विश्लेषणात्मक मानसशास्त्र : विश्लेषणात्मक मानसशास्त्र हा मनोविश्लेषणाच्या परिशीलनातून विख्यात स्विस मानसशास्त्रज्ञ ⇨कार्ल गुस्टाफ युंग (१८७५-१९६१) याने मांडलेला स्वतंत्र संप्रदाय आहे. सुप्रसिद्ध ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ ⇨सिरमंड फ्रॉइड (१८५६-१९३९) याने ⇨ मनोविश्लेषण ही मानवी मनाविषयीची सिद्धांतप्रणाली आणि मानसोपचारपद्धती मांडली होती. तिच्याकडे आकृष्ट झालेल्या सुरूवातीच्या काही मानसशास्त्रज्ञांमध्ये ⇨ॲल्फ्रेड ॲड्लर (१८७०-१९३७) व युंग हे होते. युंगने प्रथम फ्रॉइडचे शिष्यत्व पतकरून नंतर त्याच्या संशोधनात सहकारी म्हणूनही काही काळ (१९०६-१३) घालवला. मनोविकृतीचे स्वरूप व त्यांच्यामागील कार्यकारणभाव समजून घेण्याच्या प्रयत्नात फ्रॉइडप्रणीत सिद्धांतीशी व कल्पनांशी युंग सहमत होऊ शकला नाही. त्याला विशेषतः कामप्रेरणेवर, फ्रॉइडने जो भर दिला होता, तो अनाठायी वाटल्यामुळे त्याने ‘विश्लेषणात्मक मानसशास्त्र’ ही स्वतःची विचारसरणी १९१३ च्या सुमारास स्वतंत्रपणे मांडली. युंगप्रणीत विचारसरणीचे स्वरूप पाहताना फ्रॉइडच्या सिद्धांताचे स्वरूप तुलनेसाठी पाहणे उपयुक्त ठरेल.

फ्रॉइडने मन ही संकल्पना तीन स्तरांच्या स्वरूपात मांडली होती. त्याच्या मते मानवी मनाच्या कक्षा ह्या बोधावस्था, बोधपूर्व अवस्था आणि अबोधावस्था अशा तीन स्तरांत विस्तारलेल्या असतात. ज्या मानसिक घटना आणि स्मृती ह्यांची वर्तमानकाळात व्यक्तीला जाणीव असते, तो मनाचा बोध (कॉन्शस) स्तर होय. त्यातील काही इच्छा व स्मृती ह्या सर्वच्या सर्व प्रत्यक्ष जाणिवेत नसतात, परंतु त्या सहजपणे जाणिवेत आणता येतात. बोधपूर्व मन म्हणजे अशा इच्छांचे व स्मृतींचे एक भांडार होय. अबोध मनाचा काही भाग आदिम स्वरूपाचा असतो. पाशवी वृत्तिवासनांनी तो बनलेला असून केवळ सुखाची इच्छा धरणारा असतो. अबोध मनाचा हा स्तर कधीच बोधस्तरावर आलेला नसतो, काही विचार, वासना, स्मृती वगैरे कधीकाळी व्यक्तिमनाच्या बोधस्तरावर असतात परंतु जोवनाच्या ओघात-विशेषतः बालपणी-व्यक्तीला त्या धक्कादायक, क्लेशकारक आणि समाजविरोधी वाटल्यामुळे व्यक्तीने नकळत त्या दडपून टाकलेल्या असतात. अबोध मनाच्या उर्वरित भागात ह्या दडपलेल्या वासना, स्मृती इ. धुमसत असतात. त्यामुळे अबोध मनाच्या ठायीही प्रेरक शक्ती असते. अबोध मनाची कक्षा ही बोध मनाच्या कक्षेच्या तुलनेत खूपच विस्तृत असते. पाण्यावर तरंगणाऱ्या हिमनगाचा अधिकांश भाग जसा पाण्यात दडलेला असतो, तसाच मानवी मनाचा अधिकांश भाग हा जाणिवेच्या बाहेर असतो. उन्माद, भयग्रस्तता, विस्मरण ह्यांसारख्या विकृतींचा फ्रॉइड अभ्यास करीत होता. शारीरिक कारणांशी संबंध नसलेल्या ह्या विकृतींचे मूळ अबोध मनात असल्याची त्याची धारणा झाली. व्यक्तिमनाच्या बाहेरील जगाला असंमत म्हणून बोध मनाने त्याज्य केलेल्या ज्या इच्छा, कल्पना, प्रवृत्ती अबोध मनात बसत असतात, त्या विशिष्ट प्रकारे, आडमार्गाने व्यक्त होण्याच्या प्रयत्न करतात. अशा आडमार्गांना फ्रॉइडने स्वसंरक्षक यंत्रणा (डिफेन्स मेकॅनिझम) असे म्हटले आहे. अशा आडमार्गांमध्ये रोग्यांना पडणारी स्वप्ने विशेष महत्त्वाची असल्याचे फ्रॉइडचे मत झाले. विशेषतः रोग्यांच्या अवलोकनावरून, त्यांना पडणाऱ्या स्वप्नांच्या मीमांसेवरून अबोध मनात दडलेल्या प्रवृत्तींमध्ये सर्वांत प्रबळ प्रवृत्ती कामप्रेरणेची (लिबिडो) असल्याचा दावा फ्रॉइडने केला. बाल्यावस्थेत येणाऱ्या अडचणीने कामप्रेरणा निरोधिली जाते ती दडपली गेल्यामुळे असा अयशस्वी निरोध हेच मज्जाविकृतींचे मूलकारण होय, असे कामप्रेरणेबाबत फ्रॉइडला वाटत होते. त्यामुळे रोगनिवारणाच्या प्रक्रियेत उपाययोजना करताना गतायुष्यातील घटनांच्या स्मृतींना पुन्हा जागृत करणे हा त्याच्या मते एक मुख्य भाग बनला. युंगला रोग्यांच्या पाहणीत फ्रॉइडचे सिद्धांत सुरूवातीला उपयुक्त वाटले, परंतु त्यांच्या आधारे केवळ विशिष्ट प्रकारच्या विकृतीचाच उलगडा होतो, सर्व प्रकारच्या मनोव्याधींचे स्वरूप समजावून घेण्यास ते अपुरे पडतात, अशी त्याची हळूहळू धारणा झाली. मनोरूग्णांच्या सहकार्यातून उपलब्ध होणाऱ्या सर्व माहितीची संगती त्याला कामप्रेरणेच्या तत्त्वानुसार लागत नव्हती. फ्रॉइडप्रणीत मनोविश्लेषणाचा अपुरेपणा, त्यातील मर्यादा ओघाओघाने स्पष्ट होऊ लागल्या व ॲड्लर आणि युंग ह्यांनी त्यातून अंग काढून घेऊन आपापले स्वतंत्र संप्रदाय उभारले. युंगच्या स्वतःच्या घरातील वातावरण धार्मिक होते. मनोविकृतांविषयीचा त्याचा अनुभव आणि अवलोकन व्यापक होते. परिणामतः मनोविकृतांच्या मानसिक व्याधींचे स्वरूप नीट समजावून घेण्यासाठी त्याला समाजातील प्रचलित अशी विविध पुराणे, धर्म, संस्कृती, तसेच साहित्य, तत्त्वज्ञान ह्यांचा आणि त्यांतील प्रतीकांचा अभ्यास करणे जरूरीचे वाटले. प्रत्यक्ष, अनुभवसिद्ध ज्ञानाच्या आधारावर युंगने काढलेले निष्कर्ष फ्रॉइडच्या निष्कर्षाहून वेगळे आहेत. कामप्रेरणेला युंग महत्त्व देतो परंतु फ्रॉइडइतके नव्हे. युंगच्या मते, अबोध मनात कामवासना नव्हे, तर मूळ जीवनदायी प्राणशक्ती उसळत असते. ही कल्पना ⇨आंरी बेर्गसाँ हयाच्या जैव-प्रेषणेच्या (इलान-व्हायटल) कल्पनेशी अधिक जुळती दिसते.

विकास पावणाऱ्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वांवर-विशेषतः त्यांच्या काही अनिष्ट अशा सहजप्रवृत्तींवर व इतर सवयींवर-नियंत्रणा ठेवले जाते. वडीलधारी मंडळी व पालकांकडून निर्बंध घातले जातात. अशा निर्बंधांमुळे संयमित केलेल्या इच्छा आणि भावना ह्यांमध्ये मनोविकृतींची पाळेमुळे आहेत, असे युंगला वाटते. पालकांनी घातलेल्या निर्बधांमुळे विकासोन्मुख व्यक्तींच्या मनांत संघर्ष निर्माण होतो. शिक्षणामुळेही आणि एकंदर सामाजिक अपेक्षांमुळेही त्यांच्यावर आपसूक आणखी दडपणे येतात. हया सर्वांचा अनिष्ट परिणाम होतो. मनोविकृतींवर इलाज करताना फ्रॉइडने पूर्वायुष्यातील अनुभवांवर (विस्मृत) भर दिला. युंगच्या मताप्रमाणे गतगोष्टींना उजळा देणे एवढ्याने रोगपरिहार होत नाही. संपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीचा त्यासाठी विचार व्हावयास हवा पूर्वायुष्याच्या अनुभवांबरोबर भविष्याकालाचा विचार व्हावयास हवा. वर म्हटल्याप्रमाणे लहान मुलांच्या काही सहजप्रवृत्ती, वाईट सवयी इ. गोष्टींचा वडीलधाऱ्यांच्या मते बीमोड करावा लागतो. आवतीभोवतीचे हे लोक व शिक्षक त्यासाठी झटत असतात. अशा गोष्टी कालांतराने दिसेनाशा होतात, तेव्हा मुलांच्या स्वभावाचे परिवर्तन योग्य दिशेने करण्यात आपण यशस्वी झालो, असे त्यांना वाटते. वास्तविक होते काय, की या गोष्टींचा मुलांना विसर पडतो पण तो कायमचा नव्हे. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिगत अबोध मन असते. ते असे घडते : ज्यांना वारंवार विरोध होतो, ते बालपणींचे दडपलेले आवेग वा आघात, इच्छा वगैरे सर्वांची हकालपट्टी व्यक्तिगत अबोध मनात होते. त्यांचे विस्मरण होते व व्यक्तीलाही असेच वाटते, की आपण बदलतो आहोत. आपल्यातील त्या वाईट प्रवृत्ती आता नाहीशा झाल्या आहेत. परंतु हा केवळ भास असतो. व्यक्तिगत अबोध मनात त्या प्रवृत्ती चिवटपणे जगत असतात आणि संधी मिळताच एका पावसाने फोफोवणाऱ्या शुष्क तणांप्रमाणे प्रबळ होतात.

युंगने व्यक्तिमत्त्वाची ही जी रचना मांडली, ती थोडक्यात खालीलप्रमाणे सांगता येईल : प्रत्येक व्यक्तीचे एक व्यक्तिगत अबोध मन असते. त्यासंबंधीचा निर्देश आधी आलाच आहे. बालवयातील प्रवृत्ती, आवेग, इच्छा (जे व्यक्तीकडून दडपले जातात) व नंतर विस्मृत होतात ते शब्दशः असंख्य असे अनुभव ह्या व्यक्तिगत मनात वस्ती करून असतात. व्यक्तिगत मनात हे जे असते, ते बोधावस्थेला जवळचे असते, किंवा एके काळी बोधावस्थेत असून नंतर दडपलेले वा विसरलेले असेही असते. व्यक्तिगत अबोध मनावर आपल्या इच्छेचे सहसा नियंत्रण नसते. मात्र हया अबोध मनातला काही भाग व्यक्तीला प्रयत्नपूर्वक आठवून बोधावस्थेच्या कक्षेत आणता येतो. निरोधनाची (सप्रेशन) शक्ती जेव्हा क्षीण होते-उदा., निद्रेमध्ये-तेव्हा, कधी एखाद्या साहचरी कल्पनेला (असोसिएशन) चिकटून, कधी ⇨स्वप्नांचा वा ⇨कल्पनाजालाचा (फँटसीचा) वेश परिधान करून व्यक्तिगत अबोधातला काही भाग बोधावस्थेत येतो. ⇨मज्जाविकृतीसारख्या मनोव्याधीवर उपचार करताना भूगर्भातील एखादी वस्तू खणून बाहेर काढावी, त्याप्रमाणे मानसोपचारतज्ज्ञ रूग्णाच्या व्यक्तिगत दडपला गेलेला भाग विशिष्ट उपचारतंत्रे वापरून बोधावस्थेत आणण्याचा प्रयत्न करीत असतो.

युंगने एक मानसशास्त्रज्ञ ह्या नात्याने त्याच्या समोर आलेल्या व्यक्तींच्या ‘शब्दसाहचर्य कसोट्या’ (वर्ड असोसिएशन टेस्ट्स) घेतल्या. समोरच्या रूग्णासमोर एक विशिष्ट शब्द उच्चाराचा आणि त्याने तो शब्द वा कल्पना ऐकल्यावर आपल्या मनात ज्या कोणकोणत्या कल्पना आल्या हे सांगायचे, असे ह्या कसोटीचे स्वरूप थोडक्यात सांगता येईल. अशा कसोट्यांच्या अनुभवांतून युंगच्या लक्षात एक गोष्ट आली ती अशी, की निरनिराळ्या कल्पना काही मूलभूत केंद्राकांशी साहचर्य ठेवून असतात. हया कल्पना काही भाववृत्तींनी भारलेल्या असतात. एकेक केंद्रक हा एखाद्या मानसीय चुंबकासारखा असतो आणि त्याच्या शक्तीनुसार तो वेगवेगळ्या कल्पनांना स्वतःकडे जणू खेचून घेत असतो. एकेका केंद्रकाशी साहचर्य राखून असणाऱ्या ज्या कल्पना असतात, त्यांच्या समूहाला युंगने ⇨गंड (काँप्लेक्स) असे नाव दिले.

गंड हा सबोध (कॉन्शस) असू शकतो. म्हणजे व्यक्तीला त्याची जाणीव असू शकते. तो अंशतः अबोध किंवा पूर्णतः अबोधही असू शकतो. अंशतः सबोध वा पूर्णतः अबोध असलेला गंड हा संबंधित व्यक्तीमधील आपले अस्तित्व एखाद्या स्वतंत्र व्यक्तीसारखे सांभाळून असतो, आणि त्याच्याशी निगडित असलेल्या कल्पना व भाववृत्ती ह्या बोधावस्थेत वेळोवेळी येतजात असतात. त्यांच्या अशा येण्याजाण्यावर व्यक्तीचे नियंत्रण असू शकत नाही. अशा गंडांचा परिणाम गंडग्रस्त व्यक्तींच्या जीवनशैलीत दिसून येतो.


प्रत्क व्यक्तीला जसे एक व्यक्तिगत अबोध मन असते, तसे सामूहिक अबोध मनही (कलेक्टिव्ह अन्कॉन्शस) असते. सामूहिक अबोध मन हा व्यक्तिगत अबोध मनाहून अधिक खोल असा मनाचा स्तर होय. सामूहिक अबोध मनात जे असते, ते बोधावस्थेत कधीच आलेले नसते. तसेच सामूहिक अबोध मनाचा आशय व्यक्तीने स्वतः प्राप्त करून घेतलेला नसतो, तर केवळ आनुवंशिकतेने तो तिला प्राप्त झालेला असतो. त्याचप्रमाणे पिढयान्पिढया चालत आलेल्या सामाजिक व धार्मिक परंपरांचे, अनुभवांचे उपयोगी पडणाऱ्या सहजप्रेरणा व सनातन विचार त्यात राहतात. युंगने विविध संस्कृतींचा तौलनिक अभ्यास केलेला असल्यामुळे त्या संस्कृतींतील पौराणिक कथा, परीकथा, अन्य साहित्य, धर्माचरण ह्यांत असलेली साम्यस्थळे त्याने लक्षात घेतली होती. सामूहिक अबोधातील आशय आणि मानववंश ह्यांच्यात संरचनात्मक संबंध असल्याचा प्रत्यय युंगला आला. सामूहिक अबोध हा मानवी विकासाचा पुरातन काळापासूनचा आणि वंशपरंपरेने लाभलेला आध्यात्मिक वारसा असल्यामुळे आदिम प्रतीके ही सर्व मानवांमध्ये समान असतात, अशी युंग हयाची धारणा होती. व्यक्तिगत अबोधाचा बराचसा भाग वर वर्णन केलेल्या गंडांनी व्यापलेला असतो, तर सामूहिक अबोधाचा आशय हा आवश्यकतेने मूलाकृतींनी (आर्किटाइप्स) घडविलेला असतो, असेही युंगचे म्हणणे होते.

मूलाकृती म्हणजे मानवजातीने सामायिकपणे आणि सामूहिक पद्धतीने हजारो वर्षे, वारंवार घेतेलेल्या अनुभवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आद्य प्रतिमा होत. ह्या प्रतिमांसाठी युंगने आरंभी ‘आद्य प्रतिमा’ (प्रायमॉर्डिअल इमेजिस) हे नाव दिले. परंतु पुढे त्याने त्यांना ‘मूलाकृती’ (आर्किटाइप) ही संज्ञा दिली. मूलाकृती ह्या अबोध असतात, परंतु त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि मनात वारंवार निर्माण होणाऱ्या विशिष्ट प्रतिमांतून त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपणास अनेक प्रसंगी होते. स्थळकाळातील अशा अनेक मिथ्यकथा वा मिथके आणि प्रतीके, टोळ्याजमातींच्या गूढविद्या, पवित्र वा दुष्ट हेतूने निर्मिलेले धार्मिक विधी यांतून युंगच्या सिद्धांताचे प्रत्यंतर येते. अनेक गोष्टींतून ह्या प्रतिमांचा विविध संस्कृतींच्या अभ्यासात प्रत्यय येतो.

मूलाकृतींचा अनुभव माणसांना प्रतिमेच्या रूपाने जसा येतो, तसा विशिष्ट भावनांच्या रूपानेही येतो. माणसांच्या  जीवनातील काही विशिष्ट प्रसंगी हा भावनात्मक अनुभव येत असतो. उदा., जन्म आणि मृत्यू, नैसर्गिक अडचणींवर केलेली मात, पौगंडावस्थेसारखी जीवनात येणारी संक्रमणात्मक स्थित्यंतरे, भीतिदायक अनुभव. अशा अनुभवांनंतर एखाद्या मूलाकृतीचे प्रतिनिधित्व करणारी एखादी आदिम कालातील प्रतिमा आधुनिक जगात वावरणाऱ्या माणसालाही स्वप्नात दिसू शकते.

युंगने योजिलेल्या ‘सामूहिक अबोध’ ह्या शब्दप्रयोगामुळे काही गैरसमज झाले. सामूहिक अबोध आणि समूहमन ह्यांमध्ये काहींना साधर्म्य वाटले. परंतु ‘समाजातील सर्वांना समान असे एक मन’ असा ‘सामूहिक अबोधा’ चा अर्थ नसून ‘प्रत्येकाच्या मानसिक जीवनातील समानधर्मी घटकतत्त्वांच्या अस्तित्वाचा निर्देशक’ म्हणून ‘सामूहिक अबोध’ ही संज्ञा वापरली जाते. ही घटकतत्त्वे त्या त्या व्यक्तीच्या मानसिक जीवनाच्या पूर्वीपासून अस्तित्वात असतात. ‘अबोध’ हा शब्दही गैरसमज निर्माण करू शकतो. ‘अबोध’ म्हणजे ‘बोधा’ चा अभाव नव्हे, तर बोधातील अनेक द्रव्ये प्रथम अबोधात वसत असतात. ते अबोध मनातील घटक काहीसे अस्पष्ट आणि अमर्याद असतात, अनिश्‍चित असे त्यांचे स्वरूप राहते.

युंगने नारीप्रतिमा (ॲनिमा), नरप्रतिमा (ॲनिमस) आणि छाया (शॅडो). ह्या तीन मूलाकृतींचे विवेचन केले आहे. नारीप्रतिमा म्हणजे पुरूषाच्या मानसिक घडणीत असलेली एक स्त्रीस्वरूप मूलाकृती होय आणि नरप्रतिमा म्हणजे स्त्रीच्या मानसिक घडणीस पूरक ठरणारी पुरूषस्वरूपअशी मूलाकृती होय. पुरूष हा संपूर्ण पुरूषी नसतो आणि स्त्री ही संपूर्ण स्त्रीतत्त्वरूपी नसते. अतिशय कणखर, राकट, धिप्पाड अशी माणसे मुलांच्या संबंधात अतिशय हळवी, कोमल, मृदू असतात. विशिष्ट प्रसंगी ती भावनाविवश होतात. हा नारीतत्त्वाचा आविष्कार असतो. कारण हळवेपणा, भावनाविवशता हे तर वास्तविक स्त्रीचे गुणधर्म मानले जातात. आपल्यातील नारीप्रतिमेमुळे स्त्रीचा स्वभाव पुरूष जाणतो. ही नारीप्रतिमा कोणा विशिष्ट स्त्रीची नसते. काळाच्या ओघात पुरूषजातीला स्त्रीजातीबद्दल येणाऱ्या अनुभवांनी समृद्ध अशी ही नारीप्रतिमा असते. पुरूषांना त्यांच्या आयुष्यात स्त्रियांचा जो सहवास मिळालेला असतो, त्यातून नारीप्रतिमेच्या अस्तित्वाची जाणीव होते. पहिला महत्त्वाचा स्त्रीसंपर्क म्हणजे मातेचा.तिच्यामुळे स्वभावावर होणारे संस्कार पक्के असतात. काहींना पुढील आयुष्यातही मातेच्या प्रभावातून बाहेर पडता येत नाही. माता कशी वागते हे मुलगा पाहत असतो व त्यातून त्याचा अनुभव आकार घेत असतो. नारीप्रतिमा ही पुरूषाला, तो बाल्यावस्थेत असताना त्याच्या मातेचा जो अनुभव येतो, त्यावरून ठरत असते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रियांकडे तो ह्या नारीप्रतिमेनुसार पाहत असतो. किंबहुना ती प्रतिमा तो आपल्या सहवासात येणाऱ्या स्त्रियांमध्ये प्रक्षेपित करत असतो. नारीप्रतिमेचे काही गुणधर्म हे सर्वसाधारण स्वरूपाचे असतात. आपल्याला जी स्त्री महत्त्वाची वाटेल, तिला हे गुणधर्म प्रत्येक पुरूष सर्व काळी चिकटवत असतो. उदा., ती नित्ययौवना असते शहाणी म्हणजे चतुर असते तसेच धरणीशी आणि जलाशी तिचा संबंध जोडण्यात येतो.

स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचे दोन विरोधी भाग कल्पिले गेले आहेत. त्यावरून तिची दोन परस्परविरोधी प्रतिमारूपे संभवतात : एक प्रकाशमय, तर दुसरे अंधारमय एक उदात्त, प्रेमळ, शुद्ध दुसरे पुरूषाला मोह पाडणारे, त्याला कर्तव्यच्युत करणारे, घातकी असे. तिचे एकरूप पुरूषाला चेतना देणाऱ्या सर्जनशक्तीचे आहे, तर दुसरे त्याचा सर्व नाश करणारे असे आहे. एखाद्या पुरूषाला स्त्रीचा तिरस्कार वाटतो, तिची अवहेलना करावीशी वाटते, तेव्हा त्याच्यावर ह्या दुसऱ्या रूपाचा प्रभाव असतो. पौराणिक कथा, परीकथा ह्यांमधूनही ह्या दोन्ही रूपांचे चित्रण आढळते. युंगच्या मते नारीप्रतिमा हा पुरूषाचा आत्मा आहे. आत्मा म्हणजे ‘व्यक्तिमत्त्वाचे अंग’ ह्या अर्थी. नरप्रतिमा नारीप्रतिमेप्रमाणेच एक मूलाकृती आहे. नरप्रतिमेला आनुवंशिक अस्तित्व असते, ती पुरूषसहवासावर अधिष्ठित असते आणि स्त्रीमध्ये जात्याच काही प्रमाणात असलेल्या पुरूषी अंशाने नरप्रतिमेचे स्वरूप निश्‍चित होते. स्त्रियांमधील सुप्त पुरूषीपणा युद्धाच्या प्रसंगी लक्षात येण्यासारखा असतो. पुरूषांची कामे स्त्री कणखरपणे करू शकते. वैयक्तिक संबंधात ती अधिक रस घेते. युंगने स्त्रीची विचारशक्ती व पुरूषामधील भावनाप्रधानता ह्यांची त्यांच्या अबोधांशी सांगड घातली आहे. नरप्रतिमा घडताना तिच्यावर पित्याच्या अनुभवाचा ठसा असतो. त्या प्रतिमेचे आणखी एक लक्षण म्हणजे कोणत्याही विधानाच्या पुष्ट्यर्थ ‘सर्वांचा’ दाखला देण्याची स्त्रीची सवय. ‘लोक असे म्हणतात’, किंवा ‘सर्वांना असेच वाटते’ असे सांगण्याची तिची खोड. कितीही कोमल, सोज्वळ आणि शांत अशी स्त्री असली, तरी नरप्रतिमेच्या अंमलाखाली ती आक्रमक, हिंसकही बनते.

नारीप्रतिमा व नरप्रतिमा अबोधातील इतर मूलाकृतींप्रमाणे बोध आणि अबोध ह्यांच्यात मध्यस्थी करतात. इतर मूलाकृती परीकथा, अद्‌भूतकथा, पुराणे आणि स्वप्ने यांमधून वावरत असतात. नारीप्रतिमा व नरप्रतिमा हयांचे स्वरूपकोणत्याच व्यक्तीला संपूर्णपणे समजत नसते. बोधात त्या पूर्णपणे कधीच उतरत नाहीत. त्यामुळे त्या रहस्यपूर्ण, भ्रामक अशा भासतात. काहीजण आत्मपरीक्षणाने स्वत:मधील गुण व सवयी जाणून घेऊन नारीप्रतिमा आणि नरप्रतिमा ह्यांच्या आधारे त्यांचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्या सवयी व गुण बहुधा प्रतिमांचा म्हणजेच अबोधातील मूलाकृतींचा परिपाक असून व्यक्तीच्या आधीन नसतात.


याशिवाय व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचे दोन विभाग युंगने कल्पिले आहेत. एक म्हणजे ‘मुखवटा’ (पर्सोना). प्रत्येक व्यक्तीकडून समाजाच्या काही अपेक्षा असतात. त्या पुऱ्या करण्यासाठी व्यक्तीला काही भूमिका पार पाडाव्या लागतात. प्रसंगाने येणारी भूमिका रंगवावी लागते. समाजाला रूचावी अशी जी भूमिका करावी लागते, त्यास युंग ‘मुखवटा’ म्हणतो. स्वत:ला पेलवेल अशी, परंतु समाजस्वीकृत भूमिका घेऊन यशस्वी होण्यासाठी व्यक्तीला विशिष्ट प्रकारे वागावे लागते. मुखवटा हा प्रत्येक व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. मुखवटा हा दाखवण्यासाठी असतो. त्याच्या आवरणामागे खरी व्यक्ती, तिचे अहंतत्त्व असते. सर्वसाधारणपणे प्रत्येकजण समाजाने लादलेली भूमिका कमीजास्त यशस्वीपणे पार पाडत असतो. परंतु मुखवटा बाळगण्यात लक्षात येणारे अपयश म्हणजे मनोविकृती. ती दोन प्रकारे उद्‌‌‌भवू शकते: एकतर ‘मुखवटा’ हेच सत्या मानून त्याच्याशी तादात्म्य होण्याने किंवा योग्य, जमेल असा ‘मुखवटा’ परिधान करता न येण्यामुळे. दुसऱ्या प्रकारे अयशस्वी झालेल्या व्यक्तींच्या वागण्यात ओबडधोबडपणादिसून येतो. तसेच इतरांशी पटवून घेण्यात आणि स्वत:चे बस्तान बसवण्यात त्या असमर्थ असल्याचे आढळते. 

मुखवट्याप्रमाणे व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू ही अबोधाचे स्वाभाविक अंग आहे. ती म्हणजे ‘छाया’ (शॅडो).समाजाला रूचेल अशी बाजू ‘मुखवटा’ दर्शवितो, तर समाजाकडून अवमानित असलेल्या आणि म्हणून व्यक्तीने स्वत: नाकारलेल्या प्रवृत्तींनी ‘छाया’ बनलेली असते. जे जे स्वत:ला करावेसे वाटते, परंतु सामाजिक नियमांत बसत नसल्यामुळे करता येत नाही, त्यांच्यापासून ‘छाया’ घडते. समाजजीवनातील यशस्वितेसाठी ‘मुखवटा’ घालणे जितके आवश्यक, तितकीच ‘छाया’ आवश्यक आहे. ‘छाया’ हा शब्दप्रयोग वापरताना युंगला अनिष्ट, अशुभ, वाईट, काळे यांसारखे केवळ अभावात्मक असेच सुचवायचे नाही. ज्याप्रमाणे प्रकाशाबरोबर अंधार असावयाचा, त्याप्रमाणे मुखवट्याबरोबर छाया वसत असते. अबोधातील छाया ही बोधामुळे निर्माण झालेली अपरिहार्य व स्वाभाविक घटना आहे. छायेचे अस्तित्व हे प्रत्येक व्यक्तीच्या अबोधाचे अंग आहे. परंतु ते सर्वांच्याच ठिकाणी असल्यामुळे त्याला सामूहिक गुणधर्मही आहे. छायेचे अस्तित्व मान्य करण्यास फार मोठे नैतिक धैर्य लागते. अतिशय उदात्त, नैतिक, आदर्श जीवन जगण्याचे ध्येय चांगले आहे पण ते केवळ अशक्य असते म्हणून ते ढोंग आहे, आत्मवंचना आहे. कारण छाया कोणालाच टळलेली नाही. छायेची कल्पना समाजजीवनातील काही कल्पनांमध्ये उदा., समंध, पिशाच, भूत वगैरेंमधून व्यक्त होत असते. 

छायेचे स्वरूप सर्व निरोधिलेल्या मूलप्रवृतींनी घडलेले असते. सर्व दडपलेल्या, अशिष्ट, स्वार्थी, भावना व कल्पना ह्यांनी ती युक्त असते. स्वप्नांमध्ये त्यांतील घटक व्यक्त होत असतात. ती अबोधाचा भाग असल्यामुळे शिक्षणाने तिच्यावर कोणतेच संस्कार होत नसतात. असंस्कारित, बालिश, अतिरेकी, अविकसित असे तिचे स्वरूप असते. छायेची दखल न घेणे व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने भयावह असते, कारण उपेक्षित छाया मान्य केलेल्या छायेपेक्षा प्रबळ आणि बेबंद होते. व्यक्तिगत अबोधाचे छाया हे प्रमुख अंग आहे. एखाद्या भावनेच्या आहारी जाऊन नित्यापेक्षा विपरीत असे वागल्यावर ‘असे कसे व का वागलो हे कळत नाही’, अशा प्रकारचे उद्‌गार अनेक वेळा काढले जातात. असे जे काही घडते ते छायेमुळे. एखाद्याच्या सवयीबद्दल नापसंती वाटत असते, ती वास्तविक छायेमध्ये तशी सवय वा प्रवृत्ती स्वत:मध्ये असते तिच्याबद्दल. स्वप्नामध्ये हीन, चमत्कारिक, भयावह अशी स्वरूपे घेऊन छाया व्यक्त होते. अहं व्यक्तिमत्त्वाला छाया एक प्रकारचे आव्हान आहे. सामाजिक समस्येत छायेचे स्वरूप समजावून घ्यावयास हवे. उदा., जमावात व्यक्तींच्या बेजबाबदार वागण्याने ओढवणारे अनर्थ. 

अहं (एगो) हा बोधाचा मध्यबिंदू आहे आणि जीवात्मा वा ‘स्व’ (सेल्फ) हा बोध व अबोध ह्यांमध्ये मध्यवर्ती आहे. स्वचा अनुभव करणे काही अंशी मूलाकृतीचा अनुभव करण्यासारखे आहे. स्वप्नामध्ये बालकाच्या प्रतीकाने ‘स्व’ दृग्गोचर होतो. बालक हे अनेक धर्मांत दिव्यत्वाचे प्रतीक समजले जाते. उदा., ख्रिस्ती धर्मात बाल येशूचे महत्व किंवा हिंदू धर्मात बाळकृष्णाचे महत्त्व या संदर्भात लक्षात घेता येईल. त्याचप्रमाणे अंडे, सोन्याचे अंडे, अप्राप्य धनसंच, पुष्प अशी प्रतीके ‘स्व’ ची आहेत, असे युंगचे म्हणणे आहे. बौद्ध धर्मात ‘स्व’ कल्पना मंडलाकृतीने चित्रित केली आहे. धाऱ्या असलेले चक्र किंवा सूर्यमंडल, ओजस्वी मंडल स्वप्नांमध्ये आडपडद्याने ‘स्व’ व्यक्त करत असतात. योगसाधनेत एकाग्रता साधण्यासाठी असे मंडल वापरले जाते. मंडलाबरोबर इतर काही भौमितिक आकृत्या ‘स्व’ ची प्रतीके म्हणून वापरण्याची प्रथा आहे.

व्यक्तिमत्वाचे प्रकार : गेलेन (इ. स. सु. १२९-सु.१९९) या प्राचीन ग्रीक वैद्याने व्यक्तिमत्वाची वर्गवारी चित्तवृत्तीवर केली. त्याने मांडलेले व्यक्तिमत्वाचे चार प्रकारसर्वत्र प्रसृत झाले होते. त्यानंतर युंगने बहिर्मुख (एक्स्ट्रॉव्हर्ट) आणि अंतर्मुख (इन्ट्रॉव्हर्ट) अशा व्यक्तिमत्त्वाच्या दोन अभिवृत्ती सांगितल्या. युंगाने वापरलेल्या या दोन संज्ञा फार लोकप्रिय झाल्या. त्यांचे युंगने सविस्तर वर्णन केले आहे. ज्या व्यक्तीतील कामप्रवृत्तीचा वा मानसिक ऊर्जेचा (सायकिक एनर्जी) ओघ बाहेर पडतो, तिला बहिर्मुख आणि ज्या व्यक्तीत तो ओघ आत असतो तिला अंतर्मुख असे ढोबळपणे म्हणता येईल. या दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये वर्तनाचा, चित्तवृत्तीचा महत्वाचा फरक येतो. बहिर्मुखी व्यक्तीला आजूबाजूची मंडळी, घटना, वस्तू या सर्वांत रस वाटतो. अशी वृत्ती सातत्याने ज्या व्यक्तीत असते, अशा बहिर्मुखी व्यक्तीला सभोवतालचे वातावरण, त्यातील व्यक्ती, त्यांचे संबंध या सर्वांचे महत्त्व वाटते. त्यांचा तिच्यावर परिणाम होत असतो. अनेकजणांशी पटणारी, अपरिचित प्रसंगी न डगमगणारी, आत्मविश्‍वास असलेली, एखादी गोष्ट पटत नसल्यास वाद करून स्वत:चा मुद्दा पटवण्याचा प्रयत्न करणारी अशी बहिर्मुखी व्यक्ती असते. अशा प्रवृत्तीचे मूल बडबडे आणि पुष्कळ सवंगडी बाळगून असते. आई-वडिलांना आणि शिक्षकांना ते बोलून आपलेसे करते. बहिर्मुखी वडीलधारी व्यक्ती उत्सवप्रिय असते. सभासंमेलने, उत्सव तसेच अनेक प्रकारच्या संघटना यांमध्ये ती रमते. अशा व्यक्तीचा मित्रपरिवार मोठा असतो. ती एकटे बसण्यास नाखूष असते. सगळ्यांना मदत करण्यास आणि सहकार्य देण्यास अशांना उत्साह वाटत असतो. लोकांची कदर करणारी आणि म्हणून त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी धडपड करणारी अशी बहिर्मुखी माणसे असतात. काळाबरोबर चालून रूढ रीतिरिवाजांचे ती पालन करतात. सार्वजनिक, सामाजिक जीवनात अशा लोकांची फार जरूरी असते. बहिर्मुखी विद्वान व्यक्ती इतर विद्वानांशी सहकार्य करण्यास उत्सुक असते. स्वत:च्या कल्पना दुसऱ्यास सांगण्यास व दुसऱ्यांच्या कल्पना समजावून घेण्यास ती उद्युक्त होत असते. आनंद, उत्साह व आशावाद असे काहीसे या व्यक्तीच्या स्वभावाचे गुणविशेष असल्याचे मानता येते. 


याच्या उलट स्वभावाची अंतर्मुखी व्यक्ती असते. स्वत:भोवतीच या व्यक्तीचे वर्तन केंद्रित झालेले असते. ती अनेक वेळा कृतीपेक्षा विचारच अधिक करीत असते. चार लोकांत बुजणारी, अवघडलेली, संकोची स्वभावाची आणि म्हणून सार्वजनिक समारंभात अलिप्तपणे वावरणारी किंबहुना भाग न घेणारी, अशी अंतर्मुख व्यक्ती असते. अपरिचित प्रसंगी कच खाणे, एकट्यानेच खाणेपिणे, वाचणे, विशेष मित्र नसणे असे अंतर्मुख व्यक्तिमत्त्वाचे आणखी काही धर्म आहेत. चारचौघांत मिसळणे जिवावर येत असल्यामुळे जेव्हा मिसळावे लागते, तेव्हा भावना आणि कल्पना नीट व्यक्त न करता आल्यामुळे अशी व्यक्ती गैरसमजास पात्र होते. अंगी चांगले गुण असूनही ते बरोबर दाखविणे तिला जमत नाही. अबोलपणामुळे अशी व्यक्ती निराश दिसते. पण काही प्रसंगी स्वत:च्या आवडीच्या विषयावर, ऐकणाऱ्याला उत्साह नसला, तरी ती भरपूर बोलते. लोकांमध्ये मिळणेमिसळणे आणि बोलणे यांमध्ये काटकसर केल्यामुळे मानसिक व शारीरिक शक्तीची जी बचत होते त्यायोगे स्वत:चा व्यासंग वाढवण्याकडे अंतर्मुख व्यक्तीचा कल असतो.

बहिर्मुख व अंतर्मुख या काहीशा परस्परविरोधी प्रवृत्ती (अभिवुत्ती) असूनही या दोन्हीही प्रत्येकांत कमीजास्त प्रमाणात वसत असतात. कोणत्या प्रवृत्तीचे सातत्य आणि आधिक्य आहे यांनुसार व्यक्तिप्रकार ठरत असतो. एकाच कुटुंबात दोन्ही प्रवृत्तींची मुले असतात. या प्रवृत्ती एकमेकांना कमी लेखत असतात. तरीही आश्रर्याची गोष्ट म्हणजे,वैवाहिक संबंधात अनेक वेळा प्रत्येक व्यक्ती आपल्या विरूद्ध व्यक्तिप्रकार असलेल्या व्यक्तीशी विवाह करते. युंगच्या मते याचे कारण स्वत:मध्ये नसलेल्या गोष्टीची उणीव दुसरी व्यक्ती भरून काढेल, अशी प्रत्येक व्यक्तीची सुप्त इच्छा असते. हा भेद अनेकांत जात्याच असतो. काही संस्कृती या प्रकाराच्या द्योतक असतात. उदा., पाश्‍चिमात्य संस्कृतीने ऐहिक-तांत्रिक समृद्धी प्राप्त केली, तर पौर्वात्य संस्कृतीचा कल आध्यात्मिक उन्नतीकडे अधिक असल्याचे युंगला वाटते.

व्यक्तिमत्त्वाचे हे दोन मुख्य वर्ग कल्पून त्यांच्या आधारावर युंगने विचार (थिंकिंग), भावना (फीलींग), संवेदना (सेन्सेशन) आणि अंत:प्रज्ञा (इन्ट्यूइशन) हे चार मनोव्यापार मानले आहेत. या चार मनोव्यापारांच्या सिद्धांतावर आधास्ति व्यक्तिमत्त्वांचे आठ प्रकार युंगने वर्णिले आहेत.

ह्या चार मनोव्यापारांपैकी विचार आणि भावना हे तार्किक मनोव्यापार होत कारण त्यांत तर्क, निर्णय, अमूर्तीकरण आणि सामायिकरण यांचा उपयोग होतो. संवेदना आणि अंत:प्रज्ञा हे अतार्किक मनोव्यापार होत कारण हे मूर्त स्वरूपातील विशिष्ट आणि आकस्मिक अशा गोष्टींच्या संवेदनांवर आधारित असतात. हे चारही मनोव्यापार सारखेच विकसित झालेले नसतात. ह्यांपैकी एखादा अधिक, तर बाकीचे तीन गौण असतात. जो अधिक विकसित मनोव्यापार असतो, त्याचे बोधावस्थेत प्राबल्य असते. ह्याला ‘ऊर्ध्वस्थ अंश’ (सुपीरिअर फ्रॅक्शन) म्हणतात. कमीतकमी विकसित झालेल्या मनोव्यापाराला ‘अध:स्थ अंश’ (इन्फीरिअर फ्रॅक्शन) असे म्हणतात.

(१) बहिर्मुख विचारशील: (एक्स्ट्रॉव्हर्टेड थिंकिंग टाइप). ह्या प्रकारची माणसे वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे स्वत: काढलेल्या बौद्धिक सूत्रांच्या वा निष्कर्षांच्या चौकटीत स्वत:चे आणि स्वत:भोवतीच्या लोकांचे आयुष्य बसविण्याचा प्रयत्न करीत असतात. केवल वा निरपेक्ष सत्य प्रस्थापित करण्याची त्यांची धडपड असते. स्वत:ला जे केवल वा निरपेक्ष सत्य वाटते, त्याबद्दल ही माणसे अत्यंत काटेकोर आणि ताठर नसतील, तर ती भोवतालच्या वास्तवाला इष्ट आकार देऊ पाहणाऱ्या सुधारकाची भूमिका पार पाडू शकतील. परंतु अनेकदा विशिष्ट तात्विक भूमिका घेऊन दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या असंतुष्ट टीकाकाराचे आयुष्य त्यांच्या वाट्याला येऊ शकते. आपल्याला जे सत्य वाटते, आपण जी जीवनसूत्रे शोधून काढली आहेत, त्यांच्यानुसार काही घडवावयाचे असेल, तर त्यासाठी आपण कोणती साधने वापरतो ह्याचाही विचार करण्याचे कारण नाही ‘साध्य हेच साधनांचे समर्थन’ अशी भूमिकाही ही माणसे घेऊ शकतात. आपण विवेकाधिष्ठित,तर्कशुद्ध विचार करतो असा अभिमान ह्यांना असतो परंतु खरे तर आपण स्वीकारलेल्या जीवनसूत्रांच्या चौकटीत जे बसत नाही, ते एक तर दडपून टाकावयाचे किंवा त्याचे अस्तित्वच नाकारावयाचे अशी ह्यांची वृत्ती असते. अशी माणसे स्वत:च्या भावभावनांनाही दडपून टाकतात. माणसांच्या दोषांबद्दल वा प्रमादांबद्दल समजूतदारपणा ती दाखवत नाहीत. मैत्री, मानवी संबंध ह्यांबद्दलही त्यांची अशीच कोरडी वृत्ती असते. आपल्या कुटुंबात ही माणसे हुकूमशाही वृत्तीने वावरत असतात. प्रेमसंबंधांत ती अपयशी ठरतात. त्यांचे जीवनविषयक विचार, त्यांनी पुरस्कारिलेली जीवनशैली ही अनेक बाबतीत चांगली, उदात्तही असू शकते परंतु ज्या पद्धतीने ती ते आचारणात आणू पाहतात ती भावनाशून्य, असहिष्णू असते. मात्र ज्या व्यक्ती विचारशील आणि प्राकृत (नॉर्मल) असतात, त्यांची विचारशीलता ही विधायक असते. जुन्या कालबाह्य विचारांच्या जागी नवे विचार ह्या व्यक्ती आणतात. प्राकृत बहिर्मुख विचारशील व्यक्तीचे उदाहरण म्हणून युंगने विख्यात इंग्रज निसर्गशास्त्रज्ञ ⇨चार्ल्स डार्विन ह्याचे उदाहरण दिले आहे.

(२) अंतर्मुख विचारशील : (इंट्रॉव्हर्टेड थिंकिंग टाइप). ह्या प्रकारातील व्यक्ती बहुधा अबोल असतात. त्यांना बाह्य वास्तवात स्वारस्य नसते. ती आंतरिक वास्तवात गढून गेलेली असतात. अशा व्यक्तींना त्यांच्या अबोध मनातील आद्य वा आदिम प्रतिमा जाणवत असतात. अशा प्रतिमा विकसित करून त्या मांडाव्यात, अशी त्यांची सततची धडपड असते. परंतु बाहेरील वास्तवातील तथ्यांच्या (फॅक्ट्स) वस्तुनिष्ठ रूपांशी ह्या प्रतिमांचा मेळ बसत नसतो. त्यांच्या अबोलपणाचे हे एक महत्त्वाचे कारण होय. वस्तुनिष्ठेला भिडण्याचा प्रसंग आला, तर अशी व्यक्ती भिते, चिंतातूर होते वा आक्रमक बनते. जगाबरोबरच्या आपल्या संबंधाना ही व्यक्ती फारसे महत्त्व देत नाही. अशा व्यक्तीची ज्यांच्याबद्दल मैत्रीची भावना असते, त्यांनाही ही व्यक्ती आपल्याशी अलिप्तपणे वागते असे वाटते. अशी व्यक्ती जेव्हा आपल्या कल्पना इतरांसमोर मांडण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्या कल्पना आपल्याला जशा आणि जितक्या स्पष्ट झालेल्या आहेत, तशा आणि तितक्या त्या इतरांना झाल्याच असतील असे नव्हे, ह्याचे भान तिला नसते. त्यामुळे ऐकणाऱ्यांच्या प्रतिक्रयांची तिला जाणीव नसते. परंतु आपले म्हणणे, आपल्या कल्पना इतरांकडून जशा स्वीकारल्या गेल्या पाहिजेत, तशा त्या स्वीकारल्या जात नाहीत असे वाटले, तरी ही व्यक्ती वैतागते इतरांच्या आकलनशक्तीला तुच्छ लेखते. अशी व्यक्ती सहसा उत्तम शिक्षक नसते. कारण आपल्या मनातील सर्जनशील विचारांपासून थोडे दूर जाऊन आपल्या विद्यार्थ्यांच्या मनांशी संवाद साधावा, आपल्या विचारांचा आणि कल्पनांचा त्यांच्या मनांशी मेळ घालावा, हे त्या व्यक्तीला अत्यंत अवघड असते. मात्र अशा व्यक्ती काही नव्या कल्पना निर्माण करू शकतात. युंग ह्यांनी विख्यात तत्त्वज्ञ ⇨इमॅन्युएल कांट ह्याचे उदाहरण ‘अंतर्मुख विचारशील’ ह्या प्रकारातील प्राकृत व्यक्ती म्हणून दिलेले आहे. 


(३) बहिर्मुख भावनाशील : (एक्स्ट्रॉव्हर्टेड फीलिगं टाइप). हा प्रकार पुरूषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. ह्या प्रकारातल्या व्यक्ती आपल्या काळाशी आणि सामाजिक परिसराशी उत्तम प्रकारे जुळवून घेऊ शकतात. त्यांची जीवनमूल्ये पारंपारिक आणि सामाजिक मानदंडांनी प्रमाणित केलेली, अशी असतात. व्यक्तिगत संबंध कौशल्याने जपणे, अवघड वा चमत्कारिक परिस्थितीतून काही मार्ग काढून त्या परिस्थितीमुळे संभवणारा ताण कमी करणे, सामाजिक आणि कौटुंबिक जीवन सुखी करण्यासाठी झटणे, ही अशा व्यक्तींची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. अशी माणसे आतिथ्यशील असतात. समूहांमध्ये, मोठमोठ्या संमेलनांमध्ये ती बिलकूल अवघडत नाहीत. सामाजिक, मानवतावादी, सांस्कृतिक उपक्रमांना ह्यांचा आधार आणि पाठिंबा असतो. बहिर्मुख भावनाशीलता ही वरील संदर्भात एक सर्जनशील घटक म्हणून कार्य करू शकते, तथापि एखाद्या व्यक्तीत बहिर्मुख भावनाशीलता मर्यादेपलीकडे गेल्यास तीत कृत्रिमपणा येऊन त्या व्यक्तीच्या विश्‍वासार्हतेबद्दल शंका येऊ लागते. ह्या प्रकारात मोडणाऱ्या पुरूषाला एका अडचणीला तोंड द्यावे लागते. पुरूष हा विचार करणारा असतो त्याच्यात भावनाशीलता कमी असते, असाएक सामाजिक पूर्वग्रह प्रस्थापित झालेला असतो. ह्या पूर्वग्रहाच्या पार्श्‍वभूमीवर एक पुरूष म्हणून असलेले आपले ‘स्वत्व’’-स्वत:ची अशी खास ओळख (आयडेंटिटी)- सांभाळणे त्याला अवघड होऊ शकते कारण त्याच्या विचारांना भावनेचे अधिष्ठान लाभले, तरच तो विचार करण्याची शक्यता असते.

(४) अंतर्मुख भावनाशील : (इंट्रॉव्हर्टेड फीलिंग टाइप). ह्या प्रकारातली माणसे अत्यंत थंड, कोरडी, अबोल वाटतात. त्यांच्याशी सहजासहजी संपर्क साधता येत नाही. बाहेरील जगापासून आपण असुरक्षितआहोत, अशी भावना ह्यांच्या मनात असते. ह्याच भावनेतून ह्या व्यक्ती कधीकधी जगाला अत्यंत तुच्छ लेखतात. भोवतालच्या जगापासून आपण असुरक्षित असल्याच्या ह्यांच्या भावनेचा एक परिणाम म्हणजे ती स्वत:ची खरी व्यक्तिमत्त्वे दडपून एक प्रकारच्या नीरस किंवा कधीकधी अगदी बालीश वृत्तीने राहत असतात. त्यांचे स्वत:चेच असे एक जग असते आणि त्यात ती सहजपणे रमत असतात. आपल्या अंतर्यामी त्यांनाही अंतर्मुख विचारशील व्यक्तीप्रमाणे काही संदिग्ध प्रतिमा जाणवत असतात. मनाच्या ऐतिहासिक आकृतिबंधांतून त्या उत्पन्न झालेल्या असतात. अशा प्रतिमांना साक्षात रूप देण्यासाठी कलावंताची प्रतिभाउपयोगी पडते. बाहेरचे जग त्यांना धडकू लागले आणि आपल्या अंतर्यामी असलेल्या प्रतिमा बाहेरच्या जगाशी असंबद्ध असल्याची जाणीव झाली, की ते भावनेला अगदी पारखे आणि उदासीन दिसतात वा स्वत:ला खूप श्रेष्ठ समजू लागतात. बाहेरच्या जगाशी जुळवून घेण्याची प्रवृत्ती नसल्यामुळे त्यांच्या अंतर्मुख भावनांना सहजासहजी वाट मिळत नाही. परिणामत: त्या अत्यंत तीव्र होत जातात. भावनांची ही सर्व दडपणूक अगदी असह्य झाली, की त्यांचा उद्रेक नाट्यमय पद्धतीने काहीतरी कृती करण्यात होतो आणि ती अतिरेकी कृती भोवतालच्या लोकांना रूचत नाही. परंतु ह्याला आणखी एक बाजू आहे. ही माणसे अलिप्त वाटली, तरी आपल्या जवळच्या मित्रांना समजून घेण्याची वृत्ती त्यांच्यात असते. दु:खितांबद्दल, गरजवंतांबद्दल त्यांना सहानुभूती असते. अशा व्यक्ती आपल्या भावनांचा उघड आविष्कार सहसा करीत नसल्यामुळे त्या भावनांची वाढलेली उत्कटता काही प्रसंगांच्या वेळी अचानक प्रत्ययास येते. ह्या प्रकारात मोडणारी स्त्री आपल्या मुलांवर खूप प्रेम करीत असते पण त्या प्रेमाचे प्रदर्शन करीत नाही. एखादे मूल आजारी पडले वा त्याच्याशी ताटातूट व्हायची वेळ आली, तर ते मूक प्रेम उत्कटपणे व्यक्त होते. ही माणसे अत्यंत प्रामाणिक असतात. ढोंग त्यांना जमत नाही. त्यांना नीट ओळखणारे त्यांचे मोल जाणतात तसेच त्यांना विश्‍वासार्ह, टिकाऊ मैत्रीही मिळू शकते.

संवेदना (सेन्सेशन) व तीवर आधारलेले प्रकार :‘संवेदना’ ह्या शब्दाचा युंगला अभिप्रेत असलेला अर्थ काहीसा खालीलप्रमाणे होता : त्याच्या मते ‘संवेदना म्हणजे इंद्रियांमार्फत आपणापर्यंत जे पोचते, ते’. संवेदना निर्माण करणारी वस्तूआणि ती जिला प्राप्त होते ती व्यक्ती अशा दोन घटकांवर संवेदना अवलंबून असते. संवेदनेत जेव्हा ‘वस्तू’ ह्या घटकाला अधिक महत्त्व मिळते, तेव्हा ती संवेदना बहिर्मुख आहे, असे म्हटले जाते परंतु संवेदना निर्माण करणाऱ्या वस्तूपेक्षा व्यक्तीने अनुभवलेली संवेदना जेव्हा अधिक महत्त्वाची ठरते, किंवा वस्तूला महत्त्वही राहत नाही तेव्हा ती संवेदना अंतर्मुख आहे, असे म्हटले जाते. संवेदना निर्माण करणाऱ्या वस्तूपेक्षा अनुभवलेल्या संवेदनेला अधिक अथवा पूर्ण महत्त्व देण्याची कलावंतांची वृत्ती असते. भावना आणि अंतर्मुख संवेदना ह्यांच्या मिश्रणातून कलेतील आत्मनिष्ठ आविष्कार होत असतो.

बहिर्मुख संवेदनाशील (एक्स्ट्रॉव्हर्टेड सेन्सेशन टाइप) व अंतर्मुख संवेदनाशील (इंट्रॉव्हर्टेड टाइप) असे संवेदनेवर आधारलेले व्यक्तींचे दोन प्रकार युंगने मानले आहेत.

(५) बहिर्मुख संवेदनाशील : ही माणसे वास्तववादी असतात म्हणजे वस्तूंची वास्तव रूपेच ती अनुभवतात. अनुभव घेण्याच्या त्यांच्या पद्धतीत कल्पनाशक्तीला वाव नसता. आपल्या अनुभवांमध्ये खोल शिरून त्यांच्या तळाशी असू शकणारा खोल-कधी गूढही-आशय समजून घेण्याची त्यांची प्रवृत्ती नसते. अनुभवांचे मूल्यमापनही ती खऱ्या अर्थाने करू शकत नाहीत. मात्र साक्षात जगाचा अनुभव ही माणसे सातत्याने घेतात नवे अनुभव शोधत असतात. ते मिळवतानाआपल्या व्यक्तिगत गरजांचा विचार त्यांच्या मनात नसतो. वास्वव जगातली अनेक प्रकारची माहिती त्यांनी मिळविलेली असते. या अशा व्यक्तींची बहिर्मुखता जितकी अधिक, तितकी ह्या माहितीचे व्यवस्थापन वा स्वात्मीकरण (ॲसिमिलेशन) करण्याची त्यांची क्षमता कमी असते. हे सर्व पाहता, त्यांना विवेकशील म्हणता येणार नाही. ही माणसे शरीरसुखाच्या मागे आहेत, असाही अनुभव कधी कधी येतो तथापि त्यांची शरीरसुखाची कल्पना इतरांना नेहमीच मानवेल असे नाही कारण अनेकदा अत्यंत अवघड अशा शारीरिक श्रमांतही त्यांची सुखाची कल्पना सामावलेली असते. प्रसंगी भयंकर धोका पतकरून काही साहस करण्यातही हे सुख त्यांना दिसते. ही माणसे अत्यंत व्यवहारी असतात आणि आपल्या परिस्थितीशी उत्तम प्रकारे जुळवून घेऊ शकतात. मात्र ही माणसे भोगवादी आणि सदसद्‌विवेकबुद्धीला पारखी होण्याचीही शक्यता असते. 


(६) अंतर्मुख संवेदनाशील : अंतर्मुख संवेदनाशील व्यक्तींना सहजासहजी समजून घेता येत नाही. वस्तूंचे त्यांच्या मनांवर जे संस्कार होतात, त्यांनी त्या भारावून जातात. त्या संस्काराचे स्वात्मीकरण करण्यास मात्र त्यांना वेळ लागतो. सामूहिक अबोधातील प्रतिमा त्यांच्या मनांना अनेकदा व्यापून राहिलेल्या असतात. भोवतालच्या वास्तवाचे नेमके निरीक्षण केल्यानंतरही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आत्मनिष्ठेचा घटक आपला प्रभाव पाडीतच राहतो. त्यामुळे बाह्य जगातील अचेतन वस्तू त्यांच्या मनांत सचेतन रूपधारण करतात तसेच बाहेरील वास्तवावर त्यांच्या मनांतल्या कल्पना चिकटतात. उदा., झाडांना चेहरे आहेत, असे त्यांना वाटू शकते.

अंत:प्रज्ञाशीलतेवर आधारलेले दोन व्यक्तिप्रकारही-बहिर्मुख अंत:प्रज्ञाशील (एस्क्ट्रॉव्हर्टेड इंट्यूइटिव्ह टाइप) आणि अंतर्मुख अंत:प्रज्ञाशील (इंट्रॉव्हर्टेड इंट्यूइटिव्ह टाइप)-युंगने सांगितले आहेत. त्यानुसार ‘अंत:प्रज्ञा म्हणजे बोधमनाला वा जाणिवेला अज्ञात असलेल्या सत्याचे वा वास्तवाचे संवेदन होय. हे संवेदन अबोध मनाच्या द्वारे होते’. मात्र अंत:प्रज्ञा म्हणजे केवळ संवेदन नव्हे कारण ती एक सर्जनशील प्रक्रिया आहे. ह्या अंत:प्रज्ञेला विशिष्ट परिस्थितीचे जे दर्शन (व्हिजन) घडते, त्यानुसार ती त्या परिस्थितीचे रूप पालटण्याचा प्रयत्न करते. अंत:प्रज्ञेत प्रेरणादायी सामर्थ्य असते. विचार कुंठित करणाऱ्या, अत्यंत निराशाजनक परिस्थितीला ती एक प्रकारच्या स्वयंचलितपणे भिडते आणि तिच्यातून मार्ग काढते. गडद काळोखातून सहजपणे काहीतरी शोधून काढावे, तशी ही प्रक्रिया काम करीत असते. वैज्ञानिक, डॉक्टर, उद्योगपती, राजकारणी आणि अगदी सर्वसामान्य माणसांनासुद्धा ह्या विशिष्ट प्रक्रियेचा अनुभव येऊ शकतो.

(७) बहिर्मुख अंत:प्रज्ञाशील : ह्या प्रकारातील व्यक्ती ह्या मुख्यत: आपल्या अंत:प्रज्ञेच्या आधारेच जगत असतात. सर्व शक्यता त्यांना दिसत असतात. नित्याच्या परिचयाचे, सुस्थापित, सुरक्षित असे काही त्यांना आवडत नाही. सामाजिक संकेत, प्रस्थापित धर्म, कायदे ह्यांना पवित्र मानण्याची वृत्ती त्यांच्या ठायी नसते. मात्र स्वत:च्या अंत:प्रज्ञेतून प्राप्त झालेल्या विशिष्ट दृष्टिकोनानुसार तिच्या वर्तनाला एक नैतिक बैठक असते. एक बेडर साहसवादी अशी तिची प्रतिमा लोकांसमोर असते. अशी व्यक्ती भविष्यात वावरतेमात्र तिचे वर्तमानकाळाशी जमत नाही. अशी व्यक्तीचे व्यक्तिगत संबंध दुबळे राहतात. ह्या प्रकारातील पुरूषाला एकाच स्त्रीशी आपले आयुष्य बांधून ठेवणे रूचत नाही. स्वत:चे घर हाही त्याला एक तुरूंग वाटत असतो. मात्र अशा पुरूषाबरोबरचे आयुष्य त्याच्या सहवासात आलेल्या स्त्रियांना कंटाळवाणे वाटत नाही.

(८) अंतर्मुख अंत:प्रज्ञाशील : ह्या प्रकारातील व्यक्ती गूढवादी, भविष्यसूचक स्वप्ने पाहणाऱ्या असतात. त्यांना धार्मिक-आध्यात्मिकस्वरूपाच्या साक्षात्कारांचा अनुभव येतो. विचित्र कल्पनाजालाने त्यांचे मन अनेकदा व्यापून राहते. अबोधाच्या अत्यंत खोल स्तरांशी त्यांच्या मानसिक प्रक्रिया निगडित झालेल्या असतात. आपले अनुभव प्रत्यक्ष जीवनाशी जोडण्याचा समाजमान्य असा मार्ग-उदा., आविष्काराचे पर्याप्त असे माध्यम-त्यांना गवसला नाही, तर जगाच्या दृष्टीने ही माणसे वेडसर ठरू शकतात. त्यांची स्वप्ने, त्यांचे साक्षात्कार, त्यांचे कल्पनाजाल ह्यांच्याशी संवादी असे वातावरण ज्यात सापडू शकेल, असा माणसांचा एक गट ह्या व्यक्ती कधी कधी तयार करतात. आदिम समाजांमध्ये अशा व्यक्तींना मानाचे स्थान मिळू शकते. ह्या व्यक्ती स्वत:च्या विलक्षण अनुभवांबद्दल मौन राखून असतात. त्या जगाला तऱ्हेवाईक, विक्षिप्त वाटल्या, तरी तशा निरूपद्रवी असतात परंतु त्यांच्या अंतर्यामी त्यांना जाणवलेल्या काही प्रभावी अनुभवांनी वा साक्षात्कारांनी त्यांना पछाडल्यास त्यांच्यात असामान्य बल निर्माण होऊ शकते. त्यामुळे चांगल्या वा कधी वाईट गोष्टीही घडवून आणण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असते. प्रसंगी लोकांमध्ये क्षोम निर्माण करून हिंसाचाराची प्रवृत्ती घडवून आणण्याची त्यांच्यात क्षमता असते.

‘अंत:प्रज्ञा म्हणजे बोधमनाला वा जाणिवेला अज्ञात असलेल्या सत्याचे वा वास्तवाचे संवेदन होय’ अशी युंगची धारणा असल्याचे आधी म्हटले आहे.अंतर्मुख अंत:प्रज्ञाशील व्यक्ती ही विशिष्ट प्रकारच्या संवेदनाशी निगडित असते. तिला असे संवेदन होते तेव्हा फार समाधान वाटते. मात्र अशा व्यक्ती कलावंत असतील, तर त्या अशा संवेदनाला कलात्मक आकार देण्याचा प्रयत्न करतात. अंत:प्रज्ञाशील अंतर्मुख व्यक्तीचे उदाहरण म्हणून युंगने विख्यात इंग्रज कवी ⇨विल्यम ब्लेक याचे उदाहरण दिले आहे. ब्लेक हा कवी, चित्रकार आणि उत्कीर्णकही होता. त्याला विविध प्रकारचे साक्षात्कार होत असत आणि साक्षात्कारांचे गूढ संस्कारही त्याच्या कवितेवर झाले होते.

व्यक्तिमत्त्वाचे युंगप्रणीत आठ प्रकार वर दिले आहेत. तथापि मनुष्यस्वभाव हा अत्यंत गुंतागुंतीचा असल्यामुळे वरील प्रकारांतील कोणत्या ना कोणत्या प्रकारात, त्या बंदिस्त वर्गवारीत काटेकोरपणे तो बसतो असे नाही. त्याचे चपखल बसेल असे व्यक्तिमत्त्व सापडणे विरळाच. कोणत्या व्यक्तीत कोणता मनोव्यापार प्रधान वा प्रभावी आहे, हे पाहून तिला कोणत्या प्रकारात बसवायचे हे ठरवावे लागते. तथापि व्यक्तिमत्त्वप्रकारांची ही संकल्पना आपल्या व्यक्तिगत संबंधाचे नीट आकलन होण्यासाठी उपयुक्त ठरते. शिक्षणाच्या क्षेत्रातही तिचा उपयोग होऊ शकतो. वेगवेगळया वृत्तिप्रवृत्तींच्या विद्यार्थ्यांना ह्या संकल्पनेची जाणीव ठेवून शिक्षक समजून घेऊ शकतात. मानसोपचारतज्ज्ञांनाही आपल्या रूग्णांना हाताळताना ह्या संकल्पनेचा उपयोग होतो. 

पहा : व्यक्तिमत्त्व. 

संदर्भ : 1. Fordham, Frieda, An Introduction to Jung’s Psychology, London, 1953 New Ed. Baltimore, 1959.  

          2. Hall, C.S. Nordby, V.J.A Primer of Jungian Psychology, New York, 1973.  

          3. Hannah, Barbara, Jung : His Life and Work, a Biographical Memoir, New York, 1976.

          4. Jaffe, A From the Life and Work of C.G. Jung, New York, 1971.  

          5. Jung, C.G. Analytical Psychology : Its Theory and Practice, London, 1968. 

          6. Jung, C.G. Man and His Symbols, New York, 1964.  

          7. Jung, C.G. Memories, Dreams, Reflections, New York, 1961.  

          8. Jung, C.G. Modern Man in Search of a Soul, New York, 1955. 

          9. Progoff, Ira, Jung’s Psychology and its Social Meaning, New York, 1953.  

         10. Silverman, H.L. Analytical Psychology, new York, 1974.  

खंडकर, अरूंधती