मनोभाव : (इमोशन) मनोभाव ह्या संज्ञेने, व्यक्तीच्या जीवनात रंग व रशरशीत गतिमानता आणणाऱ्या ( अशा क्रोध, भय, प्रेम, करूणा, हर्ष, दुःख, पश्चाताप इ. मनोभाव वा भावना अभिप्रेत होतात. मनोभाव अथवा भावना ही जटिल स्वरूपाची अवस्था असल्याकारणाने तिची सुटसुटीत व्याख्या करणे कठीण आहे. भावनात्मक अवस्थेतील अनुभव काही आगळ्याच स्वरूपाचा असतो. त्या अवस्थेत शरीरांतर्गत प्रक्रियांमध्ये विशेष प्रकारचे फेरफारही अनुस्थूत असतात. ती अवस्था कृतिप्रेरकही असते आणि मनोभावात्मक अवस्थांचे वैशिष्ट्यपूर्ण असे बाह्य शारीरिक आविष्कारही होत असतात. मनोभावात्मक अवस्थांचे बव्हंगी स्वरूप, सीदंति मम गात्राणि मुखच परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे भ्रमतीव च मे मन यातून अर्जूनाने केलेले स्वतःच्या संमिश्र मनोभावाचे वर्णन तसेच जागतिक युध्दाच्या वेळी रणभूमिवर गेलेल्या सैनिकांनी स्वतःच्या अवस्थेचे केलेले वर्णन यांवरून लक्षात येते.

भाव व मनोभाव : भाव (फीलिंग) आणि मनोभाव अथवा भावना या दोहोंमध्ये काही बाबतीत साम्य असले, तरी महत्वाचा भेदही दिसून येतो. सुखद व असुखद भावांप्रमाणेच प्रेम, भय, क्रोधादी मनोभाव व्यक्तींच्या अभिसरणरूप अथवा अपसरणरूप प्रतिक्रियांना कारणीभूत होत असतात. भाव आणि मनोभाव या दोंहोनाही जैविक दृष्ट्या महत्व असते, मनोभावोत्पत्तीच्या वेळी सुखद वा असुखद भाव जाणवत असतो. तथापि, अभिसरण–अपसरणतेस निश्चित व वैशिष्ट्यपूर्ण रूप प्राप्त होते (उदा. आलिंगन, पलायन, आक्रमक वर्तन) ते मनोभावांमुळे होत असते. केवळ सुख-असुख भावांमुळे नव्हे. [⟶ भाव] .

मनोभावोत्पादक प्रसंग : विशिष्ट प्रकारच्या प्रसंगामुळे किंवा परिस्थिमुळे विशिष्ट स्वरूपाचे मनोभाव उत्पन्न होत असतात. अनपेक्षित असे काही अचानकपणे घडले की-उदा. अचानक मोठा आवाज,अपरिचित प्राण्याचे किंवा अक्राळविक्राळ चेहर्या चे वा मुखवट्याचे दर्शन यांमुळे –भीती निर्माण होते. अंधार, सरपटणारे प्राणी वैगेरे ज्या गोष्टींची भीती निर्माण होते. अंधार,सरपटणारे प्राणी वगैरे ज्या गोष्टींची भिती अगदी बालपणी वाटत नाही,ती पुढे पुढे वाटू लागते. ती काही अंशी बालकाच्या परिपक्कनामुळे व काही अंशी वसलेली अर्थात अभिसंधानमूलक असू शकते. उद्दिष्टप्राप्तीसाठीच्या प्रयत्नात कोणत्याही प्रकारे आलेला अडथळा, नैसर्गिक प्रवृत्तींना घातले जाणारे बंधन, जबरदस्ती, स्वतःच्या वस्तूंचे हरण, फसवणूक इ. क्रोध निर्माण करतात. व्यक्तीच्या शारीरिक तसेच मानसिक व सामाजिक गरजांच्या समाधानामुळे आनंद निर्माण होतो. आकांक्षा व प्रयत्न सफल होणे हे हर्षास कारणीभूत होते. विसंगतिदर्शन (इनकाँग्रॅटी), प्रतिस्पर्ध्यावर विजय, इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे वाटावयास लावणारे प्रसंग हे हास्योत्पादक आनंदास कारणीभूत होत असतात.

मनोभावांचे अनुभवात्मक स्वरूप : अंतर्निरीक्षणाच्या आधारे हे स्वरूप सांगता येते व अंतर्निरीक्षणपूर्वक करण्यात आलेल्या निवेदनांमध्ये एकवाक्यताही दिसून येते. मनोभावात्मक अवस्था ही मानसिक क्षुब्धतेची अवस्था असते व तिच्या तीव्रतेनुसार मनोव्यापारांवर कमी अधिक परिणाम होत असतो. अतिशय प्रबल असलेला मनोभाव हा अवधान एकाग्र होऊ देत नाही. प्रबल मनोभावामुळे व्यक्तीच्या विचारांमध्ये वस्तुनिष्ठता राहत नाही. लहानशी वस्तू दुर्बिणीतून मोठी दिसते. त्याप्रमाणे क्रोध,मत्सर, भीती या भावनांचा परिणाम राईचा पर्वत करण्यात होतो व प्रेम-मनोभावामुळे प्रिय व्यक्तीच्या किरकोळ गुणांचा गौरव केला जाऊन दोष दिसेनासे होतात. उचित-अनुचित याबाबतचा माणसाचा एरवीचा विवेक कमी होतो. मनोभावात्मक अवस्थेचा स्मृतीवरही परिणाम होत असतो. दुसर्याभ व्यक्तीने केलेल्या चांगल्या गोष्टी क्रोध वा मत्सरग्रस्त माणसास आठवत नाहीत. शोकव्याकुल अवस्थेत एरवी न आठवणारे पूर्वीचे प्रसंग आठवू लागतात. मनोभावाच्या पगड्यापायी –उदा. चिंताग्रस्त अवस्थेत –माणसाच्या कल्पनांवर एरवी असणारा वस्तुनिष्ठ दृष्टीचा अंकुश सैल होऊन स्वैर कल्पना करण्यात येऊ लागतात. भयग्रस्ताला भास होऊ लागतात. तर्कशुध्द विचार करणेही कठीण जाते. मात्र हे सर्व परिणाम मनोभाव अत्यंत प्रबल झाला तरच होतात. एरवी सौम्य मनोभाव हे माणसाचे विचार कल्पना, इच्छाशक्ती, सर्जनात्मक कल्पनाशक्ती, कर्तृत्व इत्यादींना पोषकच ठरत असतात. 

मनोभावांची शारीरिक बाजू : मनोभावोत्पादक प्रसंगामुळे अंतर्वाहक मज्जातंतूद्वारा मोठ्या मेंदूकडे जाणारे संदेश त्याच्या खालच्या बाजूस असलेल्या मध्य मेंदूतून जात असतात. त्यामुळे मध्य मेंदूतील अधोथॅलामस (हायपोथॅलामस) नामक भागातील केंद्रांचे उद्दीपन होते. अधोथॅलामसच्या उद्दिपनाचा मनोभावांच्या उत्पत्तीशी फार महत्वाचा संबंध असतो. विद्युत प्रवाहाद्वारे अथवा मेट्राझॉल किंवा सोडियम अँमॅटिल ही रासायनिक द्रव्ये रक्तात टोचून अधोथॅलामसचे उद्दिपण केल्यास प्राणी मनोभावप्रेरित झाल्यासारखे वागू लागतात. रॅमसन, यूल मॅसरमन व फिलिप बार्ड यांनी प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांवरून असेही सिध्द झाले आहे, की अधोथॅलामसचा काही भाग कापून टाकला असता प्राण्याची मनोभाव उद्दिपक्षमता नष्ट होते व त्यांच्या ठिकाणी सुस्तावलेपण येते. गिनीपिग्जमधील अधोथॅलामस अजिबात काढून टाकला असता त्यांची कामभावना लोप पावली, असेही दिसून आले आहे.

ह्या अधोथॅलामसचे उद्दिपण होताक्षणीच त्याच्या मार्फत स्वायत्त मज्जासंस्थेचेही उद्दिपण होते व तिच्य़ाशी संबंध्द असलेल्या शरीरांतर्गत विविध ग्रंथीच्या स्त्रावांमध्ये त्याचप्रमाणे ह्रदय, फुफ्फुसे, जठर, आतडी इ. अवयवांच्या कार्यात त्या त्या प्रसंगी आवश्यक अशा प्रकारचे फेरफार घडून येतात. स्वायत्त मज्जासंस्थेचा परासहानुकंपी अथवा शिरोविभागव कमरेकडील अधोविभाग हे सौम्य आनंद, आल्हाद व सौम्य प्रीती या मनोभावांना कारणीभूत होणार्यास प्रसंगी उद्दिपित होतात व त्यावेळी अधिवृक्क ग्रंथीचा स्त्राव कमी प्रमाणात होतो. ह्रदयाचे स्पंदन, रक्ताभिसरण व श्वसन संथ गतीने होते. डोळ्यांच्या बाहुल्या आकुंचन पावतात. लालाग्रंथी स्त्रवू लागतात. रक्तपेशी तसेच आतडी रूंदावतात.

याउलट, क्रोध, भय व दुःख या भावना निर्माण करणाऱ्या आणि आपातरूप अथवा आणीबाणीरूप अशा प्रसंगी स्वायत्त मज्जासंस्थेच्या मध्य विभागाचे वा अनुकंपी विभागाचे उद्दिपण होते. त्यावेळी अधिवृक्क ग्रंथीचा स्त्राव अधिक प्रमाणात होऊन शरीरक्रियांसाठी आवश्यक असलेल्या जादा शक्तीचा पुरवठा होऊ शकतो. ह्रदयाचे स्पंदन, रक्ताभिसरण व श्वसन वेगाने होऊ लागते. यकृतातून अधिक साखर रक्तात जाते. स्वेदग्रंथीचा स्त्राव होऊन घाम येतो. रक्तवाहिन्या संकोच पावून रक्तदाब वाढतो. लालाग्रंथीस्त्राव कमी होऊन तोंडास कोरड पडते. आतडी आवळतात (भीतीने पोटात गोळा उठतो) व पचन क्रियेत व्यत्यय येतो. अशा या प्रक्रियांचे वर्णन आणीबाणीप्रसंगीच्या प्रतिक्रिया असे कॅनन यांनी केले आहे. मनोभावांशी शरीरांतर्गत प्रक्रिया निगडित असतात. त्यामुळेच मनोभावांचा व्यक्तींच्या शारीरिक आरोग्याशी संबंध पोहोचतो.


मनोभावाशी मोठ्या मेंदूच्या पृष्ठभागातील केंद्राचा (कॉर्टिकल सेलर्स) देखील संबंध असतो. तो असा. त्या त्या प्रसंगाच्या स्वरूपाचे आकलन वा बोध मोठ्या मेंदूमुळे होतो. त्यासारख्या पूर्वीच्या प्रसंगाची स्मृती जागृत होते व त्यामुळे त्या प्रसंगी निर्माण होणाऱ्या एकंदर क्षुब्धतेला प्रसंगानुरूप अशा भावनेचे रूप प्राप्त होते. मोठ्या मेंदूची ही केंद्रे बधिर केली अथवा अपघातामुळे निष्क्रिय झाली,तर एरवी त्या त्या प्रसंगी निर्माण होणारे निश्चित स्वरूपाचे असे मनोभाव उत्पन्न होत नाहीत. पूर्वीचे भयंकर प्रसंग आठवले तरीदेखील कापले भरते व घाम फुटतो, अपमानाच्या प्रसंगांच्या आठवणींनी संताप येतो, प्रमयाच्या स्मृती व कल्पना कामभावना जागृत करतात इ गोष्टीवरून मनोभावांशी मोठ्या मेंदूचा असलेला संबंध स्पष्ट होतो. मोठ्या मेंदूमुळे मनोभांवर नियंत्रणही राहत असते. त्या त्या वेळच्या एकंदर परिस्थितीची जाणीव, औचित्यविवेक, मनोभावापायी होऊ पाहणार्याच कृतीच्या संभाव्य परिमाणांचा विचार या गोष्टी मोठ्या मेंदूवर अवलंबून असतात व त्यांच्यामुळे व्यक्ती मनोभावाच्या आहारी जाण्याचे टाळते. ही गोष्ट पी.डी. मॅक्लीन व जे.डब्ल्यू.पॅपेझ यांनी केलेल्या प्रयोगांद्वारे स्पष्ट झाली आहे तसेच फ्रीमन व वॅटस यानी प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांवरून असे दिसून आले आहे, की अधोथॅलामसद्वारा मेंदूच्या पृष्ठभागाकडे संदेश वाहून नेणारे मज्जातंतू जर कापून टाकले, तर मनोभावात्मक प्रतिक्रिया अतिरेकी प्रमाणात होऊ लागतात. 

मनोभावांची प्रेरकता : अमक्यातमक्याने अथवा स्वतः क्रोध आल्यामुळे, भीती वाटल्यामुळे हर्ष झाल्यामुळे, कामलालसेपायी, मत्सरापोटी असे केले असे आपण म्हणतो. यावरून मनोभाव हे व्यक्तीला प्रेरित करीत असतात, ह्या सामान्य समजुतीत तथ्य असल्याचे दिसून येते. विल्यम मॅक्डूगल यांनी मनोभावांच्या प्रेरकतेवर विशेष भर देऊन असे प्रतिपादन केले, की व्यक्तीच्या निसर्गसिध्द अर्थात ⇨सहज प्रेरणांशी (इन्स्टिक्ट वा प्रोपेन्सिटी) भावनांचा इतका गाढ संबंध असतो, की मनोभाव म्हणजे सहजप्रेरणांचा गाभाज होय. सहजप्रेरणा कार्योद्युक्त होणे व मनोभाव निर्माण होणे या गोष्टी एकरूपच होत. प्रत्येक सहजप्रेरणेशी विशिष्ट मनोभाव निबध्द असतो. मॅक्डूगल यांनी प्राण्यांच्या बालकांच्या, प्रौढांच्या आणि मनोविकृत व्यक्तींच्या प्रवृत्तींच्या निरीक्षणांचा आधार घेऊन, एनर्जीज ऑफ मेन (१९३२) या ग्रंथात मानवाच्या सहजप्रेरणा म्हणून १४ प्रेरणांची व त्या त्या प्रेरणेशी अंगभूत असलेल्या मनोभावांची यादी प्रस्तुत केली. उदा. भीती ही पलायनप्रेरणेशी, घृणा ही तिरस्काराशी ,क्रोध ही आक्रमण प्रेरणेशी, कामभावना ही लैंगिक प्रेरणेशी, कोमल भावना ही वात्सल्य प्रेरणेशी निबध्द असते असे त्यांनी म्हटले आहे. क्षुधा, तृषा, आराम, सहवास वा समूहप्रेरणा, रचनाप्रेरणा, संग्रहप्रेरणा इ.काही सहजप्रेरणांशी निगडित असलेले मनोभावात्मक अनुभव तसेच त्यांचा आविष्कार सुस्पष्ट नसतो, म्हणून तद्वाचक संज्ञा अस्तित्वात आल्या नाहीत, असे मॅक्ड्रगल यांनी म्हटले आहे. कार्यप्रवृत्त झालेल्या प्रेरणेनुसार भावना उत्पन्न होत असते, हे गिलफोर्ड यांचे मत मॅक्ड्रगल यांच्या मताशी मिळतेजुळते आहे. उद्दिष्टलक्षी व दीर्घकाल चालत राहणार्याम बहुतेक क्रिया मनोभावरंजित असतात, त्यांची दिशा व सातत्य हे मनोभावांवर अवलंबून असते, मनोभावानुसार मनात विचार येत असतात व प्रसंगाचा बोध होत असतो हे आर.डब्ल्यु. लीपर यांचे मतही मॅक्ड्रगलच्या प्रतिपादनाशी मिळतेजुळतेच आहे. त्या त्या वेळी उत्पन्न झालेला मनोभाव त्या त्या वेळी निर्माण झालेल्या प्रेरणेची जाणीव व्यक्तीला करून देत असतो तसेच आवश्यक ती ऊर्जाही पुरवीत असतो. ह्या मॅक्ड्रगल यांच्या प्रतिपादनाचे प्रतिबिंब टॉमकिन्स यांच्याही प्रतिपादनात आढळते.

मनोभावांचे आविष्कार : (१) चेहऱ्यावरील अवयवांच्या, स्नायूंच्या (डोळे ,भुवया, कपाळ, गाल, नाकपुड्या, ओठ,हानुवटी इ.) हालचाली, (२) शरीराची एकूण अंगस्थिती (पोस्चर्स) व मानेच्या तसेच हातापायांच्या प्रतिक्रियात्मक हालचाली (उभे राहण्याची व बसण्याची तर्हाच ,हातवारे व इतर कृती इ.) आणि (३) स्वराची तारता-मंद्रता, शब्दांवरील आघाढ,उदगार इत्यादी. अशा एकूण तीन प्रकारे मनोभावांची बाह्य अभिव्यक्ती होत असते व त्यावरून व्यक्तीचा त्या त्या वेळचा प्रेमविषयाचे सान्निध्य साधणे, आलिंगन, चुंबन, कुरवाळणे इत्यादी, स्मित व हास्य यांद्वारा आनंद व्यक्त होतो. नाकपुड्या संकोच पावणे, तोंड वा समग्र शरीर फिरविले जाणे, छी – शू केले जाणे हा घृणाभावनेचा आविष्कार होय. माणसांच्या मनोभावनांचे हे बाह्य आविष्कार बर्याभच अंशी निसर्गसिध्द असतात, असे चार्लस डार्बिन यांनी प्रतिपादन केले आहे.

कुत्री, मांजरे, वाघ, सिंह, माकडे इ. प्राणी भ्याल्यावेळी /संतापल्यावेळी/प्रेमात आल्यावेळी त्यांच्या त्या त्या मनोभावांचे आपोआप होणारे शारीरिक व ध्वन्यात्मक आविष्कार आणि माणसांच्या त्या त्या मनोभावांचे आविष्कार यांमध्ये मूलतः साम्य असल्याचे डार्बिन यांनी दाखवून दिले आहे. प्राण्यांच्या प्रतिक्रियांचे अवशेष व संक्षेप माणसांच्या बाबतीत दिसून येतात. उदा. मागे सरणे, दात ओठ खाणे व हात उगारणे, स्पर्शासाठी हात पुढे सारणे इत्यादी. चार्लस डार्बिन यांनी असेही दाखवून दिले आहे, की हे निसर्गसिध्द आविष्कार शरीररक्षणाच्या दृष्टीने उपयुक्त असेच असतात. डार्बिनचे हे प्रतिपादन बहुतेक मानसशास्त्रज्ञांना मान्य आहे. केवळ संस्कृतीनेच मनोभावांचा बाह्य आविष्कार निर्धारित झालेला असतो हे काही समाजशास्त्रज्ञांचे (उदा. लँडिस व फेलेकी यांचे) प्रतिपादन पटण्यासारखे नाही. कारण सांस्कृतिक दृष्ट्या भिन्न असलेल्या समाजांमध्येही मनोभावाविष्कारांच्या बाबतीत मूलभूत साम्य असल्याचे दिसून येते. शिवाय भिन्नभिन्न समाजातील व्यक्तीसुध्दा मनोभावव्यंजक चेहर्याची व हावभावांची छायाचित्रे पाहून ते मनोभाव बहुतांशी बरोबर ओळखू शकतात असे प्रयोगांती आढळले आहे.

संस्कृतिवादी प्रतिपादनात तथ्य आहे ते इतकेच की मनोभावांच्या अभिव्यक्तीबाबत समाजपरत्वे अर्थात संस्कृतिपरत्वे काहीसा फरक असतो व मनोभाव व्यक्त करण्याची तर्हा व काही एक शैलीही (स्टाइल) रूढ झालेली असते तसेच ती वाढत्या वयाबरोबर आत्मसात केली जात असते. उदा. काही समाजांमध्ये हर्ष, दुःख ,प्रेम या मनोभावांची अभिव्यक्ती अगदी मुक्तपणे, तर काही समाजात संयम राखून केली जाते. कोठे कोठे आश्चर्य ऑ या उदगाराने तर कोठे कोठे जीभ बाहेर काढून व्यक्त केले जाते.प्रेमभावना चुंबनाने किंवा नाकास नाक लावून अथवा मस्काबघ्राणाने व्यक्त केली जाते. निरनिराळ्या समाजांत मनोभाव व्यक्त करण्याच्या रूढ रीतींमधील भिन्नतेकडे ऑझे क्लाईनबर्ग यांनी लक्ष वेधने आहे.


मनोभावांचे वर्गीकरण : त्या त्या नैसर्गीक अथवा सहजप्रेरणेला अंगभूत असलेले प्राथमिक कोटीचे (प्रायमरी) मनोभाव. एकाच वेळी दोन किंवा अधिक सहजप्रेरणांना चालना मिळाल्यामुळे तत्संबंध मनोभावांच्या मिश्रणातून निर्माण झालेले संमिश्र (ब्लेंडेड) स्वरूपाचे मनोभाव आणि स्मरण, विचार, इच्छा यांसारख्या उच्च मनोव्यापारांच्या सहभागित्वामुळे ज्यांचे अस्तित्व संभवते ते आश्रित (डिराईव्हड) मनोभाव असे मनोभावांचे त्रिविध वर्गीकरण विल्यम मॅकडूगल यांनी केले आहे. त्यानी भय, क्रोध, घृणा, कामलालसा,कळवळा. कुतूहल, आश्चर्य, हर्ष, लघुत्वभावना हे मनोभावे प्राथमिक कोटीचे गणले आहेत. संमिश्र मनोभावंच्या सदरात त्यांनी पुढील मनोभावांचा समावेश केला आहे. भीतियुक्त कुतूहल, आत्मगौरव व क्रोध यांचे मिश्रण अर्थात तिरस्कार आश्चर्य, आदर, लीनता व भिती यामिळूनची स्तिमितता आदरयुक्त भीती अथवा कौतुक क्रोधयुक्त भीती अर्थात द्वेष प्रेम इत्यादी.

आश्रित मनोभावांच्या सदरात मॅकडूगल यांनी समाविष्ट केलेले मनोभाव म्हणजे आत्मविश्वास, आशा, आनंद, नैराश्य, गर्व, चिंता, खेद, खंत, विरहमूलक दुःख, विषाद, पश्चात्ताप, लज्जा, कृतज्ञता, इत्यादी. कारण गतकालीन अनुभवांचे वा कृत्यांचे सुखद असुखद स्मरण, वर्तमान परिस्थितीविषयीचे विचार, भविष्यकालाविषयी व संभाव्य प्रसंगाविषयीचे कल्पनात्मक विचार, इच्छा, आकांशा, संकल्प, निश्चय इ. उच्च कोटीतील मनोव्यापारांमुळे हे मनोभाव संभवतात.

मनोभावविषयक विविध सिध्दांत : मनोभावाविषयी जेम्स व लँग, कॅनन आणि बार्ड,शाक्खटर व सिंगर आणि लॅझॅरस इत्यादींनी आपापले सिध्दांत प्रस्तुत केले आहेत.

जेम्स-लँग सिंध्दात : मनोभावोद्दीपक प्रसंगाचे संवेदन होते, लगेच ह्रदय, फुफ्फुसे, जठर, आतडी इ. अवयवांच्या कार्यात फरक होतो. तसेच स्नायूही तंग वा शिथिल होऊन विशिष्ट प्रकारच्या हालचाली होऊ लागतात. अशा रीतीने जी अनेक वेदने उदभवतात त्यांचा समुच्चय म्हणजेच मनोभाव होय. थोडक्यात म्हणजे मनोभाव हा शारीरिक प्रक्रियांना व प्रतिक्रियांना कारणीभूत नसून त्यांचा तो परिणाम असतो. आपण दुःखामुळे रडतो, संतापामुळे मारतो, भीती वाटली म्हणजे पळतो हा सामान्यतः मानण्यात येणारा कार्यकारण संबंध चुकीचा आहे व खरी वस्तुस्थिती याच्या उलट असते, असे सामान्य समजुतीस धक्का देणार्याथ भाषेत विल्यम जेम्सनी असे म्हटले की आपण हुंदके देऊन रडतो म्हणून दुःखभावना निर्माण होते, मारतो म्हणून राग येतो व थरकाम होतो व पळतो म्हणून भीती वाटते.स्वतःच्या मताचे मंडन करताना त्यांनी प्रश्नरूपाने युक्तीवाद केला तो असा. ह्रदयाचे जलद स्पंदन, श्वासोच्छवासाचा उथळपणा ,ओठांची व शरीराची थरथर वगैरेंची वेदने बाद केली,तर भीती म्हणून काही शिल्लक उरेल का, मुसमुसणे, हुंदके देणे इत्यादीविना दुःख हा मनोभाव असू शकतो का. १०० अंक मोजले, की म्हणजेच हात उगारणे ही क्रिया थोपवून धरल्या, की राग कमी होतो ह्या गोष्टीचाही आधार जेम्स यांनी घेतला. कुशल नट मनोभावांच्या अभिनयात जिवंतपणा आणण्यासाठी मुसमुसणे, हुंदके देणे, जलद श्वासोच्छवास, आक्रमक पवित्रा इ. गोष्टी करतात या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. जेम्स यांचे प्रतिपादन सदोष असल्याचे अनेक मानसशास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे.

कॅनन-बार्ड सिध्दांत : वॉल्टर कॅनन व फिलिप बार्ड यांनी १९२० ते १९३० मध्ये कुत्र्यांवर (मुख्यत्वे क्रोध मनोभावविषयक) प्रयोग केले. मध्य मेंदूतील थॅलमस बधिर केला अथवा कापून टाकला, तर मनोभाव पूर्णांशाने उत्पन्न होत नाही. तो दुखावलातर मनोभावात्मक वर्तन एरवीपेक्षा निराळे होते, थॅलमसविशिष्ट केंद्रे उद्दीपित केल्यास क्षुब्ध प्राणी शांत होतो इ. गोष्टी त्यांना दिसून आल्या (त्यांचा उल्लेख पूर्वी आलाच आहे.) या प्रयोगांच्या आधारे त्यांनी असा सिंध्दात मांडला, की केंद्रीय मज्जासंस्थेतील थॅलमस या भागाचे उद्दीपण हे मनोभावाच्या उत्पत्तीचे मूळ असते.कॅनन-बोर्ड सिध्दांतानुसार (१) व्यक्तीचा अनुभूत मनोभाव आणि शारीरिक प्रतिक्रिया ह्या एकमेकांहून स्वतंत्र असतात. (२) त्या एकाच वेळी उत्पन्न होत असतात. (३) मनोभावोत्पादक प्रसंगी मोठ्या मेंदूपर्यंत मज्जातंतूद्वारे संदेश पोचून त्या प्रसंगाचा बोध होतो, तेथून थॅलामसकडे संदेश जाऊन तेथील केंद्राकडून एरवी होणारा अरोध कमी होतो व स्वायत्त मज्जासंस्थेद्वारा ह्रदयादी अवयवांकडे तसेच स्नायूंच्या दिशेनेही संदेश जाऊ लागतात व त्याच वेळी, मध्य मेंदूतील प्रक्रियांचे संदेश वर मेंदूपृष्ठाकडेही जाऊन मनोभावात्मक प्रत्यय येतो. 

शाक्खटर–सिंगर सिध्दांत : शाक्खटर व सिंगर यांनी अर्थघटनवादी (कॉग्निटिव थिअरीज) सिंध्दात प्रस्तुत केला. त्याच्या मते प्रथम मनोभावोत्पादक प्रसंगाचे संवेदन होते,त्यामागोमाग शरीराची एकंदरीने उत्तेजित अवस्था निर्माण होते. मात्र ती संदिग्ध स्वरूपाची असते. पुष्कळशा मनोभावांच्या बाबतीत त्या अवस्थेचे स्वरूप सारखेच असते. अर्थात तिला स्वतःचा असा निश्चित विशिष्ट अर्थ नसतो. अशा या उत्तेजित अवस्थेचा आपणाकडून प्रसंगोचित असा अर्थ लावला जात असतो व अशा प्रकारे त्या अवस्थेला भीती, क्रोध, प्रेम, आनंद इ. नावे मिळतात. या सिध्दांतास प्रयोगाद्वारे पुष्टी मिळते ती अशी, की एथिल अल्कोहोलसारखे द्रव्य सेवन केले, की शरीराची उत्तेजित अवस्था होते आणि मग व्यक्तीला त्यावेळच्या प्रसंगाचा जो बोध होईल त्यानुसार हा किंवा तो मनोभाव व्यक्ती अनुभवू लागते.

रिचर्ड लॅझॅरस यांचा अर्थविवरणवादी सिध्दांत : हा काहीसा वेगळा आहे. प्रसंगाचा व्यक्तीने लावलेला अर्थ, तिला होणारा अर्थबोध (अप्रेसल) यावर त्यांनी भर दिला आहे व म्हटले आहे. की त्यावेळची परिस्थिती, व्यक्तीचे पूर्वीचे अनुभव व अमुक तर्हेमचे प्रतिक्रियात्मक वर्तन करण्याची प्रवृत्ती या सर्वावर प्रसंगाचे अर्थविवरण (इंटरप्रिटेशन) अवलंबून असते. या सिंध्दांतात असेही गृहीत धरलेले आहे, की मनोभावांशी निगडीत असलेल्या शारीरिक प्रक्रियांचा रूपबंध मनोभावागणिक भिन्नभिन्न प्रकारचा असतो. या सिध्दांतात असेही म्हटले आहे, की प्रसंगाचा अर्थ, शारीरिक अवस्थेचा अर्थ तसेच त्यावेळी होऊ पहाणार्य प्रतिक्रियेच्या परिणामाची कल्पना या गोष्टीनुसार मनोभाव निर्माण होत असतो.

  मनोभावांचा आरोग्याशी संबंध : मनोभावानुभवाशी स्वायत्त मज्जासंस्थेचे उद्दीपन व त्यामुळे ग्रंथीचे स्त्राव तसेच ह्रदय, जठर, आतडी इ. अवयवांच्या कार्यातील बदल निगडित असतात तसेच शरीरात ऊर्जेचे विमोचन अधिक प्रमाणात होत असते. त्या ऊर्जेला कायिक स्वरूपाची म्हणा अथवा वाचिक स्वरूपाची म्हणा वाट मिळणे व व्यक्तीचे समवस्थापन वा संतुलन होणे महत्वाचे असते. मानसिक व शारीरिक क्षुब्धतेचा अतिरेक होऊ न देणे हे व्यक्ति-व्यक्तितील संबंधाच्या आणि समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने जितके महत्वाचे असते, तितकेच , व्यक्तीच्या प्रकृतिस्वास्थ्याच्या दृष्टीने जितके महत्वाचे असते,तितकेच ,व्यक्तीच्या प्रकृतिस्वास्थ्याच्या दृष्टीने तिच्या मनोभावांना वाट मिळणेही महत्वाचे असते. मनोभावांचे संपूर्ण दमन केले गेले, तर ते मनोविकृतींना कारणीभूत होऊ शकते. भय, क्रोध यांसारखे मनोभाव वारंवार उत्पन्न होत राहिले तर तसेच त्यांच्यामुळे उत्पन्न झालेल्या ऊर्जेचा निचरा न होता मनोभावयुक्त शरीरांतर्गत प्रक्रिया तशाच होत राहिल्या, तर प्रकृती पोखरली जाते व मनोदैहिक (सायकोसोमॅटिक) व्याधी, उदा. जठरात व आतड्यांत व्रण, शरीरास कंप, अपचन इ. निर्माण होतात.

अकोलकर, व.वि.


नवे संशोधन : मनोभावात्मक वर्तनाविषयी कॅनन-बार्ड सिध्दांतानंतर गेल्या ४० वर्षात जे संशोधन झाले त्याच्या (१) मनोभावाची शारीरिक अभिव्यक्ती व (२) मनोभावात्म वर्तनात मध्यवर्ती मज्जासंस्थेचे कार्य ह्या दोन दिशा आहेत.

कॅनन जेम्स लँग सिध्दांताचे खंडन करताना म्हटले होते, की भय व क्रोध ह्या दोन मनोभावांव्यक्तिरिक्त अन्य मनोभावांमधील शारीरिक अभिव्यक्तीचे वेगवेगळे आकारबंध दिसत नाहीत, तथापि मनोभावातील अंतरावयांच्या कार्यशीलतेचे सखोल निरीक्षण करताना केवळ दोनच नव्हे तर आनंद, भय, दुःख व क्रोध या चार मनोभावांतील अंतरावयवांच्या क्रियाशालतेचे विविध आकारबंध फुफ्फुसे, ह्रदय, यकृत, उदर, पित्ताशय़, मूत्रपिंड, या अंतरावयवांवर दिसून आले. मापनातील नमुने घेणे व मनोभावावरील परिणामाची विश्वसनीय नोंद घेणे यांतील अडचणीमुळे या दिशेने विशेष संशोधन मात्र होऊ शकले नाही.

दुसऱ्या दिशेने झालेले संशोधन मात्र बर्यातच प्रगत टप्प्यावर येऊन ते मुख्यत्वे कॅनन-बार्ड सिध्दांताचा पडताळा पाहण्याच्या हेतूने झाले आणि त्याच्याही बरेच पुढे गेले आहे.

कॅनन-बार्ड सिध्दांतात थॅलामस म्हणून निर्दिष्ट केलेला मेंदूचा भाग आता पारमस्तिष्क (डीएनसेफॅलॉन) म्हणून ओळखला जातो, त्यात थॅलामस,उपथॅलामस व अधोथॅलामस हे तीन प्रमुख विभाग त्यांच्या भिन्न कार्यामुळे ओळखले जातात. यांतील अधोथॅलामसचा मनोभावात्मक वर्तनाशी घनिष्ठ संबंध आहे. पारमस्तिष्काच्या भोवताली असलेले वक्रकर्णिका (सिंग्युलेट गायरस) भित्तीकापट (सेप्टल रिजन) अँमिगडाला, जलाश्व पिंड (हिपोकँपस), जलाश्व कर्णिका (हिपोकँपल गायरस) व कूचाकार पिंड (मॅमिलरी बॉडीज) हे भाग अलीकडे ज्ञात झाले असून ते पारमस्तिष्काभोवती कडीप्रमाणे स्थित आहेत. या सर्वामिळून लिंबिक तंत्र म्हणतात. या भागांचे एकमेकांशी तसेच अधोथॅलामसशी गुंतागुंतीचे संबंध आहेत. या सर्व भागांतून जाणारे मज्जाप्रवाह अखेरीस अधोथॅलामसमध्ये येतात व तेथून ते एकाबाजूने बाह्यकाकडे (कॉर्टेक्स) रवाना होतात, तर दुसऱ्या बाजूने ते स्वायत्त मज्जासंस्थाकडे जातात. म्हणजे अधोथॅलामस हे मनोभावात्मक वर्तनाचे नियंत्रक केंद्र आहे आणि जलाश्व पिंड, जलाश्व कर्णिका व मेंदूतील अग्रखंडाचा बाह्यक हे मनोभावाच्या शारीरिक अभिव्यक्तीची संस्कंरण (मॉड्यूलेशन) केंद्रे आहेत. हे संशोधन मेंदूत हव्या त्या ठिकाणी व हव्या तितक्या खोलीवर सूक्ष्म विद्युत-अग्रे (मायक्रोइलेक्ट्रोडस) रोवून त्यांच्याद्वारा तो भाग उद्दीपित करून अथवा भाजून निकामी करून अथवा विद्युत-अग्रावर न्यूनीकृत ट्रान्समीटर बसवून त्या भागातील मज्जाप्रवाहांचे निरीक्षण करण्याच्या तंत्रामुळे शक्य झाले आहे.

अधोथॅलामलच्या तळातील पाठीकडच्या भागाचे उद्दीपण केले असता, सहानुकंपी मज्जासंस्थेत प्रवाह सुरू होतात व त्याच्याशी संबंधित अंतरावयव व स्नायू कार्यान्वित होतात, तर तळातील अग्रभागाचे उद्दीपन केल्यास परासहानुकंपी मज्जासंस्थेत प्रवाह सुरू होऊन त्याच्याशी संलग्न अंतरावयव व स्नायू कार्यान्वित होतात.

होअबेल यांनी हिंसक वा आक्रमक वर्तनाचे रासायनिक गुणधर्म निश्चित केले आहेत. हिंस्त्र वर्तनात सहानुकंपी मज्जासंस्थेतील मज्जासंधिप्रसारक (सिनॅपटिक ट्रान्समीटर) द्रव्य अँसिटीलकोलीन चा केंद्रीय कार्यभाग असतो. हे द्रव्य हिंसक नसलेल्या प्राण्यास टोचल्यास ते हिंसक वर्तन करतात तसेच या द्रव्याचे निरोधन करणारे अंसिटीलकोलीनेन्ट्रेस हिंसक प्राण्यास टोचल्यास ते अहिंसक व शांत बनतात. विविध मनोभावावस्थेतील प्राण्यांच्या रक्तातील विशिष्ट द्रव्यांचे प्रमाण कसे वाढते/कमी होते याबाबतही संशोधन झाले आहे.

दोन्ही बाजूच्या अँणिग्डाला पिंडाचे उच्छेदन केल्यास उग्र व आक्रमक प्राणी नम्र व निष्क्रिय बनतात. तर या विभागाचे उद्दीपन केल्यास शांत प्राणी उग्र व हल्लेखोर बनतात. असेही विविध प्रयोगात आढळले आहे. द्विपार्श्विय अँमिग्डालाचे उच्छेदन करून माकडांमधील वर्चस्वक्रमही बदलता येतो. यथाय्रोग्य मज्जासंदेश मिळूनसुध्दा सामाजिक संबंधाचा मनोभावात्मक वर्तनावर महत्वाचा प्रभाव पडतो,असेही दिसून आले आहे. अँमिग्डाला पिंडाचा विशिष्ट भाग भयवर्तनाचे नियंत्रण करतो असे माकडांवरील व मनोरूग्णावरील प्रयोगांवरून दिसून आले. भित्तीका पिंडामध्ये सुखोत्पादक तसेच वेदनोत्पादक तध्दतच क्रोधजनक व शांतकारक अलग अलग केंद्रे आहेत. असे ओल्डस व मिल्नर यांनी उंदरावर केलेल्या व डेग्लादोने साठीमारीच्या वळूवर (मेटॅडोर) केलेल्या प्रयोगांत निष्पन्न झाले.

जलाश्व पिंडाचे रसायनाद्वारे उद्दीपन केल्यास आक्रमक वर्तन तीव्र बनते व या भागाचे उच्छेदन केल्यास पोष (पिट्युइटरी) ग्रंथीच्या ACTH स्त्रावाचे प्रमाण कमी होऊन अधिवृक्क ग्रंथीचा स्त्रावही कमी होतो आणि प्राणी तणावयुक्त (स्ट्रेस) परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊ शकत नाही. हा ताण वाढत जातो व त्याचे दुष्परिणामही दिसतात. हान्स सिल्ये यांच्या मताप्रमाणे ACTH स्त्रावन्यूनतेमुळे अधिवृक्क स्त्रावात घट होऊन रक्तात पोटॅशियम घन आयोन (K+) वाढतात आणि मज्जासंस्थेचे पुन्हा भरून न येणारे नुकसान होते.

मेंदूच्या पूर्वपालट खंडाचे उच्छेदन केल्यास चिपँझी माकडांत निराशादर्शक तसेच चिडखोरपणाच्या प्रतिक्रिया दिसत नाहीत तसेच चिंताग्रस्तताही दिसत नाही. आक्रमक प्राणी या भागाच्या उच्छेदनाने मवाळ बनतात. यावरून मोनिझ यांनी बेफाम बनलेल्या मनोरूग्णावर पूर्वललाटखंडछेदनाची शस्त्रक्रिया करून उपचार करण्याचे तंत्र शोधून काढले. त्यामुळे अतिचिंताग्रस्तता, भावातिरेकता (ऑबसेशन) तसेस क्रोधावर्तन कमी होते. पण त्याच सोबत रूग्णाची सामाजिक जाणीवही नष्ट होते. म्हणून मानसोपचारतज्ञ या शस्त्रक्रियेचा फारसा वापर करीत नाहीत.

डेल्गादो यांनी भावनिक मनोरूग्णांच्या लिंबिक तंत्रातील विविध क्षंत्रामध्ये सूक्ष्म विद्युत-अग्रे बसवून आणि त्यांना सूक्ष्म द्विमार्गी ट्रांझिस्टर जोडून रेडिओ लहरीद्वारा ह्या क्षेत्राचे उद्दिपन करण्याचे व तेथील मज्जाप्रवाहांचे नोंद ठेवण्याचे प्रयोग केले. मनोरूग्णांतील क्रोध, भय,चिंता, सुख, दुःख, निर्वस्तुभ्रम, संभ्रम इ. मनोभावांचे या पध्दतीने निरीक्षण करून त्यांच्या अनिष्ट वर्तनावर काबू मनोरंजक चौरसमराठी विश्वकोश : १२ठेवता येतो असे दाखवून दिले. ही संशोधनाची दिशा आता मनोरूग्णांना उपकारक ठरत आहे. 

  भोपटकर, चिं.त्र्यं.

संदर्भ :  1. Arnold, Magda, Ed.The Nature of Enotion Baltimore, 1968.

             2. Arnold, Magda Emotion and Personallty, 2 Vols, New York, 1960.

             3. Cannon, W.B. Bodily Changes in Pain, Hunger, Fear and Rage, New York, 1929.

             4. Delgado,j.M.R. Physical Context of Mind, Harmondsworth, 1975.

             5.Dunbar H.F. Emotions and Bodily Changes, New York, 1938.

             6. Gelhorn,E Loofbourrow, G.N. Emotions and Emotional Disorders, New York, 1963.

             7. Grings, W.W. Dawson M. Emotions and Bodlly Responses, New York, 1978.

             8. Hillman,J. Emotion A Comprehensive Phemomenology of Theories and their Meanings  for Therapy, London. 1960.

             9. Jones, M.R.Ed Nebraska Symposium on Motivation Nebraska, 1959.

            10. Mc Dougall, William, Energies of Men, London, 1932.

            11. Plutchik Robert, The Emotions, Facts, Theories and a New Model, London,1962.

            12. Strongman K.T. The Psychology of Emotion New York, 1978.

            13. Thompson R.H. Foundations of Physiological Psychology New York, 1967.

            14. Wenger, M.A. Johes F.N.Jones, M.H. Physiological Psychology Constable 1956.