वृकोन्माद : (लायकन्‌थ्रॉपी). एक मनोविकृती. मानवाचा आत्मा इतर प्राण्यांची रूपे धारण करू शकतो, असा एक लोकभ्रम रूढ असल्याचे आढळते. वृकोन्माद ह्या क्वचितच आढळणाऱ्या मनोविकृतीत आपले रूपांतर लांडगा, वाघ, अस्वल इ. हिंस्र पशूंत झाले आहे, असे रुग्णाला वाटत राहते. ख्रिसपूर्व काळातील बॅबिलोनिया ह्या मध्यपूर्वेतील देशात, एका राजाला हा विकार जडल्याची नोंद इतिहासात आहे.

माणसाचे वाघात रूपांतर होऊ शकते, असा लोकभ्रम भारतातील काही आदिवासी जमातींत आढळतो. नरमांसभक्षक वाघांचे सुप्रसिध्द शिकारी जिम कॉर्‌बेट (उत्तर प्रदेश) आणि केनेथ अँडरसन (कर्नाटक) यांनी ऐकलेल्या अशा कथांचा निर्देश त्यांनी त्यांच्या लेखनात केलेला आहे. एकोणिसाव्या शतकातील प्रसिध्द ब्रिटिश लेखक⇨रड्यर्ड किपलिंग याने द जंगल बुक (१८९४) ह्या आपल्या पुस्तकात लांडग्यांनी वाढवलेल्या एका मुलाची जी कथा लिहिलेली आहे, तिचा काहीसा संबंध या लोकभ्रमाशी असावा.

आधुनिक काळात वृकोन्माद ह्या विकाराचे वर्गीकरण सांस्कृतिक चित्तविकृतीत होते.

संदर्भ : Coleman, J. C. Abnormal Psychology and Modern Life, Bombay, 1970.

शिरवैकर, र. वै.