वॉलस, ग्रॅहॅम : (३१ मे १८५८-१० ऑगस्ट १९३२). इंग्रज शिक्षणतज्ञ व समाजशास्त्रज्ञ. जन्म संडर्लंड त्याच्या घरात कडक प्यूरिटन वातावरण होते. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले (१८७७-८१). त्यानंतर काही काळ तो शिक्षक होता (१८८१-९०). १८८६ मध्ये ‘फेबिअन सोसायटी’ चा तो सदस्य झाला. इंग्लंडमध्ये सनदशीर व वैध मार्गांनी समाजवादाची स्थापना करणे हा ह्या सोसायटीचा उद्देश होता. फेबिअन एसेज इन सोशॅलिझम (१८८९) ह्या बर्नार्ड शॉसंपादित ग्रंथात त्याने काही लेखन केले आहे. तथापि ‘फेबिअन सोसायटी’च्या प्रमुख सदस्यांशी मतभेद झाल्यामुळे त्याने आधी सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचा (१८९५) आणि नंतर सोसायटीचा (१९०४) राजीनामा दिला. १८९५ पासून तो ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ मध्ये शिकवू लागला. तेथूनच १९२३ साली तो निवृत्त झाला. १९१४ पासून लंडन विद्यापीठात तो राज्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणूनही काम करीत होता. द लाइफ ऑफ फ्रान्सिस प्लेस (१८९८), ह्यूमन नेचर इन पॉलिटिक्स (१९०८), द ग्रेट सोसायटी (१९१४) हे त्याचे काही उल्लेखनीय ग्रंथ होत.

राजकीय विचारवंतांनी मानशास्त्राची केलेली उपेक्षा त्याला अनुचित वाटत होती. राजकीय वर्तनाच्या मानसशास्त्रीय बाजूकडे अधिक लक्ष पुरवले पाहिजे, ही भूमिका ह्यूमन नेचर इन पॉलिटिक्स मध्ये दिसून येते. द ग्रेट सोसायटीमध्ये ह्यूमन नेचर … मधल्या विषयांचाच विस्ताराने परामर्श घेतलेला दिसतो. व्यामिश्र औद्योगिक समाजात दिसून येणाऱ्या मानवी स्वभावाचे परीक्षण-विवेचन त्यात केले आहे. विसाव्या शतकातील इंग्लंडमधील राजकीय विचारांची व्याप्ती आणि सखोलता वाढविण्याच्या कामी ह्या पुस्तकांचे योगदान महत्त्वाचे आहे.

प्रत्येक मानवी कृती ही एका बौद्धिक प्रक्रियेचा परिपाक असते, असे गृहीत धरणे धोक्याचे-विशेषतः लोकशाही समाजव्यवस्थेत-आहे, असे वॉलसचे मत होते. मानवी वर्तन व सामाजिक बाबी ह्यांना डार्विनच्या उत्क्रांतिवादाची तत्त्वे लागू करण्याच्या प्रवृत्तीचे त्याने खंडन केले. मानवी स्वभावाच्या संदर्भात मानसशस्त्रज्ञांना जे नवे आणि महत्त्वाचे शोध लागले त्यांची काही दखल समाजशास्त्राने घेतली पण राज्यशास्त्राने ती घेतली नाही, अशी खंत त्याने व्यक्ती केली. लंडन येथे तो निधन पावला.

कुलकर्णी. अ. र.