आक्रमक वर्तन : विरोधास न जुमानता आपले इच्छित कार्य साध्य करून घेण्यासाठी पुढे जात राहणे, हा आक्रमक वर्तनाचा व्यापक अर्थ असला, तरी मानसशास्त्रात सामान्यत: अभिप्रेत असलेला त्याचा अर्थ मर्यादित आहे. तो असा : इतरांवर शारीरिक स्वरूपाचा किंवा शाब्दिक स्वरूपाचा हल्ला करणे किंवा इतरांच्या वस्तूंची हानी करणे किंवा त्यांच्या हितास बाध आणण्याचे प्रयत्न करणे.

लहान मुलांचे आक्रस्ताळी तणतणणे, भावंडांवर व मोठ्यांवर हात टाकणे, किशोरांची बंडखोरी, समाजातील प्रबळ वर्गाकडून दुर्बळ वर्गावर होणारे अत्याचार व छळ, राजकीय सत्तेचे पक्षपाती धोरण व वर्तन, समाजावर चिडून व त्याच्याशी शत्रुत्व करून करण्यात येणारे गुन्हे, राष्ट्राराष्ट्रांमधील कारस्थाने आणि प्रत्यक्ष वा शीत युद्धे, वंशश्रेष्ठतेच्या भावनेतून करण्यात येणारी आततायी कृत्ये यांसारखे आक्रमकतेचे आविष्कार कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा सर्वच क्षेत्रांत आढळतात. बाह्य विषयावर केंद्रित झालेली आक्रमकता अवरुद्ध झाली, की तिचा रोख व्यक्ती स्वत:वरच वळवून आत्महत्येसदेखील प्रवृत्त होते [→आत्महत्या]. या सर्व गोष्टींमुळे आक्रमक वर्तन ही एक मानसशास्त्रीय समस्या ठरली आहे. 

आक्रमकता ही एक स्वतंत्र अशी सहजप्रवृत्ती आहे, हे विल्यम मॅक्‌डूगलचे (१८७१—१९३८) प्रारंभीचे मत नंतर बहुतांशी मागे पडले असले, तरी सहजप्रेरणांशी तिचा संबंध लावण्याकडे मात्र पुष्कळांचा कल अजूनही कायम आहे. 

ॲल्फ्रेड ॲड्‌लरच्या (१८७०—१९३७) मते सत्तेची इच्छा हा व्यक्तिमात्राचा स्वभावच आहे आणि आक्रमकता हा तिचाच आविष्कार होय. सिग्मंड फ्रॉइडने (१८५६—१९३९) पहिल्या जागतिक युद्धाने आलेल्या निराशामय मन:स्थितीत (१९२०) असे प्रतिपादन केले, की जीवमात्राच्या ठिकाणी ज्याप्रमाणे स्वरक्षणाच्या व कामतृप्तीच्या प्रेरणा निसर्गसिद्ध असतात, तशीच सर्व उद्दीपकांपासून मुक्त अशा अवस्थेकडे जाण्याचीही प्रेरणा निसर्गसिद्ध असते. तिला फ्रॉइडने ‘मृत्यु-प्रेरणा’ किंवा ‘आत्मविनाशप्रेरणा’ (डेथ-इन्स्टिंक्ट) असे नाव दिले. जोवर जीवरक्षणाच्या प्रेरणांचा जोर असतो, तोवर आक्रमकतेचा रोख इतरांवर असतो पण शेवटीशेवटी तो स्वत:कडे वळतो व व्यक्तीला मृत्यूचे आकर्षण वाटू लागते, असे स्थूलमानाने फ्रॉईडचे प्रतिपादन आहे. जॉन डॉलार, एन्. ई. मिलर वगैरेंच्या सिद्धांतांनुसार एखाद्या साध्याच्या दिशेने चालू असलेल्या व्यक्तीच्या प्रयत्नांत अवरोध निर्माण झाला, की वैफल्यभावना व क्रोध

उत्पन्न होतात आणि त्यांमुळे संभवणाऱ्या विविध प्रतिक्रियांपैकी एक प्रतिक्रिया आक्रमक वर्तनाची असते. व्यक्तीच्या उद्युक्त प्रेरणेच्या तीव्रतेच्या प्रमाणात तिचे आक्रमक वर्तन होत असते.

प्रेरणात्मक अतृप्तीला व तज्जन्य आक्रमकतेला सर्वसाधारणपणे पुढील निमित्ते असू शकतात :आपल्याकडे हवे तितके लक्ष दिले जात नाही वा आपल्याला जे हवे ते मिळत नाही, असे बालकांना दिसले वा वाटले, की त्यांच्या ठिकाणी असुरक्षिततेची भावना निर्माण होते व मग संबंधितांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ती आक्रमक वर्तन करतात. कुटुंबपालकांच्या कडक शिस्तीमुळे व हुकुमशाही वृत्तीमुळे किशोरांच्या ठिकाणी आक्रमकता निर्माण होते. शारीरिक व्यंग किंवा बौद्धिक कमतरता किंवा एखादी अन्य प्रकारची उणीव (उदा., वंध्यत्व, नपुंसकत्व इ.) इत्यादींमुळे निर्माण होणाऱ्या असंतुष्टतेची भरपाई म्हणूनदेखील आक्रमक वर्तनाचा अवलंब केला जातो. आर्थिक वा अन्य बाबींमुळे वाटणारी चिंता हीदेखील आक्रमकतेच्या मुळाशी असू शकते. काही व्यक्तींची अतृप्तीचा ताण सहन करण्याची शक्ती जन्मत:च कमी असते. आणि या अर्थाने आक्रमक वर्तनाकडे त्यांचा स्वाभाविकपणेच अधिक कल असतो. तेव्हा व्यक्तीचा पिंड आणि परिस्थिती हे दोन्हीही घटक आक्रमक वर्तनाला कारणीभूत ठरतात, असे मानणे युक्त ठरावे. 

व्यक्तिजीवनाच्या पूर्वार्धात आक्रमक वर्तनाचे प्रमाण अधिक असते. वाढत्या वयाबरोबर आक्रमक वृत्तीला विधायक कार्याच्या रुपाने वाटही करून देण्यात येते. उतरत्या वयात मात्र आक्रमकतेची प्रवृत्ती कमी कमी होत जाते. आक्रमक वृत्ती काही प्रमाणात जीवनकलहात आवश्यक असली, तरी तिचा अतिरेक मात्र सामाजिक स्वास्थ्याच्या व खुद्द व्यक्तीच्या हिताच्या दृष्टीने अनिष्टच ठरतो. 

संदर्भ : 1. Berkowitz, Leonard, Aggression: A Social Psychological Analysis, New York, 1962.

           2. Dollard, John and Others, Frustration and Aggression, New Haven, 1939.

अकोलकर, व. वि.