स्टाउट, जॉर्ज फ्रेडरिक : (६ जानेवारी १८६०—१८ ऑगस्ट १९४४). विख्यात ब्रिटिश मनोवैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानाधिष्ठित अनुभववादी मनोविज्ञानाच्या ब्रिटिश परंपरेतील शेवटचा प्रतिनिधी. जन्म साउथ शील्ड्स, द्युरहॅम येथे.

स्टाउट याने केंब्रिज विश्वविद्यालयात विख्यात मानसशास्त्रज्ञ ⇨ जेम्स वॉर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली तत्त्वज्ञानाचे व मानसशास्त्राचे पाठ घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर १८८१ मध्ये सेंट जोन्स महाविद्यालयात नीतिशास्त्राचा व्याख्याता म्हणून त्याने आपली अध्यापनाची कारकीर्द सुरू केली. तेथून १८८६ मध्ये ॲबर्डीन विश्वविद्यालयात अँडरसन व्याख्याता म्हणून १८९८ मध्ये लंडन विश्वविद्यालयात वाइल्ड प्रोफेसर म्हणून आणि त्यानंतर तेथेच १९०३ पर्यंत परीक्षक म्हणून त्याने काम केले. त्यानंतर ते स्कॉटलंडमधील सेंट अँड्र्यूज विद्यापीठात तर्कशास्त्र व सत्ताशास्त्राचा प्राध्यापक म्हणून तो कार्यरत होता. इंग्लंडमधील विख्यात नियतकालिक माइंडचे संपादकत्व त्याला प्राप्त झाले (१८९१—१९२०). त्याच्या संपादकत्वाखाली माइंड एक दर्जेदार नियतकालिक म्हणून ख्याती पावले. त्याच दरम्यान ॲरिस्टॉटेलिअन सोसायटीचे अध्यक्षपद त्याने भूषविले. (१८९९—१९०४).

त्याच्या ग्रंथांपैकी ॲनलिटिक सायकॉलॉजी (दोन खंड ,१८९६), मॅन्युअल ऑफ सायकॉलॉजी (१८९९), ग्राउंडवर्क ऑफ सायकॉलॉजी (१९०३), स्टडीज इन फिलॉसॉफी अँड सायकॉलॉजी (१९३०), गॉड अँड नेचर तसेच माइंड अँड मॅटर (१९३१) हे ग्रंथ उल्लेखनीय आहेत. स्टाउटने ॲनलिटिक सायकॉलॉजीमध्ये ‘ एंबॉडिड माइंड ’ ही संकल्पना मांडली. ही संकल्पना शरीर आणि मन ही दोन नाहीत, हे ध्वनित करते. त्याच्या ग्राउंडवर्क ऑफ सायकॉलॉजी या ग्रंथात त्याने मानसशास्त्रा- वरील त्याचा दृष्टिकोण थोडक्यात, पण सारभूतपणे विशद केला असून मानसशास्त्राच्या विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या संशोधनास त्याने सुग्रथित केले आहे.

त्याचे ग्रंथ मनोविज्ञानाचे व्यवस्थित व सुरचनाबद्ध निरूपण करतात. स्टाउट याचे मानसशास्त्रातील विचार व दृष्टिकोण त्याचे गुरू जेम्स वॉर्ड यांच्या ॲक्ट सायकॉलॉजीशी बराचसा मिळताजुळता होता. त्या काळात मानसशास्त्र प्रत्यक्ष कशाचा अभ्यास करते, याविषयी मतभेद होते. एका बाजूस वॉर्ड यांचा मानसिक क्रियावाद होता मानसशास्त्र मानसिक क्रियांचा अभ्यास करते असा विचार होता तर दुसर्‍या बाजूला मानसिक द्रव्यतत्त्वाचा विचार होता. या वादाप्रमाणे मानसशास्त्राच्या विषयवस्तू संवेदने, कल्पना, विचार वगैरे आहेत, जी मनाची स्थायी द्रव्यतत्त्वे आहेत. मानसिक क्रिया ही अस्थायी व दुय्यम आहे. स्टाउट याच्या मते, संवेदने म्हणजे संवेदनेन्द्रियांच्या उद्दीपनामुळे होणारी वेदने वस्तुतः शारीरिक स्वरूपाची होत. मानसिक क्रियांच्या द्वारे त्यांचे परिवर्तन बोधनात होते. केवळ संवेदने म्हणून त्यात मानसशास्त्राला रस नाही परंतु त्यावर होणार्‍या प्रक्रिया मानसिक स्वरूपाच्या असतात व त्यांचे महत्त्व जास्त असते. जर्मन तत्त्वज्ञ-मानसशास्त्रज्ञ ⇨ योहान हेर्बार्ट व ऑस्ट्रियन क्रियावादाचा पुरस्कर्ता मनोवैज्ञानिक ⇨ आलेक्सिअस माईनोंग यांच्या विचारांचा स्टाउटवर प्रभाव होता. मनोप्रक्रियांवर भर दिल्यामुळे स्टाउटच्या सिद्धांतात संकल्पशक्ती अथवा इच्छाशक्ती ही केंद्रीभूत कल्पना झाली. प्रयास करण्याचा अनुभव व प्रत्यक्ष प्रयास करणे ही मनाच्या क्रियात्मकतेची द्योतक आहेत आणि तेच मानसिकतेचे प्रमुख लक्षण आहे. हा मानसिकतेच्या लक्षणावरील भर व मानसशास्त्राची विषय-वस्तू मानसिकताच आहे हा आग्रह, यांमुळे स्टाउट वर्तनवादाच्या विरुद्ध होता असे दिसून येते. त्याने पाव्हलॉव्हच्या अभिसंधानावरील संशोधनाचे स्वागत केले पण वॉटसनचा वर्तनवाद त्याच्या दृष्टीने आत्यंतिक एकांगी होता.

मानसिक प्रक्रिया आत्मलक्षी व आंतरिक असतात. त्यामुळे मनो-विज्ञानाच्या अभ्यासपद्धतीत आंतर्निरीक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे. मात्र अन्य अभ्यासपद्धती त्याला पूरक आहेत. मानसिक प्रक्रियेची विषयवस्तू ( ह्या प्रक्रिया ज्यावर होतात ती ) संवेदने असतात. मानसिक प्रक्रियेची मानसिकता ही या दोघांमधील विषय-विषयित संबंधांद्वारे व्याख्यान्वित होते. स्टाउट मानसिक प्रक्रियेचे दोन वर्गांत वर्गीकरण करतो : (१) बोधन ( कॉग्निशन ) आणि (२) रस ( इंटरेस्ट ). रसात्मक मानसिक प्रक्रिया दोन रीतींनी व्यक्त होते : (१) क्रियात्मकता आणि (२) भावना ( फीलिंग ). क्रियात्मकता म्हणजे कोणतेही कार्य करण्याच्या उत्कंठेमध्ये जी संकल्प-शक्ती अथवा इच्छाशक्ती प्रतिबिंबित होते, तिचा अनुभव. इच्छापूर्तीने तिचे शमन होते परंतु तात्पुरते. क्रियात्मकता हे मनाचे एक अविच्छिन्न लक्षण आहे. शमन होते ते विशिष्ट इच्छांचे. सामान्य इच्छाशक्ती कधीच लोप पावत नाही. तिचे कायमचे शांत होणे म्हणजे मानसिकतेचा अंत अथवा मृत्यू. स्टाउटच्या मते, अबोधता ( अन्कॉन्शस्नेस ) ही एक शारीरिक प्रकृती आहे व तिचे केंद्र मेंदूत असते. त्याच्या ह्या मतामुळे त्याला मनो-विश्लेषणवाद कधीच पटला नाही. स्टाउटचा घटकतत्त्ववादाला स्पष्ट विरोध होता. त्यामुळे काही समष्टिवादी लेखक त्याला समष्टिवादाचे पूर्वगामी सूचक मानतात. [⟶व्यूहमानसशास्त्र].

स्टाउटच्या समोर मुख्य प्रश्न होता बोधनांचा विकास कसा होतो हा. त्याच्या मताप्रमाणे संवेदने आणि अन्य मानसिक घटकतत्त्वे यांच्यावर मानसिक क्रियाप्रक्रिया होऊन त्यांतून बोधने विकास पावतात. म्हणजे बोधन हे अनेक घटकतत्त्वांचे सुग्रथन होय. मात्र साध्यात साध्या प्रत्यक्षीकरणाच्या अनुभवातसुद्धा संवेदनापेक्षा काही जास्ती, विगमनात्मक प्रक्रिया अनुस्यूत असते. बोधने ही संवेदनांचा ढीग नाहीत किंवा अनुक्रम पण नाहीत परंतु त्या सर्वांचे संश्लेशण ( सुग्रथन ) आहे. हा विचार थोडासा ⇨ व्हिल्हेल्म व्हुंटच्या ‘सर्जक संश्लेषण ’ ( क्रिएटिव्ह सिंथेसिस ) सारखा आहे परंतु व्हुंटचा भर ज्यांचे संश्लेषण होते, त्या घटकतत्त्वावर होता. स्टाउट याचा भर संश्लेषण प्रक्रियेवर होता. या संश्लेषणात अनेक इंद्रिय-संवेदने व अन्य घटकतत्त्वांची सामुग्री एकत्र येते आणि त्यातून जे काही निघते त्यात घटकतत्त्वे परिवर्तन पावलेली असतात. बाह्य जगत आणि मन यांमधील फरक असा, की बाह्य जगत बोधनप्रक्रियेवर अवलंबून नसते. ते स्वतंत्र असते परंतु मन म्हणजे मानसिकता. ही प्रक्रियारूप असल्यामुळे त्याला बाह्य जगातून येणार्‍या संवेदनांचा विषय असतो.

सिडनी ( ऑस्ट्रेलिया ) येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Boring, E. G. Ed. A History of Experimental Psychology, New York, १९४१.

2. Fliigell, J. C. Hundred Years of Psychology, London, १९५१.

3. Peters, R. S. Ed. British History of Psychology, New York.

भोपटकर, चिं. त्र्यं.