मानसिक कसोट्या: ज्यांची निश्चितपणे व्याख्या करता येते अशा मानसिक गुणधर्मांची कसोटी वा चाचणी घेण्याची पद्धती म्हणजेच मानसिक कसोटी होय. अन्य प्रकारच्या चाचण्या सामान्य मुलाखत व शैक्षणिक परीक्षा यांच्याद्वारे नेहमीच घेतल्या जातात पण त्या परीक्षकाच्या तत्कालीन मनोवृत्तीवर अवलंबून असल्याने व्यक्तिनिष्ठ व अनिश्चित स्वरूपाच्या असतात, तर मानसिक कसोट्या शास्त्रीय पद्धतीने निश्चित केलेल्या असल्याने वस्तुनिष्ठ व प्रमाणित असतात. ‘मानसिक कसोट्या’ ह्या संज्ञेने येथे मानसिक कसोट्या आणि मानसिक मापन वा मनोमापन (सायकोमेट्रिक्स) हे दोन्हीही अभिप्रेत आहेत.

ऐतिहासिक समालोचन : व्यक्तिव्यक्तींतील मानसिक भेद समजून घ्यायचे असतील, तर त्याला निश्चित तंत्राची आवश्यकता आहे ही गोष्ट प्रथम ⇨ सर फ्रान्सिस गॉल्टनला उमजून आली. एकोणिसाव्या शतकाच्या द्वितीयार्धात मानसशास्त्रातील प्रायोगिकतेला बाळसे येत चालले होते. प्रयोगशाळांतून घेतल्या जाणाऱ्या विभिन्न चाचण्यांतील व्यक्तिगत भेद चांगलाच जाणवण्याजोगा असे पण तेव्हा शास्त्रज्ञांचे लक्ष मुख्यतः मनाचे सामान्य स्वरूप जाणून घेण्याकडे केंद्रित झाले होते. चाचण्यांतून प्रतिबिंबिक होणारे व्यक्तिगत भेद म्हणजे मापनात साहजिकच डोकावणाऱ्या उणिवा असून त्या सरासरीच्या पद्धतीने दूर करता येतील अशी त्यांची धारणा होती तथापि व्यक्तीची क्षमता व स्वभावविशेष आणि या भिन्नता यांचा काही विशिष्ट संबंध असल्याचे गॉल्टनला दिसून आले आणि या नव्या दृष्टीकोनातून चाचणीपद्धतींचा अभ्यास करून त्यांना प्रमाणित करण्याचा त्याने निश्चय केला.

 त्या वेळी ग्रेट ब्रिटनमध्ये अग्रेसर असलेल्या विचारप्रणालीच्या पाठीराख्यांचे मत असे होते, की संवेदनात्मक अनुभूतीतूनच मानसिक प्रक्रिया विकसित होतात. तेव्हा हे ओघानेच आले, की ज्या प्रमाणात व्यक्तीची बौद्धिक क्षमता असेल त्या प्रमाणात विशिष्ट संवेदनांतील सूक्ष्म भेद तिला जाणवतील. याचाच अर्थ असा, की विभिन्न प्रकारच्या संवेदनांतील आंतरिक भेद जाणण्याच्या पात्रतेवरून माणसाची निपुणता पारखता आली पाहिजे. याच पार्श्वभूमीवर गॉल्टनने स्नायव, दृक्, श्रवण व स्पर्श या संवेदनांतील विभेदनमापनाच्या पद्धती निश्चित करण्यापासून आपल्या कार्याला आरंभ केला. गॉल्टनची आरंभीची एक सर्वज्ञात पद्धती भारविभेदनासंबंधीची होती. दोन वजनांतील भेद कोणतीही व्यक्ती किती सूक्ष्म प्रमाणात निश्चित करू शकते, ते या पद्धतीने मोजता येत आहे. (अशाच प्रकारचे तंत्र वेबर-फेक्नर नियम सिद्ध करण्याकरिता उपयोगात आणले जात असे). कालांतराने गती, चलनशक्ती, प्रतिक्रियाचापल्य, साहचर्य व स्मृतीची कक्षा मापण्याच्या कसोट्यांची भर या प्रारंभिक पद्धतीत घालण्यात आली. पुढे याहूनही जटिल प्रक्रियांचा समावेश परीक्षणात केला तर सामान्य निपुणतेचे स्वरूप अधिक स्पष्ट प्रमाणात निश्चित करता येईल, हे लक्षात येताच गॉल्टनने उच्चतर मानसिक प्रक्रियांच्याही काही कसोट्या योजिल्या. या कसोट्यांना प्रमाणित स्वरूप देता यावे म्हणून त्याने निर्धारित केलेल्या सांख्यिकीय पद्धतीही अतिशय महत्त्वाच्या आहेत.

 या नंतरच्या प्रगतीत गॉल्टनला जे. एम्. कॅटेल (१८६०–१९४४) याचे अल्पकाळ सहकार्य मिळाले. अमेरिकेला आल्यानंतर कॅटेलने आपल्या सहकाऱ्यांसमवेत कोलंबिया विद्यापीठात एक कसोटी-योजना आखली व तिच्या अनुरोधाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेण्याचे कार्य त्याने आरंभिले. यातूनच कसोटी-तंत्र-संशोधनाची एक मालिकाच उदयाला आली. या कार्यातील सिंहाचा वाटा मात्र  ⇨ ई. एल्. थॉर्नडाइक (१८७४–१९४९) कडे जातो. १८९२ मध्ये गॉल्टन व जेम्स सली यांनी शालेय विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात शारीरिक व मानसिक कसोट्यांचा उपयोग केला. अवधानाचे मोजमाप केले, तर बालकांच्या बुद्धिमत्तेची यथार्थ कल्पना येईल,अशी सलीची धारणा होती. या अनुरोधाने त्याने तत्कालस्मृतिकक्षेच्या (इमीजिएट मेमरी स्पॅन) काही कसोट्या उपयोगात आणल्या. त्यात त्याला असे दिसून आले, की मुलांची सामान्य बुद्धिमत्ता आणि चाचण्यांतून दिसून येणारे व्यक्तिगत भेद हे सहपरिवर्ती (कॉन्‌कॉमिटंटली व्हेअरिंग) असतात.

  ⇨चार्ल्‌स स्पिअरमन,  ⇨ सिरिल बर्ट व  ⇨ टॉमस ब्राउन यांच्या सहकार्याने विल्यम मॅक्डूगल यानेही शालेय बालकांच्याकरिता काही कसोट्या प्रमाणित केल्या.

 सामान्य व विशेष कौशलक्षमता : आपल्या संशोधनात गॉल्टनने कौशलक्षमतेचे दोन प्रकार कल्पिले होते. प्रत्येक बौद्धिक कार्यात अनुस्यूत असलेली क्षमता (ॲबिलिटी) ती सामान्य व विशिष्ट कार्यात उपयोजिली जाणारी ती विशेष, हे ते प्रकार होत.  ⇨ आल्फ्रेड बीने (१८५७–१९११) या फ्रेंच शास्त्रज्ञाला गॉल्टनच्या मानसशास्त्रीय कार्याविषयी विशेष आदर होता. १९०४ मध्ये फ्रेंच शासनाने मनोदुर्बल बालकांचे निदान व चिकित्सा यांचे संशोधन करण्याच्या उद्देशाने एक समिती नेमली. तिचा सदस्य या नात्याने बीनने केवळ शालेय पात्रताच नव्हे, तर सामान्य व विशेष कौशलांचेही मापन करता येईल, अशा प्रकारच्या कसोट्या प्रमाणित करण्याचे काम हाती घेतले (बीने याने गॉल्टनच्या क्षमता प्रकारांचा स्वीकार केला होता पण भाषिक अडचणीमुळे क्षमता-ॲबिलिटी-ऐवजी त्याने बुद्धिमत्ता-इंटेलिजन्स-या पदाचा स्वीकार केला इतकेच). जर्मन प्रयोगशाळेत उपयोजिल्या जाणाऱ्या कसोट्यांना अनेक साधनांची आवश्यकता असे आणि म्हणूनच त्या किचकट होत्या तेव्हा त्यांच्या नादी न लागता केवळ कागद, पेन्सिल, चित्रे व काही सामान्य वस्तू यांच्या उपयोगाने सोडवता येतील अशाच कसोट्या त्याने तयार केल्या. त्या त्या वयाच्या मुलांना पेलतील अशीच त्यांची रचना होती. वयोमानानुसार उपयोगात आणता येतील अशा कसोट्यांची क्रमाक्रमाने अवघड होत जाणारी ती चढती श्रेणीच होती. या त्याच्या कसोट्या यशस्वी होताच अन्य पाश्चिमात्य राष्ट्रांचे लक्ष तिकडे वेधले गेले आणि अल्पावधीतच इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी व अमेरिका या राष्ट्रांनी त्याने तयार केलेली वयःसारणी (एज स्केल) आत्मसात केली व मानसिक वाढ सोळाव्या वर्षी पूर्ण होते, ही कल्पना सर्वमान्य झाली.

  सामूहिक कसोट्या: वर वर्णिलेल्या सर्वच कसोट्या एकेका व्यक्तीची चाचणी घेण्याच्या उपयोगी असत. यामुळे कालापव्यय होत असे पहिल्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेमध्ये एकाच वेळी अनेक व्यक्तींची चाचणी घेता येईल अशा कसोट्यांची आवश्यकता जाणवू लागली आणि अनेक मानसशास्त्रज्ञ त्या कामाला लागले. याचेच फळ म्हणजे सामूहिक कसोट्या होत. अपूर्ण वाक्ये पूर्ण करणे, जोड्या लावणे, विरुद्ध अर्थाचे शब्द सांगणे इ. कसोट्या त्यात अंतर्भूत होत्या. पुढे शालेय विषयांना उपयोगी पडतील अशाही कसोट्या नियत करण्यात आल्या तसेच असामान्य व अघःसामान्य (सब्‌नॉर्मल) बालकांच्या उपयोगी पडतील अशा कसोट्याही कालांतराने प्रचारात आल्या.

निर्वर्तन वा कृतिप्रधान कसोट्या (परफॉर्मन्स टेस्ट्स): ह्या कालापावेतो योजिलेल्या कसोट्या केवळ साक्षरांकरिताच उपयोगी असत पण ज्यांना शालेय शिक्षण मिळालेले नाही किंवा जे मूक वा परभाषी असतील त्यांच्यासाठीही कसोट्यांची आवश्यकता होती. या दिशेने प्रयत्न चालू झाले. एच्. ए. नॉक्सने रचना आणि अनुकरणकसोट्या, तर एस्. डी. पोर्च्यूस याने क्रमित कूटव्यूह (सिरियल मेझेस) कसोट्या प्रचारात आणल्या. त्याचप्रमाणे खाचफलक, चित्रपूर्ती आदी कसोट्यांची निर्मिती अनुक्रमे डब्ल्यू. एफ्. डियरबॉर्न व डब्ल्यू. हेले यांनी केली. या सर्वांचा उपयोग करून आर्. पिंटनर व डी. जी. पॅटरसन यांनी एक सुसूत्र कृतिप्रधान-सरणी विकसित केली. कसोट्यांच्या विकासासमवेत त्यांच्या उपयोगांचे व गुणांकनाचे (स्कोअरिंग) तंत्रही आकार घेत होते आणि विसाव्या शतकाच्या आरंभीच्या १० वर्षांतच ही सर्व सामग्री उपयोगात आणण्याची सोय शास्त्रज्ञांनी उपलब्ध करून दिली.

व्यवसायोपयोगी कसोट्या : पहिल्या महायुद्धापूर्वी थोडाच काळ ह्यूगो म्यून्स्टरबर्ग (१८६३–१९१६) व त्याचे काही सहकारी यांनी प्रौढ आणि कुमारांची चाचणी घेण्याचा उपक्रम केला. व्यावसायिक मार्गदर्शन व निवड यांच्या दृष्टीने मानसिक कसोट्यांचा कितपत उपयोग होईल ते पाहणे हा या मागे उद्देश होता. युद्धकालात अमेरिकेत व काही प्रमाणात ब्रिटनमध्ये सैनिकी भरती करताना लाखो व्यक्तींच्या सामूहिक कसोट्या घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे युद्धाशी संबंधित अशा अन्य क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांची निवडही अशाच प्रकारे करण्यात आली. या उपक्रमाच्या अनपेक्षित यशाने इतर व्यवसायांतही या कसोट्यांचा प्रवेश तर झालाच, पण दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी मिळालेल्या अवधीचा उपयोग करून शास्त्रज्ञांनी संरक्षण क्षेत्रातील हे तंत्र चांगलेच नावारूपाला आणले आणि त्याचा पुरेपुर उपयोग दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी करण्यात आला.

 भाव-भावनात्मक व्यक्ती-गुणविशेषांची चाचणी : आतापावेतो वर्णिलेल्या कसोट्यांनी क्षमता वा बुद्धी यांचेच मापन होऊ शकते पण भावना आणि संकल्प यांचाही वाटा व्यक्तीच्या जीवनात तितकाच महत्त्वाचा असतो. त्यांच्या मापनप्रक्रियेचा विकास मात्र तुलनेने अतिशय सावकाश होत होता. व्यक्तिमत्त्वाचा निर्धारक या दृष्टीने भावना ही केंद्रस्थानी असते असे मॅक्डूगलचे प्रतिपादन होते. म्हणून त्याच्या काही विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्वातील भावनात्मक विशेषांचा वेध घेण्याचा उपक्रम हाती घेतला. आरंभी भावनांच्या शारीरिक परिणामांचे मोजमापच पाहण्यात येत असे. रक्तदाब, नाडीचा वेग, त्वचेचे तापमान इत्यादींचा त्यात समावेश होता पण पुढे या मोजमापातून विशेष काही निष्पन्न होत नाही असे दिसून आले. गॉल्टनला साहचर्य प्रक्रियेत असे दिसून आले होते, की साहचर्ययुक्त कल्पनांच्या आवाहनात अबोध इच्छा व हेतू यांची अभिव्यक्ती होत असते. तो आपल्या प्रयोगात वेचक शब्दांचा उद्दीपक म्हणून उपयोग करीत असे. नंतरच्या संशोधकांनी व्यक्तीमत्त्व गुणविशेषांच्या मापनासाठी चित्रे, शाईचे डाग, संदिग्ध वा अनेकार्थी आकृत्या इत्यादींचा उपयोग केला आणि यातूनच प्रक्षेपण (प्रोजेक्टिव्ह) कसोट्यांचा उगम झाला.

 परिमेय विशेष: परिमेय विशेषांच्या अनुरोधाने अनेक प्रकारच्या कसोट्यांचे त्रिदल वर्गीकरण करता येते : (१) बौद्धिक वा व्यावहारिक क्षमता मापक, (२) अर्जित कौशलमापक व (३) भावना आणि अन्य स्वभाव गुणविशेषमापक कसोट्या. 

(१) सामान्य बुद्धिमापन कसोट्या : स्पिअरमनने (जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट्स) प्रस्तुत केलेल्या बुद्धिमत्तेच्या वा क्षमतेच्या द्विदलीय कल्पनेला आरंभी कडाडून विरोध झाला पण पुढे या विरोधकांना असे दिसून आले, की वास्तवात अशा दोन प्रकारच्या क्षमतांना आधार आहे आणि याच अनुरोधाने कसोट्यांची स्वतंत्र रचना करणे क्रमप्राप्त आहे. सामान्य बुद्धिमापन कसोट्यांचे मूलभूत तंत्र दिले ते बीनेने. १९०५ ते १९११ या अवधीत तेओदोर सीमोनच्या साहाय्याने बीनेने आपल्या कसोट्या प्रमाणित केल्या. यातून मुलांच्या ज्ञानाचीच नव्हे तर ते ज्ञान मिळविण्याच्या त्यांच्या जन्मजात पात्रतेची चाचणी घेणे हाही त्यांचा उद्देश होता. एखाद्या साध्या आज्ञेचे पालन, जटिल रेखाचित्राचे प्रतिरेखन किंवा उलटापालट केलेल्या शब्दांतून सलग वाक्य बनवणे इ. प्रकारच्या या कसोट्या होत्या आणि३ वर्षापासून तो १५ वर्षे वयोमर्यादेपर्यंतच्या मुलांना पेलतील अशा क्रमित कसोट्यांची ती मालिका होती. कसोट्यांची ही वयःसारणी निर्धारित करताना या संशोधकांनी जी पद्धती स्वीकारली ती अशी : ३ ते १५ वयोमर्यादेतील अनेक मुलांची चाचणी घेऊन या कसोट्या निश्चित केल्या गेल्या. एखाद्या विशिष्ट वयाच्या मुलाकरिता एखादी कसोटी प्रथम ठरवून त्या वयाच्या अनेक मुलांच्या चाचणीत तिचा उपयोग केला जाई. त्या वयाची ७० चे ७५% मुले तीत उत्तीर्ण होत असतील आणि त्याहून एका वर्षानी लहान असलेल्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण पुष्कळच कमी असेल, तर ती कसोटी ७० ते ७५% उत्तीर्ण होणाऱ्या मुलांच्या त्या वयाला योग्य अशी मानली जाई. एखाद्या कसोटीत सर्वच्या सर्व मुले उत्तीर्ण झाली तर त्या गटाला ती कसोटी फारच सोपी अतएव अयोग्य समजून खालच्या वयाच्या गटावर तिचा प्रयोग केला जात असे. अशा प्रकारे प्रत्येक वयोगटाकरिता पाच ते सहा कसोट्या याप्रमाणे ३ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांकरिता वयःसारणी प्रस्तुत केली गेली. हिच्या उपयोगाने एखादे बालक सामान्य, अधःसामान्य वा असामान्य आहे हे सांगता येत असे.

बुद्धिगुणांकाचा वंटनवक्र

वरील वयसारणीचा आधार घेऊन अनेक राष्ट्रांनी आपापल्या राष्ट्रातील  बालकांना उपयोगी होतील  अशाकसोट्यांची  रचना  आणि त्यांत  सुधारणा  करण्याचा  उपक्रम  आरंभिला. व्हिल्हेल्म श्टेर्नच्या बुद्धिगुणांक (बु. गु.)  सूत्राचाउपयोग करून  मुलांची  तौलनिक बुद्धिमत्ता निश्चित करण्याची प्रथा रूढ झाली आहे. ते सूत्र असे : मानसिक वयाला प्रत्यक्ष वयाने भागून जी लब्धी येईल तो बु. गु. पण अपूर्णांक काढून टाकण्याकरिता या लब्धीला १०० ने गुणण्याची प्रथा आहे. हे सूत्र असे मांडले जाते. मा.व./प्र.व. X १००/१ = बु. गु. आपल्या वयाकरिता नियत केलेल्या कसोट्यांत १०० च्या आसपास बु. गु. मिळविणारी व्यक्ती सामान्य बुद्धीची मानली जाते. म्हणजेच त्याचे मानसिक व प्रत्यक्ष वय सारखेच आहे असा त्याचा अर्थ होतो. उदा., जर मुलाने या कसोटीमध्ये ९० ते ११० बु. गु. मिळविला तर तो सामान्य बुद्धी समजला जाईल. त्याने ७० किंवा कमी बु. गु. मिळविला तर ती मनोदुर्बल (फीवल माइंडेड) व १३० किंवा अधिक बु. गु. मिळविला, तर कुशाग्र बुद्धीचा वा अतिबुद्धिमान (ब्राइट) समजला जाईल.

या कसोटीवर बु. गु. मोजण्याची रीत अशी आहे उदा., १० वर्षे वयाच्या मुलाने ९ वयकक्षेच्या प्रश्नगटातील सर्व प्रश्नांना बरोबर उत्तरे दिली, तर ते त्याचे मूलक वर्ष (बेसिक एज) समजावयाचे. १० वयकक्षेच्या प्रश्नगटातील पाचच प्रश्नांना बरोबर उत्तरे दिली, तर त्याला प्रत्येक प्रश्नाला दोन महिने या प्रमाणात १० महिने समजावयाचे आणि ११ वयकक्षेच्या प्रश्नगटातील चारच प्रश्नांना बरोबर उत्तरे दिली, तर त्याचे ८ महिने समजावयाचे. १२ वयकक्षेच्या प्रश्नगटातील एकाही प्रश्नाचे उत्तर बरोबर देऊ शकला नाही, तर पुढे कसोटी घेणे   थांबवून त्याचे मानसिक वय मूलक वय ९ वर्षे, अधिक १० + ८ महिने मिळून १० वर्षे ६ महिने अथवा साडेदहा वर्षे होईल व त्याचा बु. गु. १०·५/१० X १००  = १०५ येईल. हा मुलगा सामान्य-बुद्धी समजावयाचा. या गुणमापनामागे एक भूमिका आहे ती अशी, की प्रत्येक वयोगटाची मुले समान असतात व त्या वयोगटाचे सर्व प्रश्न समान कक्षेचे असतात तेव्हा त्या प्रश्नांमधील कोणतेही प्रश्न बरोबर सोडविले, तरी त्याप्रमाणे त्याला महिन्याचे गुण द्यावयाचे.

बीने-सीमोन बुद्धिमापन कसोट्यांची प्रमुख धारणा अशी, की बु. गु. अचल असतो. जर १० वर्षे वयाच्या मुलांचा बु. गु. १२० असला, तर प्रत्येक कसोटीच्या वेळेला परिस्थितीनुसार त्यात दोन-चार गुणांचा फरक पडेल पण त्याचा बु. गु. १२० च राहील म्हणजे त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्याचे मानसिक वय ६ असेल, तर त्याच्या वयाच्या तेराव्या वर्षी त्याचे मानसिक वय १५·६ वर्षे असेल, म्हणजे व्यक्तीची बुद्धिमत्ता अचल असते. कारण ती आनुवंशिक असते. बुद्धिमत्ता आनुवंशिक असते, हे मत आता सर्वमान्य राहिले नाही. बरेच मनोवैज्ञानिक असे मानतात, की मुलाच्या संगोपन परिस्थितीवर बुद्धिमत्ता बरीच अवलंबून असते व ही परिस्थिती बदलल्यास बु. गु. त म्हणजेच बुद्धिमत्तेत क्रांतिकारी परिवर्तन करता येईल.

 बीनेची पद्धती उपयुक्त असली, तरी तिला काही मर्यादा आहेत. एक मर्यादा अशी, की तिचा उपयोग एका वेळी एकाच व्यक्तीची चाचणी घेण्यात होऊ शकतो. ती मर्यादा नाहीशी करण्यारकरिता पुढे सामूहिक कसोट्यांचा विकास झाला तसेच निरक्षर, बहिरे किंवा आंधळेयांच्याकरिताही नव्या कसोट्यांची भर घालावी लागली. दुसरी उणीवअशी, की बालकांसाठी त्या ठीकअसल्या तरी प्रौढांची चाचणी घेण्यातत्यांचा तितकासा उपयोग होत नाही,याचे कारणही उघड आहे. बीनेचामूळ उद्देश बालकांसाठीच कसोट्या तयार करणे हा होता, तसेच त्याने केवळ १६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीच त्यांची रचना केली होती. पुढे १९३७ मध्ये स्टॅनफर्ड सुधारणेत ३ वर्षांची भर त्यात घालण्यात आली (स्टनफर्ड-बीने सुधारणा) तरी १६ वर्षे हीच कौमार मर्यादा मानली गेली होती आणि त्याच्या पुढचे ते सर्व मानसिक दृष्टीने १६ वर्षांचे असा हा खाक्या होता. या तत्त्वानुसार ज्या कसोट्या प्रस्तुत केल्या गेल्या होत्या त्यांच्यापासून इष्ट त्या प्रमाणात प्रौढांची अभिव्यक्ती होत नसे तसेच त्यांमध्ये शीघ्रतेवरही फारच भर देण्यात आला होता. पण प्रौढवयात शिथिलता आली तरी तिचा मानसिक प्रतिक्रियेच्या सूक्ष्मतेवर परिणाम होत नाही, असे दिसून आले आहे. ही उणीव दूर करण्याकरिता स्वतंत्र कसोट्या व गुणांकनपद्धती यांचा अवलंब अलीकडे केला जातो. (वेश्लरबेलो बुद्धिमापन सारणी, सामान्य सैनिकी व्यक्तीमापन सारणी इत्यादी). या पद्धतीत मा. व./प्र. व. X १०० या सूत्राचा उपयोग करीत नाहीत, तरी सर्व कसोट्यांतून जे एकूण गुण परीक्ष्य व्यक्तीला मिळतात त्यांची तुलना निश्चित केलेल्या प्रमाण सरासरीशी करून त्याची बुद्धिकक्षा ठरविली जाते. या पद्धतीमध्ये बौद्धिक तसेच क्रियात्मक असा दोन्ही प्रकारच्या कसोट्यांचा समावेश असतो. त्या योगे त्याची शब्दोपयोजनक्षमता व कृतिकौशल या दोहोंची तुलना करता येते तसेच, बेलो सारणीच्या शाब्दिक व क्रियात्मक घटकांच्या अनुरोधाने जे गुणांकन होते त्याचा व काही मानसिक विकृतींचा सहसंबंधही दिसून येतो. उदा., मज्जाविकृती, प्रणालित संभ्रम विकृती (पॅरॅनॉइआ), चित्तविकृती इत्यादी.

 विशिष्ट क्षमता वा बुद्धिमत्ता : सामान्य क्षमतेसह विशेष कौशलक्षमताही असते, ही गोष्ट आता साधारणतः मान्य केली जाते. आजवर ज्यांचे स्वरूप निश्चित केले गेले आहे अशा विशेष क्षमतांचे निदान व प्रक्रिया यांच्या अनुरोधाने वर्गीकरण करता येते. शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनाच्या दृष्टीने पुढील चार घटक महत्त्वाचे आहेत : (१) शब्दांच्या अर्थाचे ज्ञान व उपयोग, (२) संख्या व त्यांच्यातील संबंध यांचे ज्ञान व उपयोग, (३) अवकाशाचा दृक्‌प्रत्यय व गतिज्ञान आणि (४) मानसिक-यांत्रिक कौशल्य यांचे नियमन. प्रक्रियेला अनुलक्षून जे वर्गीकरण केले जाते त्यात चपलता वा गती, यांत्रिक स्मरण, नवनिर्माणक्षम सहचार वा कल्पन आणि तार्किक विचारप्रक्रियेला आवश्यक विश्लेषण, सामान्यीकरण इत्यादींचा समावेश होतो. या सर्व विशेष क्षमतांची चाचणी घेताना सामान्य क्षमता त्यात अनुस्यूत असते या गोष्टीचा विसर पडता कामा नये व गुणांकनात तिचा परिहार करण्याची योजनाही आवश्यक असते.

 विशेष क्षमता कसोट्या (स्पेशल ॲप्टिट्यूड टेस्ट्स): ललित कला, यांत्रिकी, वैद्यक व बौद्धिक क्षमता यांच्या मार्गदर्शनाच्या दृष्टीने काही कसोट्यांचा उपयोग करण्यात येत आहे. ललित कलांत संगीत व चित्रकला यांचा मुख्यतः विचार केला गेला आहे. कार्ल सीशोर याची संगीतक्षमता कसोटीमालिका नावाजलेली आहे. त्याच्या या चाचण्यांतून त्याला असे दिसून आले, की संगीतक्षमता ही एकाकी नसून ती अनेक क्षमतांची जटिल संहती आहे. यांतील बऱ्याच क्षमतांची स्वतंत्र चाचणी घेण्याच्या तंत्राची त्याने योजना केली आहे. स्वरांचे तारत्व, तीव्रता, कालांतर, स्वरवैशिष्ट्य (टिंबर), मधुरता व लय यांच्यातील अंतर्गत विभेदन करण्याची पात्रता पारखण्यारकिता त्याने ध्वनिमुद्रिकांचा उपयोग केला. या व इतर चाचण्यांतून मिळालेल्या गुणांचे आलेखन केले जाते व त्यावरून परीक्षार्थींच्या संगीतातील विविध क्षमतांची कक्षा निश्चित करता येते. अशा प्रकारच्या चाचण्यांमुळे व्यक्तीची सुप्त पात्रता व अपात्रताही समजून येते.

 चित्रकलेतील क्षमता पारखताना कित्येक कसोट्यांचा उपयोग केला जातो. साधी चित्रे वा चित्राकृती दाखवून त्यांच्या बाबतच्या त्या व्यक्तीच्या निर्धारणाची (जज्‌मेंट) तज्ञांच्या मताशी तुलना केली जाते. त्याचप्रमाणे रंग, प्रमाणबद्धता इत्यादींचे तुलनात्मक निर्धारण समजाऊन घेता येते.

यांत्रिक क्षमता कसोट्यांत वापरले जाणारे कागदी आकार: डावीकडील (चार तुकडे) आणि उजवीकडील अ, ब किंवा क यांतील तंतोतंत जुळणी-कसोटी.

यां त्रिक क्षमतेच्या चाचणीतंत्रात तर झपाट्याने प्रगती होत आहे. काही कसोट्यांत यांत्रिक साधनांचे मर्म आकलन करण्याच्या पात्रतेवर भर दिला जातो. सुटे भाग देऊन त्यांची जुळणी करण्याचे काम परीक्षार्थी किती तत्परतेने करतो ते पाहिले जाते. इतर काही कसोट्यांनी त्याचे हस्तकौशल्य पारखले जाते. उदा., खाचफलकात योग्य ठिकाणी योग्य चकत्या बसविणे, यंत्राचे सुटे भाग आणि त्यांच्या आंशिक चित्राकृती यांची सांगड घालणे इत्यादी.

लिपिकांची चाचणी घेण्याचे तंत्र बौद्धिक क्षमता मापनाचेच असते पण त्यात त्यांच्या व्यवसायाला आवश्यक अशा गोष्टींचा समावेश अधिक प्रमाणात असतो.

 बौद्धिक व्यवसाय-विद्यालयात प्रवेश करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनाही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कसोट्यांची सार्थकता कितपत आहे ते पाहण्याकरिता चाचणीतील गुणांची तुलना, पुढे विद्यार्थ्यांनी विद्यालयात मिळविलेल्या गुणांशी केली जाते. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांनी व्यवसायात मिळविलेल्या यशाशीही तुलना केली जाते.

 वैद्यकीय व्यवसायात मुख्यतः शास्त्रीय वस्तुस्थिती, दृक्-प्रतिमान व तार्किक विचारणा यांची चाचणी घेतली जाते. या क्षेत्रात या कसोट्यांची उपयुक्तता कितपत आहे, ते पाहण्याकरिता संशोधन चालू आहे. कायद्याच्या क्षेत्रात मात्र या कसोट्यांची मागणी फारशी दिसत नाही, अभियांत्रिकीमध्ये गणित व अवकाशीय (स्पेशियल) विचारक्षमता यांच्या कसोट्यांचा अतिशय उपयोग होतो.

 अभिरुची वा आवड कसोट्या : व्यवसायातील यश केवळ जन्मजात क्षमता व प्रशिक्षण यांवरच अवलंबून नसते. व्यवसाय करणाराची आवड व ओढ यांचा त्यात फार मोठा वाटा असतो. म्हणूनच व्यवसायार्थी व्यक्तीच्या आवडी-नावडींची कसोटी घेतली जाते. अनेक वस्तू, विषय, व्यक्ती, घटना, मनोरंजन साधने इत्यादींची सूची देऊन त्याची आवड-नावड निश्चित केली जाते. यातून साकारणाऱ्या पार्श्वचित्राची तुलना यशस्वी व्यावसायिकांच्या आवडी-निवडीशी केली जाते आणि त्यात सुसंवाद दिसून येत असेल, तर ती व्यक्ती त्या व्यवसायात यशस्वी होईल असे म्हणायला प्रत्यवाय नसतो.

अर्जित कौशल्य कसोट्या : आतापावेतो जन्मजात गुणांचे वा प्रवृत्तींचे मापन करण्याच्या कसोट्यांची रूपरेखा आपण पाहिली. प्रत्यक्षात शिक्षणाने वा प्रशिक्षणाने जे ज्ञान वा कौशल्य प्राप्त होते त्याचीही कक्षा निश्चित करण्याच्या कसोट्याही शास्त्रज्ञांनी प्रमाणित केल्या आहेत. त्यांचे शालेय व व्यावसायिक असे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात प्राथमिकापासून तो विद्यापीठीय विद्यार्थ्यांची चाचणी घेण्याच्या अनेक कसोट्यांचा समावेश होतो. या कसोट्यांना सिद्धि वा विक्रम कसोट्या (अचिव्हमेंट टेस्ट्स) म्हणतात. साधी परीक्षा आणि कसोटीचाचणी यांतील महत्त्वाचा भेद असा, की कसोट्यांचे स्वरूप व गुणांकन प्रमाणित व म्हणूनच विश्वसनीय असते. या कसोट्या त्या त्या विषयाला अनुलक्षून असतात हे उघडच आहे. व्यावसायिक कसोट्यांची रचनाही व्यवसायात प्रवेश करू इच्छिणाऱ्या व्यक्तीची त्या क्षेत्रातील पात्रता निश्चितपणे पारखता यावी या दृष्टीनेचकेलेली असते. या कसोट्यांना विशिष्ट व्यवसाय कसोट्या(ट्रेड टेस्ट्स) म्हणतात. कार्यक्षमतेचा मानदंडही निर्धारितकेलेला असतो. या मानदंडाच्या खाली ज्याची कक्षाअसते, अशांची कार्यक्षमता उपेक्षणीय मानली जाते. [→ व्यवसाय मार्गदर्शन ].

  कसोट्यांची रचना व प्रमाणीकरण : (१)कसोट्यांची व व्यक्तींची निवड : भौतिक वस्तूचे मापन हेमानसिक विशेषांच्या मापनापेक्षा किती तरी सोपे असते.शास्त्रज्ञांनी ही मापे काही विशिष्ट तत्त्वानुसार निश्चितकेलेली आहेत पण तसा प्रकार मनोमापनाचा नाही. विभिन्न देशांतील व वंशांतील व्यक्तींचे मापन करण्यास एकाच कसोटीचा उपयोग करता येईल असे नाही तसेच भौतिक शास्त्रातल्याप्रमाणे इथे नियत मापनदंड एखाद्या तत्त्वावर अथवा व्यक्तींवर आधारता येत नाही. त्याकरिता विगमनात्मक परिश्रमांची आवश्यकता असते.

 या विषयाचे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना कसोट्यांची (१) विश्वसनीयता (रिलायबिलीटी) व (२) प्रामाण्य वा सत्यता (व्हॅलिडिटी) निश्चित करावयाची असते. त्याकरिता त्यांना दुहेरी निवड करावी लागते. कसोटीकरिता निवडावयाचे विषय आणि व्यक्ती प्रातिनिधिक असाव्या लागतात, म्हणजे असे की ज्या विषयाला अनुलक्षून कसोटीचा आराखडा करायचा तो त्या ठिकाणच्या व्यक्तींच्या परिचयाचा हवा आणि कसोटी प्रमाणित करण्याकरिता ज्यांना ती प्रथम द्यावयाची त्या व्यक्ती त्या गटातील बहुसंख्य व सामान्य म्हणता येतील अशा असल्या पाहिजेत. प्रायोगिक कसोट्यांची संख्या आवश्यकतेहून बरीच अधिक व विषयात विविधताही असावी लागते. या कसोट्यांत शालेय परीक्षेप्रमाणे निबंधात्मक उत्तरांची अपेक्षा असलेले मोजके ८–१० प्रश्न नसतात तर अगदी छोटी उत्तरे असलेले ५० ते १०० पर्यंत प्रश्न दिलेले असतात. शालेय परीक्षेतील प्रश्नपत्रिका सोडविण्याकरिता अडीच ते तीन तासांचा अवधी दिलेला असतो, तर मानसिक कसोट्यांकरिता हा काळ प्रश्नसंख्येवर अवलंबून अर्ध्या ते एक तासापर्यंत मर्यादित असतो. अर्थात माणसाची चिकाटी पारखायची असेल तर हा अवधी पुष्कळच वाढवता येतो. विशेषतः क्रियात्मक कसोट्यांत ही पारख योग्य प्रकारे करता येते. जन्मजात क्षमतांची कसोटी घेताना इतर माहितीची मुळीच अपेक्षा नसते. म्हणूनच प्रश्न अशा प्रकारचे असले पाहिजेत, की ज्यांची उत्तरे देण्यासाठी शिक्षण व अनुभवापेक्षा जन्मजात बुद्धीचीच जास्त जरूरी असेल.

विश्वसनीयता : जी कसोटी पुनःपुन्हा उपयोजिली असता व्यक्तींची तीच ती कक्षा किंवा योग्यता दाखविते, ती विश्वसनीय कसोटी होय. कसोटीची विश्वसनीयता पारखताना अनेक समवयस्कांवर-अंतराअंतराने निदान दोन वेळा तरी-तिचा प्रयोग केला गेला पाहिजे. जर या दोन चाचण्यांत त्या त्या व्यक्तींना साधारणतः तेच ते गुण मिळतील, तरच ती कसोटी विश्वसनीय मानता येईल आणि असे न होता त्यांच्यात भलतेच अंतर पडेल, तर ती अविश्वसनीयच म्हणावी लागेल. 

प्रामाण्य वा सत्यता : कसोटीने दर्शविलेली गुणवत्ता व व्यक्तीची पुढील प्रगती यांत मेळ बसत असेल, तर ती कसोटी प्रमाण म्हणता येईल. प्रामाण्य निश्चित करण्याकरिता प्रयोगार्थ ज्यांची चाचणी घेतली असेल त्यांच्या प्रगतीचा मागोवा संशोधकांना घेणे आवश्यक असते. कसलेल्या व्यक्तींचे अध्ययन वा व्यवसायातील यश हीच प्रामाण्याची कसोटी असते. अशा प्रकारे प्रमाणित कसोटीचा नंतर शिक्षण वा व्यवसाय मार्गदर्शनाकरिता उपयोग करता येतो. 

मानसिक कसोट्यांची उपयुक्तता : तात्त्विक महत्त्व : कसोट्या निश्चित करण्यात बीनेचा उद्देश अत्यंत व्यावहारिक होता आणि त्याचा बोलबालाही त्वरित आणि सर्वत्र झाला तथापि कसोट्यांचा उगम झाला तो तात्त्विक जिज्ञासेतून. गॉल्टन व त्याचे सहकारी यांची समस्या होती ती मानसिक आनुवंशिकतेची. अर्थात काही अंशी त्यांचे प्रारंभिक निष्कर्ष सदोष होते यात संशय नाही आणि याचे कारण असे, की सहजात गुणांचे अवलोकन सहज करता येते अशी त्यांची समजूत होती. पण मानवी मनाचा आविष्कार हा अनुवंश आणि आसमंत यांचा जटिल संघात असतो ही गोष्ट आता सर्वमान्य झाली आहे. आविष्कारातील या दोन घटकांचा निश्चित वाटा कोणता ते गणिताच्या विशेष तंत्रांचा उपयोग करूनच ठरविता येते. आर्. ए. फिशरच्या तंत्राने आनुवंशिक बुद्धिमत्तेविषयी बरीच विश्वासार्ह माहिती मिळविता येणे शक्य झाले आहे.

मॅक्‌डूगल व त्याचे सहकारी यांचे लक्ष मनःस्थितीकडे वेधले होते. स्वतः मॅक्‌डूगलचे मत असे होते, की मन हे त्रिदलीय आहे. ज्ञान, प्रतिक्रिया व भावना हे ते तीन घटक होते. यांच्याच पारस्परिक प्रतिक्रियेने जटिल मानसिक आविष्कार होत असतात. म्हणूनच त्यांचे पृथ्‌करण करून मूलघटकांचे स्वरूप समजावून घेता येईल. या उद्देशाने पीअर्सनच्या गणित-सूत्रांचा उपयोग करून प्रथम जटिल आविष्कारांचे विश्लेषण व मग त्यांचे आयत संश्लेषण (रेक्टँग्युलर सिंथेसिस) करीत असत. पण ही पद्धती बरीच प्राथमिक स्वरूपाची होती. तथापि आजकाल विद्युत् साधनांच्या उपयोगाने कसोट्यांचे तंत्र व त्यांची आधारभूत तत्त्वे या दोहोंचेही स्वरूप चांगलेच विकसित झाले आहे. 

व्यावहारिक उपयोग : विद्यार्थ्यांचे सुप्त गुण या कसोट्यांनी आरंभीच लक्षात येतात. एरवी मनोदुर्बल मानलेल्या कित्येक मुलांचे भवितव्य या कसोट्यांनी उजळले आहे. त्याचप्रमाणे विशिष्ट क्षेत्रांतील अपात्र विद्यार्थ्यांना त्यांचे योग्य क्षेत्र या कसोट्यांच्या योगाने निवडता येते. व्यवसायक्षेत्रातही त्यांचा उपयोग उपकारक ठरला आहे. 

व्यक्तिमत्त्व व स्वभाव कसोट्या : यांची रचना करताना मानसशास्त्रज्ञांना व्यक्तीच्या व्यक्त व अव्यक्त अशा दोन्ही प्रकारच्या लक्षणांचा विचार करणे आवश्यक असते. व्यक्तिमत्त्वाचा विचार करताना स्वभाव आणि चारित्र्य यांचाही व्यक्तिमत्त्वाचे घटक या दृष्टीने विचार करणे आवश्यक असते. 

व्यक्तिमत्त्वाचे वर्णन व मापन करताना एकक म्हणून गुणविशेषांचा सर्वत्र उपयोग केला जातो. विभिन्न परिस्थितीत व्यक्तीच्या वर्तनात विशिष्ट प्रकारे व्यक्त होणारा स्थायी गुण म्हणजे गुणविशेष. बहुतेक सर्वच गुणविशेष सर्व व्यक्तींमध्ये असतात. न्यूनाधिकता असते ती त्यांच्या प्रमाणात. जेव्हा एखादा गुणविशेष डोळ्यात भरण्याइतपत अधिक प्रमाणात दिसून येतो तेव्हाच तो सविशिष्ट म्हटला जातो. जिथे प्रमाण आहे तिथे तुलना अनुस्यूतच असते. तेव्हा या तुलनेचा मानदंड निश्चित करणे हे एक महत्त्वाचे कार्य असते आणि त्याच्या तुलनेनेच कोणतीही व्यक्ती कुणीकडे झुकते हे समजू शकते. 

व्यक्तिमत्त्वाचा विचार करणाऱ्या मानसशास्त्रज्ञांना नेहमी सतावणारी समस्या म्हणजे गुणविशेषांची अफाट संख्या. तिचे आटोपशीर वर्गीकरण करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे व आजही तो चालू आहे. स्पिअरमनच्या संशोधनाचा उपयोग करून प्रथम थर्स्टनने असा एक प्रयत्न केला होता. त्याचेच सूत्र पुढे चालवून कॅटेलने १६ मूलभूत व्यक्तिमत्त्व गुणविशेषांची प्रश्नमाला निश्चित केली. या गुण विशेषांचे अल्पतम-मध्य-उच्चतम असे भाग कल्पिले तर व्यक्तीच्या ह्या सोळा गुणविशेषांची मात्रा दाखवणारे पार्श्वचित्र काढून दाखवता येते व त्यावरून व्यक्तीचे वर्गीकरण करता येते. मानसशास्त्रज्ञांप्रमाणेच मानसोपचारतज्ञही या कामात गढलेले आहेत. कसोट्यांकरिता कोणते आधारभूत घटक घ्यावयाचे त्यावर त्यांचे स्वरूप आणि परिभाषा अवलंबून असते. विकृत मनस्कावर उपचार करताना काही विशिष्ट गुणविशेषांचाच विचार करावयाचा असतो आणि त्या दृष्टीने कसोट्यांची रचना करीत असतात. उदा., आरोग्यचिंता (हायपोकाँड्रिॲसिस), शिथिलन (रिलॅक्सेशन) इत्यादी. 

आरंभीच्या व्यक्तिमत्त्व-कसोट्या : (१) मुक्त साहचर्य : या कसोटीत काही आधार शब्दांची निवड केलेली असते. आंतरिक भाव-भावनांना जणू ते परवलीसारखे असतात. परीक्षकाने एक शब्द उच्चारताच परीक्षार्थीने पहिल्या क्षणी मनात जो शब्द येईल त्याचा तत्काल उच्चार करावयाचा असतो. याही तंत्राचा प्रथम प्रयोग गॉल्टननेच  केला. त्यानंतर एमील क्रेअपेलीनने त्याचा प्रयोग विकृतमनस्कावर करण्याची प्रथा आरंभिली. पुढे १९१० मध्ये अबोधसंघर्षातील गंडांचे निदान करण्याच्या उद्देशाने कार्ल युंगने १०० उद्दीपक शब्दांची एक जंत्रीच विकसित केली आणि उत्तरातील शीघ्रता, विलंब, त्वचेच्या विद्युत् रोधकतेचे व श्वासोच्छ्वासवेगाचे परिवर्तन इ. निदान-निर्देशक लक्षण स्वरूपही विशद केले. याच सुमारास केंटरोझॅनॉफ सूचीही प्रकाशात आली. त्यानंतरही कित्येक प्रयत्न झाले, पण वरील दोन कसोट्यांचाच उपयोग सर्वांत अधिक केला गेला. अपराधित्वाचा छडा लावण्याकरिताही मुक्तसाहचर्य तंत्राचा उपयोग केला जातो. 

(२) प्रश्नावली : आजकाल अनेक संशोधन क्षेत्रांत प्रश्नावलीचा उपयोग केला जातो. याही क्षेत्रात गॉल्टन आघाडीवर होता असे म्हणता येईल. अर्थात् जी. स्टॅन्ली हॉल याने त्याचा सर्वप्रथम व्यावहारिक उपयोग केला. रॉबर्ट एस्. वुडवर्थ याने व्यक्तिमत्त्वाची आदर्शभूत प्रश्नावली प्रथम १९१८ मध्ये विकसित केली. त्याला त्याने व्यक्तिमत्त्व प्रश्नावली असे नाव दिले. सेनादलात प्रवेश करण्याला मानसिक दृष्टीने अयोग्य व्यक्तींना शोधून काढणे हा या प्रश्नावलीचा मूळ उद्देश होता. तिच्यात शारीरिक लक्षणे, भीती, असामाजिकता यांना अनुलक्षून प्रश्न असत. जसे भर रात्री तुम्हाला एकदम भीती वाटते का? तुमच्या तोंडावर सतत खाज सुटते काय? दारू पिताच तुम्हाला भांडणाची लहर येते का? इत्यादी. पुढे या प्रश्नावलीत बरीच सुधारणा करण्यात आली पण या व अशा प्रकारच्या अन्य प्रश्नावलींचा मुख्य दोष असा, की त्यात खोटी उत्तरे देण्याला बराच वाव असून मनोविकृतीची लक्षणे क्वचितच व्यक्त होतात.

स्ट्राँगची व्यावसायिक रस वा रूचीपत्रिका : वुडवर्थची प्रश्नावली व त्यानंतर सुधारून वाढविलेल्या इतर व्यक्तिमत्त्व कसोट्यांतील वर दाखविलेले दोष दूर करण्याच्या उद्देशाने जे प्रयत्न झाले, त्यांतील महत्त्वाची एक म्हणजे स्ट्राँगने अनेक वर्षे प्रयत्न करून विकसित केलेली प्रश्नावली होय. हिचा एक विशेष असा, की कसोट्या प्रमाणित करताना केवळ आंतरिक सुसंगतीचाच नव्हे, तर वास्तवतेचाही त्यात विचार केलेला असतो. विशिष्ट गुणविशेष असलेल्या परिचित व्यक्तींच्या उत्तरांचा अभ्यास करून उत्तरांची कक्षा तिच्यात निश्चित केलेली असते. तसेच विभिन्न गुणविशेषांचा परस्परसंबंधही तीत प्रमाणित केलेला असतो. या विशेषामुळे तीत फसवण्यालाही फारसा वाव रहात नाही. या व्यतिरिक्त या प्रश्नावलीची कक्षाही बरीच विस्तृत आहे. यात आवड, नावड व अनिश्चिती (आ, ना, अॲग्री, डिसॲग्री व अन्‌सर्टन) या अक्षरांनी व्यक्त करावयाची असते. ह्या व अशाच प्रकारच्या अनेक प्रश्नावलींचा मार्गदर्शनात व निवडीत आजकाल उपयोग केला जात आहे.

रोर्शाकच्या शाई-ढाग तंत्राची एक नमुनाकृती

प्रक्षेपणात्मक पद्धती : गॉल्टन, युंग आदी मानसशास्त्रज्ञांनी योजिलेल्या कसोट्यांनी जरी व्यक्तीच्या मनातील भाव-भावनांची अभिव्यक्ती होत असली, तरी रोर्शाकच्या शाई-डाग (इंक-ब्लॉट) तंत्राचा प्रवेश या क्षेत्रात झाल्यावरच प्रक्षेपण पद्धतीला खरे महत्त्व आले आणि एल्.के. फ्रँक या शास्त्रज्ञाने तिला १९३९ मध्ये तात्त्विक बैठक दिली. रोर्शाकच्या तंत्रात कागदावर शाई टाकून त्या डागावरच कागदाची घडी केली असता त्या दोन्ही अंगांची मिळून जी एक संगत व प्रमाणबद्ध आकृती तयार होते ती परीक्षार्थी व्यक्तीला दाखविली जाते. रोर्शाकने या कसोटीत ५ करड्या रंगाच्या व ५ विविधरंगी आकृती प्रमाणित केल्या आहेत. त्यांच्यात कोणतीच स्पष्ट अशी आकृती नसते. संदिग्धता हाच त्यांचा गाभा असतो. ढगात कित्येक व्यक्तींना जशा विभिन्न आकृत्या दिसतात, तशाच या चित्रातूनही दिसतात आणि त्यांना काय आणि कसे दिसते यावरून त्या व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप निश्चित केले जाते. या तंत्रामागे तीन प्रकारच्या तात्त्विक भूमिका आहेत : फ्रॉइडने जो प्रक्षेपण सिद्धांत मांडला आहे त्या अनुरोधाने पाहता व्यक्ती या आकृती पाहून जे वर्णन करते ते तिच्या अबोध मनात दबलेल्या अशा निषिद्ध वासनांची अभिव्यक्ती असते. दुसऱ्या अर्थाने प्रक्षेपण म्हणजे मनुष्याच्या तात्कालिक समस्यांचे त्यात दर्शन होते. तर फ्रँकचे मत असे, की व्यक्तीच्या मनाचे ते सर्वार्थाने मानचित्र असते. वस्तुतः पहिल्या दोन भूमिका आंशिक असून त्यांचा समावेश तिसरीत झालेला आहे. व्यक्तीच्या उत्तरांतून परिस्थितिसापेक्ष विभिन्न अंगांची अभिव्यक्ती होत असते.

प्राबंधिक आसंवेदन कसोटीत दर्शविल्या जाणाऱ्या छायाचित्र-संचातील एक नमुना.

प्राबंधिक आसंवेदन कसोटी (थिमॅटिक ॲपर्सेप्शन टेस्ट) : दुसरी एक महत्त्वाची प्रक्षेपण पद्धती म्हणजे मरी व मॉर्गनप्रणीत (१९३५) प्राबंधिक आसंवेदन कसोटी (प्रा. आ. क. टी. ए. टी.) होय. या पद्धतीत व्यक्तीला वेगवेगळी अस्पष्ट चित्रे दाखविली जातात आणि त्यावरून चाचणी देणाराने कथा रचून सांगावयाची असते. मुळात ३१ छायाचित्रांचा हा संच असून त्याचे स्त्री व पुरुषांसाठी ३०–२० चे दोन उपविभाग केलेले आहेत. या २० चित्रांचेही दोन भाग असतात. पहिला १० चित्रांचा गट थोडासा सोपा असतो व दुसरा काहीसा जटिल. एका तासात पहिली चाचणी व काही वेळाने आणखी एका तासाची दुसरी असा हा २ तासांचा कार्यक्रम असतो. या चाचणीत तुमच्या सर्जनात्मक कल्पनाशक्तीची पारख करायची आहे अशी एकच मुख्य सूचना दिली जाते आणि परीक्षार्थी जे सांगेल ते परीक्षक शब्दशः लिहून घेत असतो. पण यात परीक्षकाच्या इच्छेवर बऱ्याच तपशिलाच्या गोष्टी अवलंबून असतात. गोष्ट सांगणाऱ्याच्या भाव-भावनांचे प्रतिबिंब तीत पडलेले असते. संशोधक-परीक्षक मग त्याचे विश्लेषण करून व्यक्तिमत्त्वाच्या स्वरूपाचे आरेखन इष्ट त्या दृष्टीने करू शकतात. या पद्धतीचा उपयोग मानववंशशास्त्राच्या अध्ययनातही केला जातो.

वर्तन निरीक्षण (सिच्युएशन स्ट्रेस टेस्ट) : विशिष्ट दबाव उत्पन्न करणाऱ्या परिस्थितीत व्यक्तीला गुंतवून त्या परिस्थितीत ती कशी वागते याचे निरीक्षण करून व्यक्तिमत्त्व गुणविशेषांचे स्वरूप पारखले जाते. हार्टशॉर्न व मे आणि त्याचे इतर सहकारी यांनी या पद्धतीचा अवलंब करून सैन्यात भरती होऊ पाहणाऱ्यांची प्रामाणिकता, सहकारवृत्ती, फसवणूक इ. गुणविशेषांची चाचणी घेऊन पाहिली. त्यांचे निष्कर्ष सामान्य कल्पनेच्या इतके विरोधी होते, की कित्येक वर्षेपर्यंत वरील प्रवृत्तींची चाचणी घेण्याच्या अशा पद्धतींचे संशोधनच स्थगित झाले होते. प्रमाणिकपणा, सहकारवृत्ती इ. सामान्य गुणविशेष वर्तनात सरळपणे अभिव्यक्त होतात, ही कल्पना चुकीची आहे हे संशोधकांनी दाखवून दिले. पण पुढे विशिष्ट परिस्थितीतील वर्तनाचे कसून निरीक्षण करण्याचे तंत्र अवलंबून सेनादलीय संशोधकांनी व्यक्तिमत्त्व मूल्यमापन चाचणी (पर्सनॅलिटि ॲसेसमेंट टेस्ट) ही पद्धती प्रचारात आणली व आज ती द्वितीय महायुद्धोत्तर कालातील एक महत्त्वाची पद्धती गणली जाते.

मूल्यांची पारख : ह्या अध्ययनात व्यक्तीच्या जीवनात मूल्यांचे तौलनिक स्थान काय असते, ते शोधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ऑल्‌पोर्ट व व्हर्नन यांनी १९३१ मध्ये पहिल्यानेच या विषयाचा उपन्यास केला. त्यात (१) तात्त्विक (सत्यशोधन), (२) आर्थिक (उपयुक्ततेची दृष्टी), (३) कलात्मक, (४) सामाजिक, (५) राजकीय (अधिकारेच्छा) व (६) धार्मिक अशा सहा मूल्यांचा विचार केला गेला आहे. ही एक प्रश्नावलीच आहे आणि प्रश्नावली पद्धतीत जे दोष असतात ते सर्व येथे दिसून येतात. तसेच, प्रश्नांच्या स्वरूपावरूनही आणखी एक उणीव स्पष्ट होते ती ही, की ज्यांनी या मूल्यांचा विचार केला नाही अशा सामान्य व्यक्तींची पारख तिने होऊ शकत नाही.

 पहा : मानसशास्त्र मानसशास्त्रीय पद्धति.

संदर्भ : 1. Anastasi, A. Psychological Testing, New Tork, 1964.

             2. Bormuth, J. R. On the Theory of Achievement Test Items, London, 1970.

             3. Cattell, R. B. Personality and Motivation : Structure and Measurement, New York, 1957.

             4. Cronbach, L. J. Essentials of Psychological Testing, New York, 1971.

             5. Freeman, Frank S. Theory and Practice of Psychological Testing, New York, 1962.

             6. Hunt, J. M. Intelligence and Experience, New York, 1961.

             7. Lyman, H. B. Test Scores And What they Mean, London, 1961.

             8. Nunnally, J. C. Introduction to Psychological Measurement, New York, 1970.

             9. Nunnally, J.C. Psychometric Theory, New York, 1967.

             10. Rapoport, D and others, Diagnostic Psychological Testing, New York, 1971.

             11. Terman, L.M. Merrill, M. E. Stanford-Binet Intelligence Scale, Boston, 1960.

             12.Thorndile, R. L. Hangen, E. Measurement and Evolution inPsychology and Education, New York, 1969.

             13. Thorndike, R. L. Personal Selection Tests and Measurement Methods, New York, 1949.

कुलकर्णी, वा. मा.