फेक्‍नर, गुस्टाफ टेओडोर : (१९ एप्रिल १८०९-१८ नोव्हेंबर १८८७). प्रख्यात जर्मन मानसशास्त्रज्ञ, भौतिकीविज्ञ, तत्त्ववेत्ते व मानसभौतिकीचे (साइकोफिझिक्स) प्रवर्तक. प्रायोगिक मानसशास्त्राचा प्रत्यक्ष प्रारंभ त्यांच्या मानसभौतिकीतूनच झाल्याचे मानले जाते. प्रायोगिक सौंदर्यशास्त्राचेही तेच प्रवर्तक मानले जातात. त्यांचा जन्म प्रशियातील ग्रोस-सार्चेन नावाच्या खेड्यात एका धर्मोपदेशक कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांचा कल तत्त्वज्ञानाकडे व गूढवादाकडे होता तथापि त्यांच्या ठिकाणी वैज्ञानिक वृत्तीही तितकीच प्रबळ होती. त्यांनी १८२२ मध्ये लाइपसिक विद्यापीठातून वैद्यकाची पदवी घेतली. नंतर ते भौतिकीच्या अध्ययनाकडे वळले. १८२३ मध्ये ते लाइपसिकमध्येच निसर्गतत्त्वज्ञानाचे निदेशक (इन्स्ट्रक्टर)म्हणून नियुक्त झाले. लाइपसिकमध्ये अध्ययन करताना त्यांच्यावर लोरेन्ट्‌स ऑकेन (१७७९-१८५१) आणि  ⇨एर्न्स्ट हाइन्‍रिख वेबर (१७९५-१८७८) यांच्या अनुक्रमे निसर्गतत्त्वज्ञान आणि शारीरक्रियाविज्ञान या विषयांवरील व्याख्यानांचा सखोल प्रभाव पडला. ऑकेन यांच्या व्याख्यानांनी त्यांची ‘मनुष्य म्हणजे यंत्र’ ही कल्पना पार बदलून गेली. वेबर यांच्या शारीरक्रियाविज्ञानावरील व्याख्यानांची त्यांच्यावर इतकी छाप पडली, की वेबर हेच मानसभौतिकीचे खरे जनक होत, असे फेक्‍नर मानू लागले.

गुस्टाफ टेओढोर फेक्‍नर

लाइपसिकमध्ये १८२२ ते १८३४ ह्या काळात त्यांनी भौतिकी व रसायनशास्त्रातील विविध समस्यांवरील संशोधन, फ्रेंचमधील एतद्‌विषयक ग्रंथांचे जर्मन भाषांतर, सुधारित पाठ्यपुस्तके आणि संदर्भसूची प्रसिद्ध केल्या. हे त्यांचे काम प्रचंड स्वरूपाचे असून त्याची सु. २,००० छापील पृष्ठे भरतील. त्यात त्यांचे २८ शोधनिबंधही आहेत. याच काळात त्यांनी ‘डॉ. मिझेस’ या टोपणनावाने कविता व ललित लेखनही (विनोदी उपहासिका) केले.

ते १८३३ मध्ये विवाहबद्ध झाले. १८३१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या विद्युत् प्रवाहाच्या मोजमापावरील एका शोधनिबंधामुळे त्यांची १८३४ मध्ये लाइपसिक विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. ह्या पदावर ते फक्त १८३९ पर्यंतच होते कारण १८३९ मध्ये ते एका चमत्कारिक आजाराने ग्रस्त झाले. अतिशय थकवा, जवळजवळ अंधत्व, अपचन, निर्वस्तुभ्रम इ. विकारांमुळे त्यांनी हे पद सोडले. १८४२ मध्ये मात्र अचानकपणे त्यांची प्रकृती पूर्ववत बरी झाली. १८४० मध्ये त्यांनी पश्चात् दृक्-प्रतिमा (व्हिजुअल आफ्टर-इमेज) या विषयावरील लेखन प्रसिद्ध केले. १८४८ मध्ये ते पुन्हा लाइपसिकमध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले.

 तत्त्वज्ञानातील त्यांची विचारसरणी ⇨जडप्राणवादी (ॲनिमिस्ट) म्हणजे विश्वातील सर्व चराचर वस्तू ह्या चित्‌शक्तीचाच आविष्कार होत, अशी होती. मुळात गूढवादाकडे कल असलेल्या फेक्‍नर यांना चित्‌शक्ती आणि जड द्रव्य यांचे मूलभूत तादात्म्य सिद्ध करण्याची ओढ होती. सर्व-मानसवादानुसार (पॅनसायकीझम) विश्वात जाणीव वा चित्‌शक्ती हीच सर्वसमावेशक असून जडविश्व हे ह्या जाणिवेहून मूलतः भिन्न नाही, तर तिचाच एक वेगळा आविष्कार आहे, ह्याला ते ‘दिवस-दृष्टिकोन’ (द डे व्ह्यू) म्हणतात आणि प्रचलित जडवादास ‘रात्र-दृष्टिकोन’ (द नाइट व्ह्यू) म्हणतात. त्यांच्या द डे लाइट व्ह्यू ॲज अपोज्ड टू द नाइट व्ह्यू (१८७९, मूळ जर्मन) नात्र ऑर द साइकिक लाइफ ऑफ प्‍लँट्‌स (१८४८, मूळ जर्मन), झेंद- अवेस्ता (३ खंड, १८५१, मूळ जर्मन) या ग्रंथांत त्यांचे सर्व-मानसवादी विचार आलेले आहेत.⇨ विल्यम जेम्स (१८४२-१९१०) यांच्या मानसशास्त्रीय विचारांवरही त्यांच्या ह्या विचाराचा प्रभाव पडला. त्यांची ही सर्व-मानसवादी धारणा त्यांच्या झेंद-अवेस्ता ह्या ग्रंथात उत्तम प्रकारे व्यक्त झाली आहे. त्यांच्या ह्या धारणेस वैज्ञानिक बैठक प्राप्त करून देण्याची त्यांची मनीषा होती. जाणिवा व त्यांच्याशी संबद्ध असलेल्या मेंदूतील प्रक्रिया या दोन्हीही समरूपी (आयसोमॉर्फिक) असाव्यात, असे गृहीतक त्यांनी मांडले. या गृहीतकाच्या अनुषंगाने, मानसिक जीवन शरीरात आविष्कृत होत असल्यामुळे, भौतिक विज्ञानाच्या अन्वेषणपद्धतीच आपण मानसिक प्रक्रियांच्या अभ्यासातही उपयोजाव्यात, असे त्यांना वाटू लागले. १८५० मध्ये त्यांना अशी कल्पना सुचली, की उद्दीपक आणि वेदन यांच्यामध्ये मापनीय स्वरूपाचा संबंध असू शकेल. प्रकाशाची तीव्रता वाढली, की प्रकाशवेदनही तीव्र होते, हे त्यांच्या लक्षात आले होते. याच सुमारास वेबरचा प्रसिद्ध नियमही त्यांच्या वाचनात आला. ‘मूळ उद्दीपकामध्ये विशिष्ट गुणोत्तराने (स्थिरांकाने) वाढ झाली तरच वेदनांतील तीव्रता वाढल्याचे जाणवते.’ किंवा ‘भेदाचे वेदन हे उद्दीपकाच्या लॉगरिथमच्या प्रमाणात असते.’ हा तो नियम असून तो आता ‘वेबर-फेक्‍नर नियम’ म्हणून ओळखला जातो. वजने, स्पर्शात्मक अंतरे इ. भिन्नभिन्न प्रकारची उद्दीपके घेऊन व त्यांच्यात परिमाणात्मक बदल करून वेबरच्या नियमाचा पडताळा पाहण्याचे कार्य फेक्‍नर यांनी सुरू केले. वेबरचीच प्रयोगतंत्रे वापरून, परंतु वेबरचा नियम गणिती भाषेत मांडण्याचे उद्दिष्ट ठेवून केलेल्या ह्या संशोधनाचे वर्णन फेक्‍नर यांनी ‘मानसभौतिकी’ असे केले. १८६० मध्ये त्यांनी एलिमेंट्‌स ऑफ साइकोफिझिक्स (२ खंड, मूळ जर्मन) हा ग्रंथ प्रसिद्ध केला. या संशोधनाच्या रूपाने फेक्‍नर ह्यांनी वापरलेल्या (१) मर्यादा पद्धती (मेथड ऑफ लिमिट्‌स), (२) स्थिरता पद्धती (कॉन्स्टन्सी मेथड) व (३) सरासरी प्रमाद पद्धती (मेथड ऑफ ॲव्हरेज एरर) ह्या तीन पद्धतींची देणगी मानसशास्त्रास मिळाली. त्यांनी आपल्या मानसभौतिकीची विभागणी दोन प्रकारांत केली : (१) आंतरिक मानसभौतिकी. यात वेदन आणि तंत्रिका-उद्दीपन यांच्यातील संबंधाचा अभ्यास केला जातो आणि (२) बाह्य मानसभौतिकी. यात प्रायोगिक पद्धतीने केलेल्या वेदन आणि बाह्य उद्दीपक यांच्यातील संबंधाचा अभ्यास अंतर्भूत होतो. ⇨ प्रायोगिक मानसशास्त्रात त्यांच्या मानसभौतिकीला एक प्रभावी क्षेत्र म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. [⟶ मानसभौतिकी].

फेक्‍नर यांच्या संशोधनातून ⇨ एर्न्स्ट माख (१८३८-१९१६), ⇨ हेर्मान हेल्महोल्ट्‌स (१८२१-९४), ⇨ व्हिल्हेल्म व्हुंट (१८३२-१९२०) यांना प्रेरणा मिळाली. फेक्‍नर ह्यांच्या मानसशास्त्रातील मूलभूत स्वरूपाच्या कार्यामुळेच त्यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनकत्व बहाल केले जाते.

फेक्‍नर यांनी १८६५ ते १८७४ ह्या काळात आपल्या प्रायोगिक संशोधनाचा रोख  ⇨सौंदर्यशास्त्राकडेही वळवला. सौंदर्याचा विशिष्ट आदर्श मनात बाळगून आल्हादकता तसेच आस्वाद्यता यांचे निर्धारक घटक ठरवण्याऐवजी, लोकांना ज्या कलावस्तू कमी सुंदर व ज्या कलावस्तू अधिक सुंदर वाटतात, त्यांची पद्धतशीर तुलना करत करत ते घटक निश्चित करावयाचे, ही अनुभवाधिष्ठित पद्धती फेक्‍नर यांनी अवलंबून अवलंबून प्रयोगनिष्ठ सौंदर्यशास्त्र मांडण्याचा प्रयत्‍न केला. १८६५ मध्ये त्यांनी त्यांचा सौंदर्यशास्त्रविषयक प्रबंध तसेच १८७६ मध्ये प्रायोगिक सौंदर्यशास्त्रास आधारभूत ठरेल असा प्रोपॅंडेटिक टू एस्थेटिक्स (२ खंड, मूळ जर्मन) हा महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध केला. ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले आहे, की ‘शेलिंग व हेगेल यांच्यासारख्या पूर्वसूरींंनी वैश्विक तत्त्वांकडून विशेष गोष्टींकडे म्हणजे निगमनात्मक पद्धतीने आपल्या सौंदर्यशास्त्रीय उपपत्तींचे उपयोजन केले पण माझी उपपत्ती याच्या नेमकी उलट, प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारावरून वैश्विक तत्त्वांकडे जाणारी म्हणजे विगमनात्मक पद्धतीची आहे.’ १८७४ मध्ये ते पुन्हा मानसभौतिकीकडे वळले. लाइपसिक येथे त्यांचे निधन झाले.

त्यांची सर्वच ग्रंथरचना जर्मनमध्ये असून त्यांच्या काही ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरेही झाली आहेत. त्यांचे इतर उल्लेखनीय भाषांतरित ग्रंथ पुढीलप्रमाणे : लाइफ आफ्‌टर डेथ (१८३६), ऑन फिझिकल अँड फिलॉसॉफिकल ॲटॉमिक थिअरी (१८५०), ऑन द क्वेश्चन ऑफ द सोल (१८६१), द थ्री मोटिव्ह्‌ज अँड ग्राऊंड्‌स ऑफ फेथ (१८६३).

संदर्भ : 1. Boring,  E,  G. A History of Experimental Psychology, New York, 1950.

            2. Hall, G. S. Founders of Modern Psychology, New York, 1912.

अकोलकर, व. वि. सुर्वे, भा. ग.