वॉटसन, जॉन ब्रॉड्स : (९ जानेवारी १८७८- २५ सप्टेंबर १९५८). अमेकरिकन मानसशास्त्रज्ञ. अमेरिकेतील ग्रीनव्हिल (साउथ कॅरोलायना) येथे जन्मला. फर्मन विद्यापीठातून एम्. ए. झाल्यानंतर (१८९९) आणि बेट्सबर्ग (साउथ कॅरोलायना) इन्स्टिट्यूटमध्ये एक वर्ष प्राचार्य म्हणून काम केल्यानंतर शिकागो जॉन ब्रॉड्रस वॉटसनविद्यापीठातून प्राण्यांमधील अध्ययन (ॲनिमल एज्युकेशन) ह्या मानसशास्त्रांतर्गत विषयात त्याने पीएच्. डी मिळवली (१९०३). शिकागो विद्यापीठात प्रथम सहायक व नंतर ‘इन्स्ट्रक्टर’ म्हणून काम केल्यावर १९०८ साली बाल्टिमोर येथील जॉन हॉपकिन्स विद्यापीठात मानसशास्त्राचा प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक झाली. तेथे जाताच त्याने ⇨तुलनात्मक मानसशास्त्राच्या (प्राणिमानसशास्त्र) अभ्यासासाठी प्रयोगशाळा स्थापन केली. ह्याच सुमारास ⇨वर्तनवादाविषयीचे विचार तो व्यक्त करू लागला. ‘सायकॉलॉजी ॲज द बिहेव्हिअरिस्ट व्ह्यूज इट’ ह्या १९१३ साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या लेखातही त्याने वर्तनवादी विचार मांडले. त्यानंतर १९१४ साली त्याचा बिहेव्हियर: ॲन इंट्रोडक्शन टू कंपॅरेटिव्ह सायकॉलॉजी हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. सायकॉलॉजी फ्रॉम द स्टँडपॉइंट ऑफ द बिहेव्हअरिस्ट (१९१९) हा त्याचा आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ. बिहेव्हिअरिझम (१९२५) आणि सायकॉलॉजिकल केअर ऑफ द इन्फंट अँड चाइल्ड (१९२८) हे त्याचे ग्रंथही निर्देशनीय आहेत.

तुलनात्मक मानसशास्त्राकडे वॉटसन ज्यांच्यामुळे ओढला गेला, त्यांत प्रक्रियावादी मानसशास्त्रज्ञ जे. आर्. एंजेल, न्यूरॉलॉजिस्ट एच्. एच्. डोनाल्डसन आणि जीवशास्त्रज्ञ जे. लब. ह्यांचा अंतर्भाव होतो. ⇨एडवर्ड ली थॉर्नडाइक आणि ⇨रॉबर्ट मर्न्झ यर्कीस ह्यांनी केलेल्या प्राण्यांच्या अभ्यासाचाही अप्रत्यक्ष पण महत्त्वाचा प्रभाव त्याच्यावर पडला.

प्राण्यांचे संशोधन करीत असताना आरंभी वॉटसनने सांकेतिक मानसशास्त्रीय संकल्पनांचाच वापर केला होता. परंतु नंतर तो त्यासाठी वर्तनवादी संज्ञा वापरू लागला आणि पुढे मानवी वर्तनाच्या अभ्यासासाठीही त्याने त्या वापरल्या. मानसशास्त्रीय संशोधनासाठी-विशेषतः प्रयोगिक निरीक्षणासाठी-मानवतेवर प्राण्यांचा वापर सोयीस्कर ठरतो. प्राण्याच्या वर्तन व्यापारातील मर्यादित गुंतागुंत, त्याच्या अल्प आयुर्मानामुळे त्याचा संपूर्ण जीवनक्रम डोळ्याखालून घालता येण्याची शक्यता, त्याच्या अनेक पिढ्यांचे निरीक्षण करता येणे इ. ह्याची कारणे. नैसर्गिक वातावरणातील क्षेत्रस्थ निरीक्षणआणि प्रयोगशाळेतील प्रायोगिक निरीक्षण अशा दोन अभ्यासपद्धती तुलनात्मक मानसशास्त्रात वापरल्या जातात. ह्या पद्धतींच्या प्रभावाखाली असलेल्या वॉटसनने अशी भूमिका घेतली, की मानसशास्त्र हे जाणिवेचे वा ⇨बोधावस्थेचे शास्त्र नसून ते वर्तनाचे शास्त्र आहे. तसेच भौतिक शास्त्रांच्या बरोबरीचा दर्जा मानसशास्त्राला मिळवावयाचा असल्यास त्याने विज्ञाननिष्ठ अभ्यासतंत्रांचाच स्वीकार केला पाहिजे. मानसिक अवस्था, मानसप्रतिमा ह्यांसारखे संदर्भ मानवी वर्तनाच्या अभ्यासासाठी घेणे आवश्यक नाही त्यांचा त्याग केला पाहिजे किंबहुना तो न केल्यामुळे मानशास्त्राची प्रगती व्हावी तेवढी झाली नाही, अशी वॉटसनची धारणा होती. वॉटसनच्या भूमिकेचा आणखी एक भाग असा होता, की मानवी वर्तनावर नियंत्रण ठेवता येणे आणि त्याचे भाकित वर्तविण्याची क्षमता मिळवणे हे मानसशास्त्राचे ध्येय असले पाहिजे. सर्व मानसशास्त्रीय प्रक्रिया ह्या वर्तनीय (बिहेव्हिअरल) प्रक्रियाच असतात, असेही तो प्रतिपादित असे.

मानवी वर्तनलक्षणांचा उगम व विकास ह्यांचा अभ्यास करणाऱ्या ⇨विकास मानसशास्त्राच्या (जेनेटिक सायकॉलॉजी) क्षेत्रातही वॉटसनने काम केले. बालकांच्या भावनिक प्रतिक्रियांच्या विकासाचा अभ्यास त्याने केला. मूळ अशा भावनिक प्रतिक्रिया फक्त तीन आहेत, असे त्याचे मत होते. त्या म्हणजे (१) मोठमोठ्या आवाजांमुळे किंवा आकस्मिकपणे शारीरिक आधार नाहीसा झाल्याने निर्माण झालेली भीती. (२) बालकाच्या हालचालींवर घातलेल्या निर्बंधांमुळे त्याला येणारा क्रोध आणि (३) हळुवारपणे थोपटल्यामुळे निर्माण होणारे प्रेम.

मानसशास्त्राच्या क्षेत्रातील वॉटसनचे कार्य १९२० पर्यंत जगद्विख्यात झालेले होते. वॉटसनच्या वर्तनवादाने अनेक मानसशास्त्रज्ञांवर प्रभाव टाकला. त्याचे सर्वच विचार त्यांनी स्वीकारले, असे मात्र नाही. वर्तनवादाच्या संदर्भात त्याने घेतलेली भूमिका टोकाची हाती, अशीही टीका केली जाते.

वॉटसनला १९१४ साली ‘अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन’चे अध्यक्षपद देण्यात आले. फर्मन विद्यापीठाने त्याला एल्एल्. डी. ही सन्माननीय पदवी १९१९ मध्ये दिली. त्याच्या जीवनात घडलेल्या काही घटनांमुळे १९२० साली त्याला जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील आपल्या सेवेचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर तो जाहिरात व्यवसायात शिरला. न्यूयॉर्क शहरी त्याचे निधन झाले.

पहा : वर्तनवाद

कुलकर्णी अ. र.