प्येअर झानेझाने, प्येअर मारी फेलीक्स : (३० मे १८५९–२४ फेब्रुवारी १९४७). फ्रेंच मानसशास्त्रज्ञ व वैद्यकवेत्ता. मज्जाविकृतीवरील, विशेषतः उन्मादावरील, संशोधनासाठी तसेच मानसिक वियोजन (डिसोशिएशन) सिद्धांताच्या प्रतिपादनासाठी तो विशेष प्रसिद्ध आहे. जन्म पॅरिस येथे. त्याचे शिक्षणही पॅरिस येथेच झाले. १८८९ मध्ये त्याने पॅरिस विद्यापीठातून मानसशास्त्रात डॉक्टरेट घेतली. १८९० मध्ये तो ⇨ जे. एम्. शार्को (१८२५–९३) याच्या निमंत्रणावरून सालपेत्रीअर ह्या पॅरिस येथील सर्वांत मोठ्या मनोरुग्णालयातील विकृतिमानसशास्त्राच्या प्रयोगशाळेचा संचालक म्हणून गेला. झाने व सिग्मंड फ्रॉइड हे दोघेही शार्कोचे विद्यार्थी होते.

झानेने आपल्या L’etat mental des Hystericals ( इं. भा. १९०१) हा महत्त्वपूर्ण ग्रंथ १८९२ मध्ये प्रकाशित केला. उन्मादाच्या अनेक रुग्णांचा सूक्ष्म, विस्तृत व सखोल अभ्यास आणि संशोधन त्याच्या या ग्रंथात संगृहीत आहे. ह्या ग्रंथामुळेच त्याला १८९२ मध्ये वैद्यक शाखेतही डॉक्टरेट मिळाली.

पॅरिस येथील सॉर्‌बॉन महाविद्यालयात १८९५ मध्ये तो मानसशास्राचे अध्यापन करू लागला. १८९८ मध्ये त्याने पॅरिस येथील सालपेत्रीअर रुग्णालयाच्या संचालकपदाचा राजीनामा दिला, तसेच १९०२ मध्ये त्याने सॉर्‌बॉन येथील नोकरीही सोडून दिली आणि तो कॉलेज द फ्रान्समध्ये प्रायोगिक आणि तुलनात्मक मानसशास्राचा प्राध्यापक झाला. Journal de Psychologie normale et Pathologique (१९०४) हे मानसशास्रास वाहिलेले नियतकालिक सुरू करण्यासाठी त्याने बरीच मदत केली. ह्या नियतकालिकाचा तो सुरुवातीपासून १९३७ पर्यंत संपादकही होता. पॅरिस येथे त्याचे निधन झाले.

उन्मादावरील झानेचा ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वीचे उन्मादविषयक सर्व संशोधन उन्मादाच्या शारीरिक लक्षणांवरच केंद्रीत झालेले होते. झानेने उन्मादपीडित रोग्यांच्या मानसिक प्रक्रियांवर विशेष भर देऊन संशोधन केले. संमोहन तंत्राचा अवलंब करून केलेल्या विस्तृत व अनेक प्रयोगांवर त्याने आपल्या उपपत्ती व सिद्धांत आधारलेले आहेत. त्याने असे प्रतिपादन केले, की मानसिक ऊर्जेमुळे प्राकृत वा निरोगी मनात संवेदन, भावना, स्मृती, विचार, कल्पना इ. विविध मानसिक प्रक्रिया एकजीव होऊन कार्य करीत असतात. काही अंशी अनुवंशामुळे, काही अंशी आजारपणामुळे, काही अंशी भावनिक ताण अथवा भावनिक आघातांमुळे, मज्जा-अशक्तीमुळे जेव्हा ही मानसिक ऊर्जा कमी होते, तेव्हा त्याचा परिणाम व्यक्तिमत्त्वाच्या अंशताः म्हणा वियोजनात, विघटनात होतो आणि प्राथमिक व्यक्तिमत्त्वाहून त्याचा निराळा असा एक प्रांत निर्माण झाल्यामुळे व्यक्तीचा जाणिवेशी किंवा बोध मनाशी संबंध तुटतो. ह्या उपबोधात्मक कल्पनांची (idees fixes) नंतर उन्मादलक्षणांद्वारे अभिव्यक्ती होत असते.

झाने व ⇨सिग्मंड फ्रॉइड  (१८५६–१९३९) हे दोघेही शार्कोचेच विद्यार्थी असले आणि त्यांच्या उपपत्तींमध्ये काही अंशी साम्य असले, तरी झानेचा फ्रॉइडवर प्रभाव पडला होता, असे मानावयास फारसा आधार नाही. फ्रॉइडच्या मानसशास्रीय उपपत्तींत प्रामुख्याने अहं व प्राकृत वासना यांच्यातील संघर्ष व दमन यांवर भर आहे. झानेच्या उपपत्तींपेक्षा त्या अधिक उपयुक्त व प्रभावी ठरल्या आहेत. झानेच्या उपपत्ती ह्या वियोजनादी संकल्पनांच्या भाषेत मांडलेल्या असल्यामुळे त्या जराशा बौद्धीक व स्थितिशील भासतात. असे असले तरी, स्वतः झानेनेही अनेक उन्मादग्रस्त रोगी संमोहनतंत्राचा अवलंब करून बरे केले होते. पहिल्या महायुद्धात ज्या सैनिकांना आघातजन्य मज्जाविकृती (ट्र्यूमॅटिक न्यूरॉसिस) जडली, त्या विकृतीची त्याने वर्णन केलेली लक्षणे व निदान विशेष मोलाचे मानले जाते. मानसिक विकृतींच्या अभ्यासास आणि त्यांवरील उपचारास त्याने स्वतःस वाहून घेतले होते. मानसिक स्वयंचलनवाद (ऑटोमॅटिझम), मनास पछाडणारे, वेढून टाकणारे विचार (ऑब्सेशन), उन्मादजन्य स्मृतिलोप, निद्राभ्रमण, चित्त-अशक्ती, मानसिक ताण, व्यक्तिमत्त्वविनाश (डीपर्सनलायझेशन) इ. त्याचे विशेष अभ्यासाचे विषय होते. त्याच्या हयातीत त्याच्या मतांचा व विचारांचा फ्रान्समध्ये चांगलाच प्रभाव होता. ‘वियोजन’ या संकल्पनेचा पुरस्कार अमेरिकेत मॉर्टन प्रिन्स यानेही केला.

त्याने फ्रेंचमध्ये अनेक शोधनिबंध व ग्रंथ लिहिले असून त्याच्या महत्त्वाच्या ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरेही झाली आहेत. त्याचे महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : L’automatisme Psychologique (१८८९), Nevroses et idees fixes (१८९८), Les obsessions et la Psychasthenie (२ खंड, १९०३), La medecine Psychologique (१९२३), द मेजर सिम्प्टम्स ऑफ हिस्टेरीया (१९०७, इं. भा. १९२०) आणि सायकॉलॉजिकल हीलींग : अ हिस्टॉरिकल अँड क्लिनिकल स्टडी  (२ खंड, १९१९, इं. भा. १९२५).

संदर्भ : Prince, Morton, The Unconscious: The Fundamentals of Human Personality, Normal and Abnormal, New York, 1914.

सुर्वे, भा. ग.