फिलीप पीनेल

पीनेल, फिलीप : (२० एप्रिल १७४५ – २५ ऑक्टोबर १८२६). फ्रेंच मानसोपचारतज्ञ. मनोरुग्णांची सेवाभावाने देखभाल व चिकित्सा करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांपैकी एक अग्रेसर व्यक्ती. फ्रान्समधील लोस रोकेस येथे जन्म. सतराव्या वर्षी धर्मोपदेशक बनण्याच्या हेतूने तो तूलूझ येथील विद्यालयात गेला परंतु तेथे गेल्यावर लवकरच त्याने धार्मिक शिक्षणाऐवजी वैद्यकाचा अभ्यास करण्याचे ठरवले. निसर्गविज्ञाने आणि गणित या विषयातंही त्याची गती होती. १७७३ मध्ये त्याने डॉक्टरेट पदवी संपादन केल्यानंतर माँपेल्ये विद्यापीठातून त्याने आपले पुढील वैद्यकीय शिक्षण चालू ठेवले आणि पुढे १७७८ साली पॅरिस येथे तो स्थायिक झाला. तेथे हळूहळू मनोरुग्णांच्या प्रश्नांबाबत त्याची आस्था वाढत गेली.

मानसिक रोगांची शास्त्रीय दृष्यागत मीमांसा व चिकित्सा करण्याची हिपॉक्राटीझ (इ. स. पू. ४६०–३५७) ते गेलेन (इ. स. १३०–२००) पर्यंतची पंरपरा खंडित होऊन, पंधराव्या शतकापर्यंत गंभीर मनोव्याधींकडे पाहाण्याचा वैज्ञानिक दृष्टीकोन बहुतांशी लोप पावलेला होता. वेड लागलेल्या व्यक्ती दुष्ट असतात किंवा दुष्ट आत्म्यांच्या तावडीत सापडलेल्या असतात, अशा समजुतीने त्यांना कैदेत टाकून मारहाण केली जाई अथवा वेड्यांच्या इस्पितळात जखडून ठेवले जाई. हे वैचारिक वातावरण व ही परिस्थिती बदलून टाकण्यात पीनेलने महत्वाची कामगिरी बजावली. त्याने गंभीर मनोविकृतींचे निरीक्षण, वर्णन तसेच वर्गीकरण केले. १७९३ मध्ये पॅरिसच्या मनोरुग्णालयाचा प्रमुख झाल्याबरोबर त्याने तेथे वर्षानुवर्षे जखडून ठेवलेल्या ४९ मनोरुग्णांना शृंखलामुक्त केले व त्यांना ‘माणसे’ म्हणून वागवून त्यांपैकी पुष्कळांना बरेही केले.

त्याने १७९५ मध्ये सालपित्रे येथील रुग्णालयातील मनोरुग्णांची जबाबदारी पतकरून त्यांच्या चिकित्सेच्या व शुश्रूषेच्या बाबतीत अनेक सुधारणा घडवून आणल्या. रुग्णांच्या व्यक्ति-इतिहासाची नोंद ठेवण्याची प्रथाही त्यानेच पाडली. १७९४ ते १८२२ या काळात पीनेल पॅरिस विद्यापीठात आरोग्यविज्ञान आणि विकृतिविज्ञान या विषयांचा प्राध्यापक होता. चिकित्सालयीन वैद्यक या विषयावरील त्याचा La nosographie philosophique (१७९८) हा फ्रेंच भाषेतील ग्रंथ पाठ्यपुस्तक म्हणून वीस वर्षे मानला जात होता.

मनोरुग्णांची काळजी कशी घ्यावी यासंबंधीच्या आपल्या कल्पना त्याने ट्रिटाइज ऑन इनसॅनिटी (१८०१, इं. भा. १८०६) या ग्रंथात  मांडल्या आहेत. पीनेल हा मनोदोषचिकित्सा (सायकिॲट्री) शाखेचा जनक मानला जातो. सालपित्रे येथे तो निधन पावला.

संदर्भ : Riese, Walter, The Legacy of Philippe Pinel, New York, 1969.

अकोलकर, व. वि.