विल्यम मॅक्डूगलमॅक्डूगल, विल्यम : (२२ जून १८७१–२८ नोव्हेंबर १९३८). प्रख्यात ब्रिटिश मानशास्त्रज्ञ व प्रयोजनवादी मानसशास्त्राचे प्रवर्तक. जन्म इंग्लंडमध्ये लँकाशरजवळील शॅडरटन ह्या गावी. १८९० मध्ये मॅंचेस्टर विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. दोन वर्षांनंतर केंब्रिज विद्यापीठात शरीरक्रियाविज्ञानाच्या अभ्यासासाठी त्यांनी प्रवेश घेतला व १८९४ मध्ये तेथूनही पदवी घेतली. १८९८ मध्ये त्यांनी लंडन येथे एम्.बी. ही वैद्यकातील पदवी घेतली पण वैद्यकीय व्यवसाय केला नाही. नंतर ते काही मानवशास्त्रज्ञांच्या समवेत ऑस्ट्रेलियाजवळील टॉरस सामुद्रधुनीजवळील बेटांवर आदिवासींच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी गेले. तेथेच त्यांना सखोल मानसशास्त्रीय अभ्यासाची प्रेरणा मिळाली. नंतर ते केंब्रिजला परतले. केंब्रिजला परतण्यापूर्वी शेरिंग्टनसमवेत त्यांनी काही महिने शरीरक्रियाविज्ञानातील संशोधन केले. केंब्रिजमध्ये त्यांना सेंट जॉन कॉलेजची अधिछात्रवृत्तीही मिळाली. केंब्रिजमध्ये असताना त्या काळच्या ज्या जर्मन व ब्रिटिश तात्त्विक मानसशास्त्रज्ञांकडे ते विशेष आकृष्ट झाले, त्यांत ⇨ रूडॉल्फ हेर्मान लोत्से हे प्रमुख होत.

जेम्स वॉर्ड यांच्या सल्ल्यावरून ते जर्मनीतील गर्टिगेन विद्यापीठात गेले व तेथे त्यांनी ⇨ जी. ई. म्यूलर यांच्या हाताखाली ‘रंगदृष्टी’बाबत संशोधन केले. मेंदूच्या सर्वसाधारण कार्याबाबतही त्यांनी संशोधन केले. मेंदूच्या विविध भागांचे कार्य हे पृथक्‌पणे चालत नसून ते एकात्म संघटना म्हणून सर्वंकषपणे चालते, असे मत त्यांनी मांडले. मन व शरीर यांतील संबंधाबाबतही त्यांनी आजन्म चिंतन केले. द्वैतवादी भूमिका घेऊन मानसिक घटनांचा शारीरिक क्रियांवर प्रभाव पडतो असे विचार त्यांनी त्या काळी व्यक्त केले. १९०२–०४ मध्ये लंडन येथे असताना त्यांनी प्रायोगिक मानसशास्त्रासाठी एक लहानशी प्रयोगशाळा स्थापिली. १९०४ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात वाइल्ड रीडर इन मेंटल फिलॉसॉफी’ च्या जागेवर त्यांची नेमणूक झाली व १९२० पर्यंत ते तेथे होते. तेथे अध्यापनाबरोबरच प्रायोगिक मानसशास्त्रीय संशोधनही त्यांनी सुरू ठेवले. ⇨ सिरिल बर्ट व जे. सी. फ्लूगेल हे त्यांचे प्रख्यात विद्यार्थी होत. १९०५ मध्ये त्यांनी फिजिऑलॉजिकल सायकॉलॉजी तसेच १९०८ मध्ये ॲन इंट्रोडक्शन टू सोशल सायकॉलॉजी हा प्रख्यात ग्रंथ प्रसिद्ध केला. यांतील दुसऱ्या ग्रंथात त्यांनी प्रयोजन, हेतू किंवा उद्दिष्टलक्षी सहजप्रेरणांचा सिद्धांत मांडला. ज्या उपपत्तीचा त्यांनी आयुष्यभर पाठपुरावा केला तिला ते ‘हॉर्मिक सायकॉलॉजी’ म्हणजे प्रयोजनवादी मानसशास्त्र म्हणू लागले. हा सामाजिक मानसशास्त्राचा आद्य ग्रंथ मानला जातो. ह्या ग्रंथाच्या विसावर आवृत्त्या निघाल्या व त्याने त्यावेळी मोठी खळबळ उडवून दिली. जगातील प्रमुख विद्यापीठांत पाठ्यपुस्तक म्हणून त्यांचा हा ग्रंथ लावला गेला. जीवशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान इ. विषयांत त्यांना रुची व गती होती.

बॉडी अँड माइंड हा ग्रंथ १९११ मध्ये त्यांनी प्रकाशित करून वर्तनवाद प्रवर्तित होण्यापूर्वीच फारसा प्रचलित नसलेला यांत्रिक उपपत्तीविरुध्द असा प्रयोजनवाद उचलून धरला. या सुमारास मानसशास्त्रज्ञ म्हणून त्यांना खूपच प्रतिष्ठा लाभली होती व त्यामुळे १९१२ मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे ‘फेलो’ म्हणून निवड झाली. हा एक दुर्मिळ प्रकारचा बहुमान त्यांना मिळाला. १९१२ मध्ये त्यांनी सायकॉलॉजी : द स्टडी ऑफ बिहेषियर हा लहानसा ग्रंथ प्रसिद्ध केला. परंतु याच वेळी वॉटसनच्या ⇨ वर्तनवादाचा उदय झाला. स्वतःच्या भूमिकेबद्दल या छोट्या ग्रंथामुळे गैरसमज होऊ नये म्हणून पुढे १९२३ मध्ये त्यांनी आपल्या भूमिकेचे सविस्तर विवरण-विवेचन करणारा आउटलाइन ऑफ सायकॉलॉजी हा ग्रंथ प्रसिद्ध केला व आपली भूमिका हिरिरीने मांडली. त्यांचे विचार अमेरिकेत फारसे मान्यता पावले नाहीत, तरीही होल्ट व ⇨ एडवर्ड चेस टोलमन यांच्या मानसशास्त्रीय विचारांवर त्यांचा ठसा निश्चितपणे उमटलेला दिसतो.

पहिल्या महायुद्धकाळात मॅक्डूगल सैद्धांतिक कार्याकडून उपयोजित कार्याकडे वळले. युद्धग्रस्तांच्या मानसचिकित्सेचे काम त्यांनी केले. उन्मादपीडित तसेच बाँब-अवसादी (शेल-शॉक) रुग्णांवर त्यांनी उपचार केले. १९२० मध्ये त्यांनी द ग्रुप माइंड : अ स्केच ऑफ द प्रिन्सिपल्स ऑफ कलेक्टिव सायकॉलॉजी हा ग्रंथ लिहिला. १९२० मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठात मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते गेले. अमेरिकेत हार्व्हर्ड येथे ⇨ ह्यूगो म्यून्स्टरबर्ग व ⇨ विल्यम जेम्स यांच्याशी त्यांची वैचारिक जवळीक तसेच मैत्रीचेही संबंध होते. विल्यम जेम्सप्रमाणेच त्यांना गुह्य वा अतींद्रिय घटनांबाबत आवड होती. त्यांनी तेथे विद्यार्थ्यांसाठी आपल्या प्रयोजनवादी भूमिकेच्या समर्थनार्थ पाठ्यपुस्तके तयार केली आणि यांत्रिक दृष्टिकोनाचे त्याद्वारे खंडन करण्याचा प्रयत्‍न केला. हार्व्हर्डमधील प्रशासकीय व वैचारिक वातावरण त्यांना प्रतिकूल बनत गेले आणि त्यामुळे ते हार्व्हर्ड सोडून १९२७ मध्ये ड्यूक विद्यापीठात गेले. ड्यूकमधील वातावरण त्यांच्या प्रयोजनवादी व अतींद्रिय मानसशास्त्रास उत्तेजक असेच होते. हार्व्हर्डमध्ये असतानाच शेवटीशेवटी त्यांनी लामार्कप्रणीत उपपत्तीच्या पडताळ्यासाठी प्राण्यांवर प्रयोग सुरू केले होते. आउटलाइन ऑफ सायकॉलॉजी (१९२३) व आउटलाइन ऑफ अब्‌नॉर्मल सायकॉलॉजी (१९२६) हे ग्रंथ त्यांनी हार्व्हर्डमध्ये असताना प्रसिद्ध केले पण त्यांचे तेथे फारसे स्वागत झाले नाही. ड्यूक विद्यापीठात आल्यानंतर त्यांनी लामार्कप्रणीत उपपत्तीबाबतचे संशोधन व अतींद्रिय मानसशास्त्रातील संशोधन जोमाने सुरू करून तेथे अद्ययावत मानसशास्त्र विभागाची स्थापना केली. विविध विषयांवर त्यांनी अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले. तथापि एकंदरीत त्यांच्या ह्या कार्यास पहिल्या दर्जाचे कार्य म्हणून मान्यता मिळू शकली नाही.

मॅक्डूगलचा खरा पिंड नीतिवाद्याचा व तत्त्ववेत्त्याचा होता, मानसशास्त्रज्ञाचा नव्हता. त्यामुळेच बदलत्या परिस्थितीत वर्तनवादाच्या लाटेपुढे त्यांचे प्रयोजनवादी मानसशास्त्र बाजूला पडले. ⇨ जे. बी. वॉटसन व मॅक्डूगल यांच्यातील वाद बराच गाजला आणि वॉटसनच्या वर्तनवादाचा त्यात विजय झाला. मॅक्डूगलप्रवर्तित मूळ सहजप्रेरणांची उपपत्ती त्यांच्या अनेक टीकाकारांनी विकृत स्वरूपात मांडून तिच्यावर टीकेची झोड उठविली. जे. बी. वॉटसनप्रमाणेच सिग्मंड फ्रॉइडशीही त्यांचा मतभेद होता तथापि आपल्या सायकोॲनॅलिसिस अँड सोशल सायकॉलॉजी (१९३६) या ग्रंथात “ॲरिस्टॉटलनंतर फ्रॉइडइतके कोणीही मानसशास्त्राच्या विकासासाठी काम केलेले नाही” असे प्रशस्तिपत्रक त्यांनी फ्रॉइडला दिलेले आहे. आज तटस्थपणे विचार करता मॅक्डूगल यांच्या उपपत्तीतील काही विचार खासच महत्त्वाचे होते, हे मान्य करावे लागते. मॉडर्न मटेरियालिझम अँड इमर्जन्ट हव्होल्यूशन (१९२९) व द रिड्‌ल ऑफ लाइफ (१९३८) हे त्यांचे इतर महत्त्वाचे ग्रंथ होत. डरॅम, एन्. सी. येथे त्यांचे निधन झाले.

पहा : प्रयोजनवादी मानसशास्त्र सहजप्रेरणा.

संदर्भ : Robinson, A. L. William McDougall, M. B., D. SC., F.R.S. : A Bibliography, Together With a Brief Outline of His Life, Durham, N. C., 1943.

हरोलीकर, ल. ब.