हाराल हफडिंगहफडिंग, हाराल : (११ मार्च १८५७ – २ जुलै १९३१). डॅनिश तत्त्वज्ञ व तत्त्वज्ञानाचा इतिहासकार. जन्म कोपनहेगन येथे. त्याचे सर्व आयुष्य याच शहरात गेले. १८६५ मध्ये धर्मोपदेशक होण्याच्या दृष्टीने ईश्वरशास्त्रात आवश्यक असलेली पदवी त्याने प्राप्त केली पण दीक्षा घ्यावयाची नाही, असे त्याने ठरविले होते. विख्यात डॅनिश तत्त्वज्ञ ⇨ सरेन किर्केगॉर ह्याच्या ग्रंथांचा – विशेषतः ख्रिस्ती धर्मावरील त्याच्या विचारांचा – अभ्यास केल्यानंतर त्याच्या मनात तीव्र धर्मसंघर्ष उभा राहिला. परिणामतः ख्रिस्ती धर्मा-पासून तो दूर झाला. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात एका नव्या दिशेचा शोध घेत असतानाच तो एक उदार मानवतावादी झाला. १८६८-६९ मध्ये त्याचे वास्तव्य पॅरिस शहरात होते. तेथे फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨ ऑग्यूस्त काँत व इंग्रज तत्त्वज्ञ ⇨ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या तत्त्वज्ञानाचा त्याच्यावर प्रभाव पडला. हफडिंगने तत्त्वज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये एक विद्यावंत म्हणून काम केले. त्याच्या ग्रंथांतून त्याच्या ज्ञानाचा विस्तृत आवाका, जे जे आवश्यक त्यावर केंद्रित केलेली तीक्ष्ण नजर आणि चिकित्सेची समतोल दृष्टी ह्यांचा प्रत्यय येतो. त्याच्या ग्रंथांचे अनेक भाषांत अनुवाद झाले. उपयुक्त पाठ्यपुस्तके म्हणून त्याचे ग्रंथ महत्त्वाचे ठरले. त्याला जागतिक कीर्ती लाभली होती आणि अनेक विचारवंतांशी त्याचा व्यक्तिगत परिचय होता. त्याच्या काळातला तो नामवंत तत्त्वज्ञ होता. ‘ रॉयल डॅनिश अकॅडमी ऑफ सायन्सिस अँड लेटर्स’ ह्या प्रतिष्ठित संस्थेने त्याला राहावयाला घर देऊन त्याचा सन्मान केला होता. ह्याच घरात त्याच्या आयुष्याची अखेर होईपर्यंत तो राहिला. त्याच्यानंतर ⇨ नील्स बोर ह्या प्रसिद्ध भौतिकी-विज्ञाला ते घर देण्यात आले.

हफडिंगने लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी पाच ग्रंथ विशेष उल्लेखनीय आहेत. ते असे : आउटलाइन्स ऑफ सायकॉलॉजी (१८८१, इं. भा.), ‘एथिक्स : ॲन अकाउंट ऑफ एथिकल प्रिन्सिपल्स अँड देअर ॲप्लिकेशन टू द चिफ कंडिशन्स ऑफ लाइफ’ (१८८७, इं. शी.), हिस्टरी ऑफ मॉडर्न फिलॉसॉफी (२ खंड, १८९४-९५ इं. भा. २ खंड, १९०० पुनर्मुद्रण १९५५), फिलॉसॉफी ऑफ रिलिजन (१९०१, इं. भा. १९०६), ‘ह्यूमन थॉट : इट्स फॉर्म्स अँड इट्स प्रॉब्लेम्स’ (१९१०, इं. शी.).

आउटलाइन्स ऑफ सायकॉलॉजी मधील विवेचन ज्ञान, भाव आणि संकल्प (विल) ह्या मनाच्या पारंपरिक त्रिघटकीय विभागणीवर आधारलेले आहे तथापि त्याचा मुख्य आणि प्राथमिक भर संकल्पावर, त्या संज्ञेच्या अत्यंत व्यापक अर्थाने दिलेला आहे. ह्या अर्थाने संकल्पात यत्न, आवेग, गरज, मागणी आणि इच्छा ह्यांचा समावेश त्याने केला आहे. संकल्प हा प्राथमिक, ज्ञान हे संकल्पाला मार्गदर्शन करणारे आणि भाव हा इच्छेचा निदर्शक. हे तिन्ही संकल्पाचेच घटक अशी मांडणी त्याने केली आहे.

‘एथिक्स : ॲन अकाउंट…’ मध्ये हफडिंगने ब्रिटिश ⇨ उपयुक्ततावादा शी स्वतःला जोडून घेतले आहे. उपयुक्ततावादी विचारांना तो ‘कल्याणकारी नीतिशास्त्र’ असे म्हणतो. ‘अधिकांत अधिक लोकांचे अधिकांत अधिक सुख’ हे उपयुक्ततावाद्यांच्या सर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक विचारांचे तसेच त्यांच्या सर्व चळवळींचे मूलभूत तत्त्व होय. व्यक्तिगत आणि सामाजिक नीतिशास्त्राच्या संघर्षात हफडिंगचा दृष्टिकोण उदार होता. नैतिक मूल्यमापनाच्या मुळाशी सहानुभूतीची भावना असते आणि तिचा सर्वोच्च विकास तिला एक वैश्विक स्वरूप प्राप्त करून देतो. त्यात कोणतीही व्यक्तिगत भावना आणि स्वार्थ उरत नाही, असे त्याचे प्रतिपादन होते.

हिस्टरी ऑफ मॉडर्न फिलॉसॉफी मध्ये आधुनिक तत्त्वज्ञांचा, तत्त्वज्ञानीय प्रणालींचा सखोल आढावा घेताना हफडिंगने मांडणी आणि समीक्षा ह्यांच्यात उत्कृष्ट समतोल साधलेला आहे. ज्ञानमीमांसेचा विकास सादर करताना गॅलिलीओ आणि न्यूटन ह्यांच्या गणिती आणि यंत्रशास्त्रीय पद्धतींचा त्याने वापर केला आहे, हे त्याचे वेगळे वैशिष्ट्य होय. हफडिंगने ज्यांचा परामर्श घेतला, त्यांत स्पिनोझा, ह्यूम आणि कांट हे तत्त्वज्ञ त्याला विशेष जवळचे वाटले.

फिलॉसॉफी ऑफ रिलिजन मध्ये धार्मिक अनुभवाचा विचार ज्ञानमीमांसा, मानसशास्त्र आणि नीतिशास्त्र अशा तीन दृष्टिकोणांतून त्याने केला आहे. मूल्यांच्या अस्तित्वावरील विश्वास हा सर्व धर्मांचा पाया असून निरनिराळे धर्म कोणत्या मूल्यांचे अस्तित्व मानतात, ह्यावरून त्यांच्या स्वरूपाची ओळख पटते, असे त्याचे म्हणणे होते. धर्म ह्या संस्थेबद्दलचा आदर आणि विवेकी वस्तुनिष्ठता ही त्याच्या विवेचनाची लक्षणीय वैशिष्ट्ये होत. हफडिंग स्वतः मात्र अज्ञेयवादी होता.

‘ह्यूमन थॉट : इट्स फॉर्म्स अँड इट्स प्रॉब्लेम्स’ ह्या ग्रंथात हफडिंगने ज्ञानासंबंधीची स्वतःची प्रणाली मांडली आहे. ज्ञानमीमांसेत हफडिंगला असलेले स्वारस्य काटेकोरपणे तार्किक असण्यापेक्षा मानस-शास्त्रीय होते.

कोपनहेगन येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.