मर्मदृष्टी : (इन्‌साइट). एक मानसशास्त्रीय संकल्पना. ही संकल्पना मानसशास्त्रात विविध अर्थाने वापरली जाते. सर्वसामान्यतः एखाद्या समस्येच्या उलगड्याचे तात्काळ वा अकस्मात झालेले स्वच्छ संवेदन, आकलन वा ग्रहण म्हणजे मर्मदृष्टी म्हणता येईल. समस्यात्मक प्रसंग वा परिस्थिती असो, एखाद्याचे वर्तन असो. समाजजीवन असो. एखाद्या यंत्राचे कार्य असो वा एखादा तात्विक विषय असो, त्या त्या गोष्टीचे सांगोपांग आणि मूलग्राही आकलन म्हणजे मर्मग्रहण होय. त्या त्या गोष्टीत अंतर्भूत असलेल्या तसेच तिच्याशी संबद्ध असलेल्या घटकांच्या पारस्परिक संबंधांचे आकलन होणे, त्यामुळे त्यांची मनामध्ये निराळ्या प्रकारे जुळणी होऊन त्या गोष्टीकडे पहाण्याची पूर्वीपेक्षा निराळी दृष्टी येणे हे मर्मदृष्टीचे लक्षण होय. त्या त्या गोष्टीशी संबद्ध असलेल्या घटकांपैकी जे घटक प्रथम दुर्लक्षित राहिलेले असतात त्यांचे इतर घटकांशी असलेले आंतरिक संबंध लक्षात येणे, त्यांपैकी खरोखर महत्वाच्या घटकांना उठाव मिळणे व बिनमहत्वाच्या घटकांना दुय्यम स्थान प्राप्त होणे व अशा रीतीने ती गोष्ट निराळ्या स्वरूपात दिसू लागणे हे मर्मदृष्टीचे स्वरूप असते. कोणतीही कृती तसेच कोणताही विषय शिकण्याची यशस्विता मर्मग्रहणावर अवलंबून असते.

प्राणी तसेच मुले, माणसे अनुभवाने शिकत असतात. शिकण्याच्या या प्रक्रियेचे मूलभूत स्वरूप निश्चित करणे, हे शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचे असल्याने जे.बी.वॉटसन, ई. एल्‌. थॉर्नडाईक, डब्ल्यू. कलर, यर्किस. इ मासनशास्त्राज्ञांनी विविध जातींच्या प्राण्यांवर प्रयोग केले आहेत. प्राण्यांच्या मार्गात अडचणी निर्माण केल्या असता, (उदा., भुकेल्या उंदरांला व्यूहांमध्ये सोडणे, मांजरांना कूट पिंजऱ्यांत कोंडणे, चिपँझींना दिसतील अशी केळी बऱ्याच उंचींवर वा अंतरावर लटकविणे इ.) प्राणी त्या समस्यात्मक प्रसंगातून कसा मार्ग काढतात, याचे निरीक्षण या अभ्यासकांनी केले आहे. यांतून असे निष्पन्न झाले की, हालचालींची वारंवारता ही शिकण्याच्या प्रक्रियेत मुख्यत्वे कारणीभूत नसते. प्रयत्न, चुका व यशस्वी ठरलेल्या हालचालींचे दृढीकरण हेही शिकण्याच्या प्रक्रियेचे संपूर्ण स्वरूप नसते. जर प्राण्यांच्या निरिक्षणशक्तीस तसेच हात, पाय, पंजे, दात वगैरेंचा उपयोग करण्यास वाव राहील असे आणि त्यांच्या एरवीच्या परिसराशी मिळतेजुळते-शक्यतो अकृत्रिम स्वरूपाचे- प्रयोगप्रसंग योजले, तर प्राणी थोडक्या प्रयत्नांनी व अल्पवेळात शिकतात. कुंपण घातलेल्या मैदानात कलर यांनी  चिंपँझी वानरास ठेवून उंचावर केळ्यांचा घड टांगला, तेव्हा त्याने खोक्यावर खोके ठेवून पाहिले, बांबूचा तुकडा वापरून पाहिला आणि मग थोडा वेळ विचार करीत असल्यासारखे बसल्यावर काही एक नवीन कल्पना  चमकून गेल्याप्रमाणे ‘आ:’ अशी त्याची मुद्रा झाली व बांबूचे तुकडे एकात एक घालून त्या मोठ्या बांबूने तो घड त्याने खाली पाडला. ह्या प्रयोगावरून हे स्पष्ट झाले आहे, की प्राण्यांचे प्रयत्ने मर्मग्रहण होण्यास मदत करीत असतात. या मर्मग्रहणात मागचा अनुभव अथवा  पश्चात् दृष्टी (हाइंडसाइट) आणि वर्तमानापलीकडे पहाणारी कल्पनात्मक दृष्टी (फोअर-साइट) या दोहोंचा हातभार असतो.

मर्मग्रहणामुळे समस्यात्मक प्रसंगी होणाऱ्या प्रयत्नांना निश्चित दिशा मिळते व ते डोळसपणे व सुघटित रीत्या होऊ लागतात.बौद्धिक समस्यांच्या बाबतीतही तत्संबद्ध घटकांचे एकमेकांशी असलेले विविध संबंध लक्षात घेणे महत्वाचे असते. वैज्ञानिकही एकएका अभ्युपगमाच्या रूपाने मनातल्या मनात प्रयत्न करीत असतात व अशा रीतीने समस्येचे मर्म त्यांच्या हाती लागते. सर्जनशील कलावंतही ह्या मर्मदृष्टीचा वापर आपल्या निर्मितीत करून अपूर्व अशी निर्मिती करत असतात. 

पहा : ब्यूह मानसशास्त्र सर्जनशीलता ज्ञानसंपादन.

संदर्भ : 1.Boring, E. G.Langfeld, L. S. Weld, H. P Foundations of Psychology, New York, 1948.

            2. Stout, G. F. Mannual of Psychology, London, 1929.

अकोलकर, व. वि.