व्यक्तिमत्त्व : (पर्सनॅलिटी). ‘व्यक्तिमत्त्व’ या पदास समानार्थक असलेला इंग्रजी शब्द ‘पर्सनॅलिटी’ हा लॅटिन भाषेतील ‘पर्सोना’ या शब्दावरून आलेला आहे. ‘पर्सोना’ म्हणजे मुखवटा. प्राचीन काळी ग्रीक-रोमन नाटकांतील पात्रे आपापल्या भूमिकेशी सुसंगत असे मुखवटे धारण करीत. त्यानुसार ‘व्यक्तिमत्त्व’ म्हणजे ‘व्यक्तीचे दर्शनी स्वरूप’ असा व्युप्तत्त्यर्थ निष्पन्न होतो. व्यक्तिमत्त्वाच्या या दर्शनी मुखवट्यामागे काही वेगळे लपलेले असण्याची शक्यता आहे, असेही त्या पदाने सुचविले जाते.

अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ⇨ गॉर्डन विलर्ड ऑल्पोर्ट यांनी व्यक्तिमत्त्व या पदाच्या ५० व्याख्या विविध ग्रंथांमधून गोळा केलेल्या आहेत. त्यांतल्या काही व्याख्या व्यक्तीच्या बाह्य रूपावर भर देणाऱ्या आहेत काही तिच्या प्रधान वैशिष्ट्यांवर भर देणाऱ्या आहेत तर काही व्यक्तिमत्त्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘स्वत्वा’च्या संकल्पनेवर भर देणाऱ्या आहेत.

ऑल्पोर्ट यांची व्यक्तिमत्त्वाची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे : ‘व्यक्तिमत्त्व म्हणजे व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण आचार-विचार तथा वर्तनव्यवहार निर्धारित करणारे, तिच्या मनोदैहिक संस्थांचे गतिशील संघटन होय’  या व्याख्येनुसार (१) व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात, शारीरिक गुणधर्मांसोबत मानसिक वैशिष्ट्यांचाही अंतर्भाव होतो. (२) शारीरिक वैशिष्ट्ये आणि मानसिक वैशिष्ट्ये ही परस्परांशी निगडित असून त्यांचा परस्परांवर प्रभाव पडत असतो. (३) व्यक्तिमत्त्वात अभिप्रेत असलेले मनोदैहिक गुणधर्मांचे संघटन हे गतिशील असते. म्हणजेच व्यक्तिमत्त्व हे नित्य-परिवर्तनीय व विकसनशील असते.

व्यक्तिमत्त्वाची नियंत्रके : व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वास त्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप पिंडगत तसेच परिसरीय घटकांमुळे प्राप्त होते. व्यक्तिमत्त्व कोणालाही जन्मत:च पूर्णावस्थेत प्राप्त होत नसते. ते सतत विकसित होत असते. व्यक्तिमत्त्वामधील विविध गुणच्छटा विकसित होत असतात. व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यातील गुणच्छटांचा विकास हा अनुवंश आणि आसमंत या दोहोंच्या संयुक्त प्रभावानुसार घडून येतो. शरीरातील अवयवांची रचना, रासायनिक प्रक्रिया, कौटुंबिक वातावरण तसेच सामाजिक परिसर, व्यक्तीला वेळोवेळी धारण कराव्या लागणाऱ्या भूमिका तसेच तिच्या डोळ्यांपुढील आदर्श या सर्वांचा व्यक्तिमत्त्वविकासावर प्रभाव पडत असतो. वाढत्या वयात मूल हे नातेवाइकांच्या, शेजार्यांदच्या, समवयस्कांच्या, शालेय सवंगड्यांच्या, शिक्षकादींच्या संपर्कात येते. त्या-त्या वेळी त्याला येणाऱ्या अनुभवांनी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला बरेवाईट वळण लागत जाते.

व्यक्तिमत्त्वाच्या गुणच्छटा : (ट्रेट्स). जो गुणधर्म अथवा वर्तनविशेष एखादा मनुष्य विविध प्रसंगांत सातत्याने व सवयीनुसार प्रदर्शित करतो, त्या गुणधर्मास व्यक्तिमत्त्वाचा पैलू अथवा गुणच्छटा असे म्हणतात. जर माणूस एखाददुसऱ्या प्रसंगी संतापला, तर तेवढ्यावरून आपण त्याला ‘तापट’ अथवा ‘रागीट’ स्वभावाचा ठरवीत नाही परंतु तो जर वारंवार क्षुल्लक कारणांवरून संतापू लागला, तर मात्र तो संतापी, तापट, चिडखोर स्वभावाचा आहे, असे आपण म्हणतो. म्हणजेच तापट स्वभाव हा त्याच व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू आहे, असे आपण ठरवितो. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अशा पैलूंचा, गुणच्छटांचा समुच्चय होय.

तथापि व्यक्तिमत्त्व म्हणजे विविध गुणच्छटांची केवळ गोळाबेरीज नव्हे. व्यक्तिमत्त्वात या पैलूंची अनन्यसाधारण गुंफण होत असते व ती व्यक्तिपरत्वे अनन्यसाधारण असते. प्रत्येक व्यक्तीच्या ठायी काहीएक वैशिष्ट्यपूर्ण एकात्मता असते.

विविध गुणच्छटा व्यक्तीला येणाऱ्या विविध अनुभवांनी, सामाजिक आंतरक्रियांद्वारे, तसेच अनुवंश आणि आसमंत या दोहोंच्या संयुक्त प्रभावाने विकसित होत जातात.

प्रत्येक गुणच्छटा तिच्या विशुद्ध स्वरूपात एक टोकाची वर्तनप्रवृत्ती असते. सामान्यत: माणसांच्या ठायी दोन परस्परविरोधी गुणच्छटा एकत्र नांदतात. म्हणजेच, व्यक्तिमत्त्वात परस्परविरोधी गुणच्छटांची सरमिसळ होते. उदा. प्रत्येक व्यक्ती अंशत: विवेकशील व अंशत: भावनाप्रवण असते. गुणच्छटांची अशी सरमिसळ त्यांच्या विशुद्ध स्वरूपातील आत्यंतिकता सौम्य करते.

जी. डब्ल्यू. ऑल्पोर्ट आणि एच. एस. ओडबर्ट या मानसशास्त्रज्ञ-द्वयांनी प्राथमिक गुणच्छटा आणि त्यांच्या विरोधी गुणच्छटा यांच्या बारा जोड्या दिलेल्या आहेत :

प्राथमिक गुणच्छटाविरोधी

गुणच्छटा 

१) मुक्त भावनाव्यिक्ती :

भावनानियंत्रण 

२) बुद्धिचातुर्य :

मंदबुद्धित्व 

३) परिपक्वता :

अपरिपक्वता 

४) प्रभुत्वप्रियता :

श्रिणागतिप्रवणता 

५) आनंदी :

वृत्तीनिरुत्साह 

६) कार्य-सातत्य :

चंचलवृत्ती 

७) साहसप्रियता :

भित्रेपणा 

८) स्वतंत्र वृत्ती :

परावलंबन 

९) सुसंस्कृत सफाईदारपणा :

गावढळ गलथानपणा 

१०) समजूतदार वृत्ती :

संशयखोर वृत्ती 

११) सामाजिक बंडखोरी :

रूढिप्रियता 

१२) विवेकशीलता :

भाबडेपणा 

व्यक्तिमत्त्व आणि स्वत्व : ‘स्वत्व’ (सेल्फ) हे व्यक्तिमत्त्वाच्या केंद्रस्थानी असते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वत्वाची, आपल्या स्वीय तदेवतेची (पर्सनल आयडेंटिटी) जाणीव असते. व्यक्तीला जीवनात नाना प्रसंगी नाना भूमिका घ्याव्या लागतात, अनेक सोंगे आणावी लागतात. तथापि, अशा सर्व प्रसंगांत, तिची स्वत्वविषयक जाणीव अबाधित राहते.

व्यक्तीची स्वत्व-भावना अनुभववशात अनेक परिसरीय गोष्टींकडे आकृष्ट होते व्यापक होत जाते. हे माझे शरीर, हे माझे आईवडील, ही माझी भावंडे, हे माझे घर, हे माझे मित्र, हे माझे सगेसोयरे, ही माझी शाळा, हा माझा देश-अशा टप्प्याटप्प्यांनी व्यक्तीचे स्वत्व विशाल होत जाते. काही व्यक्तींचे स्वत्व ‘हे विश्वचि माझे घर’ असे मानण्याइतपत विकसित होते. अशा विश्वव्यापकतेप्रत विकसित होणाऱ्या स्वत्वामुळे व्यक्तिमत्त्वाला काहीएक उदात्तता व थोरवी प्राप्त होते.

व्यक्तिमत्त्वविकास आणि सुधारणा : आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा करावयाचा, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व कसे संपादन करावयाचे यासंबंधाने कोणतीही सुनिश्चित नियमावली सांगता येत नाही. कारण जो नियम एकाच्या बाबतीत फलद्रूप झाला, तो दुसऱ्याच्या बाबतीत फलद्रूप होईलच, असे म्हणता येत नाही. तथापि योग्य दिशेने प्रयत्न केल्यास व्यक्तिमत्त्वाची सुधारणा किंवा चारित्र्याचे उन्नयन साधणे, ही अगदीच अशक्यप्राय अशी गोष्ट नाही. यशस्वी व थोर माणसांचा कित्ता गिरवून आपले व्यक्तिमत्त्व थोडेफार सुधारता येते, असा अनेकांचा अनुभव आहे. व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी, स्वत:च्या अनिष्ट सवयी सोडण्याची तयारी ठेवावी लागते. त्याचप्रमाणे एका क्षेतात प्रगती करणे साधत नसेल, तर अन्य क्षेत्रात यश मिळविण्याचा प्रयत्न करणे हितावह ठरते. उदा. ज्याला अभ्यासात प्रगती करणे जमत नाही, अशा मुलाने कोणत्या ना कोणत्या खेळात प्रावीण्य मिळविण्याचा प्रयत्न करणे इष्ट फलदायक असते.


व्यक्तिमत्त्वसंबंधाने कधीकधी गंभीर समस्या उद्‌भवतात. अशा वेळी चांगल्या तज्ञ माणसांचा, प्रेमळ गुरुजनांचा, विश्वासू, मित्रादिकांचा सल्ला घेणे हिताचे असते. व्यक्तिमत्त्व सुधारणे ही गोष्ट तशी खडतर असली, तरी अशक्य नसते.

एरिक एरिकसन (१९०२–९४) यांच्या मते प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व हे जन्मापासूनच आकारित होत असते. खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे, कालानुक्रमे व्यक्तिमत्त्वविकासाचे आठ टप्पे निश्चित करता येतात :

व्यक्तीचे वयोमान

व्यक्तिमत्त्व उत्तमावस्था

व्यक्तिमत्त्व दुरवस्था 

१) बाल्यावस्था : पहिले वर्ष

परिसराची विश्वासजनक ओळख

शंकाकुल मन:स्थिती, आत्मविश्वासाचा अभाव

२) बालपणाची पहिली तीन वर्षे

स्वायत्तता, स्वावलंबन

दुर्बलता, परावलंबन

३) शालेय पूर्वकाल

उपक्रमशीलता, प्रगतिप्रवणता

कचखाऊ वृत्ती, गतानुगतिकता

४) प्राथमिक शाळेचा कालखंड

जिज्ञासू वृत्ती, धिटाई

भित्रेपणा, लाजरेपणा, न्यूनगंड

५) यौवनागमन : पौगंडावस्था

स्वत्वाची जाणीव, करारीपणा

स्वत्वविषयक संभ्रम, डळमळीतपणा

६) प्रौढावस्था

मनमोकळा, जवळकीचा सामाजिक संपर्क

एलककोंडेपणा, संशयी वृत्ती

७) मध्यमवयीन कालखंड

नवनिर्मितिक्षमता, जननशीलता

सनातनी वृत्ती, कूपमंडूकता

८) उतारवय

शांति-समाधानाची भावना

आंतरिक अस्वस्थता : नैराश्य, वैफल्य

व्यक्तिमत्त्वाचा विकास सुरळीतपणे होण्याचे भाग्य सगळ्यांनाच लाभत नसते. अनेक दुर्दैवी माणसांना व्यक्तिगत व्यंगे आणि सामाजिक अडथळे यांचा असह्य काच सोसावा लागतो. त्यामुळे अशी माणसे पुरती खचून जातात व्याधिग्रस्त होतात वा अल्पायुषी ठरतात. अशा व्याधिग्रस्त होणाऱ्या व्यक्तीविषयी फ्रॉइड, ॲड्लर, युंग यांसारख्या सुप्रसिद्ध मनोविश्लेषणतज्ञांनी संशोधन केलेले आहे. त्या संशोधनामुळे मनोव्याधी जडण्याची कारणे आणि त्या दूर करण्यासाठी योजावयाचे इलाज एतद्विषयक बरीच उद्बोधक माहिती उपलब्ध झालेली आहे. तिचा सुयोग्य उपयोग केल्यास मानसिक आरोग्य जतन करता येते.

व्यक्तिमत्त्वाचे वर्गीकरण : निरनिराळ्या मनोवेत्त्यांनी मानवी व्यक्तिमत्त्वाचे वर्गीकरण निरनिराळ्या परींनी केलेले आहे :

(१) भारतीय आयुर्वेदानुसार माणसे ही वातप्रकृती, कफप्रकृती आणि पित्तप्रकृती अशा त्रिविध प्रकृतींची असतात. भारतीय तत्त्वज्ञानानुसार सत्त्वगुण, रजोगुण, तमोगुण या तीन गुणांच्या कमीअधिक प्रभावामुळे माणसे सात्त्विक, राजस किंवा तामस स्वभावाची घडतात.

(२) प्राचीन ग्रीक वैद्यकशास्त्रानुसार माणसाची व्यक्तिमत्त्वे उत्साही, निरुत्साही, नेभळट व संतापी अशा चार प्रकारची असतात. हे चार प्रकार मानवी देहातील रक्त, कफ, कृष्णपित्त आणि पीतपित्त या चार प्रधान रसायनांच्या कमीअधिक प्रमाणामुळे घडून येतात. रक्ताने उत्साह, कफाने विषण्णता, कृष्णपित्ताने भयभीती आणि पीतपित्ताने क्रोध-संताप निर्माण होत असतो.

(३) अर्न्स्ट क्रेश्मर (१८८८–१९६४) यांनी मानवी व्यक्तिमत्त्वाचे मेदप्रधान, स्नायुप्रधान आणि अस्थिप्रधान असे त्रिविध वर्गीकरण केले : (अ) मेदप्रधान व्यक्ती या स्थूल, ठेंगण्या, गोलाकार शरीरयष्टीच्या असतात. त्या स्वभावाने आनंदी, खेळकर, मोकळ्या, समाजप्रिय असतात. अशा व्यक्ती जर काही प्रापंचिक कारणामुळे व्याधिग्रस्त झाल्या, तर त्या मुख्यत्वेकरून उन्माद-अवसाद या चित्तविकृतीच्या बळी ठरतात. (ब) स्नायुप्रधान व्यक्तींना रुंद छाती, सुडौल शरीरबांधा, बळकट अवयव यांची देणगी लाभलेली असते. या व्यक्ती स्वभावाने संयमी, मध्यममार्गी, आत्मसंतुष्ट असतात. त्यांना मनोव्याधींची क्वचितच बाधा होते आणि कदाचित झाल्यास त्या व्यक्ती आत्म-श्रेष्ठत्वाच्या (मेगॅलोमॅनिआ) भ्रमाच्या बळी होतात. (क) अस्थिप्रधान व्यक्ती सडपातळ, कृश, उंच बांध्याच्या असतात. स्वभावाने त्या दीर्घ विचारी, एकान्तप्रिय, गंभीर, संकोची, स्वप्नाळू वृत्तीच्या असतात. त्या जर आपत्तींमुळे कोलमडल्या, तर त्या ⇨छिन्नमानस या व्याधीने ग्रस्त होतात.

(४) डब्ल्यू. एच. शेल्डन यांनी मानवी व्यक्तिमत्त्वाचे गोलकृती (एंडोमॉर्फी), आयताकृती (मेसोमॉर्फी) आणि लंबाकृती (इक्टोमॉर्फी) असे तीन प्रकार कल्पिले होते. त्यांच्या मते गोलाकृती व्यक्तींची पचनेंद्रिये अधिकतर विकसित झालेली असतात व त्यामानाने इतर अवयव कमकुवत राहतात. अशा गोलाकृती व्यक्ती सामान्यत: सुखलोलुप, ऐषआरामी स्वभावाच्या असतात. आयताकृती व्यक्ती या हाडामांसाने पुष्ट, बलवान, सुदृढ बांध्याच्या असतात. अशा व्यक्ती दीर्घोद्योगी, कष्टाळू, कर्तव्यतत्पर असतात. लंबाकृती व्यक्ती या कृश, उंच, नाजूक बांध्याच्या असतात. अशा व्यक्ती दीर्घसूत्री, चिंतातुर, अतिसावध स्वभावाच्या असतात.

(५) स्विस मानसशास्त्रज्ञ ⇨ कार्ल गुस्टाफ युंग (१८७५–१९६१) यांनी अंतर्मुख आणि बहिर्मुख असे व्यक्तिमत्त्वाचे दोन मुख्य परस्परविरोधी प्रकार मानले आहेत. त्यांच्या मते अंतर्मुख व्यक्ती ही चिंतनशील, ध्येयवादी, एकांतप्रिय असते, तर बहिर्मुख व्यक्ती ही समाजप्रि, कार्यतत्पर, सुखवादी असते. युंग यांनी व्यक्तिमत्त्वाचे भावनाप्रधान विरुद्ध विवेकप्रधान, तसेच संवेदन-प्रधान विरुद्ध अंत:प्रज्ञाप्रधान असेही प्रकार मानले होते. विशेष म्हणजे युगांच्या मते, वरवर अंतर्मुख वाटणारी व्यक्ती ही अंतर्यामी बहिर्मुख प्रवृत्तीची असते. तसेच बाह्यत: भावनाप्रधान वाटणारी व्यक्ती ही अंतऱ्यामी विवेकप्रधान असते. तसेच बाह्यात्कारी संवेदनशील वाटणारी व्यक्ती अंत:प्रज्ञाशील असते.

विपरीत व्यक्तिमत्त्वे : मानवी व्यक्तिमत्त्वाचे काही चमत्कारिक, अपवादात्मक प्रकार मानसशास्त्रज्ञांनी वर्णिले आहेत. ते म्हणजे – (१) सहजाणीव (को-कॉन्शस) व्यक्तिमत्त्वे आणि (२) आवर्ती (ऑल्टरनेटिंग) व्यक्तिमत्त्वे.

सहजाणीव व्यक्तिमत्त्वे : एकाच मानवी देहात जणू दोन वा अधिक व्यक्तिमत्त्वे एकाच वेळी वास करीत आहेत, अशा स्वरूपाचे काही माणसांचे वागणे घडत असते. उदा. एखादा मनुष्य तुमच्या आमच्याशी तोंडाने संभाषण करीत असतो, त्याच वेळी त्याचा हात काहीतरी लेखन खरडत असतो. या माणसाला आपला हात कशाविषयी लिहीत आहे याची कल्पना नसते. लेखन करणारा हात आणि संभाषण करणारी जीभ यांचे जणू परस्परांशी नातेच उरलेले नसते.


आवर्ती व्यक्तिमत्त्वे : एखादा मनुष्य काही काळापर्यंत एक प्रकारचे व्यक्तिमत्त्व प्रकट करतो आणि नंतर दुसऱ्या कालखंडात तो वेगळ्याच व्यक्तिमत्त्वाचे प्रदर्शन करू लागतो. या दुसऱ्या व्यक्तिमत्त्वाची भूमिका काही काळ वठविल्यानंतर तो मनुष्य पुनश्च आपल्या पहिल्या व्यक्तिमत्त्वात वावरू लागतो. अशा प्रकारे तो मनुष्य भिन्नभिन्न काळी, आलटूनपालटून भिन्न व्यक्तिमत्त्वे प्रदर्शित करतो.

वस्तुस्थिती अशी दिसते की, सर्वसामान्य माणसाच्या ठिकाणी विविध मानसिक तसेच वार्तनिक प्रवृत्तींचे एक सुसूत्र संघटन घडून येत असते. या विविध प्रवृत्तींपैकी एखादी प्रवृत्ती ही सर्वाभौम सत्ताधारी होते आणि तिच्या आधिपत्याखाली इतर प्रवृत्ती परस्परसहकार्य करीत नांदत असतात. त्यांच्यामधील सुसूत्रतेमुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला एकात्मतेचे स्वरूप प्राप्त होते. जेव्हा या विभिन्न प्रवृत्तींमध्ये बेबनाव होतो, तेव्हा व्यक्तिमत्त्वाच्या एकतेला तडा जातो आणि विभिन्न व्यक्तिमत्त्वे, विभिन्न वेळी आपले डोके वर करून स्वतंत्रपणे वागू लागतात.

व्यक्तिमत्त्वाचे मापन : सुनिश्चित शास्त्रोक्त पद्धतीने व्यक्तिमत्त्वाचे मापन केल्याने व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर आणि तिच्या समस्यांवर प्रकाश पाडता येतो. तसेच त्याच्या समस्यांवरील उपचारांची दिशा ठरविता येते. त्याचप्रमाणे योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्याच्या कामी अशा व्यक्तिमत्त्व-मापनतंत्रांचा उपयोग होऊ शकतो.

व्यक्तिमत्त्व-मापनासाठी पुढील तंत्रे वापरण्यात येतात : (१) श्रेणीमापन पद्धती (२) आत्मनिवेदन (३) शब्द-साहचर्य पद्धती (४) प्रेक्षपण-तंत्रे (५) प्रासंगिक चाचण्या.

श्रेणीमापन पद्धती : या पद्धतीत परीक्षक हा परीक्षणीय व्यक्तीचे मानक रेषेवरील स्थान ठरवितो. उदा. ‘आत्मसंयम’ या व्यक्तिमत्त्व-पैलूसंबंधाने काही व्यक्तींचे मापन करावयाचे झाल्यास परीक्षक एक पाच बिंदूंची मापनरेषा मुक्रर करून त्या रेषेवरील परीक्षणीय व्यक्तीचे स्थान कोणते, ते ठरवितो. या पाच बिंदूंची श्रेणी तो पुढीलप्रमाणे रचतो : (१) अत्युत्तम आत्मसंयम : संकटांना न डगमगता सामोरे जातो. (२) उत्तम आत्मसंयम : संकटप्रसंगी डोके थंड ठेवतो. (३) समाधानकारक आत्मसंयम : संकटप्रसंगी थोडाफार हताश होतो. (४) बऱ्यापैकी आत्मसंयम : संकटप्रसंगी तोल जाऊन चुकीच्या गोष्टी करतो. (५) निकृष्ट दर्जाचा आत्मसंयम : संकटप्रसंगी भीतीने गारठून जातो. परीक्षणीय व्यक्तीला यातले जे वर्णन अधिकतर समुचितपणे लागू पडण्यासारखे असेल, त्या जागेवर परीक्षक परीक्षणीय व्यक्तीच्या नावे खूण करतो.

आत्मनिवेदन : या पद्धतीत परीक्षक परीक्षणीय व्यक्तीला एक प्रश्नावली देतो. परीक्षणीय व्यक्तीने त्या त्या प्रश्नास ‘होय’, ‘नाही’, ‘माहीत नाही’ यांपैकी एक उत्तर द्यावयाचे असते. वुडवर्थ, ऑल्पोर्ट आदी मनोवैज्ञानिकांनी तयार केलेल्या अशा प्रश्नावली सुप्रसिद्ध आहेत.

शब्द-साहचर्य : या पद्धतीत परीक्षणीय व्यक्तीसमोर एखादा ‘अर्थपूर्ण’ शब्द उच्चारण्यात येतो. तो शब्द ऐकल्याबरोबर दुसरा कोणता शब्द आपल्या मनात उमटतो, ते त्या व्यक्तीने पटकन सांगावयाचे असते. या पद्धतीने परीक्षणीय व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर आणि समस्यांवर उद्‌बोधक प्रकाश पाडता येतो.

प्रेक्षपण-तंत्रे : यात मुख्यत्वे दोन तंत्रांचा वापर करण्यात येतो : (१) रोर्शाक यांचे रचनाकृतिदर्शन आणि (२) मरी यांचे प्राबंधिक (कथावस्तू) आसंवेदन. (अ) रोर्शाक यांच्या रचनाकृतिदर्शन चाचणीत काही ठराविक आकाराचे कृष्ण-धवल, तसेच रंगीत ठिपके असलेली कार्डे परीक्षणीय व्यक्तीला दाखविण्यात येतात. त्या-त्या कार्डावर आपणास कोणती आकृती दिसते, ते त्या व्यक्तीने सांगावयाचे असते. त्या व्यक्तीने केलेल्या कथनानुसार तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि समस्यांचा अंदाज बांधता येतो. (अ) मरी यांच्या प्राबंधिक आसंवेदनात (थिमॅटिक ॲपर्सेप्शन) परीक्षणीय व्यक्तीला काही संदिग्ध चित्रे दाखविण्यात येतात आणि त्या त्या चित्रासंबंधाने एखादी काल्पनिक गोष्ट लिहावयास सांगण्यात येते. त्या व्यक्तीने रचलेल्या काल्पनिक गोष्टीवरून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि समस्यांचा अंदाज बांधता येतो.

प्रासंगिक चाचण्या : या चाचण्यांत परीक्षणीय व्यक्तीला एका मुद्दाम रचलेल्या प्रसंगात मन मानेल तसे वागावयास सांगतात. उदा. व्यक्तीला शंभरएक चॉकलेटच्या वड्या देण्यात येतात आणि त्या वड्या तिने इतरांसमवेत खाव्यात किंवा कुणाला काही न देता एकट्यानेच खाव्यात अशी पूर्ण मुभा देण्यात येते. अशा प्रसंगीच्या व्यक्तीच्या वागण्यावरून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि समस्यांचा अंदाज बांधता येतो.

पहा : आनुवंशिकता व आसमंत मानसिक कसोट्या.

संदर्भ : 1. Allport, G. W. Personality : A Psychological Interpretation, New York, 1937.            2. Cattell, R. B. Description and Measurement  of Personality, New York, 1946.            3. Guilford, J. P. Personality, New York, 1959.            4. Hall, C. S. Lindzey, G. Theories of Personality, New York, 1978.            5. Jung, C. G. Personality Types, New York, 1931.            6. Murphy, G. Personality : A Bio-Social Approach to Origins and Structure, New York, 1966.            7. Sarason, G. Personality : An Objectvie Approach, New York, 1972.            8. Thorpe, L. P. The Psychological Foundations of Personality, New York, 1938.

केळशीकर, शं. हि.