निरोधन : (रिप्रेशन). सिग्मंड फ्रॉइडच्या मनोविश्लेषणातील ज्या संकल्पना मनोविकृतींचा तसेच सामान्य व्यक्तींच्या काही वर्तनप्रकारांचाही उलगडा करण्याच्या दृष्टीने मानसशास्त्रज्ञांना उपयुक्त वाटल्या आहेत, त्यापैकी ‘निरोधन’ ही संकल्पना व तीबाबतची फ्रॉइडची उपपत्ती फार महत्त्वाची आहे. व्यक्तिमनातील चिंता वा अपराधभावना यांपासून सुटका करून घेण्याची निरोधन ही एक अहंरक्षणात्मक यंत्रणा आहे. व्यक्तीच्या अहंला (एगो) व पराहंला (सुपर-एगो) अप्रशस्त वाटणाऱ्या वासनांच्या ऊर्मींशी निगडित असलेल्या कल्पनांचे, विचारांचे तसेच स्मृतींचे दमन त्या त्या जाणिवेच्या कक्षेतच येणार नाही इतक्या बलपूर्वक करणे, हा ‘निरोधन’ या संज्ञेचा पारिभाषिक अर्थ आहे.

रुग्णांच्या मज्जाविकृतींची अबोध स्तरावरची मुळे त्यांच्या स्वतःच्या लक्षात आणून दिली, तरच त्या विकृती समूळ नष्ट होतील असा फ्रॉइडचा विश्वास होता. म्हणून रुग्णाने त्याच्या मनात जो जो विचार, जी जी आठवण, कल्पना वगैरे येईल ते सर्व कुठलाही अडसर न ठेवता मोकळेपणाने बोलत जावयाचे, या मनोविरेचनात्मक मुक्त साहचर्य-तंत्राचा जेव्हा फ्रॉइडने अवलंब केला तेव्हा त्याला असे आढळून येऊ लागले, की रुग्णाचा मुक्त विचारप्रवाह एखाद्या विषयापर्यंत येऊ लागताच त्याच्या मनात काहीच येईनासे होई वा तो बोलणेच बंद करी वा तो विषय टाळून दुसरेच काही बोलू लागे. हा प्रकार रुग्ण प्रतिकारात्मक अवस्थेत आला असल्याचा द्योतक असल्याचे फ्रॉइडने हेरले व या प्रकाराचा अर्थ त्याने असा लावला, की रुग्णाच्या अबोध मनःप्रातातून त्याला नको असलेले विचार जाणिवेत येऊ पहात आहेत परंतु त्यांना त्याच्या अहंकडून अवरोध होत आहे. अर्थात वास्तवाची दखल घेऊन वागणाऱ्या आणि पराहंच्या आदेशांचे पालन करणाऱ्या अहंने ह्या विचारांचे निरोधन करून ठेवलेले असले पाहिजे व त्या विचारांचा संबंध अप्रशस्त अशा वासनोर्मींशी पोहोचत असला पाहिजे. उदा., बालपणात मातेविषयी वाटणाऱ्या अंगस्पर्शोत्सुक कामभावनेशी तसेच पित्याविषयी वाटणाऱ्या द्वेषमूलक आक्रमक वृत्तीशी.

अहंकडून आणि पराहंकडून केल्या जाणाऱ्या या निरोधनाच्या प्रक्रियेचे स्वरूप फ्रॉइडने पुढीलप्रमाणे कल्पिले आहे. निरोधन हे जाणीवपूर्वक घडून येत नसून नेणिवेच्या पातळीवरच घडून येत असते. आक्षेपार्ह अशा वासनातृप्तीच्या प्रसंगाची मनात खोल खोल कुठेतरी कल्पना केली जाते, लगेच व्यक्तीच्या ठिकाणी त्या प्रसंगाचे भय व तज्जन्य चिंता निर्माण होते आणि ही भयमिश्रित चिंता, आक्षेपार्ह वासनांशी संबंधित अशा त्या विचारांचे तक्ताळ निरोधन करण्यास कारणीभूत होते.

ही चिंता अतिशय वाढली म्हणून व्यक्तीच्या अहंने त्या आक्षेपार्ह वासनेतून आपले अंग पूर्णपणे काढून घेतले, असे काही रुग्णांच्या बाबतीत घडून आल्याचे आढळते. काही वेळा असे घडते, की व्यक्तीचा अहं त्या आक्षेपार्ह वासनेची ऊर्जा (लिबिडो) दुसऱ्याच एखाद्या विषयाकडे वळवतो. असे होणे म्हणजेच विकृतिलक्षणे निर्माण होणे होय, असे फ्रॉइडने म्हटले आहे. उदा., जर एखाद्या अप्रशस्त व आक्षेपार्ह वासनोर्मीशी अंधाऱ्या जागेचा, उंचवट्याच्या जागेचा, निर्जन रस्त्याचा वगैरे संबंध आलेला असेल, तर व्यक्तीला अशा जागांचीच भीती वाटू लागते व अशी ठिकाणे टाळली, की आपण सुरक्षित आहोत असे तिला वाटू लागते [⟶ भयगंड]. तिसरा संभाव्य प्रकार म्हणजे त्या आक्षेपार्ह वासनेची ऊर्जा तिचा विषय सोडीत नाही. परिणामी व्यक्तीच्या मानसिक विकासातील पूर्वीच्या एखाद्या अवस्थेत गेल्याची–परागतीची–लक्षणेही उद्‌भवतात.

पहा : मनोविश्लेषण

संदर्भ : Bose, G. The Concept of Repression, Calcutta, 1921.

अकोलकर, व. वि.