तुलनात्मक मानसशास्त्र : मानसशास्त्राची एक महत्त्वपूर्ण शाखा. निरनिराळ्या प्राण्यांच्या वर्तनातील साम्य आणि भेद जाणून घेण्यासाठी केलेला अभ्यास म्हणजे तुलनात्मक मानसशास्त्र. त्यायोगे विविधजातीय प्राण्यांच्या जीवनव्यवहारांविषयी मौलिक माहिती मिळते आणि पर्यायाने मानवाच्या जीवनावरही बोधप्रद प्रकाश पडतो. म्हणूनच या शाखेला ‘प्राणिमानसशास्त्र’ असेही म्हटले जाते.
मानसशास्त्रीय संशोधनास, विशेषतः प्रायोगिक निरीक्षणास, मानवेतर प्राणी फार सोईचे असतात. कारण त्यांचे वर्तनव्यापार कमी गुंतागुंतीचे असल्याने त्यांची उकल करणे काहीसे सोपे जाते. शिवाय मानवेतर प्राण्यांची शारीरिक वाढ झपाट्याने होते व त्यांचे आयुर्मानही थोडे असते त्यामुळे एकाच प्राण्यांचे संपूर्ण जीवन डोळ्याखालून घालणे शक्य होते तसेच अनेक पिढ्यांचे निरीक्षण करता येते. मनुष्यप्राण्याच्या बाबतीत जे संशोधन करता येत नाही ते अन्य प्राण्याच्या बाबतीत करता येते. जी आहारनिद्राभयविषयक नियंत्रणे मनुष्यप्राण्यावर लादता येत नाहीत, ती अन्य प्राण्यांवर लादता येतात. ज्या शस्त्रक्रिया सामाजिक वा नैतिक कारणांपायी मनुष्यावर करणे व्यवहार्य नसते,त्या अन्य प्राण्यांवर ज्ञानार्जनाप्रीत्यर्थ करणे क्षम्य मानले जाते.
एका अर्थी, अन्य प्राण्यांचा मानसशास्त्रीय अभ्यास हा नेहमी तुलनात्मकच असतो असे म्हणावयास हरकत नाही. जेव्हा जेव्हा आपण इतर प्राण्यांच्या वर्तनाचे निरीक्षण वा विवेचन करीत असतो, तेव्हा तेव्हा आपल्या विचारांच्या पार्श्वभूमीत, आपणास सुपरिचित असलेले मानवी वर्तन अनुस्यूत असतेच. कळत न कळत आपण इतर प्राण्यांची मनुष्यप्राण्याशी तुलना करीत असतोच.
अभ्यासपद्धती व प्रयोजन : तुलनात्मक मानसशास्त्रात मुख्यतः दोन अभ्यासपद्धती वापरतात : (१) नैसर्गिक वातावरणातील क्षेत्रस्थ निरीक्षण व (२) प्रयोगशाळेतील प्रायोगिक निरीक्षण. क्षेत्रस्थ निरीक्षणात प्राण्यांचे अकृत्रिम वातावरणातील जीवन पहावयास मिळते. त्यायोगे काही समस्या व गृहीतक सुचू शकतात. उलट पक्षी प्रयोगपद्धतीत विशिष्ट समस्यांतर्गत सर्व घटकांवर नियंत्रण ठेवता येते. त्यायोगे जटिल वर्तनप्रणालीची फोड करणे अथाव गृहीतकाचे परीक्षण करणे या गोष्टी सुकर बनतात.
या दोन्ही अभ्यासपद्धती एकमेकींस पूरक ठरतात. सजीव प्राण्यांचे त्यांच्या नैसर्गिक परिसरात निरीक्षण करतेवेळीदेखील मानसशास्त्रज्ञास प्रयोगयोग्य अवधाने बाळगावी लागतात आणि प्रयोगशाळेत संशोधन करतेवेळीदेखील प्राण्यांना मानवेल असे नैसर्गिक वातावरण निर्माण करावे लागते.
गेल्या शतकाच्या अखेरीस तुलनात्माक मानसशास्त्र उत्क्रांतिवाद व तुलनात्मक शारीर यांच्या पार्श्वभूमीवर सजीव सृष्टीत मन आणि बुद्धी यांची उत्क्रांती कशी झाली, हे जाणून घेण्यासाठी उदयास आले. त्या काळात या शास्त्रापुढे जीवशास्त्रीय उत्क्रांतिवादाचा व तुलनात्मक शारीरशास्त्राचा आदर्श होता. तुलनात्मक शारीरशास्त्राने प्राणिमात्रांच्या शरीररचनेचा सविस्तर तुलनात्मक अभ्यास करून त्याचे वर्गीकरण केले होते. उत्क्रांतिवादाने प्राण्यांची वांशिक नाती निश्चित केली व त्यांची एक विकासदर्शक श्रेणी रचली. तेव्हा तुलनात्मक मानसशास्त्राने प्राण्यांच्या मानसिक क्षमतांचा असाच तुलनात्मक अभ्यास करून त्यांच्या वांशिक संबंधांवर अधिक प्रकाश टाकावा, अशी त्या काळची अपेक्षा होती.
सुरुवातीच्या तुलनात्मक मानसशास्त्रज्ञांनी प्राण्यांचे शरीररचनेतील साम्यभेदांवर आधारलेले प्राणिविज्ञानातील वर्गीकरण जसेच्या तसे स्वीकारले आणि त्याच्या अनुरोधाने आपले संशोधनकार्य आरंभिले. शरीररचनेचा व मानसिक क्षमतांचा अत्यंत निकटचा संबंध असल्यामुळे, प्राण्यांची शारीरिक वाढ जशी झालेली असेल तशा त्यांच्या मानसिक क्षमता विकसित झालेल्या असतात आणि प्राणिविज्ञानातील वर्गीकरणात एखाद्या प्राण्याचे जे स्थान असेल, त्यास बरोबर समांतर अशीच मानसिक विकासाची पातळी त्याने गाठलेली असणार, असे ते मानीत. परंतु आता या मानसशास्त्रज्ञांचा दृष्टीकोन पुष्कळच बदललेला आहे. हे आज मनाचा छडा लावीत बसत नाहीत, तर वर्तनाचा अभ्यास करीत असतात. वर्तनाच्या अभ्यासात प्राणिविज्ञानातील वर्गीकरणाचा फारसा उपयोग होत नाही, असे आढळून आले आहे.
एक तर प्राणिविज्ञानातील वर्गीकरणाच्या मदतीने, वेगवेगळ्या स्तरांवरील प्राण्यांच्या वर्तनाची भाकिते करता येत नाहीत. दुसरे असे, की प्राण्यांची शरीररचना आणि त्यांच्या वर्तनप्रक्रिया यांचा परस्परसंबंध अजून सुस्पष्ट झालेला नाही. शरीररचनेत फरक असला, की वर्तनक्रियांत बदल दिसून येतोच येतो, असे घडत नाही. ज्यांची शरीररचना भिन्न आहे अशा प्राण्यांचे वर्तन अनेकदा सारखेच असल्याचे दिसून येते. उदा., रानातील उंदीर आणि प्रयोगशाळेतील उंदीर यांच्या दातांची रचना भिन्न आहे, तरी त्यांच्या अन्नसंपादनादी वर्तनात फरक आढळत नाही.
अमुक प्रकारची शरीररचना असली, की अमुक प्रकारचे वर्तन होते, असेही मानसशास्त्रज्ञास निश्चयपूर्वक सांगता येत नाही. तेव्हा भिन्न भिन्न प्राण्यांच्या वर्तनाचा स्वतंत्र रीत्या अभ्यास करणे व वर्तनाची वैशिष्ट्ये स्वतंत्रपणे टिपून ठेवल्यानंतर त्यांची त्या त्या प्राण्याच्या शरीररचनेच्या वैशिष्ट्यांशी काही सांगड घालता आली तर ती घालणे, हीच पद्धती अलीकडे रूढ झालेली आहे.
प्राणिविज्ञानातील वर्गीकरणावर विसंबून न राहता प्राण्यांच्या वर्तनाचे स्वतंत्र संशोधन करून, त्याच्या आधारे तुलनात्मक मानसशास्त्राची रचना करण्याचे प्रयत्न सद्यःकालीन मानसशास्त्रज्ञांनी जरी चालविले असले, तरी त्यांच्या प्रयत्नांस अजून म्हणण्यासारखे यश आलेले नाही. या शास्त्राचा कार्यक्रम अद्याप असावा तितका व्यापक व सर्वंकष बनलेला नाही. उंदीर, कुत्रा, मांजर, चिंपँझी माकड यांसारख्या काही निवडक प्राण्यांचाच या शास्त्रात काहीसा सविस्तर अभ्यास झालेला आहे. सर्व जातींच्या प्राण्यांची मानसशास्त्रीय छाननी अजून झालेली नाही. तसेच शिकणे वा ज्ञानसंपादनप्रक्रियेसारख्या काही विशिष्ट प्रश्नांवरच विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्राण्यांच्या सर्व वर्तनप्रकारांचे एक संकलित चित्र अजून रेखाटले गेलेले नाही. मूलगामी जीवनव्यापारांची एकच एक संपूर्ण यादीही अजून तयार झालेली नाही व प्रत्येक वर्तनक्रियेचे प्रमुख घटक अजून निश्चित झालेले नाहीत.
अर्थात तुलनात्मक शारीरापेक्षा तुलनात्मक मानसशास्त्राचे कार्य अधिक बिकट आहे. शारीरात जसे देहातील अस्थी, स्नायू इ. एकमेकांपासून वेगळे करता येतात व त्यांचे मोजमाप करता येते, तसे वर्तनक्रियांचे करता येत नाही. कधीकधी अनेक प्रक्रियांची परस्परांत विलक्षण सरमिसळ असते. कधीकधी निरनिराळ्या वाटणाऱ्या वर्तनक्रिया एकाच मूलगामी प्रक्रियेची भिन्न भिन्न रूपे असतात. शिवाय असे, की नामशेष झालेल्या प्राण्यांच्याही शारीरिक अवशेषांचा तुलनात्मक शारीरात जसा अभ्यास करता येतो, तसा तुलनात्मक मानसशास्त्रात त्यांच्या वर्तनाचा ऐतिहासिक पुरावा गोळा करून अभ्यास करता येत नाही.
अशा प्रकारे प्राण्यांच्या वर्तनाचा तुलनात्मक अभ्यास करणे ही एक अत्यंत अवघड बाब आहे. तुलनात्मक शारीराने जसे शरीररचनेच्या अनुषंगाने प्राण्यांच्या विविध जातींचे वर्गीकरण केले, तसे तुलनात्मक वर्तनाच्या अनुरोधाने प्राण्यांचे वर्गीकरण करावयाचे कार्य तुलनात्मक मानसशास्त्रास अजूनपर्यंत साध्य होऊ शकले नाही.
ऐतिहासिक आढावा : आदिमानव ज्या गुहांमध्ये रहात असे, तेथे त्याने पशुपक्ष्यांची चित्रे व आकृत्या काढलेल्या आढळून येतात. यावरून २५,००० वर्षांपूर्वीदेखील मानवाला अन्य प्राण्यांबद्दल जिज्ञासा व माहिती होती यात शंका नाही. प्रारंभी मानवाला हिंस्र श्वापदांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी इतर प्राण्यांची दखल घ्यावी लागली. पुढे पुढे क्षुधाशमनार्थ तो काही प्राण्यांची शिकार करू लागला. कालांतराने सेवक व सहचर म्हणून प्राण्यांचा उपयोग होऊ शकतो, हे ध्यानी येऊन त्याने कुत्रा, घोडा, गाय, इ. पशूंना तसेच कोंबडी, बदके, पोपट इ. पक्ष्यांना माणसाळविले. पाळीव प्राण्यांपासून उत्तम प्रतीचे प्राणी निपजावे तसेच दूध, मांस, अंडी इ. खाद्यपदार्थ विपुल प्रमाणात मिळावेत म्हणून त्याचे प्रयत्न चालत आले आहेत. अजब, विलक्षण वाटणाऱ्या पशुपक्ष्यांचा त्याने मंत्र, जादूटोणा, धार्मिक कर्मकांड इत्यादींत अंतर्भाव केलेला आहे.
आदिम काळातील लोकांना मानवेतर प्राण्यांविषयी असलेली माहिती बव्हंशी कल्पनारंजित तसेच सुरस व चमत्कारिक गोष्टींच्या स्वरूपाची होती. जुन्या ग्रंथांत अन्य प्राण्यांचा उल्लेख मुख्यतः धर्मविचाराच्या अनुषंगाने होत असे आणि त्यांच्या वर्तनास शकुन व नीतिपर अर्थ चिकटविलेला असे.
नंतरच्या काळात प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ते बुद्धिनिष्ठ विचारसरणीची कास धरून साऱ्या सृष्टीकडे व प्राणिमात्राकडे पाहू लागले. एम्पेडोक्लीझ (इ. स. पू. सु. ५००–४३०), ॲनॅक्सॅगोरस (इ. स. पू. ५००–४२५), प्लेटो (इ. स. पू. ४२७–३४७) यांच्यासारखे तत्त्वज्ञ प्राणिजीवनाचा उलगडा शरीर व मन या द्वैताच्या आश्रयाने करीत. याच्या उलट, ल्युसिपस (इ. स. पू. सु. ४५०), डीमॉक्रिटस (इ. स. पू. ४६०–३७०) यांच्यासारखे विचारवंत प्राणिमात्रांचे जीवन अणूंच्या संकल्पनेद्वारा विशद करीत. ॲरिस्टॉटलने (इ. स. पू. ३८४–३२२) प्राणिविज्ञानाचा पाया घातला. प्राण्यांचे वर्तन हेतुगर्भ असते आणि प्राणिजातीची चढती श्रेणी रचता येते, असे त्याचे मत होते परंतु त्याच्या विचारांवर व एकंदर ग्रीक तत्त्वेत्त्यांच्या प्राणिविषयक ज्ञानावर तत्त्वचिंतनाची गडद छाया पडलेली होती.
मध्ययुगीन काळात पाश्चात्त्य विचारसरणीवर धर्मश्रद्धेचा अतोनात पगडा बसला. सृष्टिकर्त्या परमेश्वराने आपली प्रतिकृती म्हणून मानवप्राणी घडविला आणि त्याच्या सोईसाठी अन्य प्राणी निर्मिले, असे तेव्हा मानले जाई.
सतराव्या शतकात, आधुनिक युगाच्या प्रारंभी, रने देकार्त (१५९६–१६५०) या तत्त्ववेत्त्याने मनुष्यासच आत्मा असतो अन्य प्राण्यांस नसतो अन्य प्राणी म्हणजे केवळ शारीरिक यंत्रेच होत, असे मत मांडले. याचा एक परिणाम असा झाला, की अन्य प्राण्यांचा अभ्यास निव्वळ भौतिक शास्त्राच्या पद्धतीने करणे सुकर झाले.
अठराव्या शतकात कॉन्त न्यूफाँ (१७१७–८८), चार्ल्स बॉने (१७२०–९३) यांच्यासारख्या संशोधकांनी प्राणिविज्ञानाचा विकास केला. याच सुमारास तुलनात्मक शारीरविज्ञान अस्तित्वात आले. त्यामुळे उत्क्रांतिवादी विचारसरणीस चालना मिळाली आणि तुलनात्मक मानसशास्त्राच्या उदयास अनुकूल वातावरण निर्माण झाले.
चार्ल्स डार्विन (१८०९–८२) आणि ⇨ जी. जे. रोमानिज (१८४८–९४) यांनी तुलनात्मक मानसशास्त्रास आकार दिला. डार्विनच्या उत्क्रांतिवादाने जीवशास्त्रीय विचारसणीत मोठीच क्रांती घडवून आणली. मानवप्राणी आणि अन्य प्राणी या दोहोंमधील देकार्तप्रणीत दरी त्याने नाहीशी केली. मनुष्य व प्राणी या दोहोंमध्ये अविच्छिन्न संबंध आणि वर्तनप्रकारांच्या बाबतीत अनेक परिचे साम्य असल्याचे व प्राण्यांनाही इंद्रियवेदने व भावना असतात, असे त्याने विपुल पुराव्यानिशी प्रतिपादन केले.
डार्विनच्या पावलावर पाऊल टाकून जी. जे. रोमानिज याने पशुपक्ष्यांविषयी अनेकविध माहिती गोळा केली. साम्यानुमानाच्या आश्रयाने अन्य प्राण्यांच्या वर्तनाचा अर्थ लावून त्यांचे ठायी कोणकोणते मानवतुल्य मनोधर्म वास करतात, ते ठरविण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु कथापद्धतीवर (ॲनेक्डोटल मेथड) त्याने फार भिस्त ठेवली. या पद्धतीत निरीक्षणाचे आणि निवेदनाचे अनेक प्रमाद होऊ शकतात. रोमानिजच्या विवेचनात ही वैगुण्ये व्यक्त झालेली आहेत.
कथापद्धतीवर ⇨ कॉनवे लॉइड मॉर्गन (१८५२–१९३६) याने टीकास्त्र धरले. अन्य प्राण्यांच्या वर्तनाचे विवरण करतेवेळी त्यांना अनावश्यक ते मानवी गुणधर्म चिकटवण्याकडे अभ्यासकांची जी प्रवृत्ती असते, तिला आळा घालण्यासाठी त्याने पुढील लाघव नियम घालून दिला : प्राण्याची एखादी क्रिया मानसशास्त्रीय श्रेणीमध्ये कनिष्ठ पातळीवरच्या मनःशक्तीमुळे घडून येते असे जर दाखविता येण्याजोगे असेल, तर ती क्रिया वरिष्ठ पातळींवरील मनःशक्तीमुळे घडून येते, असे कधीही प्रतिपादन करू नये. हा दंडक ‘लॉइड मॉर्गनचे सूत्र’ या नावाने तुलनात्मक मानसशास्त्रात सुविख्यात झाला.
डार्विन, रोमानिज आणि लॉइड मॉर्गन हे ज्या काळात तुलनात्मक मानसशास्त्राचे स्वरूप घडवीत होते त्या काळात झां आंरी फाब्र (१८२३–१९१५), ऑग्यूस्त आंरी फॉरेल (१८४८–१९३१), ऑल्ब्रेख्ट बेते (१८७२–१९३१), एलिझाबेथ पेकॅम यांच्यासारख्या प्राणिवैज्ञानिकांनी मुंग्या, मधमाशा, गांधीलमाशा इ. कीटकांविषयी पुष्कळ विज्ञानमान्य ज्ञान संचय केला. जॉन लबॉक (१८३४–१९१३), एल्. टी. हॉबहाउस (१८६४–१९२९) यांनीही प्राण्यांविषयी काहीशी प्रायोगिक स्वरूपाची निरीक्षणे प्रसिद्ध केली.
प्राण्यांना मानसशास्त्रीय प्रयोगशाळेत आणून व कूटपेट्यादी साहित्य वापरून प्रायोगिक तंत्रे वापरण्याचा महत्त्वाचा प्रयत्न अमेरिकेत ⇨ एडवर्ड ली थॉर्नडाइक (१८७४–१९४९) याने केला. कोंबड्या, मांजरे, कुत्री, माकडे यांवर केलेल्या प्रयोगांत असे आढळून आले, की या प्राण्यांच्या ज्ञानसंपादनप्रक्रियेत अनुकरण, अनुमानादी उच्च मानसिक शक्तींचा विलास दिसत नाही. त्यांची ज्ञानसंपादनप्रक्रिया केवळ प्रयत्न–प्रमाद पद्धतीने होत असते.
वर्तनवादी विचारसरणी : अमेरिकेत ⇨ जे. बी. वॉटसन (१८७८–१९५८) याच्या नेतृत्वाखाली वर्तनवादाचा पुष्कळच प्रभाव पडला व रोमानिज आणि लॉइड मॉर्गन यांना अभिप्रेत असलेला प्राण्यांच्या मनाचा व मनःशक्तींचा अभ्यास मागे पडून केवळ दृश्य वर्तनाच्या वस्तुनिष्ठ निरीक्षणास महत्त्व प्राप्त झाले. मार्गारेट फ्लॉय वॉशबर्न (१८७१–१९३९) आणि आर्. एम्. यर्कस् (१८७६– ) यांनी प्राण्यांच्या मनाचे स्वरूप व रचना रेखाटण्याचा पारंपरिक प्रयत्न पुढे चालू ठेवला परंतु त्यांना त्यात म्हणण्यासारखी लोकप्रियता अथवा यश लाभले नाही. याच्या उलट एडवर्ड टोलमन (१८८६– ), क्लार्क हल (१८८४– ), बी. एफ्. स्कीनर (१९०४– ), वॉल्टर हंटर (१८८९– ) इ. वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांनी केवळ वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून केलेले वर्तनविषयक संशोधन विशेष प्रभावी ठरले.
एस्. आय्. फ्रँझ (१८७४–१९३३) आणि के. एस्. लॅशली (१८९०– ) यांनी प्राण्यांच्या मेंदूचे वेगवेगळे भाग कापून टाकल्यास त्यांच्या वर्तनावर कोणते परिणाम होतात याचे निरीक्षण केले. एन्. आर्. एफ्. मेअर व एच्. एस्. लिड्ल यांनी प्राण्यांच्या वर्तनविकृतींचाही प्रयोगनिष्ठ अभ्यास केला.
तुलनात्मक मानसशास्त्रातील प्रायोगिक संशोधनावर रशियन शारीरक्रियावैज्ञानिक ⇨ इव्हान प्यिट्रॉव्ह्यिच पाव्हलॉव्ह (१८४९–१९३५) व जर्मन मानसशास्त्रज्ञ ⇨ व्होल्फगांग कलर (१८८७– ) यांच्याही प्रयोगपद्धतींचा प्रभाव पडला. पाव्हलॉव्हने अभिसंधानाचे तंत्र शोधून काढले व त्याचा कुत्र्याच्या लालोत्पादनावर वापर केला. त्या संशोधनावरून प्राण्यांचे ज्ञानसंपादन हे अभिसंहित प्रतिक्षेप क्रियेद्वारेच होते असे वॉटसनला सुचले. कलरने चिंपँझी माकडांवर प्रयोग केले आणि प्राण्यांच्या ज्ञानसंपादनात मर्मदृष्टीचाही भाग असतो तसेच परिस्थिती जाणिवेच्या आवाक्यामधील असली, की प्राणी उद्दिष्ट प्राप्तीसाठी जरूर तर लांबचा मार्गदेखील पतकरतो हे दाखवून दिले.
एक स्वतंत्र शास्त्र व संशोधनक्षेत्र म्हणून तुलनात्मक मानसशास्त्रास आज जी प्रतिष्ठा लाभलेली आहे, तिचे बरेचसे श्रेय झाक लब (१८५४–१९२४) आणि एच्. एस्. जेनिंग्झ (१८६८– ) यांच्या कार्यास द्यावे लागते. लब याचे असे म्हणणे आहे, की मानवेतर प्राण्यांचे वर्तन पूर्णतया यंत्रवत होत असते. त्याच्या मते प्राण्यांच्या सर्व प्रतिक्रिया अनुवर्तन (ट्रोपिझम) तत्त्वानुसार होत असतात. उष्णता, प्रकाश, रासायनिक द्रव्ये इ. निव्वळ भौतिक शक्तींनी प्राण्यांच्या क्रिया यांत्रिक रीत्या घडविल्या जातात. पाणी जसे उतारावरून खोलगट भागाकडे धावते किंवा वनस्पती जशा सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढत असतात, तशाच प्राणिमात्रांच्या क्रिया निव्वळ भौतिक कारणांनी आपोआप घडविल्या जातात. परंतु लबच्या या यंत्रवादी अनुवर्तन तत्त्वास जेनिंग्झने विरोध केला. कारण त्याला असे आढळले, की छोट्या एकपेशी जीवांच्यादेखील वर्तनक्रिया पूर्णतया यंत्रवत घडून येत नाहीत. त्यांत प्राण्याची प्रसंगोपात्त धडपड व्यक्त होते व आवश्यक असे बदलही घडून येतात. अशा प्रकारे या शास्त्रात लबचा अनुवर्तनवाद आणि जेनिंग्झचा प्रयत्न–प्रमादवाद यांचे द्वंद्व दृष्टीस पडते. तसेच उद्दीपकप्रतिक्रिया उपपत्ती आणि क्रियाक्षेत्र उपपत्ती यांचेही द्वंद्व येथे पहावयास सापडते.
अमेरिकेत चालू असलेला तुलनात्मक मानसशास्त्राचा अभ्यास एकांगी व संकुचित आहे, असे एन्. टिनबर्गेन आणि के. झेड्. लोरेन्झ या यूरोपियन शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते अमेरिकेतील प्रयोगशाळांत होणारे संशोधन प्रायः प्राण्यांच्या ज्ञानसंपादनप्रक्रियेवरच केंद्रित झालेले आहे व साहजिकच त्यात प्राण्यांचे संपूर्ण जीवन प्रतिबिंबित होत नाही. प्राण्यांच्या जीवनाचे यथार्थ दर्शन होण्यासाठी तुलनात्मक मानसशास्त्रज्ञांनी निसर्गाच्या मोकळ्या परिसरात जाऊन व विज्ञानोचित अवधान ठेवून, प्राण्यांना सुपरिचित असलेल्या वातावरणातच, त्यांचे विविध व्यवहार पाहिले पाहिजेत.
प्राण्यांचे सहजप्रेरणात्मक वर्तन : प्राण्यांच्या क्रिया प्रायः ⇨ सहजप्रेरणात्मक असतात. त्यांच्या योगे प्राण्यास नैसर्गिक जैविक उद्दिष्टे साध्य करता येतात व परिसराशी मेळ घालता येतो. तथापि या उद्दिष्टांचे त्यांना पूर्वज्ञान नसते आणि या क्रिया करण्याचे कौशल्य त्यांनी संपादन केलेले नसते. या आपोआप होणाऱ्या क्रिया त्या त्या प्राणिवंशात सार्वत्रिकपणे आढळतात तसेच त्या कमीअधिक ठराविक साच्याच्या असतात.
प्राण्यांच्या सहजप्रेरणात्मक क्रियांची उदाहरणे म्हणजे, अन्नसंपादन व अन्नसंचय घरटी, बिळे इत्यादींची निर्मिती शत्रूवर अथवा भक्ष्यावर हल्ला आत्मरक्षणार्थ पलायन प्रजोत्पत्तीसाठी अनुनय व प्रणयक्रीडा अपत्यसंगोपन ऋतुमानानुसार प्रदीर्घ शिशिर–निद्रा स्थलांतर स्वगृही परतणे सामाजिक जीवनोपयोगी सहकार्य अनुकरण समूहात शक्य तेथे वर्चस्व संपादन इत्यादी. प्राण्यांचे वर्तन मुळात सहजप्रेरणांनी प्रेरित होते, ही कल्पान प्राचीन ग्रीकांच्या काळापासून चालत आलेली आहे. मनुष्याचे वर्तन आणि पशूंचे वर्तन यांत मूलभूत भेद असून एकाच्या मुळाशी बुद्धी, तर्क, असतो तर दुसऱ्याच्या मुळाशी सहजप्रेरणा असतात, असे साधारणपणे मानले जाई.
एकोणिसाव्या शतकात प्राणिजीवन आणि मनुष्यजीवन यांमधील अंतर उत्क्रांतिवादाने भरून काढल्यानंतर, मानसशास्त्रामध्ये सहजप्रेरणांचे महत्त्व वाढले. केवळ अन्य प्राण्यांच्याच नव्हे, तर मनुष्याच्याही वर्तनावर सहजप्रेरणांची हुकमत असते, हे दाखविण्याच्या प्रयत्नांत अनेक मानसशास्त्रज्ञ गुंतले. ⇨ विल्यम जेम्स (१८४२–१९१०) याच्या मते प्राणिमात्रांमध्ये असंख्य सहजप्रेरणा वास करतात. मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राण्यांपेक्षा त्या जास्त आढळतात. ⇨ विल्यम मॅक्डूगलच्या मते प्राण्यांच्या सर्व प्रतिक्रियांच्या मुळाशी सहजप्रेरणा असून मनुष्यप्राण्याच्या ठिकाणी १७ आणि अन्य प्राण्यांच्या ठिकाणी १३ प्राथमिक सहजप्रेरणा आढळतात.
जेम्स आणि मॅक्डूगल यांच्या सहजप्रेरणांविषयक उपपत्ती १९२० च्या सुमारास त्याज्य समजण्यात येऊ लागल्या. प्राण्यांचे वर्तन प्रायः परिसराने प्रभावित होते, सहजप्रेरणांनी नव्हे अशी आसमंतवादी विचारसरणी मूळ धरू लागली व सहजप्रेरणांकडे दुर्लक्ष होऊन परिसराचा प्राण्यावर होणारा प्रभाव अभ्यासिला जाऊ लागला. सहजप्रेरणांच्या जागी परिसराच्या प्रभावाने नियंत्रित होणाऱ्या गरजा व प्रेरणा या संकल्पना आल्या आणि ज्ञानसंपादनप्रक्रियेवरील संशोधनास उधाण आले.
या एककल्ली प्रवृत्तिविरुद्ध लोरेन्झ, टिनबर्गेन इ. यूरोपीय शास्त्रज्ञांनी मौलिक आक्षेप घेतलेले आहेत व नव–सहजप्रेरणावादास जन्म दिला आहे. त्यांच्या मते शरीररचनेची मूलभूत वैशिष्ट्ये जशी प्राण्यांमध्ये वंशदायाने प्रकट होतात, त्याचप्रमाणे काही जीवनोपयोगी अत्यावश्यक असे क्रियाप्रकारही त्यांच्या ठिकाणी नैसर्गिक रीत्याच उतरलेले असतात.
या शास्त्रज्ञांनी सहजप्रेरणांच्या अभ्यासाचे एक नवे तंत्र शोधून काढले आहे. ज्या नैसर्गिक उद्दीपकांनी प्राण्यांच्या सहजप्रेरणा उद्दीपित होतात, त्याच उद्दीपकांच्या कृत्रिम प्रतिकृती वापरून प्राण्यांच्या ठिकाणी त्याच निसर्गदत्त, अनर्जित प्रक्रिया उत्पन्न करावयाच्या, असे हे तंत्र आहे. उदा., काही पक्षी शिकारी, लुटारू जातीचे असतात, तर काही जात्याच भित्रे, पळपुटे असतात. शिकारी पक्ष्यांना पाहून हे निरुपद्रवी पक्षी भयभीत होऊन आत्मसंरक्षणार्थ पळून जातात, उडून जातात. आता प्रश्न असा, की शिकारी पक्षी आपणावर चालून येत आहे, हे या इतर पक्ष्यांच्या ध्यानी कसे येते? अशा कोणत्या खुणेने संकटाचे आगमन सूचित होते? निरीक्षणान्ती असे दिसून आले, की उपद्रवी पक्ष्यांची मान सहसा अखुड असते. दुरून अखुडशी मान येताना दिसली, की भित्र्या पक्ष्यांत घबराट उडते. अखुड मान असलेला पक्षी अन्यथा निरुपद्रवी असला, तरी केवळ त्याच्या मानेमुळेच भित्र्या पक्ष्यांची गाळण उडते. शरीराचा आकार लहानमोठा कसाही असो, पिसांचा रंग भडक–सौम्य कोणताही असो, या गोष्टींची भित्र्या पक्ष्यांस भीती वाटत नाही पण अखुड मानेचे मात्र त्यांना विलक्षण भय वाटते. हे गृहीतक तपासून पहाण्यासाठी या शास्त्रज्ञांनी अखूड व लांब मानेचे पुठ्ठ्याच्या कृत्रिम पक्ष्यांचे नमुने तयार केले आणि त्यांना विविध रंगांची व निरनिराळ्या आकारांची पिसे, पंख, शेपट्या वगैरे जोडल्या. हे नमुने हंस, बदके यांसारख्या घाबरट पक्ष्यांना जेव्हा जेव्हा दाखविले, तेव्हा तेव्हा या पक्ष्यांची त्रेधातिरपिट उडते, असे दिसून आले.
अशा धर्तीचे प्रयोग करून लोरेन्झ व टिनबर्गेन यांनी सहजप्रेरणांविषयी अशी उपपत्ती मांडली, की प्राण्यांची तंत्रिका–तंत्रीय केंद्रे म्हणजे वर्तनशक्तीची निर्मिती व संचय करणारी कोठारे होत. ही केंद्रे विशिष्ट नैसर्गिक उद्दीपकांनी चाळविली जातात. त्या त्या उद्दीपकाचा प्राण्यावर इंद्रियसंवेदनेद्वारे आघात झाला, की त्या त्या तंत्रिका केंद्रातून सहजप्रेरणात्मक प्रतिक्रिया आपोआप मुक्त होतात. सहजप्रेरणात्मक वर्तनास चालना देणारी इंद्रियवेदने मूळ नैसर्गिक उद्दीपकांनीच नव्हे, तर तत्सम बनावटीच्या प्रतिकृतींनीही उत्पन्न होऊ शकतात. यामुळे नैसर्गिक उद्दीपकांनी चाळविल्या जाणाऱ्या सहजप्रेरणा कृत्रिम प्रतिकृतींनीही जागृत होऊ शकतात परंतु या उपपत्तीवर गिन्झबर्ग, बीच, हेब, व्हरप्लँकप्रभृती मानसशास्त्रज्ञांनी आक्षेप घेतलेले आहेत.
प्राण्यांचे वर्तन-प्रेरण : जेम्स–मॅक्डूगल यांची सहजप्रेरणांची कल्पना असमाधानकारक असल्याने १९२० च्या सुमारास उघड होऊ लागल्यावर, तुलनात्मक मानसशास्त्रज्ञांनी वर्तनविषयक मानसशास्त्रीय विवेचनात ‘गरज’, ‘प्रेरणा’ इ, संज्ञांचा वापर करावयास प्रारंभ केला. त्यांच्या मते प्राण्यांच्या ठिकाणी काही गूढ, शक्ती प्रसवणाऱ्या, सहजप्रेरणा जन्मतः वास करीत नसून, त्यांच्या शरीरयंत्रणेत वेळोवेळी जैविक गरजा व प्रेरणा उद्भवतात. एखादी जैविक गरज जाणवू लागली, की तिच्यापायी तंग अवस्था व अस्वस्थता निर्माण होते आणि त्या गरजेच्या शमनार्थ आवश्यक ती क्रिया करावयास प्राणी साहजिकच सज्ज होतो. म्हणजे त्याचे तंत्रिका तंत्र, स्नायू, ग्रंथी आदींची यंत्रणा विशिष्ट प्रकारची प्रतिक्रिया करावयास तत्पर बनते. अनुरूप वर्तनक्रिया करता येऊन गरजेचे शमन झाले, की प्राण्याची ती तंग अवस्था ओसरते व समाधान होऊन त्याला बरे वाटते.
श्वासोच्छ्वास, उबारा, विश्रांती यांची गरज तसेच तहान, भूक, कामवासना, वात्सल्यप्रवृत्ती, क्रीडाप्रवृत्ती, जिज्ञासा, पारितोषिकेच्छा, दुःखयातनानिवारण इ. अनेकविध गरजा व प्रेरणा प्राण्यांच्या ठिकाणी वास करीत असलेल्या दिसतात. त्या परिस्थितिप्रभावसुलभ म्हणजे संस्कारक्षम असतात. परिस्थितीच्या प्रभावानुसार त्यांचे स्वरूप बदलते. एकच एक प्रेरणा अनेकविध वर्तनप्रकारांची निर्मिती करू शकते. त्याचप्रमाणे एकच एक वर्तनक्रिया अनेक प्रेरणांच्या संकलित प्रभावानेही प्रादुर्भूत होते. या गरजा व प्रेरणा परस्परांशी निगडित झालेल्या व परस्परावलंबी असतात. उदा., तहानेचे नीट शमन झाले नाही, प्यायला पुरेसे पाणी मिळाले नाही, की प्राण्याची भूक कमी होते. भुकेचे नीट शमन झाले नाही, की प्राण्याची कामवासना मंदावते.
प्राण्यांच्या गरजा व प्रेरणा या स्वतंत्र, अलगअलग कार्यशक्ती नसून, त्यांच्यात सुसूत्रता व परस्परावलंबित्व असते. यामुळेच तर प्राण्यांच्या वर्तनात कमालीची गुंतागुंत दिसून येते. प्रेरणांचे हे परस्परसंबंध विशद करण्यासाठी, सी. टी. मॉर्गन याने सर्व गरजा व प्रेरणांच्या मुळाशी एक सर्वंकष केंद्रीय प्रेरणावस्था कल्पिलेली आहे. ही केंद्रीय प्रेरक प्रवृत्ती प्राण्याच्या ठिकाणी त्या त्या परिस्थितीत योग्य ते शारीरिक बदल घडवून आणते आणि ते ते वर्तन करावयास प्राण्यास सज्ज करते.
क्लोद बेर्नार (१८१३–७८) आणि डब्ल्यू. बी. कॅनन (१८७१–१९४५) यांच्या मते प्राण्यांच्या शरीरात एक प्रकारची मूलगामी ‘समस्थिती’ असते. ती पुष्कळशी रासायनिक स्वरूपाची असते. एखादी गरज वा प्रेरणा उत्पन्न झाली, की ती ढळते व प्राणी अस्वस्थ होतो. अनुरूप वर्तनक्रिया करून ती गरज शमविली, की प्राण्याचे ठिकाणी ढळलेली समस्थिती पुन्हा प्रस्थापित होते. शरीरांतर्गत समस्थिती सांभाळण्याच्या या मूलभूत प्रवृत्तीला कॅननने ‘होमिओस्टॅसिस’ असे नाव दिले आहे.
सी. टी. मॉर्गनसारख्या मानसशास्त्रज्ञांनी सुचविल्याप्रमाणे होमिओस्टॅसिस म्हणजे केवळ यांत्रिकतेने पूर्वपदावर येणे होय, असे मानण्याचे कारण नाही. प्राणी अशा प्रकारे जर पूर्वस्थितीप्रत परतत राहिला, तर त्याची वाढ व विकास कधीच होणार नाही. गरजांचे शमन झाले, की एकापरीने समस्थिती पुनःप्राप्त होते हे खरे परंतु कधीकधी हे प्रत्यागमन जरा वरच्या पातळीवर होत असेत. कधीकधी एकदा तोषविलेल्या गरजा कायमच्या लोप पावतात आणि प्राण्यास नव्या गरजा जाणवू लागतात. यास्तव होमिओस्टॅसिसच्या कल्पनेच्या जोडीस प्रेरणांच्या विविध स्तरांची वा पातळ्यांचीही कल्पना डोळ्यांपुढे ठेवणे इष्ट आहे.
बेर्नार–कॅननची समस्थितीची ही कल्पना रिक्टर, फ्रीमनप्रभृती मानसशास्त्रज्ञ काहीशा व्यापक अर्थाने घेतात. रिक्टरच्या मते प्राण्याच्या शरीरात एक स्वयंप्रेरित यंत्रणा असते. तीच प्राण्याची समस्थिती सांभाळीत असते तीच त्याच्या गरजा व प्रेरणा निर्माण करून त्याचे एकंदर वर्तन नियंत्रित करते. फ्रीमनच्याही मते प्राण्याचे ठायी स्वयंनियामक यंत्रणा असते ती प्राण्याचे विविध वर्तन–व्यापार घडवून आणते आणि मार्गात क्वचित जर काही व्यत्यय आला, तर दुप्पट जोमाने त्यावर मात करावयास ती प्राण्यास प्रवृत्त करते. यायोगे एकदा आरंभिलेले कार्य शेवटास नेण्याची पराकाष्ठा प्राणी करीत राहतो. एकापरीने ढळलेला समतोल पुन्हा मिळविण्याचा तो प्रयत्न करीत राहतो.
प्राण्याचे वर्तन–प्रेरण त्यांच्या शरीररचनेवर अवलंबून असते, यात शंका नाही. विशेषतः अंतःस्रावी ग्रंथी व मेंदू यांच्या प्रक्रियांचे वर्तनावर खोल परिणाम होतात, असे अनेक प्रयोगांत दिसून आले आहे.
सी. पी. रिक्टर याने अंतःस्रावी ग्रंथी आणि वर्तन–प्रेरण यांचा संबंध जाणून घेण्यासाठी उंदरांवर प्रयोग केले. अधिवृक्क, पोष, अवटू किंवा लैंगिक ग्रंथी काढून टाकल्या, की उंदरांची एकूण क्रियाशीलता अतोनात मंदावल्याचे दिसून येते.
फ्रँझ, लॅशली, क्रेचेव्हस्की, ओल्ड्स, मिल्नर इ. संशोधकांच्या प्रयोगांत मेंदूचा वर्तनाशी निकटचा संबंध असल्याचे दिसून आले आहे. जुने मानसशास्त्रज्ञ तहान, भूक, क्रोध इ. अनुभवांचा छाती–पोटांमधील आंतरेंद्रियांशी संबंध जोडीत परंतु आता या अनुभवांची नियामके मेंदूमध्ये सापडलेली आहेत. ओल्ड्स व मिल्नर यांनी उंदराच्या मेंदूला विजेच्या सौम्य धक्क्यानी उद्दीपित केले. त्याचा परिणाम म्हणून तो उंदीर जणू पुनःपुन्हा उत्तेजित होऊन तरफेचा दांडा सारखा हालवीत राही किंवा व्यूहातून पुनश्च भ्रमण करी. फ्रँझ, लॅशली, क्रेचेव्हस्की यांनी उंदराच्या मेंदूचे वेगवेगळे भाग कापून टाकले आणि याचा त्या प्राण्याच्या वर्तनावर व ज्ञानसंपादनप्रक्रियेवर काय परिणाम होतो, याचे निरीक्षण केले. मेंदूला इजा झाली, की त्या इजेच्या प्रमाणात उंदराच्या वर्तनक्रिया मंदावतात आणि त्याची ज्ञानसंपादनक्षमता खालावते, असे त्यांना दिसून आले.
निरनिराळ्या प्रेरणांचे बल अजमावण्यासाठी सी. जे. वॉर्डन (१८९०– ) याने एक व्यत्यय पेटिका तयार केली. तिच्या एका दालनात प्रेरणाव्याकुल प्राणी व दुसऱ्या दालनात त्यास इष्ट अशी वस्तू ठेवतात. या दोन दालनांमध्ये एक अरुंद मार्ग असतो. त्यावरून प्राणी गेल्यास त्याला विजेचा धक्का बसतो. प्राणी किती वेळा त्या विजेरी मार्गावरून धक्के सोसून जातो, त्यावरून त्याच्या ठिकाणच्या प्रेरणेचे बल कळते.
या पद्धतीने वॉर्डनने पाढऱ्या उंदराच्या पाच प्रमुख प्रेरणांची बलवत्ता मोजली :
मातृवात्सल्य : २२·४ वेळा विजेरी मार्गावरून प्रयाण.
तहान : २०·४ वेळा विजेरी मार्गावरून प्रयाण.
भूक : १८·२ वेळा विजेरी मार्गावरुन प्रयाण.
कामवासना : १३·८ वेळा विजेरी मार्गावरून प्रयाण.
जिज्ञासा : ६·० वेळा विजेरी मार्गावरून प्रयाण.
अशा प्रकारे आजचे तुलनात्मक मानसशास्त्रज्ञ प्रयोगपद्धतींनी प्राण्यांच्या वर्तन–प्रेरणांविषयी संशोधन करीत आहेत. त्यांच्या या संशोधनास अजून पुष्कळच मजल मारावयाची आहे. प्राण्यांच्या मूलभूत प्रेरणा किती व कोणत्या, याविषयी अजूनही त्यांचे एकमत झालेले नाही. मात्र एकंदर प्राण्यांच्या वर्तना–प्रेरणांविषयी बरीच उपयुक्त माहिती उपलब्ध झाली आहे.
गोल्टश्टाइन, मॅस्लो, क्रेच व क्रचफील्ड यांच्यासारखे मानसशास्त्रज्ञ वर्तन–प्रेरणांकडे काहीशा व्यापक दृष्टिकोनातून पाहतात. त्यांच्या मते मनुष्यासह सर्व प्राण्यांच्या प्रेरणा सर्व एकजात पाशवी असतात, असे मानण्याचे कारण नाही. त्या केवळ शरीरविषयकच नसून सामाजिकही असतात. शिवाय न्यूनतेच्या परिस्थितीत उद्भवणाऱ्या प्रेरणा आणि विपुलतेच्या परिस्थितीत स्फुरणाऱ्या प्रेरणा यांत निश्चितच फरक असतो. मनुष्याच्या जीवनात तर प्रेरणांचे स्वरूप पुष्कळच निराळे बनते. त्याच्या ठायी प्रतीकात्मक वर्तन अतिशय प्रगत झालेले असते आणि स्वत्वाची भावनाही विकसित झालेली असते. त्यामुळे त्याच्या प्रेरणांत इष्टानिष्टतेची श्रेणी निर्माण होते नैतिकता अवतरते. आत्माविष्कार अथाव स्व–प्रकटीकरण ही त्याच्या वर्तनातील एक अत्यंत प्रभावशाली बाब असते.
ज्ञानसंपादनप्रक्रिया : ज्ञानसंपादनप्रक्रिया ही सर्व प्राणिमात्रांत दिसून येते. सूक्ष्म एकपेशी जीवाणूपासून धिप्पाड शरीराच्या पशूपर्यंत साऱ्या प्राणिजाती ज्ञानसंपादनक्षम आहेत. प्राण्यांच्या ज्ञानसंपादनप्रक्रियेसंबंधी तुलनात्मक मानसशास्त्रज्ञांनी विविध तंत्रे वापरून प्रयोगनिष्ठ संशोधन बरेच केलेले आहे व अनेकविध उपपत्तीही सुचविलेल्या आहेत. अभिसंधान, प्रयत्न–प्रमाद आणि मर्मदृष्टी ह्या ज्ञानसंपादनप्रक्रियेच्या तीन प्रमुख उपपत्ती होत.
अभिसंधानाचे तंत्र रशियन शास्त्रज्ञ पाव्हलॉव्ह याने बसवले. कुत्र्याची लालोत्पादनक्रिया जशी नैसर्गिक उद्दीपकाने (अन्नाने) सुरू होते, तशी ती अनैसर्गिक उद्दीपकाने (अन्नासोबत होणाऱ्या घंटानादाने) सुरू करता येते, हे त्याने दाखवून दिले. ज्ञानसंपादन म्हणजे ⇨ प्रतिक्षेपी क्रियांचे अभिसंधान होय, असे त्याच्या तंत्रात दिसून येते. आपल्या तंत्राच्या द्वारे पाव्हलॉव्हने अभिसंहित प्रतिक्षेपांची निर्मिती, त्यांचे विलोपन, अभिसंहित उद्दीपकांचे सामान्यीकरण, असल्या उद्दीपकांचे भेदबोधन, वरच्या श्रेणीतील अभिसंधान, प्रयोगनिर्मित वर्तनविकृती इ. अनेक गोष्टी प्रकाशात आणल्या. पाव्हलॉव्हने अभ्यासिलेल्या पद्धतीस ‘अभिजात अभिसंधान’ असे नाव दिले जाते.
‘साधनात्मक अभिसंधान’ हा अभिसंधानाचा दुसरा एक प्रकार आहे. उदा., स्कीनरच्या पेटिकेत एक तरफेचा दांडा दाबला, की प्राण्यास अन्न प्राप्त होते. याच पद्धतीचा आणखी एक उपप्रकार ‘वर्जनात्माक अभिसंधान’ म्हणून संबोधला जातो. यात सूचना देणारा आवाज ऐकताच प्राणी विशिष्ट जागेपासून दूर सरकतो अथवा पाय उचलण्याची क्रिया करतो व त्यायोगे अन्यथा बसणारा विजेचा धक्का किंवा यासारखी दुसरी एखादी होणारी शिक्षा टाळतो.
मानवेतर प्राणी आंधळेपणाने प्रयत्न–प्रमाद करत करत शिकतात, असे थॉर्नडाइकने प्रतिपादिले. त्याने केलेल्या प्रयोगांत कूटपेटिकेत डांबून ठेवलेले मांजर प्रथम बरीच आंधळी धडपड करते, अखेर पेटिकेचा अडसर काढून सुटका करून घेते आणि अन्न मिळविण्यास शिकते.
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ मुख्यतः या प्रयत्न–प्रमाद पद्धतीचा अभ्यास करीत असलेले दिसतात परंतु ते आपल्या प्रयोगांत थॉर्नडाइकच्या कूटपेटिकेपेक्षा स्मॉल याने बनविलेला व्यूह वापरणे अधिक पसंत करतात. व्यूहात अनेक वाटा बंद असतात व प्रयोगविषय असलेल्या प्राण्यास बाहेर नेणारी एकच एक वाट असते. प्रयत्न–प्रमाद पद्धतीने चुकीच्या बंद वाटा टाळून, प्राणी योग्य वाटेने पळण्याचे ज्ञान संपादन करतो.
दोन भिन्न उद्दीपकांमधील फरक प्राण्यास ओळखता येतो किंवा नाही, हे जाणून घेण्यासाठी पूर्वी यर्क्सची पेटिका वापरीत असत. या पेटिकेत दोन वाटा असत. एक अंधारी व दुसरी प्रकाशयुक्त. अंधाऱ्या वाटेवर विजेचा धक्का व प्रकाशयुक्त वाटेवर अन्न प्राप्त होई. प्रयत्न–प्रमाद पद्धतीने प्राण्याने या दोन मार्गांमधील (म्हणजेच अंधार आणि प्रकाश यांमधील) फरक आपणास कळतो हे दाखवून द्यायचे असे परंतु यर्क्सची पेटिका तांत्रिक दृष्ट्या असमाधानकारक असल्याने तिच्या ऐवजी अलीकडे लॅशलीचा स्टँड वापरतात. प्रयोगविषय प्राणी स्टँडवर असला, की त्याला समोर दोन भिन्न रेखांकित पुठ्ठे दिसतात. एक पुठ्ठा (म्हणजेच त्यावरील रेखाकृती) चुकीचा व दुसरा बिनचूक असतो. चुकीच्या पुठ्ठ्याकडे उडी मारल्यास त्यावर नाक आपटून प्राण्यास खाली पडावयास होते. बिनचूक पुठ्ठ्याकडे उडी घेतल्यास त्याला अन्नाकडे जाणारी वाट सापडते. हा या दोन पुठ्ठ्यांमधील (म्हणजेच त्यांच्यावरील आकृतींमधील) फरक प्राण्याने प्रयत्न–प्रमाद पद्धतीने ओळखावयाचा असतो.
होल्फगांग कलर (१८८७–१९६७) याने थॉर्नडाइकच्या प्रयोगांवर अशी टीका केली, की त्या प्रयोगांतील प्राण्यांना प्राप्त परिस्थितीवर पूर्णपणे नजर टाकता येत नाही. त्यामुळे ते प्राणी बावरून जातात व म्हणून आंधळी धडपड करीत बसतात. अशा प्रसंगी खरी ज्ञानसंपादनप्रक्रिया व्यक्त होत नाही. त्यासाठी प्रयोगकर्त्याने प्राण्याच्या निरीक्षणशक्तीच्या आवाक्यातील प्रसंगच योजले पाहिजेत.
असे प्रसंग योजून स्वतः होल्फगांग कलरने चिंपँझी माकडांवर प्रयोग केले. उंचावर टांगलेली वा पिंजऱ्याबाहेर ठेवलेली केळी सहजासहजी हाती येत नाहीत हे पाहिल्यावर, त्या माकडाने खोक्यावर खोका रचून किंवा बांबूमध्ये बांबू अडकवून ती केळी हस्तगत केली. प्राप्त समस्या सोडविण्यासाठी नेमके काय करावयाचे हे प्राण्याच्या लक्षात येते, तीच त्याची ⇨ मर्मदृष्टी होय तीच त्याची खरी ज्ञानसंपादनप्रक्रिया होय असे कलरचे मत होते.
होंझीक व ⇨ ई. सी. टोलमन (१८८६–१९५९) यांनी एक उंचावरला व्यूह रचला. त्यात अन्नाकडे जाण्याच्या तीन वाटा ठेवल्या. प्रयोगविषय उंदीर नेहमी जवळची वाट घेतो. जवळची वाट जर बंद केली, तर तो थोडी लांबची वाट घेतो. एकच एक अडथळा लावून जवळच्या दोन्ही वाटा बंद केल्या, की ते त्याच्या लक्षात येते आणि नाहक फेऱ्या मारीत न बसता तो सरळ तिसऱ्या लांबच्या वाटेने अन्नाप्रत जातो. यातही उंदराची मर्मदृष्टीच दिसून येते.
होंझिक व टोलमन यांनी हाच प्रयोग थोड्या निराळ्या पद्धतीनेही केला. त्यांनी त्या व्यूहाच्या तिन्ही मार्गांवर दोन्ही बाजूंनी भिंती उभारल्या. या प्रयोगात मात्र उंदीर गडबडला. यावरून संपूर्ण परिस्थितीवर प्राण्यास जर नजर टाकता आली नाही, तर त्यास त्याचे कौशल्य अथवा मर्मदृष्टी दाखविता येत नाही, या कलरच्या म्हणण्यात तथ्यांश आहे हे दिसून येते.
प्राण्यांचे ज्ञानसंपादन मुख्यतः कोणत्या इंद्रियावर अवलंबून असते, ते निश्चित करण्यासाठी जे. बी. वॉटसनने पांढऱ्या उंदरास प्रथम व्यूहातून पळावयास शिकवले. नंतर शस्त्रक्रियेने त्या प्राण्याचे एकेक ज्ञानेंद्रिय बधिर केले. दृष्टी इ. इंद्रियवेदने नष्ट करून केवळ एक गतिवेदन शाबूत ठेवले, तरीही त्याच्या बळावर उंदरास व्यूहातून अचूक पळता आले. यावरून वॉटसनने निष्कर्ष काढला, की प्राण्याचे व्यूहशिक्षण त्याच्या स्नायूंच्या हालचालीवर, प्रतिक्षेपसाखळीवर, अवलंबून असते.
पुढे ⇨ के. एस्, लॅशली याने उंदरांची गतिवेदनेही नष्ट केली तरीदेखील ते प्राणी व्यूहातून व्यवस्थित पळू शकतात, असे दिसून आले. त्याचप्रमाणे, मॅकफर्लेनने उंदीर व्यूहातून नीटपणे पळावयास शिकल्यावर, व्यूहात पाणी सोडले. तरीसुद्धा ते उंदीर पाण्यातून पोहत पोहत बिनचूक बाहेर आले. म्हणजेच स्नायूंच्या वेगळ्या प्रकारच्या हालचाली करून ते बाहेर आले.
एकूण प्राण्यांचे व्यूहशिक्षण प्रथमदर्शनी वाटते तितके समजण्यास सोपे नाही. व्यूहाचे ज्ञान प्राण्यास कसे होते हे कोडे, असंख्य प्रयोग करूनही तसेच निरनिराळ्या प्रकारचे सु. १५० व्यूह वापरूनही, मानसशास्त्रज्ञांना अजून उलगडलेले नाही.
अशा प्रकारे ज्ञानसंपादनप्रक्रियेसंबंधी तुलनात्मक मानसशास्त्रज्ञांनी प्राण्यांवर अनेक प्रकारचे प्रयोग केलेले आहेत. प्राण्यांचे लिंगभेद, वय, आहार, उत्तेजक पेये, हेतुप्रेरण, अंतःस्रावी ग्रंथींचे कार्य, मेंदूच्या इजा, शिक्षा व पारितोषिके इ. गोष्टींचा प्राण्याच्या ज्ञानसंपादनप्रक्रियेशी कोणता संबंध असतो, हे जाणून घेण्यासाठी कितीतरी प्रयोग केलेले आहेत. या प्रयोगांतून कधीकधी आपणास मनोरंजक माहिती मिळते. उदा., कुत्र्यांना छायाप्रकाशाचे ज्ञान होते परंतु रंगांचे ज्ञान होत नाही, असे प्रयोगान्ती आढळून आले आहे.
ज्ञानसंपादन म्हणजे अनुभवामुळे घडून येणारा कमीअधिक स्थायी स्वरूपाचा वर्तनातील बदल. हा बदल मुळात कोणत्या स्वरूपाचा असतो? याविषयी तुलनात्मक मानसशास्त्रज्ञांनी काही उपपत्ती मांडलेल्या आहेत.
काही मानसशास्त्रज्ञांच्या मते ज्ञानसंपादनप्रक्रियेच्या वेळी, प्राण्याच्या तंत्रिका तंत्रात वेदक आणि कारक नसातंतू यांचे नवे संबंध प्रस्थापित होतात. इतरांच्या मते या प्रक्रियेत प्राण्यांच्या संवेदनमय जाणिवेचा घाट बदलतो आणि वस्तूंचे नवे नवे परस्परसंबंध प्राण्यास ज्ञात होतात. काहींच्या मते या प्रक्रियेत उ–प्र (उद्दीपक–प्रतिक्रिया) यांची नवी जवळीक जुळून येते, तर इतरांच्या मते उ–उ (उद्दीपक–उद्दीपक) यांची नवी जवळीक जुळून येते. काहींच्या मते या प्रक्रियेत पारितोषिक व शिक्षा यांना फार महत्त्व असते, तर इतरांच्या मते या गोष्टींना तितकेसे महत्त्व नसते.
संकीर्ण प्रक्रिया : तर्कानुमान, कल्पना, स्मरण इ. खास मानवसुलभ क्रियांना उच्चतर मानसिक प्रक्रिया म्हणून संबोधले जाते. त्या अगदी प्राथमिक स्वरूपात व मामुली प्रमाणात प्राण्यांमध्येही घडतात की काय? ई. एल्. थॉर्नडाइकसारख्या जुन्या मानसशास्त्रज्ञांच्या मते मानवेतर प्राण्यांमध्ये उच्चतर मानसिक प्रक्रिया नसतात परंतु अलीकडचे मानसशास्त्रज्ञ हा पूर्णतया नकारात्मक निष्कर्ष स्वीकारीत नाहीत.
प्राण्यांवर करण्यात येणाऱ्या ज्ञानसंपादनविषयक प्रयोगांकडे थोडे निरखून पाहिल्यास, त्यांच्या ठिकाणचे बुद्धिकौशल्य निःसंशयपणे प्रतीत होते. त्यांचे व्यूहातील स्थलविषयक ज्ञान, मर्मदृष्टीसूचक वर्तन, उद्दिष्टप्राप्तीसाठी साधनांचा वापर इ. गोष्टी त्यांच्या बुद्धिमत्तेची साक्ष पटविण्यास समर्थ आहेत. पाव्हलॉव्हच्या प्रयोगांत प्रयोगविषय असलेल्या प्राण्यांकडून अनेकदा अभिसंहित उद्दीपकांचे सामान्यीकरण होते. त्याचप्रमाणे यर्क्सच्या पेटिकेतील अथवा लॅशलीच्या स्टँडवरील प्रयोगांत प्राणी दोन भिन्न उद्दीपकांमधील फरक ओळखण्यास शिकतो, यात त्याची अमूर्तीकरणप्रक्रिया दिसून येते.
हंटर याने विलंबित प्रतिक्रियांवर प्रयोग केले. प्राण्याच्या समोर तीन दिशांना तीन पेटिका असतात. त्यांतील कोणत्याही एकीवर दिवा पेटतो, तिच्यात खाद्यपदार्थ असतो. नेहमी या दिवा पेटलेल्या पेटिकेकडे जावयास उंदीर शिकतो. नंतर काचेचा पारदर्शक अडथळा बसवून, त्यातून त्या उंदराला दिसेल अशा रीतीने एका पेटिकेवरील दिवा पेटवितात व लवकरच मालवितात. काही क्षण जाऊ दिल्यावर उंदराला सोडतात. जेथे दिवा पेटला होता, नेमक्या त्याच पेटिकेकडे उंदीर जातो.
दिवा पेटलेली पेटिका त्या उंदराच्या लक्षात कशी राहते? प्रतीक्षा करीत असताना त्याच्या अंतरंगात काय तरळत राहते? हंटरच्या मते त्याच्या अंतरंगात दिव्याची स्मृतिप्रतिभा तरळत राहते असे म्हणण्यात काही अर्थ नाही. त्याच्या मते खरा प्रकार असा, की ज्या दिशेला दिवा पेटतो त्या दिशेकडे तो उंदीर आपला मोहरा फिरवून बसतो आणि अडथळा दूर झाल्याबरोबर सरळ त्याच दिशेने पळतो.
हंटर याच्या प्रयोगांतील काही दोष टाळून, होंझिक, मॅक–ॲलिस्टर, मॅक्कॉर्ट यांनी असलेच प्रयोग केले. त्यांना आढळून आले, की विशिष्ट दिशेकडे तोंड वळविलेले न ठेवताही उंदरास विलंबित प्रतिक्रिया करता येते. वॉल्टन, मॅक–ॲलिस्टर यांनी कुत्र्यामाकडांवर केलेल्या प्रयोगांत दिशाभिमुखत्व न ठेवूनही या प्राण्यांची विलंबित प्रतिक्रिया होऊ शकते, असे दिसून आले. यावरून या प्राण्यांना प्राथमिक स्वरूपाचे प्रतीकात्मक वर्तन करता येते, असे म्हणावयास हरकत नाही.
अशाच प्रकारे प्राण्यांचे बुद्धिकौशल्य अजमाविण्यासाठी हंटरने एकेरी पर्याय असलेले आणि दुहेरी पर्याय असलेले व्यूह वापरले. एकेरी पर्यायांत प्रयोगविषय प्राण्यास क्रमशः उ–डा–उ–डा म्हणजे उजवीकडे–डावीकडे–उजवीकडे–डावीकडे अशी वळणे घेत पळावे लागते. दुहेरी पर्यायांत उ–उ–डा–डा–उ–उ–डा–डा या क्रमाने वळणे घ्यायची असतात.
उंदरांना एकेरी पर्यायांची समस्या सोडवणे सोपे परंतु दुहेरी पर्यायांची समस्या सोडवणे कठीण गेले. त्यांना मोठ्या कष्टाने दुहेरी पर्याय, फक्त उ–उ–डा–डा येथपर्यंतच, आत्मसात करता आला. त्यापुढे मात्र त्यांची प्रगती झाली नाही. कुत्र्यामांजरांनाही उ–उ–डा–डा पर्यंतचा क्रम आत्मसात करता आला. त्यापुढे त्यांची गती खुंटली. एकंदरीत प्राण्यांना अगदी प्राथमिक स्वरूपाचे प्रतिकात्मक वर्तन वा सांकेतिक प्रक्रिया साधतात हे उघड आहे.
लॉजेट याने भुकेलेल्या उंदरांचे तीन गट केले व त्यांना व्यूहांतून धावावयास लावले. पहिल्या गटास व्यूहांतून नीट धावल्यास ताबडतोब अन्न मिळे. दुसऱ्या गटातील उंदरांना व्यूहांतून नीट धावूनही ताबडतोब अन्न मिळत नसे, असे सहा दिवस गेल्यावर सातव्या दिवसापासून मात्र त्यांना व्यूहांतून आल्याबरोबर अन्न मिळू लागले. तिसऱ्या गटाला फक्त पहिले दोन दिवस अन्नाविना धावावे लागले आणि तिसऱ्या दिवसांनंतर त्वरित अन्न प्राप्त होऊ लागले. साहजिकच अन्नप्राप्ती नसलेल्या दिवसांत, दुसऱ्या व तिसऱ्या गटांतील उंदरांचे ज्ञानसंपादन दिसून येईना परंतु ज्या दिवसापासून त्वरित अन्नलाभ होऊ लागला त्या दिवसापासून त्यांच्या वर्तनात प्रचंड सुधारणा घडून आली आणि अल्पावधीतच व्यूह ओलांडण्याच्या कामी ते पहिल्या गटाच्या बरोबरीला येऊन पोहोचले. यावरून असे दिसते, की अन्नलाभ होत नव्हता तेव्हा त्या दोन गटांतील उंदरांची ज्ञानसंपादनातील प्रगती बाह्यतः दिसत नव्हती, तरी ती अप्रकट रीत्या होतच होती.
एन्. आर्. एफ्. मेअर याने उंदरांवर केलेल्या प्रयोगांत, या प्राण्यांना दोन अनुभव एकत्र करून त्यांवरून नवा निष्कर्ष काढता येतो, असे आढळून आले. पुलांनी जोडलेल्या अ, ब, क या तीन टेबलांवरून उंदरांस मुक्तपणे हिंडूफिरू दिले (अनुभव १). नंतर त्याला अ टेबलावर थोडेसे अन्न खायला दिले (अनुभव २). लगेच त्याला उचलून ब किंवा क टेबलावर ठेवले. जणू अनुभव १ व अनुभव २ यांची बेरीज करून तो उंदीर पुलावरून धावत सरळ अन्न असलेल्या अ टेबलाकडे आला.
असाच आणखी एक उल्लेखनीय प्रयोग मेअरने केला. उंदरास प्रथम टेबलाच्या क्ष भागातून मधला अडथळा ओलांडून य भागात जाण्याचे शिक्षण दिले (अनुभव १). नंतर त्यास व्यूह ओलांडण्याचे शिक्षण दिले (अनुभव २). मग टेबल व व्यूह एकमेकांशी जोडून, उंदराला टेबलाच्या क्ष भागात सोडले. तेथून त्याला व्यूहाच्या शेवटी असलेली अन्नपेटिका दिसताच, जणू अनुभव १ आणि अनुभव २ यांची बेरीज करून तो सरळ टेबलाच्या क्ष भागातून य भागात गेला आणि तेथून व्यूहात शिरून, शीघ्र गतीने अन्नपेटिकेकडे धावला. या प्रयोगावरून उंदरांना अनुमान करता येते, असा निष्कर्ष मेअरने काढला.
सामाजिक जीवन : समाजप्रियता फक्त मानवप्राणी आणि काही कीटक यांच्यामध्येच आढळते, इतरांत नाही, ही काही दशकांपूर्वीची समजूत चुकीची असल्याचे सिद्ध झाले आहे. प्रत्येक प्राण्याचा निकटवर्तीयांशी, स्वजातीयांशी तसेच शत्रुमित्रांशी, अपरिहार्य संबंध येतो. त्याला या साऱ्यांशी देवाणघेवाण करावी लागते, मिळतेजुळते घ्यावे लागते. अन्नोदकप्राप्तीसाठी, आत्मरक्षणासाठी, वंशवृद्धीसाठी, अपत्यसंगोपनासाठी त्याला सहवासप्रधान अशा विविध क्रिया कराव्या लागतात.
प्राण्यांच्या बहुतेक सर्व वर्तनप्रकारांना सामाजिकतेचे अंग असते. उदरभरण, आत्मरक्षण, प्रजोत्पत्ती, अपत्यसंगोपन यांप्रीत्यर्थ कराव्या लागणाऱ्या क्रिया सामाजिक संदर्भातच कराव्या लागतात. प्राण्यांना अनेक प्रकारे परस्परांशी सहकार्य करावे लागते. असहाय अर्भाकांच्या अन्नपाण्याची सोय करावी लागते. अन्नपाण्याचा शोध लावण्यासाठी अनेकदा स्वजातीयांची मदत घ्यावी लागते. प्रजोत्पत्तीसाठी भिन्नलिंगी व्यक्तीशी जवळीक करावी लागते. अनेकदा आत्मरक्षणासाठी एकमेकांकडे धाव घ्यावी लागते.
विशेषतः कळप करून राहणारे प्राणी परस्परांवर पुष्कळच अवलंबून असतात. विविध वर्तनप्रकारांनी ते एकमेकांस उद्दीपीत करतात. एकमेकांचे अनेकवार अनुकरण करतात. कळपप्रिय प्राण्यांत अनेकदा समाजव्यवस्था प्रस्थापित होते.
प्रत्येक समुदायात प्राण्यांच्या परस्परसंबंधांचे जाळे पसरलेले असते. कोणत्याही दोन व्यक्ती एकत्र आल्या की, त्यांच्यात सामाजिक नाते निर्माण होऊ शकते. सहवास, नर–मादी संबंध, अपत्य–पालक संबंध, नेता–अनुयायी संबंध, श्रेणिक संबंध तसेच इतर परस्परसहकार्याचे संबंध हे महत्त्वाचे सामाजिक संबंध होत. हे सगळ्या प्राणिवंशात सारख्याच प्रमाणात वृद्धिंगत झालेले नाहीत. भिन्नभिन्न प्राण्यांची समाजव्यवस्था त्या त्या प्राण्यांमध्ये कोणते सामाजिक संबंध विशेष प्रगत झालेले आहेत, यावर अवलंबून असते.
कणाहीन प्राणी, कीटक, मासे, सरपटणारे प्राणी आणि रवंथ करणारे प्राणी यांच्यामध्ये समूहप्रियता अधिक प्रगत झालेली आहे. प्रजोत्पत्तीच्या मोसमात पक्षी जोड्याजोड्यांनी काहीसे अलग अलग राहतात. अन्यथा ते लहानमोठ्या थव्यांनी वावरतात आणि शीत ऋतूत एकत्र स्थलांतर करतात.
नर–मादी संबंध सार्वत्रिक आहे तथापि काही प्राण्यांच्या समाजव्यवस्थेत त्यास प्रधान महत्त्व असून इतरांमध्ये त्यास गौण स्थान आहे. रवंथ करणारे प्राणी, कीटक व मासे यांचे लैंगिक जीवन विशिष्ट ऋतुपुरते मर्यादित असते. पक्षी, वानर, मांसभक्षक प्राणी यांच्यातील नर–मादी नाते दीर्घकाळ टिकणारे असते व त्यांच्या समाजव्यवस्थेत ते बरेच प्रभावी ठरते.
अपत्य–पालक संबंधही सार्वत्रिक आहे तथापि सस्तन प्राण्यांमध्ये तो विशेष प्रगत झालेला आहे. मुंग्या, मधमाशा इ. कीटकांत अपत्य–संगोपनाच्या कामी समाजातील एक मोठा वर्ग, कामकरी वर्ग, गुंतलेला असतो.
नेता–अनुयायी संबंध अनेक सस्तन प्राण्यांत विकसित झालेला आहे. श्रेष्ठकनिष्ठतेचे श्रेणीजीवन पक्षी, वानर, रवंथ करणारे प्राणी यांच्या अनेक जातींत रूढ झाले आहे.
प्राण्यांचे सामाजिक जिव्हाळ्याचे संबंध प्रायः त्यांच्या बाल्यावस्थेत जडतात. बाल्यावस्थेत सुपरिचित झालेल्यांशी जे नाते जमते, ते तदनंतरच्या काळात इतरांशी सहसा जुळून येत नाही. सामाजिक संबंधांचा पाया अर्भकावस्थेच्या काळात रचला जातो.
कुत्र्याचे पिलू जन्मतः आंधळे–बहिरे असते. ते सु. तीन आठवड्यांचे झाल्यानंतर त्यास दिसू लागते, ऐकू येऊ लागते. या काळात कुणी मनुष्य अथवा प्राणी जर त्या पिलाजवळ गेला, तर प्रथम ते पिलू भीतीने दूर सरकते पण मग लवकरच त्याची भीती लुप्त होऊन ते त्या मनुष्यास अथवा प्राण्यास बिलगते. ते एकदा असे बिलगले, की मग त्याला कितीही मारहाण केली तरी ते त्या परिचित व्यक्तीला सोडून जात नाही.
या संदर्भात ओ. हाइनरॉथ, के. झेड्. लोरेन्झ यांची निरीक्षणे मनोरंजक आहेत. हंस पक्ष्याची पिले अंड्याबाहेर पडताक्षणी ज्याच्या संपर्कात येतात, त्याच्या (मग तो मनुष्य असो अथवा अन्य कोणी असो) मागोमाग जाऊ लागतात. वानराच्या पिलास जन्मताक्षणी मातेच्या देहास बिलगावयास मिळाले नाही आणि त्याऐवजी ब्लँकेट, चादर यांसारख्या वस्तूंना बिलगण्याचा प्रसंग आला, तर पुढे ते नेहमी त्याच वस्तूंना बिलगून राहते. ज्या व्यक्तीशी अथवा वस्तूशी प्राण्याचा पहिला संपर्क घडतो, तिच्याशी त्याचा जिव्हाळा जडतो. या प्रक्रियेला ‘छाप पडण्याची प्रक्रिया’ (इंप्रिंटिंग) म्हणतात.
एकमेकींस अपरिचित असलेल्या कोंबड्या एकत्र आणल्या, की थोड्याच वेळात त्यांची आपापसांत टोचाटोची सुरू होते आणि त्यांचे परस्परांशी श्रेष्ठ–कनिष्ठतेचे नाते अथवा वर्चस्वाधीनतेचे संबंध प्रस्थापित होतात. त्यांच्यामध्ये एक चंचुप्रहारांची उतरंड निर्माण होते. कोंबड्यांमध्ये प्रस्थापित होणारी ही चंचुप्रहारांची उतरंड अथवा सामाजिक श्रेणी प्रथम नॉर्वेजियन शास्त्रज्ञ शेल्ड्रुप–एबे याने हेरली. त्यानंतर सामाजिक वर्चस्वाधीनतेची उदाहरणे सर्व पृष्ठवंशी प्राण्यांत आणि अनेक वानरांत दिसून आलेली आहेत.
काही प्राण्यांचे विशिष्ट भूप्रदेशांशी आपुलकीचे नाते जुळते. पक्ष्यांचे व माश्यांचे आपापल्या मुलखावर फारच प्रेम जडते. प्रत्येक ऋतूत हजारो मैलांचे अंतर तोडून ते आपल्या ठराविक जागी परत येतात. आपल्या जागेवरील आपले स्वामित्व सिद्ध करण्यासाठी हे प्राणी कधी कधी इतरांशी प्राणपणाने लढाईही करतात.
विशिष्ट जागेचा कबजा घेणे, तेथे आपले घरटे बांधणे, इतरांस तेथे येण्यास मज्जाव करणे हा वर्तनप्रकार पक्ष्यांमध्ये सर्रास आढळतो. काही प्रमाणात तो माश्यांतही आढळतो. कुत्र्यांमध्ये व काही खारींमध्येही तो दिसून येतो. ही मुलूखगिरी एका परीने प्राण्यांच्या जीवनास उपयोगी ठरते. तिच्यामुळे संख्येची दाटी होत नाही व अपत्यांचे संरक्षण–संगोपन उत्तम प्रकारे होते. शिवाय नव्या व्यक्तींना नवा भूप्रदेश शोधावा लागतो व त्यामुळे वसाहतीचे क्षेत्र विस्तृत होते. पक्ष्यांच्या मुलूखगिरीचा पद्धतशीर अभ्यास प्रथम ई. हॉवर्ड याने केला (१९२०).
अनेक प्राणी एकमेकांस आपापला आशय कथन करतात. के. फोन फ्रिश याने मधमाश्यांचे आशय–कथन वा संचारण (कम्युनिकेशन) अभ्यासिले. त्याच्या निरीक्षणात असे दिसून आले, की एखाद्या मधमाशीला मध मिळण्याची नवी जागा सापडली, की ती मधमाशी आपल्या वसाहतीत येऊन ती नवी जागा कुठे, सूर्याच्या कोणत्या बाजूला, साधारणतः किती अंतरावर आहे, हे आपल्या वसाहतीतील इतर बांधवांना एक प्रकारचे ‘उड्डाण–नृत्य’ करून सांगते. थोड्याच अवधीत त्या मधमाश्या मोठ्या संख्येने त्या नव्या जागी जाऊन पोचतात.
संचारण हे पृष्ठवंशी प्राण्यांत विशेष प्रमाणात प्रचलित असावे असे वाटते. एच्. फ्रिंग्स याने स्टार्लिंग पक्ष्याचा विशिष्ट भयव्याकूळ आवाज फीतमुद्रकावर नोंदवून वाजविला. तो ऐकताच त्या पक्ष्यांचा थवा भीतीने उडून गेला.
काही मानसशास्त्रज्ञांच्या मते गाणारे पक्षी आपले गाणे अनुभवी स्वकीयांकडून शिकून घेतात. आवाजाचे अनुकरण करण्याची कला जशी पुष्कळ पक्ष्यांना अवगत असते, तशी ती सस्तन प्राण्यांना असत नाही. चिंपँझीसारख्या प्राण्यांना माणसाची बोली शिकविण्याचे सारे प्रयत्न फोल ठरले आहेत. अर्थात चिंपँझी माकडे एकमेकांशी आपल्या विशिष्ट भाषेत आशय संचारण करतात परंतु त्यांच्या चीत्कारपद्धतीत कोणत्या प्रकारची माहिती व्यक्त केली जाते, ते अजून सविस्तरपणे अभ्यासिले गेले नाही.
कुत्रा, मांजर, घोडा, गाय इ. पाळीव प्राणी आपल्या मालकाच्या आज्ञा पाळावयास शिकतात हे खरे परंतु हे त्यांचे ज्ञानसंपादन म्हणजे मानवी भाषेचे त्यांनी मिळविलेले बौद्धिक ज्ञान नव्हे. ते केवळ यांत्रिक अभिसंधानात्मक ज्ञानसंपादन होय. प्रयोगशाळेत घंटानाद ऐकताच लाळ गाळण्याची अथवा पाय उचलण्याची क्रिया करावयास जे कुत्रा शिकतो, त्याच प्रकारचे हे पाळीव प्राण्यांचे मालकाच्या हुकुमाबरहुकूम होणारे वर्तन होय.
वर्तनाविकृती : मनोविकृतींनी पीडलेली माणसे व त्यांचे तापदायक वर्तन ही आपल्यापुढील एक गंभीर सामाजिक समस्या आहे. ती सोडविण्यास हातभार लावावा म्हणून आणि केवळ वैज्ञानिक जिज्ञासा म्हणूनही, तुलनात्मक मानसशास्त्रज्ञ मानवेतर प्राण्यांच्या विकृत वर्तनाचा अभ्यास करतात.
मानवेतर प्राण्यांच्या वर्तनविकृतींचा अभ्यास पाव्हलॉव्हच्या प्रयोगशाळेत सुरू झाला. अभिसंधानतंत्राचा कुत्र्यावर प्रयोग करतेवेळी, त्या प्राण्यापुढला प्रसंग चमत्कारिक व संभ्रमजनक बनला, की त्याचे वर्तन विपरीत होऊ लागते असे दिसून आले. उदा., कुत्र्यास प्रथम अंडाकृती आणि वर्तुळाकृती या दोहोंमधला फरक ओळखण्यास शिकविले. पुढे अंडाकृतीची रुंदी वाढवीत वाढवीत वर्तुळाकृतीच्या जवळपास आणली. अशा वेळी या दोन आकृतींमधला भेद ओळखणे, कुत्र्यास जड जाऊ लागते. त्यामुळे तो गोंधळतो, बावचळतो व पिसाट बनतो.
प्रयोगशाळेत निर्मिलेल्या प्रसंगांनी उत्पन्न होणाऱ्या विपरीत वर्तनप्रकारास पाव्हलॉव्हने ‘प्रयोगनिर्मित वर्तनाविकृती’ असे नाव दिले. त्याच्या मते वर्तनविकृतीच्या मुळाशी संघर्ष असतो. ‘संघर्ष’ या पदाचा शारीरक्रियाविज्ञानपर अर्थ त्याला अभिप्रेत होता. संभ्रमजनक परिस्थितीत प्राण्याच्या तंत्रिका तंत्रात एकाच वेळी उद्रेक आणि निरोध या परस्परविरोधी प्रक्रिया सुरू होतात. त्यामुळे प्राण्यांचे वर्तन विपरीत होते, असे पाव्हलॉव्हचे म्हणणे होते परंतु त्याचे मत सर्वसामान्य होऊ शकले नाही.
पाव्हलॉव्हने चालना दिल्यानंतर, या विषयावर इतरत्र संशोधन होऊ लागले. कुत्रा, मांजर, शेळी, डुक्कर, उंदीर, कबूतर, चिंपँझी, माकड इ. प्राण्यांवर अनेक परींनी प्रयोग करून नवीन माहिती मिळविण्यात आली.
लिड्ल याने अमेरिकेत कॉर्नेल येथे शेळीवर प्रयोग केले. घंटानादानंतर प्रयोगविषय शेळीच्या पायास विजेचा धक्का बसत असे. म्हणून घंटेचा आवाज ऐकताच विजेचा धक्का बसण्यापूर्वी, आपला पाय उचलण्यास शेळी शिकते. परंतु लिड्लला असे दिसून आले, की धोक्याची घंटा जर लागोपाठ पाच किंवा त्याहूनही कमी मिनिटांच्या अंतराने वाजविली व आवाजापाठोपाठ विजेचे धक्के देत राहिले, तर शेळीचे वर्तन बेफाम होऊ लागते. यावरून लिडलने निष्कर्ष काढला, की प्राण्याच्या अवधानप्रक्रियेवर काही एका प्रमाणाबाहेर ताण पडला, की प्राण्याच्या वर्तनात बिघाड निर्माण होतो. म्हणजेच केंद्रीय तंत्रिका तंत्राच्या प्रक्रिया काही ठराविक कालांतराने, काही एका लयीत, होत असतात. तो ताल जर सुटला, ती लय जर बिघडली, त्या ठराविक कालांतरापेक्षाही जर द्रुतगतीने उद्दीपकांचे आघात होऊ लागले, तर प्राण्याच्या वर्तनात विकृती उत्पन्न होते.
लिड्ल यास असेही आढळून आले, की अभिसंहित उद्दीपक, म्हणजे धोक्याची सूचना देणारी घंटा जर पाच–पाच मिनिटांच्या अंतराने वाजविली तर कुत्र्याचे वर्तन बेफाम, पिसाट बनते परंतु तोच उद्दीपक जर त्याहूनही जलद दोन–दोन मिनिटांच्या अंतराने वाजविला, तर कुत्र्याचे वर्तन अगदी उलट प्रकारचे होते. म्हणजे तो प्राणी मूढ, विकल, निश्चल होऊन उभा राहतो.
मेअरच्या मते केवळ संघर्षानेच वर्तनविकृती उत्पन्न होते असे नव्हे, तर कधीकधी विशिष्ट प्रकारच्या आवाजनेही प्राण्याच्या वर्तनात बिघाड निर्माण होतो. आवाजाने सुरू होणाऱ्या पिसाटवृत्तीला ‘ध्वनिजनित विकृती’ म्हणतात. ध्वनिजनित विकृती जडलेल्या प्राण्यांची शारीरिक तपासणी केल्यास अनेकदा त्यांना मध्यकर्णाचा रोग झाल्याचे दिसून येते.
एन्. ई. मिलर, जे. एच्, मॅसरमन इ. तुलनात्मक मानसशास्त्रज्ञ अन्य प्राण्यांच्या वर्तनविकृतीचा अभ्यास काहीशा निराळ्या पद्धतीने करतात. ही पद्धती म्हणजे मनुष्याच्या विकृतींविषयी वैद्यकशास्त्रात जी माहिती दिलेली आहे, तिच्या अनुरोधाने अन्य प्राण्यांवर प्रयोग करणे. संघर्ष, चिंता, निरोधन, भावविस्थापन, व्यसनासक्ती, आत्मक्लेश, बालिशता, स्थिरीकरण इ. मानवी विकृतींबद्दलच्या वैद्यकीय कल्पना प्रयोगरूपाने प्राण्यांवरही वापरल्या जातात. उदा., मिलरने भावविस्थापनाचा प्रकार प्रयोगरूपाने अभ्यासिला (१९४८). त्याने काही उंदरांनां एकमेकांवर मुष्टिवत प्रहार करावयास शिकविले. नंतर पेटिकेत एकाच उंदरास सोडून त्याच्या जोडीदाराऐवजी एक कचकड्याची बाहुली तेथे ठेवली. उंदराने त्या बाहुलीवर प्रहार केले.
मॅसरमनने विकृत वर्तन करणाऱ्या मांजरांवर मद्यार्काचा काय परिणाम होतो ते अभ्यासिले. मद्यार्क दिल्याने या प्राण्याची भीती व बेफाम वर्तन बरेच कमी झाले. सर्वसाधारणपणे मांजरांना साधे दूध आवडते परंतु मद्यार्कामुळे ज्या विकृतीपीडित मांजरांना बरे वाटले, त्यांना साध्या दुधाऐवजी मद्यार्कमिश्रित दूध पसंत पडू लागले. वर्तनविकृती पूर्णपणे नाहीशी झाल्यानंतर मात्र त्यांना पूर्ववत साधे दूध आवडू लागले. यावरून त्यांना मध्यंतरी जडलेली मद्यार्काची चटक त्यांच्या शरीरात रूजून बसलेली नव्हती असे दिसते.
पशूंच्या विकृतीचा हा अभ्यास मानवासही उपयुक्त ठरलेला आहे. उंदीर व कबूतर यांच्या विकृतीवर इलाज म्हणून जी साधने वापरली जातात, तशाच प्रकारची साधने विकृतिपीडित मनुष्यांबाबतही यशस्वी रीत्या वापरता येतात, असे ओ. आर्. लिंड्स्ले यास आढळून आले (१९५६). प्राण्यांच्या वर्तनविकृती पूर्णपणे बऱ्या करण्यासाठी केवळ प्रयोगकर्त्यानेच इलाज योजून भागत नाही. त्यासाठी त्या प्राण्यांनीही काही प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. विकृतीजनक परिस्थितीशी जर प्राण्याने नीट परिचय करून घेतला व तिच्यावर काही काबू मिळविला, तर त्याची विकृती नष्ट होई शकते. केवळ त्याला दीर्घकाळ विश्रांती घेऊ दिली, त्याची गरज कमी केली अथवा त्याची समस्या सोपी केली, तरी त्याचा या कामी फारसा उपयोग होत नाही. असे काही निष्कर्ष या अभ्यासाद्वारे मिळाले आहेत.
या शास्त्राने अजून आपले यशोमंदिर गाठलेले नाही हे जरी सत्य असले, तरी त्याने बरीच बोधप्रद माहिती आपल्या पदरी टाकलेली आहे, यात शंका नाही. विसाव्या शतकात मानसशास्त्र हे एक अत्यंत संपन्न शास्त्र बनलेले आहे. या शास्त्राची समृद्धी वाढविण्यात शारीर–क्रियाविज्ञान व मनोविश्वेषण यांच्याप्रमाणेच तुलनात्मक मानसशास्त्राची खूप मदत झालेली आहे. या शास्त्राची आपणास थोडी जरी ओळख झाली, तरी क्लोद बेर्नार याचे पुढील शब्द किती अर्थपूर्ण आहेत ते आपल्या ध्यानात येईल : ‘अन्य प्राणी जर अस्तित्वात नसते, तर मनुष्यस्वभाव आपणास अधिकतर अनाकलनीयच राहिला असता’.
संदर्भ : 1. Kohler, Wolfgang, The Mentality of the Apes, New York, 1925.
2. Maier, N. R. F. Schneirla, T. C. Principles of Animal Psychology, New York, 1964.
3. Morgan, C. L. An Introduction to Comparative Psychology, London, 1894.
4. Stone, C. P. Ed. Comparative Psychology, Delhi, 1964.
5. Thorndike, E. L. Animal Intelligence, New York, 1965.
6. Thrope, W. H. Learning and Instinct in Animals, Cambridge, Mass., 1963.
7. Warden, C. J. Jenkins, T. N. Warner, L. H. Comparative Psychology, 3 Vols., New York, 1935–40.
8. Watson, J. B. Behavior : an Introduction to Comparative Psychology, New York, 1914 .
9. Werner, Heinz Trans. Garside, E. B. Comparative Psychology of Mental Development, London, 1940.
केळशीकर, शं. हि.
“