व्यक्तित्व : (इंडिव्हिड्युॲलिटी) प्रत्येक व्यक्तीत शारीरिक आणि मानसिक वैशिष्ट्यांचे जे एक खास संघटन घडून आलेले असते, त्यामुळे तिला दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळेपणा लाभलेला असतो. अशा प्रकारचे अनन्यसाधारणत्व म्हणजे व्यक्तित्व होय. कोणत्याही दोन व्यक्तींची तुलना केली, तर त्यांच्यात अगदी तंतोतंत साम्य नसल्याचे दिसेल.

मनुष्यजातीतील सर्वसाधारण असे शारीरिक-मानसिक स्वरूपविशेष सगळ्याच व्यक्तींमध्ये आढळून येतात. म्हणूनच आत्मविश्वास, सामाजिकता, आक्रमकता, वर्चस्व, चिकाटी ही व यांसारखी इतरही वैशिष्ट्ये काही व्यक्तींमध्ये ठळकपणे दिसून आली, तरी ती सगळ्याच व्यक्तींमध्ये कमी-अधिक प्रमाणात असू शकतात. अशा वैशिष्ट्यांचे कमी-अधिक मात्रांमध्ये घडून येणारे जे वैशिष्ट्यपूर्ण संघटन असते, ते त्या त्या माणसाच्या व्यक्तित्वाचे निदर्शक ठरते. ‘प्रत्येक व्यक्ती म्हणजे जिची पुनरावृत्ती होऊ शकत नाही, अशी एक घटना होय’ असे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ⇨ गार्डन विलर्ड ऑल्पोर्ट ह्यांनी म्हटले आहे.

नवजात अर्भकाच्या शरीररचनेत आणि वर्तनातही त्याचे व्यक्तित्व प्रतीत होत असते. उदा. एखादे अर्भक जन्मजात सक्रिय असते, तर दुसरे अतिशय शांत असते. बालक जसजसे मोठे होत जाते, तसतसे त्याचे व्यक्तित्वही विकसित होत असते. उदा. भूक लागली की, खाणे सर्वांनाच आवश्यक असते तथापि काय आणि कसे खावे ह्याबाबतीत प्रत्येकाची तऱ्हा वेगळी असते. हे व्यक्तित्वाचे लक्षण होय.

 मानवी व्यक्तींचे काही प्रधान साम्यभेदांच्या आधारे ढोबळ स्वरूपाचे वर्गीकरण मानसशास्त्रात करण्यात येते. ‘व्यक्तित्वाचे प्रकार’ ही संकल्पना अशा वर्गीकरणाशीच निगडित आहे. काही व्यक्तींचे वर्णन महत्त्वाकांक्षी किंवा मेहनती किंवा जिद्दी असे करण्यात येते पण ह्याचा अर्थ सर्वच महत्त्वाकांक्षी किंवा मेहनती किंवा जिद्दी व्यक्ती अगदी एकसारख्या असतात असे नाही कारण या गुणांव्यतिरिक्त इतर बऱ्याच बाबतींत त्यांच्यात वेगळेपण दिसून येण्याची शक्यता असते. म्हणूनच ‘एकाच प्रकारच्या व्यक्ती’ असे ज्यांचे वर्णन केले जाते, त्यांच्यातील प्रत्येकाच्या व्यक्तित्वात वेगळेपणा असतोच.

आनुवंशिकता आणि आसमंत ह्यांच्या संयुक्त परिणामांतून प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तित्वात आगळेवेगळेपण निर्माण होत असते. व्यक्तीच्या विविध वैशिष्ट्यांच्या विकासात अनुवंशाचा कार्यभाग महत्त्वाचा असतो. एकपेशीय जुळ्या भावंडांचा अपवाद वगळता कोणत्याही दोन व्यक्तींना लाभलेला अनुवंश सारखा नसतो. शिवाय प्रत्येकाला प्राप्त होणारा आसमंत आणि अनुभव ह्यांतही भिन्नता असते. एकपेशीय जुळ्या भावंडांचा प्राप्त परिसर किंवा अनुभवदेखील वेगवेगळा असू शकतो. म्हणूनच अशा जुळ्या भावंडांमध्ये वरवर कितीही साम्य दिसत असले, तरी सर्वच बाबतींत त्यांच्यात अगदी तंतोतंत साम्य असल्याचे दिसणार नाही. [→  आनुवंशिकता व आसमंत].

एकंदरीत प्रत्येकाचे ‘व्यक्तित्व’ ही त्याच्यापुरतीच मऱ्यादित असणारी बाब असून त्याचे आगळेपण त्यातून सूचित होत असते.

पहा : व्यक्तिमत्त्व.

संदर्भ : Leahy, Robert L. Ed., The Development of the Self, 1985.

कुळकर्णी, अरुण