न्यूनगंड : (इन्फीअरिऑरिटी काँप्लेक्स). ॲल्फ्रेड ॲड्लर याने प्रसृत केलेली एक मानसशास्त्रीय संकल्पना. अर्भके व अगदी लहान मुले बराच काळ मोठ्या माणसावर अवलंबून असतात. त्यांच्या भोवतालची माणसे तुलनेने खूपच शक्तिमान व प्रचंड भासतात म्हणून त्यांना नमून वागावेच लागेत. मानसिक विकास वेगाने होत असलेल्या बालकाला ह्याची पूर्ण जाणीव असते, की आपण इतरांवर अवलंबून आहोत, दुसऱ्याला विरोध करण्याची ताकद आपल्यात नाही. तीत शारीरिक अपूर्णतेची जाणीव प्रमुख असते व तिचे रूपांतर न्यूनतेच्या भावनेत होते. ही न्यूनतेची भावना व्यक्तीला अधिक प्रयत्नशील बनवते. बालकाच्या विकासावस्थेत पालनपोषणाच्या पद्धती चुकीच्या असल्या, तर त्याच्या प्रयत्नशीलतेला मध्येच खीळ बसते व ह्या न्यूनतेच्या भावनेचे रूपांतर न्यूनगंडात होते. ⇨ॲल्फ्रेड ॲड्लर (१८७०–१९३७) न्यूनतेची भावना व न्यूनगंड यांत असा फरक दाखवतो, की न्यूनतेच्या भावनेमुळे व्यक्ती अधिक प्रयत्नशील बनून प्रगती करण्याचा प्रयत्न करते, तर न्यूनगंड हा व्यक्तीच्या विकासमार्गातील धोंड बनतो. जीवनातील प्रश्न सोडविण्याची अक्षमता म्हणजे न्यूनगंड, असे म्हणता येईल.

न्यूनगंडाचा विकास बालकात तीन कारणांनी होऊ शकतो : (१) शारीरिक व्यंग, (२) अतिलाड व

(३) दुर्लक्ष. शारीरिक व्यंग कित्येक वेळा अस्पष्ट असते किंवा त्याचे स्वरूप इतके किरकोळ असते, की त्याकडे दुर्लक्ष केले तरी चालू शकते. महत्त्वाची गोष्ट अशी, की ह्या शारीरिक व्यंगाचे परिणाम केवळ शारीरिक न राहता मानसिक जीवनावरही होतात आणि त्याचे रूपांतर मज्‍जाविकृतीसारख्या मानसिक विकृतीत होऊ शकते. लहान मुलाचे दोष हे केवळ शारीरिक न्यूनतेचे निदर्शक नसून चुकीच्या मानसिक प्रवृत्तीचे निदर्शक होत. उदा., अधू डोळ्यांचा मुलगा वर्गात मागे बसेल, त्याला शिक्षकाने शिकविलेले समजणार नाही व तो अभ्यासात कच्चा राहील. विद्यार्थ्याच्या डोळ्यांची तक्रार शिक्षकाला माहीत नसल्यामुळे तो मुलाला मंदबुद्धी आणि परिणामी तो मुलगाही स्वतःला इतरांहून कमी लेखेल. खेळताना त्याला अशाच स्वरूपाचे अनुभव आल्यामुळे ही जाणीव दृढमूल होईल.

बहुतेक माणसे लहानपणी लाडात वाढलेली असतात तथापि अतिरिक्त लाडामुळे इतरांविषयी आपुलकी वाटत नाही व आत्मकेंद्री वृत्ती वाढते. आईचे मुख्य कार्य मुलाचा संबंध बाहेरच्या जगाशी जास्तीत जास्त वाढविणे व त्याला अधिकाधिक सहनशील व समाजशील बनविणे हे असते. कधीकधी मुलाचे लाड पुरविण्यात आनंद मानणाऱ्या मातेकडून हे कार्य नीट होत नाही व मूल परावलंबी बनते. सतत होणारे लाड, मागितलेली गोष्ट मिळणे इ. प्रकारांमुळे मुलाला विरोध असा ठाऊकच नसतो आणि त्याची जीवनशैली वेगळेच वळण घेते. मूल स्वतःला मोठे समजते तसेच आपली प्रत्येक इच्छा इतरांनी तृप्त केलीच पाहिजे, असेही त्याला वाटू लागते. मोठेपणी असे होणे शक्य नसते, विरोध सहन करावा लागतो, निर्णय स्वतःच घ्यावे लागतात. अशा प्रसंगी त्यांना वास्तवतेचे दर्शन होते आणि आपल्यातील अपुरेपणाचीही जाणीव होते.

नकोशी असलेली, तिरस्कृत, कुरूप, रोगट मुले त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे न्यूनगंडाची शिकार बनतात. सतत होणारा उपहास, सापत्न वागणूक, छळ, हेटाळणी यांमुळे अशा मुलांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकृत बनला, तर नवल नाही. परीकथा व लहान मुलांच्या गोष्टींतून सावत्र आईच्या छळाच्या भडक कथा ह्या दृष्टिकोनाला खतपाणी घालतात. आईवडिलांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी आपण दूषित वातावरणात वावरत आहोत, ह्याची मुलाला जाणीव असते. अशी मुले आक्रमक प्रवृत्तीची बनतात कित्येक वेळा ती गुन्हेगारीच्या मार्गाकडेही वळतात.

पहा : व्यक्तिमानसशास्त्र.

संदर्भ : 1. Adler, Alfred Trans. Study of Organ Inferiorlty and its Psychical Compensation : A Contribution to Clinical Medicine,                   New York, 1917.

बोरूडे, रा. र.