रुग्णाचे लक्ष त्या चिंतेमुळे उद्‌भवणाऱ्या शारीरिक लक्षणांतच- उदा., छातीत धडधड होणे, कासाविस होणे, गरगरणे, घाम फुटणे, हातपाय गार पडणे इत्यादींमध्येच-गुंतून राहते. भयगंडपीडित रुग्णांत भीती निर्माण करणाऱ्या वस्तूच्या अथवा परिस्थितीच्या सान्निध्यात असतानाच भीती निर्माण होते. एरवी त्या वस्तीचे तीव्र स्मरण देणारी घटना घडल्याशिवाय तशी भीती वाटत नाही. त्या वस्तूपासून दूर असल्याची खात्री वाटल्यास भयगंडपीडित रुग्ण निश्चित असतो. म्हणूनच भयजनक वस्तुला किंवा परिस्थितीला टाळण्याची वृत्ती ह्या विकारात प्रामुख्याने दिसते. चिंताजन्य मज्जाविकृतीत असे नसते. भयगंडात शारीरिक लक्षणे चिंतेप्रमाणेच असतात परंतु त्यांच्याकडे सतत लक्ष दिले जात नाही. शिवाय भयगंडाच्या रुग्णाला ती नसते. भावातिरेकी सक्तीयुक्त मज्जा विकृतीच्या रुग्णाला भयाच्या स्वरुपाची व निरर्थकतेची जशी कल्पना असते, तशी चिंताजन्य मज्जाविकृतीच्या रुग्णाला नसते. भावातिरेकी सक्तियुक्त ⇨ मज्जाविकृतीच्या रुग्णाला भावातिरेकी विचाराने अत्यंत पछाडलेले असते. त्याला भीतीची स्पष्ट जाणीव नसते. कारण तो त्या विचारमंथनात पूर्णपणे मग्न असतो. सक्तीच्या क्रियांना जरी भावातिरेकी भयगंड कारणीभूत असले, तरी त्या भयाची स्पष्ट जाणीव नसते. भीतीपेक्षा उदासीनता किंवा राग ह्या भावनांचे प्रमाण त्यात जास्त असते. विशेषतः भावातिरेकी शंका सक्तीच्या पुनरावृत्त क्रियांनी न निघाल्यास व पूर्ण समाधान न झाल्यास अशा भावना निर्माण होतात. काही वेळा भावातिरेकी विचार व भयगंड एकाच रुग्णात आढळतात परंतु हे भयगंड किळस आणणाऱ्या काही विशिष्ट वस्तू अथवा प्राण्याविषयी असतात. उदा., विष्ठा, खरकटे, पाल, साप, झुरळ वगैरे. भावातिरेकी सक्तियुक्त मज्जाविकृतीत स्पष्ट भीती वाटल्यास तिचा उगम स्वतःकडून अधार्मिक, अनैतिक अथवा समाजविरोधी कृत्य घडेल ह्या शंकेत असतो. कारण अशा व्यक्तीच्या कर्मठ विवेकबुद्धीला अपराधी ठरणे अत्यंत दुःखदायक वाटते. ती भीती टाळण्यासाठी म्हणून उलट प्रकारच्या सक्तीच्या क्रिया करण्याकडे रुग्णाची प्रवृत्ती होते. उदा., भ्रष्टाचारामुळे लागलेल्या पापाचे क्षालन म्हणून हात वारंवार धुण्याचे प्रतीकात्मक प्रायश्चित्त. त्याउलट भयगंडामध्ये, वस्तू अथवा परिस्थिती टाळण्याकडे अथवा त्यामुळे निष्क्रिय होण्याकडे जास्त कल असतो. भयगंडपीडित रुग्णास ती विशिष्ट वस्तू टाळून समाधान मिळते. परंतु भावातिरेकी भीती सक्तीच्या क्रियांनी काढून टाकल्याचे समाधान मिळणे कठीण असते. म्हणूनच ते मिळण्यासाठी सक्तीच्या क्रिया पुनःपुन्हा करण्याची रुग्णास गरज भासते. भयगंडाचा प्रादुर्भाव तरुणांत तसेच इतर संस्कृतीच्या मानाने हिंदू संस्कृतीत (स्त्रियांत) अधिक आढळतो.

भयगंडाची प्रमुख लक्षणे: (१) विशिष्ट वस्तू, प्राणी, स्थळ, परिस्थिती, दुर्घटना अथवा रोग यांविषयी वाटणारी जीवघेणी भीती. (२) त्यामुळे उद्‌भवणारी शारीरिक लक्षणे (विकृत चिंतेच्या लक्षणासारखी). (३) भीती टाळण्यासाठी घराबाहेर न पडण्याची अतिरेकी दक्षता अथवा त्या भयजनक वस्तूपासून पलायन. (४) ह्या भीतीच्या निरर्थकपणाची पूर्ण कल्पना आणि आपल्या असहायतेमुळे येणारी उदासीनता (५) आपल्या भयगंडाची पुनरावृत्ती होईल अशी दुय्यम चिंता व विमनस्कता. (६) दैनंदिन कृत्ये व कर्तव्ये करण्याची असमर्थता व असहायता. (७) भीती टाळण्यासाठी काही क्षुद्रवस्तू (फेटिश)-उदा., ताईत, देवाचा फोटो, बाम इ. औषधे तसेच घरातील प्रिय व्यक्ती-यांच्यावर रुग्ण विसंबून राहतात.

भयगंडाचे विषय : मरण, हृदरोग, कर्करोग, महारोग, वेड, एकटेपणा, गर्दी, उंच स्थळ, नवीन परिसर, बंदिस्त जागा, परीक्षा, वरिष्टांची भेट, औपचारिक वातावरण- उदा., समारंभ, चर्चा, मेजवानी (पार्टी)- कुत्रा, मांजर, साप, पाल, झुरळ इ. प्राणी मलमूत्र, घाण, धुळ इ. त्याज्य वस्तू आणि त्यांचा विटाळ (ही भीती भावातिरेकी सक्तियुक्त मज्जाविकृतीच्या लक्षणसमूहात जास्त आढळते.) हे भयगंडाचे विषय सर्वसामान्यतः असतात.

फ्रॉइड यांनी भयगंडाचे वर्गीकरण दोन प्रकारांत केले आहे. पहिला प्रकार : भीती वाटावयास लावणाऱ्या सार्वत्रिक व सर्वसामान्य अशा गोष्टींमुळे निर्माण होणारे भयगंड. उदा., मरण, रोग, साप इत्यादी. दुसरा प्रकार म्हणजे वैयक्तिक भीती निर्माण करणाऱ्या विशिष्ट विषयांपासून होणारे भयगंड. उदा., पूर्वी अप्रिय अनुभव आलेल्या अशा विशिष्ट जागा, अप्रिय अशा संवेदना अथवा स्वतःच्या हालचाली.

काही सर्वसामान्य भयगंडांना खास संज्ञा देण्यात आल्या आहेत. उदा., बाह्य परिसर भयगंड (ॲगोराफोविया), उत्तुंगता भयगंड (ॲक्रोफोबिया), बंदिस्तता भयगंड (क्लॉस्ट्रो फोबिया), मृत्युभयगंड (नेक्रोफोबिया), व्याधिभयगंड (पॅथोफोबिया), शालाभयगंड (स्कूल फोबिया) आणि संदूषण भयगंड (मायसोफोबिया). यांपैकी बाह्य परिसर भयगंड, बंदिस्तता भयगंड, मृत्युभयगंड, व्याधिभयगंड व संदूषण भयगंड यांचा प्रादुर्भाव प्रौढ व्यक्तींमध्ये जास्त असतो. मुलांत शाला-भयगंडाचा प्रादुर्भाव जास्त असतो. बाह्य परिसर भयगंडात व्यक्तीला घराबाहेच्या वातावरणात, विशेषतः रहदारीत जाणे किंवा सामाजिक आंतरक्रियेत भाग घेणे अत्यंत भयप्रद व कष्टमय होते. मनाचा हिय्या करुन गेल्यास भीतीची अप्रिय शारीरिक लक्षणे उद्‌भवून अर्ध्यावरच परतावे लागते. बंदिस्तता भयगंड असलेल्या व्यक्ती स्नानगृह, अंधारी अडगळीची खोली, सिनेमा, परीक्षादालन, उव्दाहक (लिफ्ट) वगैरे बंदिस्त जागा टाळतात. मृत्युभयगंडात प्रेताचे दर्शन झाल्यास किंवा मरणाची बातमी वाचल्यास अथवा ऐकल्यास किंवा काही वेळा ह्या गोष्टी आठवल्यास कमालीची भीती वाटून असे प्रसंग काटेकोरपणे टाळण्याची वृत्ती निर्माण होते. व्याधिभयगंडात ह्रदरोग विशेषतः ह्रदयाघात (हार्ट अटॅक)-महारोग, कर्करोग, वेड इ. भयंकर समजल्या जाणाऱ्या रोगांची अवास्तव भीती वाटून काल्पनिक लक्षणांच्या काळजीत व शंकानिरसनात मन कायमचे गुंतलेले असते. शाला-भयगंडात, शाळकरी मुले शाळेत जायला कुरकुर करतात व जबरदस्ती केल्यास रडतात किंवा शाळेत न जाता बाहेर कुठेतरी हिंडत राहतात. या वर्तनाचे मुख्य कारण शाळेच्या अभ्यासाची किंवा आडदांड अथवा टिंगलखोर मुलांची वाटणारी अवाजवी भीती (काही मुलांना शाळेच्या भीतीपेक्षा घरच्या सुरक्षित वातावरणातून-विशेषतः आईचे प्रेमळ सान्निध्य सोडून-जाणे जिवावर येते. काहींना आईच्या सुरक्षिततेची चिंता वाटल्यामुळे तिला सोडून जाऊ नयेसे वाटते. अशा प्रकारांना मात्र शास्त्रोक्त व्याख्येनुसार भयगंड म्हणता येणार नाही.) संदूषण भयगंडात मलमूत्रामुळे अथवा कचऱ्या धुळीमुळे संदूषण (काँटॅमिनेशन) किंवा विटाळ होईल अशी भीती वाटून अशा घाणीशी शरीरसंपर्क-विशेषतः हस्तस्पर्श-टाळण्याची कायम धडपड केली जाते. हा भयगंड भावातिरेकी सक्तियुक्त मज्जाविकृतीच्या लक्षणात जास्त गणला जातो.


भयगंडाचे मनोगतिकीय विवरण दोन सिध्दांतावर आधारलेले आहे. फ्रॉइड यांच्या मनोविश्लेषणात्मक सिध्दांतातील ईडिपस गंडानुसार जेव्हा मूल आपल्या परलिंगी पालकाबद्दल लैंगिक (अर्भकीय) आकर्षण दाखवते आणि मग समलिंगी पालकाचा रोष (काल्पनिक) पतकरते, तेव्हा ह्या पालकाकडून अपेक्षित असलेल्या खच्चीकरणाच्या शिक्षेची भीती (कॅस्ट्रेशन फियर) त्याला वाटते. ती टाळण्यासाठी अबोध मन या भीतीचे प्रक्षेपण (प्रोजेक्शन) आणि भावविस्थापन (डिसप्लेसमेंट) बाहेरच्या टाळता येतील अशा वस्तूवर करते. त्यामुळे अशा वस्तू अथवा प्राण्यांची अवास्तव भीती म्हणजेच भयगंड निर्माण होतो. फ्रॉइड यांच्या ‘छोटा हॅन्स’ या बालरुग्णाला घोडा चावेल अशी अतिरेकी भीती वाटे. याचे कारण वडील आपले खच्चीकरण करतील या भयंकर भीतीचे अबोध मनात झालेले प्रक्षेपण व भावविस्थापन होते. तसे त्याला सामान भरलेली गाडी उलटून घोडा मरेल अशी जी भीती वाटत होती, तिचा उगम, वडिलांची शिक्षा टाळण्याच्या हेतूने अबोध मनात दडलेली त्यांच्या मरणाची इच्छा ही होती. वडिलात व घोड्यात साम्य म्हणजे दोघांचेही मोठे शिश्न हे होय. मनोगतिकीय रचनेमुळे आक्रमक इच्छा अबोध मनात राहून बाह्यांगी (जाणिवेत) वडिलांशी प्रेमपूर्वक संबंध ठेवणे शक्य होते.

अध्ययन वा ज्ञानसंपादन सिध्दांतानुसार मूळ भीतीचा उगम एकतर खोल मनात असतो अथवा वातावरणाच्या कटू अनुभवात असतो. परंतु अभिजात अभिसंधानाच्या (क्लासिकल कंडिशनिंग) तत्वानुसार त्या समयी सान्निध्यात असलेल्या वस्तूशी अथवा परिस्थितीशी अभिसंधान होऊन नविन अभिसंहित चेतक (कंडिशनड स्टिमुलस) निर्माण होता. पुढे या चेतकाच्या सान्निध्यात भीती मूळच्या कारणाशिवाय पुन्हा निर्माण होते. ह्यालाच भयगंड म्हणतात. वॉटसन व रेनर यांनी १९२० मध्ये एक वर्षाच्या एका मुलाच्या मनात त्याच्या आधीच्या आवडत्या उंदराबद्दल अभिजात अभिसंधानाच्या तत्त्वानुसार भयगंड निर्माण केला होता. ज्या ज्या वेळी तो मुलगा आवडत्या उंदरांना उचलायला जाई त्या त्या वेळी मागून कर्णकर्कश असा आवाज केला जाई. त्यामुळे आवाजाची भीती त्या उंदराच्या सान्निध्यातही त्या मुलास वाटू लागली आणि कालांतराने उंदराबद्दलचा भयगंड त्याच्या मनात निर्माण झाला.

रुग्णांना होणारे भयगंड मनोघातजन्य वर्तन-अध्ययन (ट्रोमॅटिक अव्हॉयडन्स लर्निंग) ह्या तत्त्वानुसार दोन टप्प्यांत होतात. आधी मनोघातजन्य (भयानक) अनुभवाने (उदा., ह्रदयाघात झालेली व्यक्ती कोसळताना पाहिल्यामुळे) उद्‌भवलेल्या भीतीमुळे क्लेशात्मक शारीरिक लक्षणांचे (उदा., छातीत धडधड) अभिसंधान, हृदरोग अथवा कोळसणे (कोलॅप्स) ह्या कल्पनेशी होते व दुसऱ्या टप्प्यात ही कल्पना टाळण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांचे प्रबलन (रीएन्फोर्समेंट) होऊन भयगंडाच्या सवयीत रुपांतर होते.

भयगंडावरील उपचार : (१) औषधे : उव्देगनाशक (अँटीडिप्रेसंट) गोळ्या-विशेषतः अँमिट्रिप्टीलीन-आणि शांतक गोळ्या -उदा., डायाझेपॅम- यांचा योग्य प्रमाणात व सतत वापर केल्याने भयगंडापासून वराच आराम पडतो परंतु त्याचे निर्मूलन मात्र होत नाही. त्यासाठी (२) मनोविश्लेषण अथवा (३) वर्तनोपचार (बहेवियर थेरपी) ह्या उपचार पद्धतीची जरुरी असते. (४) विरोधाभासी उद्दिष्टोपचार (पॅरॅडॉक्सिकल इंटेन्शन) : ह्या उपचारानेही भयगंडाने निर्मूलन होऊ शकते.

मनोविश्लेषणात जरुर पडल्यास संमोहनाची मदत घेऊन अबोध मनातील ईडिपस गंडामुळे उद्‌भवलेल्या घटनांचा शोध घेतला जातो व त्याचे विश्लेषण व विवरण करुन तो गंड सबोध केला जातो. अशा प्रकारे तो गंडा हळूहळू नष्ट होतो. अर्थात ह्या उपचाराला बराच कालावधी लागतो.

वर्तनोपचार त्या मानाने सोपे व कमी कालावधी घेणारे आहेत. यातील रीतसर निर्संवेदीकरणाची (सिस्टेमॅटिक डीसेन्स्टिटायझेशन) पद्धत सोपी व क्लेशविरहित असते. परंतु सुधारणा टिकविण्यासाठी तिचा अवलंब अधूनमधून करत रहावा लागतो. शरीर शिथिल असताना मन पण शांत व चिंताविरहित असते, ह्या मानशास्त्रिय सल्ल्यावर ह्या पद्धतीची रचना आहे. [⟶ मानसचिकित्सा]. चेतक वा उद्दीपक वर्षाव : (फ्लडिंग) ह्या दुसऱ्या वर्तनोपचारपद्धतीत भयंगडातील भीतीजनक चेतकांचा सतत मारा, चिकित्सकाच्या काल्पनिक पण भावोत्कट कथनाने रुग्णाच्या मनावर केला जातो. उसंत न मिळाल्यमुळे व पलायन वर्तनाचे (अव्हॉयडन्स बिहेवियर) प्रबलन न झाल्यामुळे अभिसंहित चेतकाची, भय निर्माण करायची क्षमता झपाट्याने कमी होऊन भयगंड क्षीण होतो.

चौथा उपचार विरोधाभावी उद्दिष्टोपचार हा असून तो एक कमी प्रचलित पण प्रभावी उपचार आहे. फ्रँक यांनी अस्तित्त्वविषयक मानसोपचारच्या (एग्‌झिस्टेंशियल सायकोथिरपी) तत्त्वानुसार रचलेल्या विरोधाभासी उद्दिष्टोपचारांत, रुग्णाला भयगंडाचा विषय असणाऱ्या परिस्थितीत शक्य तो जास्त भीती तो जास्त भीती हेतूपूर्वक रीत्या वाढविण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे रुग्णाला त्या भीतीचे फोल स्वरुप कळून येते व तो स्वतःचीच निर्भत्सना करुन भीतीवर हळूहळू मात करतो. ह्या पद्धतीत अध्यन सिद्धांताचाही नकळत वापर होतो. ज्या भयगंडाला रुग्ण कटाक्षाने टाळतो त्याच वस्तू अथवा परिस्थिती यांच्या सान्निध्यात रुग्णास हेतुपुरःसर सतत ठेवल्यास विलोपन (एक्स्टिंक्शन) ह्या तत्वानुसार त्यांचा तो भयगंड कालांतराने क्षीण होतो.

संदर्भ : 1. Arieti, Silvano Brody, E.B.Ed. American Handbook of Psychiatry,Vol.III, New York, 1974.

            2. Costello, C. G. Ed.Symptoms of Psychopathology, New York, 1970,

            3. DcutschAlbert Fishman, Helen, Ed. The Encyclopedia of Mental Health, Vol. V, New York, 1963.

            4. Freedman, A. M. Kaplan, H. L. Saddock, B. J. Ed. Modern Synopsis of Comprehensive Text Book of Psychiatry II, Baltimore, 1976.

            5. Hinsie, L. E. Campbell, R. J. Psychiatric Dictionary, New York, 1970.

शिरवैकर, र. वै.