मानस भौतिकी : (सायकोफिजिक्स). भौतिक घटनाप्रवाह व मानसिक घटनाप्रवाह यांमधील संख्यात्मक संबंधांचा अभ्यास म्हणून मानसभौतिकी या अभ्यासक्षेत्राचा उदय ⇨ जी. टी. फेक्नर (१८०९−८७) या भौतिकीविज्ञाच्या १८६० मध्ये प्रसिद्ध झालेल्या एलिमेंट्स ऑफ सायकोफिजिक्स (म. शी. मानसभौतिकीची मूलतत्त्वे) ह्या मूळ जर्मनमधील दोन खंडांत असलेल्या ग्रंथाने झाला. विसाव्या शतकाच्या तिसऱ्यादशकापर्यंत हा ग्रंथ मानसभौतिकीचा प्रमाणभूत ग्रंथ होता. फेक्‌नरच्या काळात मानसशास्त्राचे विषयक्षेत्र बोधयुक्त अनुभवापुरतेच मर्यादित होते व त्याचा प्रायोगिक अभ्यास अशक्य मानला जात होता. या मान्यतेला मानसभौतिकीने सुरुंग लावला. मानसिक वेदनानुभवाची राशी व वेदन उत्पन्न करणाऱ्या भौतिक उद्दीपकाची राशी यांमधले संबंध तपासणे, हाच मानसभौतिकीचा मूळ उद्देश होता.

 वेदनानुभवाच्या मापनाचे खरे आरंभस्थान प्राचीन ग्रीक खगोलवेत्ता हिपार्कसने सुचविलेल्या आकाशस्थ ताऱ्याच्या तेजस्वितेच्या षट्पदी मापनसारणीत आहे. हिपार्कसने आकाशातील सर्वांत तेजस्वी दिसणाऱ्याताऱ्याला प्रथम प्रतीचा मानून व नुसत्या डोळ्यांनी दिसतो-न-दिसतो इतक्या अंधुक ताऱ्याला सहावी प्रत देऊन या दोन टोकांमध्ये दृश्य तेजस्वितेच्या चार समान पायऱ्या कल्पून षट्पदी मापनसारणी तयार केली. ही सारणी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरकालात दीप्तिमापन (फोटोमेट्री) पद्धतीचा शोध लागून ताऱ्यांचे दीप्तिमापन शक्य होईपर्यंत प्रमाणभूत मानली जात होती. फरक एवढाच, की दीप्तिमापनाने डोळ्यांत प्रवेश करणाऱ्या प्रकाशकिरणांचे मापन होते, तर हिपार्कसच्या मापनसारणीने दृश्य तेजस्वितेचे म्हणजे मानसिक अनुभवाचे मापन होत होते.

 फेक्‌नरचे मत असे होते, की वेदनानुभवाची प्रक्रिया मानसिक असल्यामुळे त्याचे सरळ रीतीने मापन अशक्य आहे पण ते अप्रत्यक्ष रीतीने वेदनानुभव उत्पन्न करणाऱ्या भौतिक उद्दीपकाच्या मापनाने शक्य आहे व याच हेतूने त्याने मानसभौतिकीचा सैद्धांतिक पाया रचला व त्यासाठी प्रयोगप्रविधी तयार केले.

 मानसभौतिकीच्या सिद्धांतांचा विकास चार टप्प्यांत झाला. पहिल्या टप्प्यांत फेक्‌नरने सुचविलेला मानसभौतिकी नियम व त्या अनुषंगाने रचलेल्या प्रयोगपद्धतीचा विकास झाला. दुसऱ्या टप्प्यात लूई लिओ थर्स्टन (१८८७−१९५५) याने फेक्‌नरच्या सिद्धांतामध्ये केलेली सुधारणा व मानसभौतिकीच्या पद्धतींचा केलेला विस्तार येतो. तिसरा टप्पा एस्. एस्. स्टीव्हन्झने सुचविलेला घातनियम (पॉवर लॉ) व वेदनानुभवाच्या सरळ मापनासाठी बनविलेल्या प्रयोगकार्यपद्धती (प्रोसिजर) यांचा आहे. चवथ्या टप्प्यामध्ये डब्ल्यू. पी. टॅन्नर व जे. ए. स्वेट्स यांनी प्रवर्तित केलेला संकेत ओळख सिद्धांत व त्या अनुषंगाने सुचविलेल्या प्रयोगकार्यपद्धती येतात.

 पहिला टप्पा : फेक्‌नरच्या पूर्वी ⇨ एर्न्स्ट हाइन्रिख वेबर (१७९५−१८७८) या शरीरक्रियावैज्ञानिकाने स्पर्श व स्नायू वेदनांवर संशोधन करून वेदनानुभवाच्या राशीमध्ये अल्पतम अनुभवित तफावत (अ. अ. त., जस्ट-नोटिसिएबल डिफरन्स−जे. एन्. डी.) घडवून आणण्यासाठी मूळ उद्दीपक राशी (S) मध्ये करावयास लागणारी वृद्धी (∆ S) ही मूळ उद्दीपकाच्या राशीच्या स्थिर प्रमाणात (K) असते (∆S /S = K) हे सूत्र प्रस्थापित केले. यालाच वेबरचा नियम व (∆S/S) ला वेबर अपूर्णांक म्हणतात. वेबरने या अभ्यासासाठी वापरलेल्या प्रयोगपद्धतीस स्थूल अर्थाने ‘अल्पतम अनुभवित तफावती’ ची पद्धती म्हणतात.


फेक्‌नरने वेबरचेच संशोधनकार्य पुढे चालविले व अनेक वेदनप्रकारांचा अभ्यास करून वेबरच्या नियमाला लॉगरिथमिय नियमाचे स्वरूप दिले. हा नियम, R = K Log S, फेक्‌नरचा नियम किंवा वेबर−फेक्‌नरचा नियम म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने वेदनानुभव उद्दीपक यांच्या राशींमधील संबंधांचा अभ्यास करण्यासाठी जे तपशीलवार प्रयोगप्रविधी बनविले, त्याला मानसभौतिकी पद्धती म्हणतात व त्यासाठी जी सैद्धांतिक बैठक तयार केली त्याला मानसभौतिकी सिद्धांत म्हणतात.

सिद्धांत : फेक्‌नरने तीन मूलभूत सिद्धांतधारणा सुचविल्या : (१) निम्न सीमा : (लोअर लिमेन) अथवा निरपेक्ष तलसीमा (ॲब्सोल्यूट थ्रेशहोल्ड). कोणताही वेदनानुभव उत्पन्न होण्यासाठी उद्दीपकाची अमुक अल्पतम राशी आवश्यक असते. त्यापेक्षा कमी राशीचा उद्दीपक वेदन उत्पन्न करू शकत नाही. (२) भेदन सीमा (डिफरन्स लिमेन) किंवा विभेदन (डिफरंशियल) तलसीमा. वेदनानुभवाच्या राशीत अल्पतम अनुभवित वृद्धी अथवा अ. अ. त. आणण्यासाठी उद्दीपकाच्या मूळ राशीमध्ये अमुक प्रमाणातच वृद्धी करावयास हवी. त्याहून कमी वृद्धी अ.अ.त आणू शकत नाही. (ही संकल्पना वेबरच्या नियमाने सिद्ध होते.) निम्न सीमा व भेदन सीमा ही व्यक्तीच्या संवेदनक्षमतेची मापे आहेत. (३) वेदनानुभवाच्या राशीमध्ये या रीतीने क्रमशः वाढ करून तयार झालेली मानसिक वेदनानुभव श्रेणी गणितीय क्रमाने वाढत जाते, तर वेदनानुभव उत्पन्न करणाऱ्या भौतिक उद्दीपकाची श्रेणी भौमितिक क्रमाने वाढत जाते. ह्या दोन श्रेणीमधील हा संबंध फेक्‌नरच्या नियमाने दाखविला जातो. फेक्‌नरच्या नियमामागे दोन गृहीत धारणा होत्या : (१) निम्न सीमा व भेदन सीमा स्थिर असत नाहीत, तर त्यांत सतत चढउतार होतात. त्यामुळे एकाच मापनावर संतुष्ट न राहता अनेक मापने घेऊन सर्वांची सरासरी हेच खरे माप मानावे. (२) वेदनानुभवाच्या श्रेणीमधील प्रत्येक टप्प्यावरचा अ. अ. त. सारखाच असतो.

 मानसभौतिकी पद्धती : निम्न सीमेचे व भेदन सीमेचे मापन करण्यासाठी फेक्‌नरने तीन प्रयोगपद्धती सुचविल्या व त्यांचे विगतवार प्रविधी बनविले. त्यांमध्ये प्रयोग करताना होणाऱ्या संभाव्य त्रुटींचे निवारण करण्याच्या प्रयुक्त्यांचाही समावेश केला. ह्या तीन प्रयोगपद्धती अशा :

(१) मर्यादा वा सीमा पद्धती (मेथड ऑफ लिमिट्स) : अथवा क्रमिक अन्वेषण पद्धती (मेथड ऑफ सेरिअल एक्स्प्लोरेशन) : या पद्धतीद्वारा निम्न सीमा व भेदन सीमा दोन्ही तपासता येतात.

(२) स्थिर उद्दीपकांची पद्धती (मेथड ऑफ कॉन्स्टंट स्टिम्यूलस) अथवा सत्य व असत्य किस्सा पद्धती (मेथड ऑफ राइट ऑर राँग केसेस) : या पद्धतीनेही निम्न सीमा व भेदन सीमा शोधता येतात.

(३) सरासरी प्रमाद पद्धती (मेथड ऑफ ॲव्हरेज एरर) अथवा समायोजन पद्धती (मेथड ऑफ ॲडजेस्टमेंट) : ही पद्धती भेदन सीमेच्या तपासणीसाठी वापरली जाते.

दुसरा टप्पा : १९२७ मध्ये थर्स्टनने ‘तौलनिक निर्णयाचा नियम’ (लॉ ऑफ कंपॅरेटिव्ह जज्‌मेंट) व ‘मानसभौतिकीय विश्लेषण’ (सायकोफिजिकल ॲनॅलिसिस) हे दोन लेख लिहून फेक्‌नरच्या मानसभौतिकी सिद्धांतात काही सुधारणा सुचविल्या व मानसभौतिकीच्या क्षेत्राचा विस्तार करून ज्या अनुभवांच्या मुळाशी मापनीय उद्दीपक नाही व ज्यांमध्ये मात्र गुणात्मकच तफावत आहे, अशा ‘छाप’, ‘मनोभाव’, ‘मनोवृत्ती’, ‘व्यक्तिमत्त्वगुण’ वगैरेंच्या मापनपद्धतींचा मानसभौतिकीमध्ये समावेश केला.

सिद्धांत : फेक्‌नरच्या सिद्धांताप्रमाणे उद्दीपक राशीचा भौतिकीय सातत्यक (काँटिन्यूअम) आणि वेदनानुभवाच्या राशीचा मानसिक सातत्यक (सेन्सॉरी काँटिन्यूअम) हे दोन समांतर व भिन्न प्रमाणाने वृद्धी पावणारे सातत्यक आहेत. आकृती क्र. १ ही संकल्पना स्पष्ट करते.


आ. १. फेक्नर-सिद्धांत स्पष्ट करणारी आकृती

फेक्‌नरच्या सिद्धांताप्रमाणे उद्दीपक व वेदनानुभव श्रेणी. उद्दीपक श्रेणी S… So…… S1……S2…… Sn……Sn+1…… व वेदनानुभव श्रेणी R1……R2……R3……Rn……Rn+1…. हे समांतर सातत्यक आहेत. निम्न सीमेमुळे वेदनानुभव श्रेणी R1 पासून सुरू होते, जे स्थान So ला समांतर आहे. R1 = अल्पतम वेदनानुभव. R2 – R1 = R3 – R2 = Rn – Rn+1 = अ. अ. त. So = उद्दीपकाची निम्न सीमा. 

S1

=

S2

=

Sn+1

=

∆S

(वेबर अपूर्णांक). 

So

S1

Sn

S

 

या सिद्धांतावर थर्स्टनने सुधारणा सुचविली. (१) फेक्‌नरने गृहीत धरले होते, की निम्न सीमा व भेदन सीमा अस्थिर आहेत व त्यांमध्ये चढउतार होतात. म्हणजे R1 हा वेदनानुभन So वरच होईल असे नाही, तर So च्या राशीमध्ये चढउतार होतो. थर्स्टनने हे जास्त स्पष्ट केले व सुचविले, की हा चढउतार प्रसामान्य वंटन वक्राप्रमाणे होतो. म्हणजे R1 ही वेदन प्रतिक्रिया सर्वांत जास्त वेळा So या राशीवर येते व या स्थानापासून दोन्ही बाजूच्या राशींवर त्या अनुभवाची वारंवारता कमीकमी होत जाते. So हा या विस्तरणाचा मध्य आहे. (२) एका राशीच्या वेदनानुभवाच्या राशीचा वंटन वक्र शेजारच्या राशींच्या अनुभवाच्या वितरणांवर परस्परव्यापक होतो व त्यामुळे ज्या उद्दीपक राशीवर शेजारशेजारचे दोन्ही वक्र परस्परव्यापक आहेत, त्याच्या वेदनानुभवाच्या राशीचा प्रयुक्ताला निर्णय घ्यावा लागतो. याला ‘विभेदनात्मक प्रक्रिया’ (डिस्क्रिमिनल प्रोसेस) म्हणतात. (३) थर्स्टनने गृहीत धरले, की उद्दीपकाच्या प्रत्येक राशीचा वेदनानुभवावर परिणाम होतो व त्यामुळे वेदनानुभवाच्या राशीचे पण प्रसामान्य वंटन असते आणि शेजारशेजारच्या वेदनानुभवाची वितरणे पण परस्परव्यापक असतात. याला ‘विभेदनात्मक प्रसारण’ (डिस्क्रिमिनल डिस्पर्शन) म्हणतात व यामधून योग्य वेदनानुभवाचा निर्णय घेण्याचे काम प्रयुक्ताला करावे लागते म्हणजे उद्दीपक श्रेणी व वेदनानुभव श्रेणी यांच्याही वर निर्णय सातत्यक असतो व प्रयुक्ताने घेतलेला निर्णय थर्स्टनने सुचविलेल्या ‘तौलनिक निर्णयाच्या नियमा’प्रमाणे असतो. थर्स्टनने दिलेला हा नियम  

R2− R1 = Z21 

√ 

σ12 + σ22 – 2 r 12 σ1 σ 2 

यासूत्रा मध्ये :

R1= वंटन नं. १ चा मध्य किंवा सरासरी.

R2= वंटन नं. २ चा मध्य किंवा सरासरी.

Z21= निर्णय R2 उणे निर्णय R1चा प्राकृत विचलक.

σ1= वंटन नं. १ चे प्रमाण विचलक.

σ 2= वंटन नं. २ चे प्रमाण विचलक.

R12= वंटन नं. १ व वंटन नं. २ मधील सहसंबंध.


थर्स्टनच्या मुख्य संकल्पना आकृती क्र. २ मध्ये दाखविल्या आहेत.

आ.२. थर्स्टन-सिद्धात स्पष्ट करणारी आकृतीथर्स्टनच्या सिद्धांताप्रमाणे तीन सातत्यकांची वंटने : उद्दीपक श्रेणी S, वेदन परिणाम श्रेणी R व निर्णय श्रेणी J हे समांतर सातत्यक. So= निम्न सीमा. S1 – So = भेदन सीमा. R1 हा So चा अल्पतम वेदनानुभन परिणाम. R2−R1 अ. अ. त. J1, J2 हे R1 व R2 च्या वितरणांचे निर्णय बिंदू व J1, J2 हे मधले अंतर थर्स्टनच्या तौलनिक निर्णयाप्रमाणे असते.

याशिवाय थर्स्टनने फेक्‌नरने सुचविलेल्या मानसभौतिकी प्रयोगात प्राप्त होणाऱ्या प्रदत्ताच्या गणनेमध्ये संख्याशास्त्रीय पायावर सुधारणा केल्या व तीन नवीन मापनपद्धती सुचविल्या. त्या मनोमापन पद्धती (सायकोमेट्रिक मेथड्स) म्हणून प्रसिद्ध आहेत.

 पद्धती : थर्स्टनने मनोमापनाच्या तीन पद्धती सुचविल्या : (१) मूल्यनिर्धारण (रेटिंग मेथड) : या पद्धतीमध्ये प्रयुक्तासमोर अनेक उद्दीपक किंवा वस्तू ठेवण्यात येतात व प्रयुक्ताने प्रत्येकाच्या गुणमूल्याचा निर्णय एकैकशः घ्यावयाचा असतो. या मूल्यनिर्धारण पद्धतीची अनेक स्वरूपे आहेत. परंतु त्या सर्वांमध्ये प्रत्येक उद्दीपक वस्तूचे एकैकशः मूल्यनिर्धारण करणे ही सामान्य क्रिया आहे.

(२) युग्म (पेअर्ड) तुलना पद्धती : या पद्धतीमध्ये मूल्यनिर्धारण होत नाही, तर उद्दीपक वस्तूंमध्ये अमुक गुण ध्यानात ठेवून तौलनिक दृष्टीने क्रमश्रेणी (रँकिंग) स्थापन करता येते. यात उद्दीपक वस्तूंच्या सर्व शक्य जोड्या करून प्रयुक्तापुढे प्रत्येक जोडी ठेवण्यात येते व प्रयुक्ताने प्रत्येक जोडीपैकी कोणता उद्दीपक श्रेष्ठ आहे किंवा जास्त आवडला आहे, ते सांगावयाचे असते. प्रयुक्ताने दिलेल्या उत्तरांवरून एक चौरस कोष्टक बनवून त्यावरून संख्याशास्त्रीय गणना करून या उद्दीपक वस्तूंमध्ये श्रेष्ठ ते कनिष्ठ क्रमश्रेणी स्थापन करता येते.

 (३) क्रमश्रेणी स्थापन पद्धती (रँकिंग मेथड) : या पद्धतीमध्ये प्रयुक्ताने त्याच्या पुढे ठेवण्यात आलेल्या वस्तू किंवा उद्दीपकांमध्ये श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत क्रमवारी करावयाची असते. क्रमश्रेणी स्थापन पद्धतीमध्येही क्रमवारी करण्याच्या अनेक रीती आहेत.

 या मनोमापन पद्धतींच्या क्रियाव्यापारामध्ये (ऑपरेशन) होणाऱ्या चुका व एकांगी झोक वा अभिनती (बायस) च्या निवारणासाठी थर्स्टनने अनेक क्लृप्त्या सुचविलेल्या आहेत. ज्या अनुभवांच्या मागे मापनीय उद्दीपक नाही, त्यांच्या मापनासाठी थर्स्टनच्या मनोमापन पद्धती अजूनही सर्वत्र वापरल्या जातात. मनोवृत्तींच्या मापनासाठी थर्स्टनची सुप्रसिद्ध समभासमान मध्यंतर श्रेणी पद्धती व लायकर्टची प्रसिद्ध संकलित श्रेणी पद्धती या मूल्यनिर्धारण पद्धतीचीच विशिष्ट रूपे आहेत.


तिसरा टप्पा : स्टीव्हन्झने १९३६ ते ६३ दरम्यान अनेक लेख लिहून फेक्‌नरच्या मानसभौतिकी सिद्धांताच्या काही उणिवा व मर्यादा दाखविल्या. त्याने वेदनानुभवाचे दोन वर्ग केले : (१) प्रोथेटिक सातत्यके : यामध्ये वेदनानुभव राशीच्या वृद्धीमागे उद्दीपक राशीचा वृद्धी बेरजेच्या स्वरूपाची असते. उदा., आवाजाची गरिमा (लाउडनेस), प्रकाशाची प्रखरता (इंटेन्सिटी) वगैरे. ध्वनीच्या गरिम्यामागे ध्वनिलहरींची तीव्रता असते. समान ध्वनिलहरींचे दोन आवाज एकदम झाले, तर होणाऱ्या ध्वनिवेदनाची राशी वाढते. (२) मेटॅथेटिक सातत्यके : यामध्ये वेदनराशीच्या वृद्धीसाठी उद्दीपकाच्या तीव्रतेत नाही, तर त्याच्या स्वरूपात बदल करावा लागतो. उदा., स्वरकोटी किंवा प्रकाशवर्ण वगैरे. स्वरकोटीच्या वेदनानुभवात वृद्धी करण्यास ध्वनिलहरींची कंपनसंख्या बदलावी लागते. त्यास खऱ्या अर्थाने वृद्धी म्हणत नाहीत. एकाच ध्वनिलहरींचे दोन आवाज एकदम झाले, तर वेदनानुभवाची कोटी वाढत नाही, तर गरिमा वाढते. स्टीव्हन्झने सप्रयोग दाखवून दिले, की फेक्‌नरचा नियम मात्र मेटॅथेटिक सातत्यकाचे बाबतीत खरा ठरतो व त्यात सुद्धा उद्दीपक राशी श्रेणीच्या मध्यविस्तारातच. निम्न व अंतिम टोकांकडे हा नियम कोलमडून पडतो. प्रोथेटिक सातत्यकाचे बाबतीत हा नियम खरा ठरत नाही. म्हणजे या बाबतीत सर्व अ. अ. त. सारखे नसतात, तर वेदनानुभवाच्या वृद्धीबरोबर अ. अ. त ची राशी देखील वाढत जाते. यामुळे प्रोथेटिक सातत्यकांच्या मापनश्रेणी बनविण्यासाठी त्याने घातनियम (पॉवर लॉ) सुचविला आहे. RS = K (S1−So)n म्हणजे वेदनाची राशी Rs ही उद्दीपकाच्या भेदन सीमेच्या स्थिरघाताच्या (n) स्थिर प्रमामात (K) असते. ह्या घातनियमाप्रमाणे वेदनानुभवाची शुद्ध मापनसारणी बनविण्यासाठी स्टीव्हन्झने आठ नवीन प्रयोगपद्धती सुचविलेया व त्यांचे वेदनानुभवाच्या प्रत्यक्ष मापनश्रेणी रीती (डायरेक्ट मेथड्स ऑफ सेन्सॉरी स्केल कन्स्ट्रक्शन) असे वर्णन केले.

पद्धती : या प्रत्यक्ष मापन पद्धतींचे दोन मुख्य वर्ग आहेत : (१) वेदनानुभवाची मध्यंतर मापन सारणी (इन्टर्व्हल स्केल) बनविण्याच्या पद्धती व (२) वेदनानुभवाच्या अनुपात मापन सारणी (रेशो स्केल) बनविण्याच्या पद्धती.

प्रत्येक पद्धतीत प्रयत्नांची संख्या, अनुक्रम वगैरे बाबतींत स्टीव्हन्झने लिगतवार प्रयोगविधी बनविले व प्राप्त होणाऱ्या प्रदत्तांच्या गणनेवरून वेदनमापन सारणी कशी बनवावयाची त्याच्या मार्गदर्शन सूचनाही केल्या आहेत. प्रत्येक प्रयोगपद्धतीने प्राप्त झालेल्या प्रदत्तांवरून वक्रालेख काढला, तर तो घातनियमाचा दर्शक होतो.

चवथा टप्पा : दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात रडारच्या पडद्यावर शत्रूची विमाने किंवा आगबोटी वगैरेंचे संदेश ओळखण्यासाठी पहारा करणाऱ्या निरीक्षकांच्या निर्वर्तनावर असर करणारे अनेक घटक उजेडात आले. टॅन्नर व स्वेट्स यांनी रडार-पडद्यावर निरीक्षण करणाऱ्यांच्या निर्वर्तनाचा पद्धतशीर अभ्यास करून प्राप्त झालेल्या प्रदत्तांच्या आधारे ‘संकेत ओळख सिद्धांता’ चे प्रवर्तन केले. हा सिद्धांत तसे पाहू गेले असता, ‘सांख्यिकीय निर्णयन सिद्धांत’ (स्टॅटिस्टिकल डिसिजन थिअरी) चे वेदनक्षमतेच्या प्रश्नाला अनुप्रयोजन आहे. परंतु या सिद्धांताने मानसभौतिकिच्या गोटात खळबळ उडवून दिली. कारण त्याने फेक्‌नरच्या मानसभौतिकी सिद्धांतामधील उणिवा व मर्यादांवर विदारक प्रकाश टाकला. स्वेट्सने निम्न सीमेच्या संकल्पनेची जरूर नाही असे प्रतिपादन केले. त्यामुळे मानसभौतिकीच्या आधीच्या सिद्धांतावर प्रभावी असर पडला व हा नवा सिद्धांत ‘समकालीन मानसभौतिकी’ मानला जाऊ लावला. या सिद्धांताचे महत्त्वाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण म्हणजे त्याच्या योगाने निरीक्षकाच्या विभेदक वर्तनाचे त्याची वेदनक्षमता (सेन्सिटिव्हिटी) व त्याचा प्रतिक्रिया निकष (रिस्पॉन्स क्रायटेरियन) या घटकांमध्ये पृथःकरण करता येते व प्रतिक्रिया निकषावर परिणाम करणाऱ्या परिबलाचा प्रभाव तपासता येतो.

सिद्धांत : संदेश ओळख सिद्धांताचे पायाभूत गृहीत सिद्धांत व संकल्पना अशा आहेत : (१) उद्दीपकाच्या वेदनप्रक्रियेबरोबर ‘गोंगाट’ वा ‘रव’ (नॉइझ) ची पार्श्वभूमी असते. (‘गोंगाट’ वा ‘रव’ ही संदेशप्रवहन सिद्धांताची एक पारिभाषिक संकल्पना आहे. संदेशप्रवहनाच्या प्रक्रियेमध्ये माध्यमाच्या व अन्य कारणामुळे उत्पन्न होणारा ‘गोंगाट’ वा ‘रव’ हा एक स्थिर व व्यत्ययकारक घटक आहे व त्या कारणाने प्रत्येक संदेश ह्या ‘रव’ च्या पार्श्वभूमीवरच ओळखला जावा लागतो). आपल्या वेदनतंत्रामध्ये व केंद्रीय मज्जासंस्थेमध्ये मज्जाप्रभावाचे गुंजन सतत चालू असते व उद्दीपन होत नसतानासुद्धा ‘रवा’ची पार्श्वभूमी सतत चालू असते. कमी राशीचा संदेश उद्दीपक असला, तर हा रव त्याच्या ओळखण्यामध्ये व्यत्यय आणतो (२) हा रव सतत यदृच्छेने (रँडमली) कमीजास्त होत असतो व (३) उद्दीपकाचा वेदनेंद्रियाच्या ग्राहकपेशींवर पडणारा वेदनप्रभाव देखील अनियमित रीतीने क्षणाक्षणाला कमी जास्त होत असतो. या तीन धारणांमुळे निम्न सीमेची संकल्पना अनावश्यक ठरली. (४) रवचे त्याचप्रमाणे वेदनप्रभावाचे कमीजास्त होणे प्रसामान्य वंटन वक्रा (नॉर्मल डिस्ट्रिब्यूशन कर्व्ह) च्या आकाराचे असते. (५) रवाचे वितरणावर वेदनप्रभावाचे वंटन संयोजक (ऑडिटिव्ह) असते आणि ही दोन्ही वंटने मज्जाप्रभावाच्या एकाच कोटीवर (ऑर्डिनेटवर) दोन प्रसामान्य वंटन वक्रांद्वारे दाखवता येतात. संदेश उद्दीपकाची राशी कमी असली, तर ही दोन्ही वंटने परस्परव्यापक असतात व त्यामुळे निरीक्षकाला संदेश ओळखणे कठीण होते.


प्रयुक्त निरीक्षकापुढे दोन परिस्थिती असू शकतात : (१) संकेत उद्दीपकाची उपस्थिती (SN) किंवा त्याची अनुपस्थिती (N) व (२) त्याच्या पुढे प्रतिक्रियेचे दोन विकल्प असतात−‘होय’ (A) व ‘नाही’ (B). या दोघांच्या संयोजनाने एकूण चार परिणाम संभवतात : (१) संकेताची उपस्थिती व निरीक्षकाची ‘होय’ प्रतिक्रिया (SN.A). या परिणामाला ‘अचूक वेध’ (हिट) म्हणतात. (२) संदेशाची उपस्थिती व निरीक्षकाची ‘नाही’ प्रतिक्रिया (SN.B). या परिणामाला ‘चूक’ (मिस) म्हणतात. (३) संदेशाची अनुपस्थिती व निरीक्षकाची ‘नाही’ प्रतिक्रिया (N.B). या परिणामाला ‘योग्य नकार’ (करेक्ट रिजेक्शन) म्हणतात. (४) संदेशाची अनुपस्थिती व निरीक्षकाची ‘होय’ प्रतिक्रिया (N.A). या परिणामाला ‘खोटा इशारा’ (फॉल्स अलार्म) म्हणतात.

हे चार परिणाम आकृती क्र. ३ मध्ये चतुष्कोष्टक वा संव्यूहाच्या (मॅट्रिक्स) स्वरूपात दाखविले आहेत. 

निरीक्षकाची प्रतिक्रिया 

संकेत 

 

अनुपस्थिती.N

उपस्थिती.SN 

होय A

खोटा इशारा N.A

अचूक वेध SN.A

नाही B 

योग्य नकार N.B

चूक SN.B


 जेव्हा संकेत उद्दीपक पुरेसा तीव्र असतो, तेव्हा ‘संकेत उपस्थिती’ व संकेत अनुपस्थितीची वितरणे एकमेकांपासून दूर असतात आणि त्यांच्यात परस्परव्याप्तीचा अभाव असतो. अशा परिस्थितीत निरीक्षकाला संकेत ओळखावयास काही अडचण पडत नाही पण जेव्हा संकेत उद्दीपक अंधुक अथवा कमी तीव्रतेचा असेल, तेव्हा ही दोन वितरणे परस्परव्यापक असतात व त्यामुळे निरीक्षकाला ‘होय’ किंवा ‘नाही’ प्रतिक्रिया देण्याबाबत समस्या पडते. कारण त्याच्या सर्वच ‘होय’ प्रतिक्रिया ‘अचूक वेध’ असत नाहीत. काही होय प्रतिक्रिया ‘खोटा इशारा’ असू शकतात. त्याचप्रमाणे सर्वच ‘नाही’ प्रतिक्रिया ‘योग्य नकार’ असत नाहीत. काही ‘नाही’ प्रतिक्रिया ‘चूक’ असू शकतात. आकृती क्र.४ वरून निरीक्षकाची ही समस्या स्पष्ट होते.

आ. ४. ‘रव’ आणि ‘र व + संदेश’च्या वितरणांची परस्परव्यापकतादर्शक आकृतीN व SN ची वितरणे परस्परव्यापक असतात त्याची परिस्थिती या आकृती नं. ४ वरून दिसून येते, की SN व N वितरणांच्या परस्परव्याप्तीमुळे X1 ते X2 पर्यंतच्या मज्जाप्रभाव राशीला होणार्यां निरीक्षकाच्या ‘होय’ व ‘नाही’ प्रतिक्रियेने दोन परिणाम संभवतात. काही ‘होय’ प्रतिक्रिया ‘खोटा इशारा’ असू शकतात आणि काही ‘नाही’ प्रतिक्रिया ‘चूक’ असू शकतात. अशा परिस्थितीत निरीक्षकाला ‘होय’ किंवा ‘नाही’ प्रतिक्रिया देण्यासाठी मज्जाप्रभावाच्या अमुक राशीचा निकष नक्की ठरवावा लागतो. जर त्याने X1 या जागी निकष नक्की केला व त्याहून जास्त राशीला होय प्रतिक्रिया देण्याचे ठरविले, तर संदेशाच्या उपस्थितीचा एकही किस्सा तो चुकणार नाही परंतु त्याचबरोबर संदेशाच्या अनुपस्थितीच्या अनेक किस्स्यांना ‘खोटा इशारा’ असण्याचा संभव असेल. अशा निकषाला ‘शिथिल’ (लॅक्स) किंवा ‘बेजबाबदार’ (रेकलेस) निकष म्हणतात. जर त्याने X2 या स्थानावर प्रतिक्रिया निकष नक्की केला आणि त्याहून जास्त मज्जाप्रभावाची राशी असल्याशिवाय ‘होय’ प्रतिक्रिया द्यावयाची नाही असे ठरविले, तर संदेशाच्या अनुपस्थितीच्या एकाही किस्स्यां मध्ये तो ‘खोटा इशारा’ देणार नाही. पण त्याबरोबर संदेशाच्या उपस्थितीच्या अनेक किस्स्यांमध्ये तो ‘चूक’ प्रतिक्रिया देईल. अशा निकषाला ‘अतिकडक’ (स्ट्रिक्ट) किंवा ‘स्थितिरक्षक’ (कॉन्झर्वेटिव्ह) निकष म्हणतात. निरीक्षकाने Xo या स्थानी निकष नक्की केला, तर ‘खोटा इशारा’ आणि ‘चूक’ यांमध्ये समतोल साधला जाईल. परंतु यामध्ये गृहीत धरले जाते, की निरीक्षकाच्या ‘होय’ व ‘नाही’ प्रतिक्रियांचे सर्वच परिणाम समान महत्त्वाचे आहेत. प्रत्यक्ष जीवनात तसे नसते. कित्येक वेळा ‘चूक’ प्रतिक्रियेने प्रमाणाबाहेर नुकसान होण्याचा संभव असतो किंवा खोट्या इशाऱ्यामुळेही नुकसान होऊ शकते अथवा ‘अचूक वेधा’ मुळे अन्य प्रतिक्रियांमुळे होणाऱ्या नुकसानापेक्षा प्रमाणाबाहेर फायदा होण्याचा संभव असतो. त्यामुळे निरीक्षकाला प्रतिक्रिया परिणामांमुळे होणारे संभाव्य ‘फायदा नुकसान’ (पे-ऑफ) लक्षात घ्यावे लागते. सामान्यतः निरीक्षक अशा स्थानी निकषाचे स्थान नक्की करतो, की त्यामुळे त्याचा अधिकतम फायदा आणि/अथवा न्यूनतम नुकसान होईल. या तत्त्वाला किमान-कमालता (मिनी-मॅक्स) तत्त्व म्हणतात. या बाबतीत साधारण नियम असा आहे, की प्रतिक्रियांच्या संभाव्य परिणामांविषयी निरीक्षकाच्या अपेक्षा व त्याने ठरविलेल्या निकषाचे स्थान यांमध्ये सरळ संबंध आहे. ‘अचूक वेधा’मुळे जास्त फायदा होणार असेल व त्यामानाने ‘खोट्या इशाऱ्या’ने किंवा ‘चूक’ प्रतिक्रियेने अत्यल्प नुकसान होणार असेल, तर निकषबिंदू X1 या स्थानाकडे झुकेल व खोट्या इशाऱ्याने किंवा चूक प्रतिक्रियेने नुकसानच जास्त होणार असेल, तर निकषबिंदू X2 या स्थानाकडे झुकेल. याशिवाय निरीक्षकाला प्रतिक्रिया देण्याची वेळ येईल तेव्हा म्हणजे कोणत्याही प्रयत्नात संदेश उद्दीपक उपस्थित असण्याची शक्यताही लक्षात घ्यावी लागते. साधारणपणे संदेश उपस्थित असण्याची त्याची अपेक्षा व त्याने नक्की केलेल्या निकषबिंदूचे स्थान यांमध्ये व्यस्त संबंध असतो. संकेत उपस्थित असण्याची अपेक्षा जशी जास्त, तसा निकषबिंदू X1 या स्थानाकडे झुकेल.

संदेश ओळख प्रयोगामध्ये प्रयोगयोजक संदेश उद्दीपकाची राशी कमी जास्त करून, संदेशाच्या उपस्थितीच्या संभाव्यतेमध्ये फेरफार करून त्याचप्रमाणे निरीक्षकाच्या प्रतिक्रियेने होणारे नफा-नुकसानीचे प्रमाण कमी जास्त करून निरीक्षकाचा ‘प्रापक क्रियाप्रक्रिया लक्षणांचा वक्रालेख’ (रिसिव्हर ऑपरेटिंग कर्व्ह) बनवू शकतो व त्यावरूननिरीक्षकाची वेदनक्षमता व तिच्यावर होणारा निरीक्षकाच्या संदेश उपस्थितीच्या अपेक्षा त्याचप्रमाणे प्रतिक्रियेमुळे होणाऱ्या संभाव्य फायदा−नुकसानीचे ज्ञान या घटकांचा पडणारा प्रभाव तपासता येतो.


आ. ५. ‘खोटा इशारा’ व ‘अचूक वेध’ यांच्या टक्केवारीचा ‘प्रापक क्रियाप्रतिक्रिया लक्षण’ वक्रालेख.

एका निरीक्षकापासून प्राप्त झालेल्या ‘खोटा इशारा’ व ‘अचूक वेध’ यांच्या टक्केवारीचे ‘प्रापक क्रियाप्रतिक्रिया लक्षण’ वक्रालेख : d हा वक्रालेख ‘मात्र रव’ चा सैद्धांतिक आलेख आहे. d1 व d2 हे वक्रालेख ‘संदेश + रव’ चे आहेत. d2 मध्ये d1 पेक्षा जास्त राशींचा संदेश आहे. भरीव ठिपके हे ५० प्रयत्नांच्या गटात निरीक्षकाने दिलेल्या प्रतिक्रियांच्या सरासरी आहेत. d ते d1 ते d2 हे अंतर निरीक्षकाची वेदनक्षमता दाखविते. प्रयोगयोजकाने प्रत्येक ५० प्रयत्नांच्या गटात संदेश उद्दीपकाच्या उपस्थितीची वाढती संभाव्यता ठेवली होती.

 आकृती क्र. ५ वरून संदेशाच्या उपस्थितीची संभाव्यता निरीक्षकाच्या ‘खोटा इशारा’ व ‘अचूक वेध’ प्रतिक्रियांवर कशी असर करते ते स्पष्ट होते. ही संभाव्यता वाढत जाते, तशी ‘खोटा इशारा’ व ‘अचूक वेध’ यांची टक्केवारी वाढत जाते.

पद्धती : टॅन्नर व स्वेट्स यांनी संदेशओळख प्रयोगासाठी वापरलेली प्रयोगपद्धती सरळ व साधी आहे. निरीक्षकाला अंधेऱ्या खोलीत बसवून त्याच्या समोर एक रडारसारखा पडदा ठेवला जातो व त्यावर प्रक्षेपकाद्वारा अंधुक ठिपका प्रक्षेपित करण्यात येतो व निरीक्षकाला त्याचे अस्तित्व ओळखण्यास सांगण्यात येते. या काळ्या ठिपक्याची राशी कमी जास्त करता येते. त्याचप्रमाणे त्याच्या उपस्थितीची संभाव्यताही कमी जास्त करता येते. निरीक्षकाला योग्य त्या सूचना देऊन, त्याच्या प्रतिक्रियांचे संभाव्य फायदा-नुकसान काय आहे ते स्पष्ट सांगून प्रत्येक ५० प्रयत्नांच्या गटात प्रयोगयोजक हा संदेश उद्दीपकाच्या उपस्थितीची संभाव्यता बदलत जातो. प्राप्त झालेल्या परिणामांच्या कोटीवर अंकन करून त्याचा बंधबेसता (फिटिंग) वक्रालेख काढण्यात येतो. त्याचप्रमाणे त्याच्या सर्व ‘होय’, ‘नाही’ प्रतिक्रियांचा संव्यूह बनविण्यात येतो.

संदेशओळख सिद्धांताचे-प्रयोगाचे अनुप्रयोजन अनेक समस्यांच्या अभ्यासासाठी करता येते. त्यांपैकी काही पुढे दिल्या आहेत : (१) अभिजात अभिसंधान (२) उद्दीपक सामान्यीकरणाचे ढाळमान (स्टिम्यूलस जनरलायझेशन ग्रॅडिएंट). (३) कबूतरांचे विभेदनशिक्षण. (४) विवेचक (सिलेक्टिव्ह) अवधान. (५) संवेदनात्मक संरक्षण (पर्सेप्च्युअल डिफेन्स). (६) निम्न सीमेखालील संवेदन. (सब् लिमिनल पर्सेप्शन). (७) प्रत्यभिज्ञा स्मृती (रेकग्निशन मेमरी). (८) व्यक्तिमत्त्व लक्षणे. (९) प्राकृत व छिन्नमानस मनोरुग्णांमधील संवेदन प्रक्रियांचा फरक वगैरे.

 सारांश, मानसभौतिकी अथवा वेदनाचा भौतिक उद्दीपक व वेदनानुभव यांमधल्या संबंधाचा संख्यात्मक अभ्यास वेबर व फेक्‌नर या शास्त्रज्ञांनी प्रथम सुरू केला. त्यासाठी त्यांनी निम्न सीमा, भेदन सीमा व अल्पतम अनुभवित तफावत या तीन संकल्पना सादर केल्या व सीमा पद्धती, स्थिर उद्दीपकांची पद्धती व सरासरी प्रमाणाची पद्धती या तीन अभ्यास पद्धतींच्या तपशिलाचा विकास केला. पुढे थर्स्टन यांनी या अभ्यासाला संख्याशास्त्रीय पायाची जोड देऊन ज्यांच्या मागे भौतिक मापनीय उद्दीपक नाही अशा अनुभवाच्या मापनाच्या युग्मतुलना पद्धती, क्रमश्रेणी पद्धती व मूल्यनिर्धारण पद्धती प्रसृत केल्या. यायोगे ‘भावना’ (फीलिंग), ‘अभिवृत्ति’, ‘छाप’ वा ‘संस्कार’ (इंप्रेशन्स) वगैरे अमूर्त अनुभवाचे मापनही शक्य झाले. स्टीव्हन्झ यांनी फेक्‌नर यांच्या मानसभौतिकीच्या मर्यादा दाखवून देऊन जास्त शास्त्रशुद्ध मापनासाठी नवीन पद्धती सुचविल्या. स्वेट्स व टॅन्नर या संशोधकांनी मानसभौतिकीचे रूपांतर संकेतओळख सिद्धांतात करून वेदनानुभवाच्या निर्णयावर प्रभाव पाडणाऱ्या प्रेरण, अपेक्षा वगैरे परिबलांचा अभ्यास करण्यासाठी संकेतओळख पद्धती सुरू केली. या पद्धतीने पूर्वी मानसभौतिकीच्या क्षेत्रात येत नव्हत्या अशा अभिजात अभिसंधान, विवेचक अवधान, विभेदनशिक्षण वगैरे नव्या क्षेत्रांचा अभ्यासही होऊ लागला.

पहा : वेदन शारीरक्रिया मानसशास्त्र संवेदन.

संदर्भ : 1.   Fechner, G. T. Trans. Elements of Psychophysics, New York, 1966.

            2. Galanter, E. “Contemporary Psychophysics” in Newcomb, T. Ed., New Directions in Psychology, New York, 1962.

            3. Guilford, J. P. Psychometric Methods, New York, 1954.

            4. Swets, J. A. “Is There a Sensory Threshold?” Science, 134, 168, 77,

             5. Tanner, W. P. Swets J. A. “A Decision Making Theory of Visual Detection” in Psychological Review, 61 401−409, New York, 1954.

             6. Tobias, J. V, Foundations of Modern Auditory Theory, 2 Vols., New York, 1970, 1972.

भोपटकर, चिं. त्र्यं.