आल्फ्रेड बीने

बीने, आल्फ्रेड : (८ जुलै १८५७ – १८ ऑक्टोबर १९११). फ्रेंच मानसशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म फ्रान्समधील नीस येथे झाला. त्यांनी प्रथम कायद्याचा अभ्यास सुरू केला होता परंतु फ्रेंच मानसशास्त्रज्ञ शार्को यांच्या कार्याच्या प्रभावामुळे १८७८ साली त्यांनी संमोहनशास्त्राचा व मानसवैद्यकाचा अभ्यास सुरू केला. १८९४ मध्ये त्यांनी निसर्ग विज्ञानात डॉक्टरेट घेतली. विल्यम जेम्स, जॉन स्ट्यूअर्ट मिल आणि सर फ्रान्सिस गॉल्टन यांच्या प्रभावामुळे ते मानसशास्त्रातील बुद्धिमापनाच्या कार्याकडे वळले. १८९१ मध्ये मानसशास्त्रज्ञ या नात्याने पॅरिसमधील सॉरबॉन येथील संशोधन-प्रयोगशाळेत त्यांची प्रथम सहायक संचालक म्हणून नियुक्ती झाली. १८९५ साली त्यांची या संस्थेचे संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. ते शेवटपर्यंत याच जागेवर काम करत होते. सुमारे दहा वर्षे त्यांनी प्रायोगिक मानसशास्त्रात संशोधन करण्यात व्यतीत केली.

बीने यांचे सर्व ग्रंथ फ्रेंच भाषेत असून त्यांच्या महत्त्वाच्या ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरेही झाली आहेत. इंग्रजीत भाषांतरित झालेले त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : द सायकॉलॉजी ऑफ रीझनिंग (मूळ फ्रेंच १८८६, इं. भा. १९०१), अनिमल मॅग्नेटिझम (१८८७ फेरे यांच्या समवेत, इं.भा. १८९२), ऑन डबल कॉन्शसनेस (१८८९), आल्टरेशन्स ऑफ पर्सनॅलिटी (१८९२, इं. भा. १८९६), माइंड ऑड द ब्रेन (१९०६, इं. भा. १९०७). त्यांचे फ्रेंचमधील महत्त्वाचे ग्रंथ असे : Introduction a la psychologie experiementale (१८९४), Introduction a La psychologie experimentale(१८९४),La fatigue intellectuelle (व्ही. आंरी समवेत,१८९८), La suggestibilite (१९००), L’etude experimentale de l’intelligence (१९०३), Les idees modernes sur les enfants (१९११) इत्यादी. आंरी बोनीस यांच्या सहकार्याने त्यांनी १८९५ मध्ये पहिले फ्रेंच मानसशास्त्रीय वार्षिक –L’annee psychologique- सुरू केले. यातून त्यांनी स्वतःचे तसेच सीमोन यांच्या समवेत अनेक महत्त्वाचे मानसशास्त्रीय शोधनिबंध प्रसिद्ध केले.

फ्रेंच सरकारने १९०० च्या सुमारास त्यांच्यावर सर्वसाधारण मुले आणि बुद्धिमत्तेत मागासलेली मुले यांच्या संबंधात काही कामगिरी सोपविली असता, त्यातून बीने यांनी बुद्धिमापनाची कल्पना पुढे आणली. तेओदेर सीमोन (१८७३-१९६१) यांच्या सहाय्याने १९०५ मध्ये त्यांनी पहिली बुद्धिमापन चाचणी प्रसिद्ध केली. १९०८ मध्ये या चाचणीची पहिली सुधारित आणि त्यांच्या मृत्यूच्या वर्षी दुसरी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली. अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ या त्यांच्या कार्याने खूपच प्रभावित झाले. टर्मन यांनी १९१६ साली बीने-सीमोन चाचणीची स्टॅनफर्ड येथील सुधारित आवृत्ती प्रसिद्ध केली. त्यानंतर अनेक देशांत बीने-सीमोन चाचणीची भाषांतरे व सुधारित आवृत्त्या निघाल्या. या चाचण्यांबरोबरच बीने यांची मानसिक वय (मेंटल एज) ही संकल्पना मोलाची समजली जाते. वयाबरोबरच जी मानसिक वाढ होते, ती अधिक अवघड समस्या सोडविण्याच्या क्षमतेतून स्पष्ट होते, या वस्तुस्थितीचा बीने यांनी उपयोग करून घेतला. विशिष्ट वयोमर्यादेच्या चाचण्या उत्तीर्ण होण्याने त्या वर्षाचे मानसिक वय मिळते आणि मानसिक वय विविध वयोमर्यादेवरील किती चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्या यावर अवलंबून असते, असे त्यांनी प्रतिपादन केले.

बीने यांच्या बुद्धिमत्ता-चाचण्या बुद्धिमत्तेच्या विशिष्ट संकल्पनेवर अवलंबून होत्या. जीवनात उद्दिष्टे असणे, उद्दिष्टांच्या दिशेने कार्य करीत असता परिवर्तनशीलता असणे तसेच योग्य मार्गांची निवड करता येणे ही बीने यांनी बुद्धिमत्तेची गमके मानली होती. त्यांच्या चाचण्या बुद्धिमत्तेच्या याच स्वरूपावर आधारलेल्या होत्या. परंतु गेल्या पंचाहत्तर वर्षात बुद्धिमत्तेच्या या संकल्पनेत अमूलाग्र बदल झालेला असल्याने, बुद्धिमत्ता-चाचण्यांचे स्वरूपही बदलले आहे. असे असले, तरी बुद्धिमत्ता-चाचण्यांचे आद्य प्रणेते हे त्यांचे महत्त्व आजही कायमच आहे. पॅरिस येथे त्यांचे निधन झाले.

पहा : बुद्धिमत्ता, मानसिक कसोट्या.

संदर्भ : 1. Miller, G. A. Psychology: The Science of Mental Life, Harper, 1962.

2. Varon, E. J. The Development of Alfred Binet’s Psychology (Psychological Monographs, Vol. XLVI), Lancaster, N.Y., 1935.

गोगटे, श्री. ब. सुर्वे, भा.ग.