कार्ल गुस्टाफ युंगयुंग, कार्ल गुस्टाफ : (२६ जुलै १८७५−६ जून १९६१). स्विस मानसशास्त्र, मानसचिकित्सक आणि विश्लेषणात्मक मानसशास्त्राचा प्रवर्तक. स्वित्झर्लंडमधील केसव्हिल या गावी जन्म. १९०० मध्ये बाझेल विद्यापीठाची वैद्यकीय पदवी त्याने प्राप्त केली. त्यानंतर झुरिक विद्यापीठातील मानसोपचारकेंद्रात ऑइगेन ब्लॉइलरचा साहाय्यक म्हणून युंगची नेमणूक झाली. १९०२ मध्ये त्याने त्याच विद्यापीठाची एम्‌.डी. पदवी मिळवली आणि तेथेच मानसोपचार विषयाचा व्याख्याता म्हणून काम सुरू केले. १९०५ मध्ये पॅरिसमधील सालपित्रे रुग्णालयात ⇨प्येअर झाने या फ्रेंच मानसोपचार तज्ञाबरोबर त्याचा परिचय होऊन त्याच्या हाताखाली अध्ययन सुरू केले. १९१३ सालापासून व्याख्यात्याचा व्यवसाय सोडून स्वतंत्र व्यवसाय व संशोधन यांवर त्याने लक्ष केंद्रित केले. १९०६ मध्ये प्रथमच फ्रॉइडशी त्याने पत्रव्यवहार सुरू केला आणि १९०७ मध्ये व्हिएन्नात फ्रॉइडची गाठ घेतली. फ्रॉइडच्या कामाविषयी त्याला आदर आणि आकर्षण होते. वैद्यकीय व मनोविश्लेषणाला वाहिलेल्या नियतकालिकात या दोघांनी एकत्र लिखाण केले. फ्रॉइडचा एक निकट, प्रतिभावान सहकारी म्हणून युंगचा लौकिक झाला आणि फ्रॉइडही आपला वैचारिक अनुगामी म्हणून त्याच्याकडे पाहू लागला.

‘फ्रॉइड-गेसेलशाफ्ट’ नावाचे चर्चामंडळ १९०७ च्या सुमारास स्थापन झाले. १९०८ मध्ये युंगने सॉल्झबर्ग येथे मनोविश्लेषण परिषदेचे आयोजन केले. १९०९ मध्ये फ्रॉइडसमवेत त्याने अमेरिकेचा दौरा करून तेथील अनेक विद्यापीठांना भेटी दिल्या. १९११ मध्ये आंतरराष्ट्रीय मनोविश्लेषण संस्थेचा तो फ्रॉइडच्या पाठिंब्याने पहिला अध्यक्ष झाला. यानंतरच्या काळात मात्र फ्रॉइड व युंग यांच्यात वैचारिक अंतर पडू लागले. फ्रॉइडच्या सर्वच संकल्पना युंगला पटेनात. विशेषतः  फ्रॉइडच्या मानसशास्त्रीय प्रणालीच्या गाभ्याशी असलेला ‘लिबिडो’ हा सिद्धांत युंगला जसाच्या तसा अमान्य होता. त्यातील लैंगिक प्रेरणेला अवास्तव दिलेले महत्त्व युंगने नाकारले. आंतरराष्ट्रीय मनोविश्लेषण संस्थेच्या अध्यक्षपदाचा तसेच सदस्यत्वाचा देखील युंगने नंतर राजीनामा दिला.

पुढे १९१३ च्या सुमारास स्वतंत्रपणे, युंगने ‘विश्लेषणात्मक मानसशास्त्र’ असा संप्रदाय स्थापला. ब्लॉइलरबरोबर केलेल्या दीर्घ संशोधनावर आधारित ‘शाब्दिक साहचर्य’ या कसोटीची आखणी केली. त्या विषयावर त्याच नावाचे−स्टडीज इन वर्ड असोसिएशन−पुस्तक त्याने प्रसिद्ध केले. ‘शाब्दिक साहचर्य’ या कसोटीची उपयुक्तता मनोविश्लेषण आणि प्रायोगिक मानसशास्त्रात महत्त्वाची मानली जाते. मनोरुग्णांच्या रोगनिदानात आणि उपचारपद्धतीत या कसोटीचा वापर होऊ लागला. तिचे महत्त्व आजही कायम आहे.

युंगने मानसशास्त्रात आणखी कितीतरी मौलिक भर घातली. फ्रॉइडच्या काही संकल्पनांप्रमाणे युंगच्याही काही संकल्पनांना वस्तुनिष्ठ वैज्ञानिक पुरावा सापडत नाही. तरीही नंतरचे मानसशास्त्र, संलग्नसाहित्य आणि सामान्य व्यवहार यांत युंगच्या मानसशास्त्रीय संकल्पना सर्रास वापरल्या जातात. त्याच्या गंड (कॉम्प्लेक्स) उदा., न्यूनगंड, सामूहिक अबोध (कलेक्टिव्ह अनकॉन्शस), मूलबंध वा मूलाकृती (आर्केटाइप्स), अंतर्मुखी (इन्ट्रोव्हर्ट) आणि बहिर्मुखी (एक्स्ट्रोव्हर्ट) अशी व्यक्तिमत्त्वाची विभागणी अशा अनेक संकल्पना नेहमीच्या भाषेत डोकावतात. गंड म्हणजे स्वायत्त इच्छा आणि कल्पनांचे संपुट. अबोधात वसणाऱ्या ह्या संपुटांचा परिणाम गंडग्रस्त व्यक्तीच्या जीवनशैलीत दिसून येतो. फ्रॉइडच्या लिबिडो सिद्धांताचे स्वरूप युंगच्या संप्रदायात बदलले आहे. व्यक्तीच्या वाढ-विकासाला कारणीभूत ठरणारी लिबिडो ही अविर्भिन्न ऊर्जा असल्याचे त्याचे म्हणणे. शोपेनहौअरच्या लिखाणातील ‘विजिगीषा’ किंवा बेर्गसाँच्या विचारसरणीतील जैव-प्रेषणेशी (इलान-व्हायटल) तिचे साधर्म्य आहे. फ्रॉइडनेही आपल्या सुरुवातीच्या संकल्पनांत पुढे फेरफार केले आहेत.

युंगने अंतर्मुख आणि बहिर्मुख अशी व्यक्तिमत्त्वाची जी एक ढोबळ विभागणी केली आहे ती इच्छा प्रवृत्तींच्या दिशेवर. ज्यांचे लक्ष स्वतःतील इच्छा−भावना−कल्पना यांवर केंद्रित होते ते अंतर्मुख व ज्यांचे चित्त भोवतालचे जग, त्यातील वस्तू आणि घटना यांत अधिक रमते ते बहिर्मुख. याव्यतिरिक्त आणखी वेगळ्या प्रकारे तो लोकांचे वर्गीकरण प्रमुख चार गटांत करतो मानवी मनाच्या कार्याच्या तत्त्वावर ही विभागणी होते.उदा., विचारप्रधान−‘थिंकिंग टाइप’, भावनाप्रधान−‘फीलिंग टाइप’, वेदनाप्रधान−‘सेन्सिंग टाइप’ आणि अंतःप्रज्ञ− ‘इन्ट्युइटिव’.

बोधमन आणि अबोधमन अशा दोन ध्रुवांच्या खेळातून मानसिक जीवनाचा अर्थ समजतो. हे दोन्हीही परस्परपूरक असतात. व्यक्तिमत्त्वांच्या संरचनेत, युंगच्या मते तीन थर कल्पिता येतात. बोधमन, पाठोपाठ वैयक्तिक अबोध आणि तळाशी असलेले सामूहिक अबोध. भयाने वा लाजेखातर दडपल्या गेलेल्या अशा आणि इच्छा, विस्मृतीच्या गर्तेत असलेल्या वासना व आवेग तसेच नकळत शिरलेल्या इतर संकल्पना वैयक्तिक अबोधात ठाण मांडतात. वैयक्तिक अबोधाची सुरुवात व्यक्तीच्या जन्माबरोबरच होते. सामूहिक अबोधात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आनुवंशिक अनुभवांचे सार साठवलेले असते. विशेष प्रसंगी उपयोगी पडणाऱ्या सहजप्रेरणा, सनातन विचार त्यात राहतात. शिवाय मूलाकृती तसेच पुरुषाच्या मनातील खोलवर रुतलेली अनुभवपूर्व असणारी नारीप्रतिमा किंवा ‘ॲनिमा’ आणि स्त्रीच्या मनातील अशा प्रकारची नरप्रतिमा किंवा ‘ॲनिमस’ ह्या सुद्धा अबोधमनाचा आशय असतात. काही वेळा प्राणिमात्रांचे अनुभव सुद्धा सामूहिक अबोधात उतरतात. या अबोधातील आशय मुलांच्या कल्पनाजालात, तर कधी मानसिक तोल गेलेल्या व्यक्तींच्या अफाट कल्पनाराज्यात आणि बहुतेकांच्या स्वप्नात आकार घेतात. युंगने विविध संस्कृतींचा तौलनिक अभ्यास केला. त्यांच्या पुराणकथा, बालवाङ्मय, परीकथा, शिल्प, साहित्य, धर्माचरण तपासल्यावर त्यांत फारच समानता युंगला आढळली. सामूहिक अबोधातील आशय आणि मानववंश यांत संरचनात्मक संबंध असल्याची युंगची खात्री पटली. सामूहिक अबोध हा मानवी विकासाचा पुरातन काळापासून वंशपरंपरागत आध्यात्मिक वारसा असतो, म्हणूनच सर्व मानवांमध्ये आदिम प्रतीके समान असतात, असे युंगचे प्रतिपादन आहे.


व्यक्तिमत्त्वाच्या संकल्पनेच्या गाभ्याशी ‘सेल्फ’ किंवा जीवात्मा असल्याचे युंगचे मत आहे. आत्म्यामुळे व्यक्तीला स्थैर्य आणि एकजिनसीपणा येतो. आत्मसाक्षात्कार हा व्यक्तिमत्त्वविकासातील फार वरच्या दर्जाचा, परिपक्वतेचा टप्पा आहे असे त्याचे म्हणणे आहे. मानसिक ऊर्जा शक्तिमान मूल्यांपासून कमजोर मूल्यांपर्यंत दोलायमान होऊ शकते. तिचे नियमन ऊर्जासंधारण व अवक्रममापन (एंट्रॉपी) या पद्धतीने होते. सामाजिक जडणघडणीच्या पार्श्वभूमीवर व्यक्तीच्या काही क्षमता प्रकट होतात पण इतर अनेक सुप्तच राहतात. व्यक्तिमत्त्वाच्या समत्वासाठी वयाच्या मध्यानंतर, साधारण चाळीशीनंतर, अनेकांना अपुरेपणा आणि विफलतेचा अनुभव येतो. सुप्त क्षमता बोधनाच्या थरावर आणून विकसित करण्याचा प्रयत्न केल्यास व्यक्तीचा एकांगीपणा नाहीसा होऊ शकतो. ह्या आतील ओढीचा उल्लेख आणि आत्म्याच्या संकल्पनेमुळे युंगच्या विचारसरणीला गूढतेचे वलय निर्माण होते. [⟶ व्यक्तिमत्त्व].

युंगने किमया (आल्केमी-पूर्वप्राथमिक रसायन विद्या), पुराणकथाविद्या, धर्म, लोकाचार, गुह्य आचरण (ऑकल्ट प्रॅक्टिसेस) वगैरे क्षेत्रांत रस घेतला. उत्तर आफ्रिकेतील आदिवासींचा जीवनक्रम, ॲरिझोना व न्यू मेक्सिको आणि केन्यातील जमातींची संस्कृती यांचा त्याने जवळून अभ्यास केला.

युंगचे दीर्घ अध्ययन, संशोधन आणि विपुल लेखन यामुळे त्याला अनेक मानसन्मान प्राप्त झाले. अमेरिकेतील क्लार्क, येल, हार्व्हर्ड, फॉरधॅम या विद्यापीठांनी तसेच कलकत्ता, बनारस अलाहाबाद या विद्यापीठांनी आणि जिनीव्हा व झुरिक येथील विद्यापीठांनी त्याला सन्मान्य डॉक्टरेट पदव्या बहाल केल्या. १९३२ साली ‘झुरिक लिटरेचर प्राइझ’ त्याला लाभले. १९३८ साली इंग्लंडमधील ‘रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन’ या संस्थेचे मानद सदस्यत्व, १९४४ मध्ये ‘स्विस ॲकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेस’ने देखील त्याला सदस्यत्व देऊन त्याचा सन्मान केला १९३३−४९ च्या काळात झुरिकच्या टेक्नॉलाजी इन्स्टिट्यूटमध्ये त्याची तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली जर्मन मेडिकल सोसायटी फॉर सायकोथेरपी या संस्थेचे अध्यक्षपद आणि त्या संस्थेच्या मानसोपचारविषयक मुखपत्राचे संपादकपद अशी मानाची पदे त्याने भूषविली. ‘स्विस सोसायटी फॉर प्रॅक्टिकल सायकॉलॉजी’ या संस्थेचा तो अखेरपर्यंत अध्यक्ष होता. १९४८ मध्ये झुरिक येथे मानसचिकित्सालय सुरू करून, त्याने जर्मन आणि इंग्रजी भाषांमधून त्या ठिकाणी प्रशिक्षणाची व संशोधनाची व्यवस्था केली. झुरिकजवळील कूशनाख्त येथे त्याचे निधन झाले.

युंगचे मूळ ग्रंथलेखन जर्मन भाषेत असून ते विस्तृत आहे. बहुतेक सर्व ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर झाले आहे : स्टडीज इन वर्ड असोसिएशन (१९१८), सायकॉलॉजी ऑफ द अनकॉन्शस (१९२२), सायकॉलॉजिकल टाइप्स, कॉन्ट्रिब्यूशन्स टू ॲनॅलिटिकल सायकॉलॉजी (१९२८), मॉडर्न मॅन इन सर्च ऑफ द सोल (१९३३), इंट्रोडक्शन टू द सायनस ऑफ सायकॉलॉजी (१९५१), डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी, सायकॉलॉही ऑफ रिलिजन (१९५४), इंटरप्रिटेशन ऑफ नेचर ॲण्ड द सायकी (१९५५), सायकिऍट्रिक स्टडीज हा लेखसंग्रह (१९५७), आर्केटाइप्स ॲण्ड द कलेक्टिव्ह अनकॉन्शस (१९५९), स्ट्रक्चर ॲण्ड डायनॅमिक्स ऑफ द सायकी (१९६०) असे विविध ग्रंथ त्याने सादर केले. १९६० साली आयोनसायकॉलॉजी ऑफ आल्केमी असे आणखी दोन ग्रंथ त्याने प्रसिद्ध केले. १९७३ मध्ये कलेक्टेड वर्क्‌स ऑफ सी. जी. युंग ह्या नावाने त्याची समग्र लेखनसंपदा हल याने इंग्रजीत प्रसिद्ध केली.

मानवी मनाच्या शोधासाठी युंगने फार परिश्रम घेतले. फ्रॉइडच्याही एक पाऊल अधिक पुढे जाऊन सामूहिक अबोधाच्या सिद्धांताबरोबर मनाच्या अज्ञात भागावर नवा प्रकाश टाकला. मानवी संस्कृतीच्या मर्यादा, त्यातील मनोविकृतिजनक भयस्थाने यांचे त्याने विवरण केले. विश्लेषणात्मक मानसशास्त्राच्या उपपत्तीसाठी नव्या संकल्पनांना मानवी संस्कृतीचा खोल आधार सादर केला. युंगच्या मते मानवी मनाचा शोध हेच उद्याचे खरे विज्ञान आहे आणि हे असे विज्ञान आहे, की ज्याची आपणांस नितांत गरज आहे आता हळूहळू असे प्रत्ययास येत आहे, की माणसाला सर्वांत मोठा धोका कशापासून असेल तर तो दुष्काळ, भूकंप, सूक्ष्मजंतू किंवा कॅन्सर यांपासून नव्हे, तर तो त्याच्या स्वतःपासूनच आहे.

विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ मानसशास्त्रज्ञ म्हणून युंगचे स्थान निश्चित आहे.

संदर्भ : 1. Fordham, Frieda, An Introduction to Jung’s Psychology, Harmondsworth, 1976.

    2. Hall, C. S. Nordby, V. J. A Premier of Jungian Psychology, New York, 1973.

    3. Hannah, Barbara, Jung : His Life and Work, New York, 1976.

   4. Jacobi, Jolande, The Psychology of C. G. Jung, New Haven, 1962.

   5. Read, H. Fordham, M. Adler, G. Ed. The collected Works of C. G. Jung-20 Vols., Princeton, N. J., 1953-1979.

खंडकर, अरुंधती.