रोमानिज, जॉर्ज जॉन : (२ मे १८४८ – २३ मे १८९४). ब्रिटिश तुलनात्मक मानसशास्त्रज्ञ. जन्म किंग्स्टन (कॅनडा) येथे. किंग्स्टनमधील क्वीन्स विद्यापीठातील नोकरी सोडून त्याच्या वडिलांनी इंग्लंडला स्थलांतर केले (१८४८). रोमानिजने केंब्रिज विद्यापीठातून एम्. ए. पदवी प्राप्त केली (१८७४). त्यानंतर लंडन विद्यापीठातील ‘बर्डन सँडरसन प्रयोगशाळे’त त्याने तंत्रिका कशा उत्तेजित होतात, याविषयीचे आपले संशोधन सुरू ठेवले.

प्रथम धर्मोपदेशक होण्याची त्याची इच्छा होती. नंतर त्याला निसर्गविज्ञानाविषयी गोडी वाटू लागली. त्याच्या धर्मविषयक विचारांत देखील सतत बदल होत गेले. प्रथम तो निरीश्वरवादी होता पण नंतर देववादी बनला.

रोमानिजने तुलनात्मक मानसशास्त्रास आकार दिला. फॉस्टर आणि बर्डन सँडरसन यांच्या हाताखाली प्रत्यक्ष काम केल्यामुळे आणि डार्विनशी मैत्री असल्यामुळे त्याचे या विषयाकडील आकर्षण अधिकच वाढले. चार्ल्स डार्विनप्रमाणेच त्याने मानवेतर प्राण्यांचा शारीरक्रियाविज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास केला व त्यांच्याविषयी बरीच माहिती गोळा केली. पशूचे मन आणि मनुष्याचे मन या दोन्हींत संवेदनादींबाबतीत बरेच साधर्म्य असल्याचे तो मानत होता. सामान्य अनुमानानुसार अन्य प्राण्यांच्या वर्तनाचा अर्थ प्रस्थापित करून त्यांच्या ठिकाणी कोणकोणते मानवतुल्य मनोधर्म वास करतात, हे ठरविण्याचा त्याने प्रयत्न केला. उत्क्रांतिवादी सिद्धांताचा वापर करून तुलनात्मक शारीरक्रियाविज्ञानाच्या धर्तीवरच तुलनात्मक मानसशास्त्र उभारण्याच्या कल्पनेचा त्याने अखेरपर्यंत पाठपुरावा केला. मात्र आपल्या प्रतिपादनात त्याने कथापद्धतीवर (एनिक्‌डॉटल मेथड) फार भिस्त ठेवली. या पद्धतीत निरीक्षणाचे आणि निवेदनाचे अनेक प्रमाद होऊ शकतात. रोमानिजला आपल्या शास्त्रीय निरीक्षणांतून कथापद्धती बाजूला करता आली नाही.

रॉयल सोसायटीमार्फत त्याने अनेक शास्त्रीय शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्याच्या महत्त्वाच्या ग्रंथसंपदेत निमल इंटेलिजन्स (१८८२), सायंटिफिक एव्हिडन्सिस ऑफ ऑर्‌गॅनिक ईव्हलूशन (१८८२), मेंटल ईव्हलूशन इन निमल्स (१८८३), मेंटल ईव्हलूशन इन मॅन (१८८८), डार्विन अँड आफ्टर डार्विन (३ भाग, १८९२ – ९७), माइंड अँड मोशन अँड मॉनिझम (१८९५) यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. त्याच्या अनेक पुस्तकांचे भाषांतर फ्रेंच व जर्मन भाषांत झाले असून अमेरिकेतही ती बरीच प्रसिद्ध होती. १८९१ मध्ये त्याने ऑक्‌सफर्डमध्ये ‘रोमानिज व्याख्यानमाला’ सुरू केली.

रोमानिजने लिनीयन सोसायटीच्या प्राणिसंग्रहालयाचा सचिव, शारीरक्रियाविज्ञान संस्थेचा सचिव, लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजच्या कार्यकारिणीचा सदस्य वगैरे विविध उच्च पदे भूषविली. ऑक्सफर्ड येथे तो मृत्यू पावला.

केळशीकर, शं. हि.