पराहम् : (सुपर एगो). सिग्मंड फ्रॉइडने व्यक्तिमानसाचे कार्यलक्षी दृष्टिकोणातून विश्लेषण करून त्याचे तीन घटक अथवा अंगे स्पष्ट केली, ती अशी : (१) प्राकृत प्रवृत्ती वा इदम् (इड), (२) विशेषेकरून सामाजिक वास्तवाचा परिसर लक्षात घेऊन प्राकृत प्रेरणांचे यथायोग्य व्यवस्थापन करू पाहणारा अहम् (एगो) आणि (३) त्या अहंमध्येच निर्माण होणारा ‘पराहं’संज्ञक स्तर. सामान्यत: सदसद्विवेकबुद्धी वा मनोदेवता म्हणून संबोधिला जाणारा घटक म्हणजेच हा परहम्.

व्यक्तीतील हा पराहम् तीन प्रकारची कार्ये करतो : तो अहंचा निरीक्षक-समीक्षक असतो, तसेच अहंसमोर सतत आदर्श ठेवण्याचे व त्यावर नैतिक बंधने घालण्याचे कार्य करीत असतो. त्या आदर्शांनुसार व आदेशांनुसार व्यक्तीचा अहम् प्राकृत प्रेरणांना वाट व वळण देण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्या आदर्शाला अनुलक्षून स्वत:चे मूल्यमापन करीत असतो. जेव्हा जेव्हा पराहम् व अहम् या दोहोंमध्ये तणाव येतो व अहम् त्या आदर्शाच्या दिशेपासून दूर जातो तेव्हा तेव्हा अपराधभाव, आत्मदूषण, स्वत:स शिक्षा करून घेण्याची इच्छा, लघुताभाव इ. लक्षणे व्यक्तीच्या ठिकाणी दिसू लागतात.

पराहंविषयीचे फ्रॉइडचे विवेचन प्राकृतिक (नॅचरॅलिस्टिक) दृष्टिकोणास अनुसरून आहे. पराहम् वा सदसद्विवेकबुद्धी म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी मूलतःच असलेला दैवी अंश नसून, व्यक्तीच्या बालपणी त्याचा उद्गम होत असतो, असे फ्रॉइडचे प्रतिपादन आहे. बाल्यावस्थेत बालकाचे मातापित्यांशी पूर्ण तादात्म्य असते व त्यामुळे त्यांचा आदर्श व कठोर अधिकारवाणीने त्यांनी दिलेले आदेश बालक आत्मसात करते. इतर मोठ्या मंडळींचे व शिक्षकांचेही आदेश त्यात असतात. अशा रीतीने या आदर्शांचे व आदेशांचे अंतःक्षेपण (इंट्रॉजेक्शन) होऊन व्यक्तीच्या ठिकाणी जणू आतून स्वयंनियमन करणारा श्रेष्ठ अहम् अस्तित्वात येतो, असे फ्रॉइडने म्हटले आहे. अंतःक्षेपण प्रक्रियेने आत्मसात होणारे हे मातापित्यांचे आणि शिक्षकांचे आदेश परंपरागत मूल्यांना धरून असतात. साहजिकच, व्यक्तीचा पराहम् हा परंपरागत मूल्यांची जपणूक करणारा ठरतो.

पहा : मनोविश्लेषण.

संदर्भ : 1. Freud, Sigmund Trans. New Introductory Lectures on Psychoanalysis, New York, 1933.

2. Freud, Sigmund Trans. The Ego and The Id, London, 1947.

 अकोलकर, व. वि.