रचनालक्षी मानसशास्त्र : एक मानसशास्त्रीय संप्रदाय. रचनावाद (स्ट्रक्चरॅलिझम) हे त्याचे पर्यायी नाव. मानसिक जीवनाचे किंवा अनुभवाचे विश्लेषण करून त्याचे मूलघटक शोधून काढणे व त्यांच्या योगाने मनाची किंवा अनुभवाची रचना उलगडून दाखविणे, हे कार्य रचनात्मक मानसशास्त्र करते. रसायनशास्त्राप्रमाणेच रचनात्मक मानसशास्त्र अनुभवाचे किंवा मानसिक जीवनाचे विश्लेषण करून विवेचन करते. ह्या संप्रदायाची विचारसरणी पूर्वीच्या मिल पितापुत्रांच्या साहचर्यवादी विचारसरणीची आठवण करून देणारी आहे. या संप्रदायाचे दोन प्रमुख पुरस्कर्ते म्हणजे व्हिल्हेल्म व्हुंट (१८३२-१९३०) आणि ई. बी. टिचनर (१८६७-१९२७) हे होत. तात्विक दृष्ट्या पाहू गेल्यास एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी प्रक्रियावादी (फंक्शनल) मानसशास्त्र आणि रचनालक्षी मानसशास्त्र हे संप्रदाय परस्परांवरील क्रिया-प्रतिक्रिया म्हणून विकास पावले.

मानसशास्त्र म्हणजे आंतरिक अनुभवांचे शास्त्र अशी व्याख्या व्हुंटने केली. बाह्य अनुभवाचे शास्त्र ते प्राकृतिक वा निसर्गविज्ञान होय. आंतरिक अनुभव म्हणजे आपली वेदने, भावना, विचार, एषणा (व्होलिशन्स) होत. आपले सर्वच अनुभव जटिल असून त्यांचे शास्त्रीय विश्लेषण केल्याशिवाय त्यांचा नीट उलगडा होत नाही, असे ही विचारसरणी प्रतिपादन करते. पुढे व्हुंटने मानसशास्त्राच्या विषयात आंतरिक अनुभवासोबतच बाह्य विषयांच्या अनुभवांचाही अंतर्भाव केला आणि मानसशास्त्र म्हणजे सर्वच (आंतरिक व बाह्य) प्रत्यक्ष (इमीडिएट) अनुभवांचे शास्त्र किंवा बोधानुभवांचे (कॉन्शस एक्स्‌पीअरिअन्सेस) शास्त्र अशी अधिक व्यापक व्याख्या त्याने केली. या प्रत्यक्ष किंवा बोधात्मक अनुभवांचे घटक दोन प्रकारचे असतात : (१) बाहेरून प्राप्त होणारी वेदने आणि (२) आतून प्राप्त होणाऱ्या भावना (फीलिंग). रंग, ध्वनी, स्पर्श, रुची आदी मूलघटक बाहेरून प्राप्त होणारे वेदनिक मूलघटक होत तर सुख-दुःख, क्षोभ-शांती आदी आतून प्राप्त होणारे भावनिक मूलघटक होत. ह्या मूलघटकांच्या संयोगातूनच अनेकविध जटिल मानसिक अवस्था सिद्ध होतात. ह्या संयोगांचे अनेकविध नियम आहेत. त्यांपैकी ‘निर्माणक्षम (क्रिएटिव्ह) संश्लेषण तत्त्व’ हा एक प्रमुख नियम होय. मूलघटकांच्या संयोगातून सिद्ध होणाऱ्या संयुक्तात (कंपाउंड) त्या मूलघटकांच्या गुणधर्मांहून भिन्न गुणधर्मांची उत्पत्ती होते, असा या नियमाचा आशय आहे.

व्हुंटप्रणीत रचनालक्षी मानसशास्त्राचा अमेरिकन प्रतिनिधी टिचनर याने कॉर्नेल विद्यापीठातून या संप्रदायाचा बराच प्रचार-प्रसार व विकास केला. टिचनरचे रचनालक्षी मानसशास्त्रावरील विचार, त्याच्या विज्ञान म्हणजे काय आणि विज्ञानाचे कार्य काय या विचारांवर आधारित आहेत. त्याच्या मते विज्ञानाचा अभ्यास विषय वस्तुतथ्ये (फॅक्ट्स) होत आणि ही वस्तुतथ्ये समजावून घेणे हे विज्ञानाचे उद्दिष्ट होय. वस्तुतथ्ये समजावून घेताना वैज्ञानिकाची वृत्ती व्यक्त्तिनिरपेक्ष आणि तटस्थपणाची असते. तिला कुठलेही पूर्वग्रह चिकटलेले नसतात. अर्थातच वस्तुतथ्यांना मूल्ये आणि उपयोगिता चिकटविणे ही रचनालक्षी मानसशास्त्रात निषिद्धे (टाबू) मानायला हवीत. त्याच्या मते मानसशास्त्रासहित सर्वच विज्ञानांचे अभ्यासविषय, समस्या आणि पद्धती ह्या सारख्याच होत. मानसशास्त्राचा अभ्यासविषय अनुभवाचे क्षेत्र, समस्या, त्यांचे वर्णन व स्पष्टीकरण असा, तसेच पद्धती ही निरीक्षणपद्धती होय. उपयोगात आणल्या जाणाऱ्या अनेक पद्धतींपैकी अंतर्निरीक्षण पद्धती ही रचनालक्षी मानसशास्त्राची अत्यंत महत्त्वाची पद्धती होय. ह्या पद्धतीचा रचनालक्षी मानसशास्त्र अत्यंत पद्धतशीरपणे इतका उपयोग केला, की रचनालक्षी मानसशास्त्राला ‘अंतर्निरीक्षणवाद’ असेही अनेकदा म्हटले गेले.

अनुभवाचे विश्लेषण त्याच्या मूलघटकांमध्ये केल्यानंतर टिचनरला तीन मूलभूत घटक आढळून आले : (१) वेदने, (२) प्रतिमा (इमेज) आणि (३) विकार वा भावना (अफेक्शन). ह्या तीन मूलभूत अशा अनुभवघटकांची टिचनरने निश्चिती केल्यावर सु. १५ वर्षांनी अनेक प्रयोग केल्यानंतर त्याला असे आढळून आले की, वेदने आणि प्रतिमा यांतील भेद केवळ संख्यात्मक स्वरूपाचाच आहे, गुणात्मक स्वरूपाचा नाही म्हणून त्याने मूलभूत घटकांतून प्रतिमेच्या घटकाला वगळले. पुढे १९२४ मध्ये तर त्याला विकारात्मक वा भावनिक गुणधर्माचा सहसंबंध जेव्हा वेदनांशी आढळून आला तेव्हा त्याने विकार वा भावना ह्या घटकासही अर्धंचंद्र दिला आणि केवळ वेदने हा एकच मूलघटक मानला आणि म्हणूनच टिचनरच्या विचारसरणीला कधीकधी ‘वेदनवाद’ (सेन्सेशनॅलिझम) असेही संबोधण्यात येते.

रचनालक्षी मानसशास्त्राचे मूलबीज व्हुंटच्या मानसशास्त्रात आहे. व्हुंटचे मानसशास्त्र हे ब्रेंटानोच्या क्रिया (ॲक्ट) मानसशास्त्राशी विरोधी आहे. रचनालक्षी आणि प्रक्रियावादी दृष्टिकोणांतील फरक अमेरिकेत प्रथम ⇨विल्यम जेम्सने दाखवून दिला. टिचनरचे अध्ययन व्हुंटच्या प्रयोगशाळेत त्याच्या हाताखाली झाले. ह्या प्रयोगशाळेत विशेष भर विश्लेषणात्मक अवलोकनावर, मूलभूत परीक्षणांवर आणि त्यांच्या संयोजनप्रवृत्तींवर होता. वास्तविक रचनालक्षी आणि प्रक्रियावादी मानसशास्त्रात तसा विरोध नाहीच. उलट त्यांची परस्परांना पूरक म्हणून तशी मदतच झाली. ‘आमचीच विचारसरणी बरोबर असून मानसशास्त्राला उपकारक आहे’, असा दोन्हीही विचारसरणींचा ऐकांतिक दावा मात्र अतिशयोक्त आणि चुकीचा आहे. १९१२ च्या सुमारास ⇨वर्तनवादाच्या प्रभावामुळे प्रक्रियावादी मानसशास्त्र क्षीण होऊ लागले आणि रचनालक्षी मानसशास्त्राचे नवसाहचर्यवादामध्ये रूपांतर झाले. १९१८ च्या सुमारास टिचनर मानसघटनाशास्त्र वा रूपविवेचनवाद (फिनॉमेनॉलॉजी) आणि अस्तित्त्ववादी (एक्झिस्टेंशिअल) मानसशास्त्राकडे वळला. १९२१ मध्ये तो लिहितो, की, ”मानसशास्त्राला लावण्यात येणाऱ्या ‘प्रक्रियावादी’ आणि ‘रचनालक्षी’ ह्या दोन्हीही संज्ञा आज मृतप्राय झालेल्या आहेत”.

पहा : प्रक्रियावादी मानसशास्त्र.

संदर्भ : 1. Boring, E. G. A History of Experimental Psychology, New York, 1950.

2. Titchener, E. B. A Textbook of Psychology, New York, 1910.

3. Woodworth, R. S. Contemporary, Schools of Psychology, Bombay, 1961.

सुर्वे, भा. ग.