मनोधैर्य : (मोराल). अडजणींनी डगमगून न जाता व धीर खचू न देता अमुक एक उद्दीष्ट साध्य करण्याचा निर्धार म्हणजे मनोधैर्य अथवा मनोबल. उद्दिष्टप्राप्ती होईपर्यंत प्रयत्न करीत राहण्याची जिद्द, हिम्मत कमी होऊ न देता आवश्यक ते सर्व करण्याचा अढळ निश्चय मनोधैर्य या संज्ञेत अभिप्रेत असतो.

स्वतःच्या उद्दिष्टसिध्दीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार्यास व्यक्तीचे मनोधैर्य टिकून राहणे तसेच ते उत्कृष्ट प्रतीचे असणे फार महत्वाचे असते. विशिष्ट लक्ष्यावर दृष्टी ठेवून कार्य करणार्याच समूहालादेखील ही गोष्ट लागू आहे. मग तो शिक्षकांचा समूह असो, रणभूमीवरील सैन्य असो, कामगारांचा समूह असो, कामगारांची संघटना असो,खेळाडूंचा संघ असो अथवा विशिष्ट ध्येयप्रत पोहोचू इच्छिणार्या राष्ट्रातील जनता असो. रणांगणावर केवळ बंदुका लढत नसतात, तर सैनिकांची मने लढत असतात. या उत्कीतील सत्य प्रत्येक उद्दिष्ट लक्षी समूहास लागू आहे.

समूहाकडून होणाऱ्या कार्याचे परिमाण तसेच समूहातील व्यक्तींना लाभणार्या समाधानाचे प्रमाण हा दुहेरी दृष्टीकोन स्वीकारून समूहाच्या कार्याचा विचार करू लागले, की समूहामध्ये चालत असलेल्या गतिशील प्रक्रियेचे (ग्रुप डायनॅमिक्स) महत्व लक्षात येते आणि त्या प्रक्रियेत अंतर्भूत असणार्याय घटकांमध्ये समूहातील व्यक्तींचे व पर्यायाने एकूण समूहाचे मनोर्धेय हा अत्यंत महत्वाचा घटक असतो. हेही लक्षात येते. म्हणून सैन्ये, कामगारसमूह इ. समूहांचा कार्यदृष्ट्या अभ्यास मानसशास्त्रज्ञांनी केला आहे व (१) समूहाचे मनोधैर्य उच्च प्रतीचे असल्याची लक्षणे ठरविली आहेत आणि (२) उच्च प्रतीचे मनोधैर्य टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टीही निश्चित केल्या आहेत.

उच्च प्रतीच्या मनोर्धैर्याची गमके : समूहाची एकजूट कोणा व्यक्तीच्या दडपणापायी अथवा अगतिकपणामुळे निर्माण झालेली नसून व्यक्तींच्या भावबंधावर आधारलेली ,आतून निर्माण झालेली असणे हे उत्कृष्ट मनोधैर्याचे एक लक्षण होय. बदलत्या परिस्थितीशी तसेच वेळोवेळी उदभवणाऱ्या प्रसंगांशी जमवून घेण्याची समूहातील सर्वांची तयार असणे समूहातील व्यक्तींच्या व्यक्तिगत प्रेरणा पारस्परिक प्रेमभावास व समूहाच्या एकजुटीस बाधक नसून पोषक असणे, स्वतःच्या नेत्याविषयीची समूहाची अनुकूल अभिवृत्ती समूहातील व्यक्तींना समूहाविषयी वाटणारा आत्मीयताभाव व आदर आणि त्या समूहात स्वतः समाविष्ट असल्याचा त्यांना वाटणारा अभिमान स्वतःच्या समूहास कमीपणा वा अपयश येऊ नये, ही तीव्र इच्छा आणि सहकार्याची अपुरी राहिलेली कामे स्वतःपूर्ण करण्याची तयार प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असणे, यांशिवाय उत्तम मनोधैर्याचे आणखी एक गमक म्हणजे, तसा काही प्रसंग उदभवलाच तर समूहाचे नेतृत्व स्वीकारण्याची प्रत्येक व्यक्तीची तयारी असणे हे होय.

जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते अशा वेळी समूहाचे मनोधैर्य उत्कृष्ट प्रतीचे राहणे अत्यंत आवश्यक असते. ध्येयनिष्ठा, प्रयत्नांची पराकाष्ठा, वैयक्तिक सुखाकडे डोळेझाक आणि स्वतःच्या समहाचे यशापयश तेच माझे यशापयश ही भावना सतत असावी लागते. उत्कृष्ट प्रतीचे मनोधैर्य टिकून राहण्यासाठी अनेक गोष्टी आवश्यक असतात. समूहातील व्यक्तींचे परस्परसंबंध ,साधनसामग्रीची कमतरता उपलब्धता, नेतृत्वाचे स्वरूप इ. घटकांचा सामूहीक मनोधैर्यावर आणि त्यामुळे समूहाच्या कार्यक्षमतेवर कसकसा परिणाम होऊ शकतो या प्रश्नाचा अभ्यास समूहातील व्यक्तींच्या मुलाखती, समूहातील वातावरणाचे निरीक्षण, समूहाच्या कार्यनिष्पत्तीचे मूल्यमापन इत्यादीद्वारा मानशास्त्रज्ञांनी केला आहे व उत्कृष्टमनोधैर्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक असतात असा निष्कर्ष काढला आहे. (१)समूहाचे उद्दिष्ट विधायक स्वरूपाचे असणे व ते साध्य करण्याची प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी ईर्षा असणे आवश्यक असते. केवळ विघातक हेतूने एकत्र आलेल्या व्यक्तींचा समूह नंतर विघटित होण्याचा संभव असतो. सत्तास्थापनावरील व्यक्तीस पदच्युत करण्याच्या उद्देशाने किंवा परकीय राजसत्ता झुगारून देण्यासाठी म्हणून हातमिळवणी केलेल्या व्यक्तींची वा पक्षांची एकजूट ते उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर टिकून राहत नाही व विधायक कार्यक्रमाच्या अभावी त्यांचे मनोधैर्य उच्च पातळी गाठू शकत नाही. असे इतिहास दर्शवितो. विधायक कार्यासाठी झटणार्या समूहातच खरेखुरे सहकार्य वाढी लागते. समूहभाव जोपासला जातो आणि सामूहिक प्रेरणाबळ व उत्साह वृध्दिंगत होतो. (२) समूहातील व्यक्तींच्या ठिकाणी स्वार्थबुध्दीचा तसेच वर्चस्व लालसेचा अभाव असावा लागतो. स्वार्थी आणि सत्ताकांक्षी व्यक्ती असंतुष्ट राहतात. समूहाच्या कार्यात त्यांची प्रामाणिक साथ मिळत नाही, समूहाच्या ऐक्यास तडे जातात व अशा परिस्थितीत एकूण समूहाचे मनोधैर्य खालावते. (३) समूहाने हाती घेतलेल्या अथवा समूहावर सोपवलेल्या कार्याला महत्वाचा अर्थ आहे, असे समूहातील प्रत्येक व्यक्तीस वाटले पाहिजे. आपण करीत असलेल्या कामास काही अर्थच नाही, असे व्यक्तींना वाटू लागले, तर त्यांना उत्साहात वाटेनासा होतो व ते कार्य त्यांच्याकडून पुरेपूर नेटाने होऊ शकत नाही. (४) व्यक्ती जरी सामूहिक उद्दिष्टासाठी एकत्र प्रयत्न करीत असतात, तरी त्यांच्याही काहीना काही जैविक, मानसिक व सामाजिक गरजा असतातच. आपण सामील असलेल्या समूहामध्ये आपल्या विविध गरजा बहुतांशी समाधआन पावत आहेत असेही समूहातील व्यक्तींना वाटले पाहिजे. (५) सामूहिक मनोधैर्य उच्च पातळीवर राहण्यासाठी उद्दिष्टाच्या दिशेने प्रत्यक्षात काही प्रगती होते आहे असे समूहाच्या प्रत्ययास येणे हेही महत्वाचे होय. अन्यथा, समूहाच्या उत्साह मावळतो. (६) आपण यशस्वी होऊ, आपले भविष्य उज्ज्वल आहे, असा सतत विश्वास वाटणेही आवश्यक असते. (७) त्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आपले कार्य तडीस नेण्यासाठी म्हणून आवश्यक असलेल्या साधनांची व सामग्रीची कमतरता पडणार नाही, याची खात्री समूहास वाटली पाहिजे. नाहीतर आपला प्रयत्न व्यर्थ जाणार व तो करीत राहण्यात अर्थ नाही. अशी भावना निर्माण होते. (८) आपले सहकारी हरएक प्रसंगी आपल्या खांद्यास खांदा लावून सहकार्य करणारे आहेत, आपल्याला ते एकाकी पडू देणार नाहीत असा विश्वास आवश्यक असतो.

समूहाच्या नेतृत्वावरदेखील समूहाचे मनोधैर्य उच्च प्रतीचे राहणे वा न राहणे अवलंबून असते. प्रतिकूल प्रसंगी न डगमगणारा, अडचणीतून मार्ग काढू शकणारा, कल्पक, बुध्दिमान व खंबीर,समूहाला स्फूर्ती देणारा, उद्दिष्टाभिमुख ठेवतील अशा भावना समूहाच्या प्रयत्नात सहभागी असलेला नेता समूहाचे मनोघैर्य उच्च पातळीवर टिकवून धरू शकतो. [⟶ नेतृत्व] .

संदर्भ : 1. Baynes John, Morale: A Study of Men and Courage, London,1967.

2. Moran Charles, The Anatomy of Courabe, Toronto, 1945.

आकोलकर, व.वि.