स्थिरभाव : ( सेंटिमेंट्स ). मानवाच्या मानसिक जीवनातील काहीशा स्थिरावलेल्या भावप्रवृत्ती व त्यांची काहीशी सुस्थिर स्वरूपाची गुंफण काही विवक्षित वस्तूंभोवती वा विषयांभोवती होत असते. जीवनानुभवांच्या विकासाबरोबर या स्थिर झालेल्या भावप्रवृत्तींचे उत्तरोत्तर दृढीकरण व संघटन होत जाते आणि त्यामुळे व्यक्तिजीवनास सुसंगतता व स्थैर्य प्राप्त होत जाते. हे स्थिरभाव याप्रमाणे व्यक्तिजीवनाचे एक महत्त्वाचे अंगच बनतात. भावनांच्या या विशिष्ट स्वरूपाच्या संघटन प्रवृत्तीकडे ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ ए. एफ्. शॅन्ड याने मानसशास्त्रज्ञांचे प्रथम लक्ष वेधले आणि एखाद्या विशिष्ट विषयाभोवती सुस्थिर झालेल्या प्रेरणा-भावनांच्या संघटनास अनुलक्षून स्थिरभाव ही संज्ञाही त्याने प्रथम रूढ केली. प्रत्येक व्यक्तीत भावना, संवेग व स्थिरभाव असतात परंतु एखाद्या विषयाबद्दलच्या मनाच्या संपूर्ण प्रतिक्रिया असतीलच असे नाही. त्या कमी-जास्त प्रमाणात व निरनिराळ्या व्यक्ती व वस्तूंना अनुलक्षून असतात.

प्रख्यात ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ विल्यम मॅक्डूगल यानेही त्याच अर्थाने स्थिरभाव ही संज्ञा उपयोजिली आहे. व्यक्तीच्या चारित्र्या-मध्येही अशा स्थिरावलेल्या स्थिरभाव-प्रणालीचा प्रमुख भाग असतो, असा सिद्धांत त्याने पुढे मांडला. व्यक्तिचारित्र्याच्या उपपादनासाठी स्थिरभाव या संकल्पनेचे असलेले महत्त्व त्याने कौशल्याने प्रस्थापित केले व ते आता सर्वमान्यही झाले आहे.

स्थिरभावाच्या मानसशास्त्रीय रचनेची यथार्थ कल्पना येण्यासाठी प्रथम भावना, मनोभाव, मनःस्थिती आणि स्थिरभाव या संकल्पनांमधील फरक समजावून घेणे आवश्यक आहे. क्रोध, भीती, असूया व चिंता या भावना प्रसंगानुसार उत्पन्न होतात व लोप पावतात. त्यात कालिक फरक असतो. त्या क्षणिक असतात परंतु कुलाभिमान, देशाभिमान, शत्रुत्व हे स्थिरभाव होत. स्थिरभावांचा समावेश मनोरचनेतच करणे आवश्यक असते. कोणताही स्थिरभाव एकदम निर्माण होत नाही. बर्‍याच अनुभवांनंतर, आंतरक्रियांनंतर तो निर्माण होतो. प्रारंभी तो मूर्त स्वरूपात असतो. कालांतराने त्याचे रूपांतर अमूर्त स्वरूपात होते. स्थिरभावांमुळे चारित्र्याची घडण होत असल्याने त्यांना मनोरचनेचा अंगभूत भागच मानणे योग्य ठरते मात्र, चारित्र्य निर्माण करणारे स्थिरभाव सर्व व्यक्तींत एकसारखे असतात, असे नाही. सामान्यतः स्थिरभाव हे सुप्त मनःप्रवृत्तींच्या स्वरूपातच असतात. योग्य प्रसंगी व योग्य संदर्भांतच ते जागृत होतात आणि विवक्षित भावनांच्या व कृतिप्रेरणांच्या रूपाने आपल्याला अनुभवास येत असतात. या दृष्टीने स्थिरभाव हे भावना व कृतींचे प्रेरक असणारे मनोरचनेचे अंगभूत भागच होत, असे म्हटले पाहिजे. उदा., माझा देश या विचाराभोवती प्रेम, अभिमान इ. भावनांची व कृतिप्रेरणांची स्थिर स्वरूपाची रचना मनात तयार झाली, की तिलाच आपण देशाभिमान असे स्थिर-भावनिदर्शक नाव देत असतो.

स्थिरभाव या संकल्पनेची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल : जेव्हा एखाद्या विषयाशी किंवा कल्पनेशी, एक किंवा एखाद्या व्यक्तीप्रति अधिक भावक-कारक प्रवृत्ती निगडित होऊन त्यांची एक एकसंध राचनिक प्रणाली होते व ती व्यक्तिवर्तनामध्ये प्रसंगोपात्त संपूर्णत्वाने कार्यवाहीत येते, तेव्हा त्या संपूर्ण भावसमुच्चयाला स्थिरभाव म्हणतात किंवा अधिक संक्षिप्त रीतीने ज्या मानसिक विचार-कल्पना प्रणालीमध्ये एक किंवा अधिक सहजाभिनिवेशांची ( प्रॉपेन्साइट्स ) क्रियाशील गुंफण झालेली असते, अशा प्रणालीस स्थिरभाव असे म्हणतात ’.

वरील व्याख्येनुसार कोणत्याही स्थिरभावाच्या रचनेमध्ये (१) एक मध्यवर्ती विषय ड्ढ वस्तू , व्यक्ती किंवा कल्पना असावा लागतो (२) त्या विषयाभोवती अनेक भावना व क्रिया-प्रवृत्तींची कमी--अधिक सुस्थिर आणि दृढ स्वरूपाची गुंफण झालेली असावी लागते व (३) ही संपूर्ण स्थिरभावरचना त्या व्यक्तीच्या मनोरचनेचाच एक स्थायिभाव बनते आणि योग्य प्रसंगी व्यक्तिवर्तनात संपूर्णत्वाने कार्यवाहीत येते, असे दिसून येईल.

मॅक्डूगल याने आपल्या आउटलाइन ऑफ सायकॉलॉजी (१९२३) या ग्रंथामध्ये स्थिरभावांची तुलना एखाद्या वृक्षाच्या मुळाशी केली आहे. वृक्षाच्या एखाद्याच मुळापासून त्याचा विस्तार अनेक शाखा व पर्णे यांमध्ये होत असतो, तसेच थोड्या स्थिरभावांची अभिव्यक्ती पुढे व्यक्तिजीवनातील विविध घटनांमध्ये अनेक रीतींनी होत असते.

स्थिरभावांची निर्मिती व्यक्तीच्या भावनिक अनुभवांमधूनच होत असते. अनुभवांची जसजशी पुनरावृत्ती होत जाईल, तसतशी ही रचना दृढतर बनत जाईल. एखादी सवय सतत आवर्तनाने दृढ होते, तसेच आवर्तनाने स्थिरभावांची रचनाही अधिकाधिक दृढ बनत जाते. याप्रमाणे मॅक्डूगलच्या मते स्थिरभाव हेसुद्धा सवयीच्या नियमांनुसार दृढ किंवा क्षीण होऊ शकतात. यावरून असे दिसून येईल, की मनामध्ये केवळ स्थिरभाव बाळगून चालत नाहीत तर त्या स्थिरभावांची अनुभवात व वर्तनामध्ये जसजशी कार्यवाही होत जाईल, तसतसे त्या स्थिरभावांमध्ये जोमदारपणा येत जाईल. थोडक्यात, एखाद्या मध्यवर्ती विचार-कल्पनेभोवती विविध प्रेरणा-भावनांची जीवनानुभवांमुळे गुंफण होत राहणे व ती अधिकाधिक स्थिर होत जाणे हे स्थिरभावांचे व्यवच्छेदक मानसशास्त्रीय लक्षण ठरते, असे दिसून येईल. स्थिरभाव हा एखादी वस्तू किंवा व्यक्ती यांच्या प्रति असलेली अभिवृत्ती, प्रेम, आपुलकी यांच्यामुळे निर्माण होतो व तो कित्येक वर्षे किंबहुना जन्मभरदेखील असतो. तो एक प्रकारचा भावसमुच्चय असतो.

भावनांच्या तुलनेने स्थिरभावांची जटिलता अधिक असते हे उघड आहे कारण एखादा मध्यवर्ती विषय, व्यक्ती व प्राणी यांच्याभोवती अनेक वा विविध भावभावनांचे जाळे विणले जाणे अगदी शक्य असते. याचे एक उदाहरण मॅक्डूगलने आपल्या वरील ग्रंथात दिले आहे. अशी कल्पना करू या, की विद्यापीठातील एक वरिष्ठ श्रेणीतला विद्यार्थी आपला दिवसाचा अभ्यास व वाचन संपवून रात्रीच्या वेळी आपल्या खोलीकडे विश्रांतीसाठी परत येत आहे. रात्र अंधारी आहे. पाऊस पडत आहे. हवेत गारठाही बराच आहे. तो खोलीचे दार उघडणार, तोच त्याला उंबर्‍यापाशी एक लहानसे व गोंडस कुत्र्याचे पिलू दिसते. त्याला वाटते, की थंडीने कापणार्‍या त्या पिलाला एवढ्या गारठ्यात बाहेर कसे ठेवावे, तो त्याला उचलून खोलीत आणतो. त्याला काही खायला देऊन एका कोपर्‍यात जाजमावर निजवतो. इतक्यात त्याच्या नजरेस येते, की त्या पिलाचा एक पाय दुखावला गेला आहे व त्याला जखमही झाली आहे. त्याला त्या पिलाविषयी दया वाटते. तो त्याच्या पायाला औषध लावून पट्टी बांधतो. भूतदया दाखविल्याचे त्याला समाधान वाटते. पुढे त्याला त्या पिलाचा लळा लागल्याने तो त्याचा सांभाळ करतो. त्याला तो आपल्याबरोबर रोज फिरायला नेऊ लागतो. त्या दोघांनाही एकमेकांचा सहवास अधिकाधिक प्रिय वाटू लागतो. शेजारची कुत्री कधी त्या पिलावर हल्ला करू लागली, की तो त्याच्या संरक्षणार्थ धावून जात असे. रात्री कधी ते भुंकू लागे व त्यामुळे शेजारची माणसे तक्रार करू लागली, की त्याला त्यांचा राग येई. अशा रीतीने त्या दोघांमध्ये जिव्हाळा उत्पन्न होऊ लागतो. एकदा एका सायंकाळी तो फिरायला जाण्याची तयारी करीत असतो ते त्या पिलाच्या लक्षात येते आणि ते आनंदाने इकडेतिकडे स्वैरपणे धावू लागते. तेवढ्यातच तिकडून एक अजस्र मालमोटार येते आणि तिच्या चाकाखाली ते सापडून ठार होते. हे भयानक दृश्य पाहून त्याच्या डोळ्यांत अश्रू येतात. तो त्या पिलाचा मृतदेह उचलून बागेत नेतो तेथे एक खड्डा खणून त्यात त्याला पुरतो आणि वर माती लोटून त्यात एक फुलझाडाचे रोपटे लावतो.

स्थिरभावांची रचना किती जटिल व विविधांगी स्वरूपाची होऊ शकते, हे वरील उदाहरणावरून उत्तम रीतीने दिसून येईल. त्या पिलाच्या मध्यवर्ती विचाराभोवती त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये कितीतरी भावनांची मनोहर रचना तयार होऊन स्थिरावली होती. प्रथम दया, वात्सल्य नंतर त्याच्या सहवासाविषयी आवड व प्रेम त्याच्या संरक्षणासाठी प्रसंगी युद्धप्रवृत्ती शेजार्‍यांच्या तक्रारीबद्दल क्रोध आणि शेवटी त्या प्राण्याच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूसंबंधी कारुण्य, दुःख अशा कितीतरी प्रेरणा-भावनांची ही स्थिरावलेली रचना आहे. प्रथम काही काळ जसजशा स्मृती जागृत होतील, तसतशी ही रचना दृढतर होत जाईल पुढे कालगतीने ही रचना क्षीण होत जाईल. स्थिरभावांचे स्वरूप हे असे आहे. मनोरचनेचाच ते अंगभूत घटक असतात. मनातले स्थिरभाव केवळ प्रसंगोपात्त जागृत होतात. स्थिरभावांमुळेच सुसंगत सवयींची घडण होते. स्थिरभावांमुळेच चारित्र्य बनते वर्तनाला सुसंगत, स्थिर स्वरूपाचे वळण मिळते. जीवनाची दिशा स्पष्ट होते.

सामान्यतः स्थिरभावाचे दोन प्रमुख वर्ग मानले जातात. मॅक्डूगलच्या मते प्रेम आणि द्वेष हे स्थिरभावाचे दोन प्रमुख प्रकार किंवा जाती होत. ज्या स्थिरभावाच्या रचनेमध्ये एखाद्या विषयाभोवती प्रेम व वात्सल्य या भावनांची गुंफण प्रामुख्याने झालेली असते, अशांना प्रेम-स्थिरभाव (लव्ह-सेंटिमेंट्स) म्हणतात आणि ज्या स्थिरभावांमध्ये भीती आणि क्रोध या भावनांची गुंफण झालेली असते, अशांना द्वेष-स्थिरभाव (हेट--सेंटिमेंट्स) म्हणतात. स्थिरभावांची प्रकृतीच अशी असते, की त्यांवर आधारलेल्या वर्तन-प्रतिक्रिया अनुकूल किंवा प्रतिकूल अशा स्वरूपाच्या असतात. मातृप्रेम, पुत्रप्रेम, देशप्रेम या स्थिरभावांवर आधारलेल्या वर्तन- -प्रतिक्रिया अनुकूल स्वरूपाच्या व विश्वासघात, क्रौर्य, दुष्टपणा यांच्यात होणार्‍या प्रतिक्रिया प्रतिकूल स्वरूपाच्या असतात.

स्थिरभावांचे विषय कोणतेही असू शकतात. सजीव प्राणी, व्यक्ती, व्यक्तिसमूह, अचेतन वस्तू या सर्वांबद्दल आपल्या मनामध्ये अनुकूल--प्रतिकूल स्थिरभाव उत्पन्न होऊ शकतात. आपले मित्र, शत्रू, माता-पिता व मुले आपली शेतीवाडी, शाळा, भाषा, देश आपणाला कोणी दिलेली स्मृतिचिन्हे आपली कलानिर्मिती ड्ढ चित्र, काव्य या सर्वांबद्दल आपल्या मनात स्थिरभाव निर्माण होऊ शकतात.

अनेक स्थिरभाव एकसमयावच्छेदेकरून आपल्या मनात राहू शकतात. आपल्या संपर्कामध्ये येणार्‍या विविध व्यक्ती वा वस्तू या सर्वांबाबत कमी-अधिक दृढ झालेले स्थिरभाव आपण एकाच वेळी मनात धारण करू शकतो. एखाद्या मातेच्या मनामध्ये तिच्या प्रत्येक अपत्यासंबंधी वेगवेगळे स्थिरभाव असतात व ते तिच्या मनात एकत्र राहू शकतात. व्यक्तीच्या मनामध्ये अनेक विषयांसंबंधीचे स्थिरभाव एकाच वेळी असू शकतात.केवळ मूर्त वस्तूच नव्हे, तर नैतिक गुणांसारख्या अमूर्त कल्पनांबाबतही स्थिरभावांची निर्मिती होऊ शकते. सत्य, अहिंसा, दयाबुद्धी, लोकशाही इ. अनेक अमूर्त विचार-कल्पनांसंबंधी आपल्या मनात स्थिरभावांची निर्मिती होत असते. यांतील काही अनुकूल व काही प्रतिकूल स्वरूपाचे असतात. एकूण स्थिरभावांची रचना सचेतन- अचेतन, मूर्त-अमूर्त अशा वस्तू , व्यक्ती वा कल्पनांभोवती असू शकते, हे मॅक्डूगलचे मत निःसंशय विचारार्ह आहे.

इतर कोणत्याही कल्पनेप्रमाणे व्यक्तीच्या मनामध्ये तिच्या स्वतः- विषयीच्या कल्पनेभोवतीही अनुकूल वा प्रतिकूल स्थिरभावांची रचना होऊ शकते. अर्थात त्यापूर्वी व्यक्तीचा आत्मपर स्थिरभाव वा स्व-आदर स्पष्ट असणे आवश्यक असते. अगदी लहान वयात बालकाच्या मनात स्वतःसंबंधी कोणतीही कल्पना नसते. पुढे मी म्हणजे माझे शरीर होय, हीच भावना बळावते कारण त्याचे शरीर हे वेदनाग्राहक असल्यामुळे ते इतर वस्तूंपासून वियोजित केले जाते. पुढे वाढत्या वयाबरोबर इतरांशी सामाजिक संबंध उत्पन्न होऊ लागतात. बालक त्याच्या रागालोभांचा विषय बनते. त्याबरोबरच त्याच्या स्वत्वकल्पनेच्या सीमारेषाही आता अधिक स्पष्ट होऊ लागतात. मी म्हणजे केवळ माझे शरीरच नव्हे, तर इतरांच्या सामाजिक प्रतिक्रियांचा मी विषय आहे आणि शेवटी मी म्हणजे खरोखर माझ्या शारीरिक-मानसिक अनुभवांमधून प्रतीत होणारा आंतरिक अनुभव–केंद्रबिंदू होय, अशी धारणा होऊ लागते. हा केंद्रबिंदू म्हणजे प्रत्यक्ष मी होय पण याहूनही अधिक उच्च, उदात्त असा माझ्या जीवनाचा आदर्श-केंद्रबिंदू आहे. त्या माझ्या आदर्श मीपणामध्येच माझी सर्व ध्येये-धोरणे, माझी सुखस्वप्ने, माझे नैतिक आदर्श सामावलेले आहेत. माझी ही मनाने चितारलेली आदर्श प्रतिमा म्हणजेच खरा मी होय. याप्रमाणे व्यक्तीची स्वत्वकल्पना किंवा आत्मप्रतिमा तिच्या मानसिक-नैतिक विकासाबरोबर सतत बदलत असते.

शारीरिक-मी, अप्रत्यक्ष-मी, सामाजिक-मी, आदर्श-मी ही सर्व आत्मप्रतिमेची (सेल्फ इमेज) कमी-अधिक प्रगल्भ व विकसित स्वरूपे होत. या विविध आत्मकल्पनांभोवती आपल्या भावना-प्रेरणांची गुंफण होऊ शकते व या प्रक्रियेमधूनच आत्मलक्षी स्थिरभावाची ( सेल्फ-रिगार्ड सेंटिमेंट ) घडण होत असते, असे मत मॅक्डूगलने व्यक्त केले आहे.म्हणजे मी या कल्पनेभोवती विविध भावना-प्रेरणांची रचना होऊन, ती स्थिर स्वरूपाची रचना, व्यक्तिवर्तनाचे नियमन करीत असते. उदा., जेव्हा एखादा मध्ययुगीन रजपूत वीर त्याच्या निद्रिस्त शत्रूला एक घाव घालून ठार करण्याची आलेली संधी न घेता, अगोदर त्या निद्रिस्त शत्रूला झोपेतून जागे करतो, त्याच्या हाती तलवार देऊन त्याला युद्धाचे आव्हान देऊन मग त्याला युद्धात ठार करतो, तेव्हा त्याच्या या उदात्त वर्तनाचे उपपादन त्याच्या श्रेष्ठ आत्मलक्षी स्थिरभावरचनेच्या आधारेच युक्ततेने करता येते. निद्रिस्त शत्रूचा वध केल्यास ते वर्तन त्याच्या आदर्श आत्मप्रतिमेशी विसंगत होईल व त्यामुळे त्याचे आदर्श-स्वत्व (आयडिअल सेल्फहुड) डागाळेल, त्याला कलंक लागेल. याच विचाराचा प्रभाव त्याच्या वर्तनावर पडलेला असतो.

व्यक्तीचा आत्मलक्षी स्थिरभाव हा संग्राहक स्वरूपाचा असतो. ज्या ज्या वस्तू किंवा व्यक्तींमध्ये त्याचे स्वत्व गुंतलेले असते, त्या त्या सर्वांबाबतच्या स्थिरभावांमध्येच त्याचा आत्मलक्षी स्थिरभावही समाविष्ट झालेला असतो. आपल्या पुत्रासंबंधीचा स्थिरभाव हा एका दृष्टीने आत्मलक्षी स्थिरभावच होय कारण पुत्र हे स्वतःचेच प्रतिबिंब असते. पुत्र हे पित्याचेच अंशस्वरूप होय. पुत्रकल्पनेमध्ये पित्याची स्वतः-विषयीची कल्पना गुंतलेली असते. यामुळे पुत्रासंबंधीच्या सर्व स्थिर-भावांमध्ये आत्मलक्षी स्थिरभाव हे अंशतः अंतर्भूत असतात, असा महत्त्वाचा सिद्धांत मॅक्डूगलने मांडलेला आहे.

शेवटी व्यक्तीच्या मनामध्ये अमूर्त अशा नैतिक-आध्यात्मिक मूल्यांसंबंधी स्थिरभाव निर्माण होत असतात व ते व्यक्तिवर्तनाचे दिग्दर्शन करीत असतात. सत्य व अहिंसा या श्रेष्ठ नैतिक मूल्यांसंबंधीचे स्थिर-भाव महात्मा गांधींच्या मनामध्ये किती तीव्रतेने वसत होते, हे सर्वश्रुतच आहे. श्रीरामचंद्राने पित्याच्या वचनाचे पालन करणे हाच श्रेष्ठ पुत्रधर्म आहे, असे मानून आनंदाने वनवास पतकरला. या घटनेमध्ये त्याच्या मनातील श्रेष्ठ नैतिक मूल्यांबद्दलची आदरभावनाच दिसून येते. प्रगल्भ व समृद्ध व्यक्ति-जीवनाच्या विकासप्रक्रियेचा मॅक्डूगलच्या मते हा परमोच्च बिंदू होय.

नैतिक-आध्यात्मिक मूल्यांसंबंधीचे स्थिरभाव तीन अवस्थांमधून विकसित होत जातात : (१) मूर्त विशिष्ट, (२) मूर्त सामान्य आणि (३) अमूर्त. अशा त्या तीन अवस्था होत. उदा., शौर्य या नीतिगुणाबद्दल मुलांच्या मनामध्ये स्थिरभाव उत्पन्न व्हावेत यासाठी (१) त्यांना एखाद्या विशिष्ट शूर पुरुषाबद्दल कथा सांगणे. उदा., छ. शिवाजी महाराजांची कथा सांगणे, ही पहिली मूर्त विशिष्ट अवस्था. (२) त्यांना इतरही अनेक शूर पुरुषांच्या कथा सांगणे. उदा., राणा प्रताप, समुद्रगुप्त, नेपोलियन इत्यादींच्या कथा सांगणे, ही दुसरी मूर्त सामान्य अवस्था आणि (३) शेवटी या सर्व कथांमधून दिसून येणारा सामान्य नैतिक गुण शौर्य हा अलग करून त्यासंबंधी विवेचन करणे, ही तिसरी अमूर्त अवस्था. अशा प्रकारे स्थिरभावांची रचना अमूर्त विषयांसंबंधी होऊ शकते. अशा अनेक नीतिगुणांसंबंधीच्या स्थिरभावांची निर्मिती मनात निर्माण होणे ही चारित्र्य-संपादनाची एक आवश्यक अट आहे.

हरोलीकर, ल. ब.