स्वप्न : (ड्रीम). निद्रावस्थेत अनुभवास येणाऱ्या प्रतिमा, वस्तू , व्यक्ती, घटना, भावना म्हणजे स्वप्न. स्वप्न अनुभवताना त्यात जे घडते, ते स्वप्नदर्शकाला, म्हणजे स्वप्न पाहणाऱ्याला खरे वाटते पण ते खरे नसते, हे निद्रावस्था संपल्यानंतर लक्षात येते. उदा., आपल्या अंगावर राजाचा पोषाख असून आपण राजा आहोत, असे स्वप्नात दिसले आणि ते निद्रावस्थेत खरे वाटले, तरी प्रत्यक्षात आपण एक सामान्य माणूस आहोत हे वास्तव स्वप्नदर्शकाला, त्याची निद्रावस्था संपल्यानंतर समजते.

विविध संस्कृतींत स्वप्नांविषयी वेगवेगळ्या समजुती आढळतात. काही जमातींचा असा विश्वास आहे, की निद्रावस्थेत स्वप्न पाहणाऱ्याचा आत्मा आपले शरीर सोडून एका खास स्वप्नसृष्टीत संचार करावयास जातो. त्यामुळे स्वप्नदर्शकाला मधेच जागे केले असता त्याचा आत्मा कुठेतरी हरवून जाईल, असे त्याला वाटते. स्वप्नांत पाहिलेल्या गोष्टी खऱ्या मानण्याकडे काही लोकांचा कल असतो. उदा., झुलू जमातीतल्या एका माणसाने स्वप्नात असे पाहिले, की त्याचा मित्र त्याच्यावर हल्ला करीत आहे. जागा झाल्यावर त्याने त्या मित्राशी असलेली आपली मैत्री तोडून टाकली. अशा कृतींतून स्वप्नाला वास्तवाचा दर्जा देण्याची वृत्ती दिसून येते.

स्वप्नांतून व्याधी बऱ्या केल्या जातात, अशीही समजूत होती. औषधाचा ग्रीक देव व्याधिग्रस्तांच्या स्वप्नांत येतो. त्यांनी निद्राग्रस्त होऊन स्वप्नात त्या देवाच्या वा त्याच्या दूताच्या दर्शनाची वाट पाहायची दर्शन मिळाले, की उपायही त्या देवाकडून सांगितला जातो, अशीही श्रद्धा होती. स्वप्नांतून भविष्यकालीन घटनांचे पूर्वकथन केले जाते, असेही मानले गेले आहे. ग्रीकांच्या इलिअड ह्या महाकाव्यात ग्रीकांचा सरसेनापती ॲगमेनॉन ह्याला झ्यूस ह्या देवाचा दूत स्वप्नात भेटतो आणि त्याने भविष्यात कोणत्या कृती कराव्या हे सांगतो, असा एक प्रसंग आहे. बायबलच्या ‘जुन्या करारा’ त भविष्यसूचक स्वप्नांचे निर्देश अनेक आहेत तथापि सर्वच भविष्यसूचक स्वप्ने खरी मानली जात नाहीत. ग्रीकांच्या ओडिसी या महाकाव्यात स्वप्नांची खरी स्वप्ने आणि खोटी स्वप्ने अशी वर्गवारी केलेली आहे. ग्रीक भविष्यवेत्ता आर्टेमिडोरस डाल्डिअनस (इ. स. चे दुसरे शतक) याने लिहिलेले स्वप्नार्थविषयक पुस्तक प्रसिद्ध आहे. आजही अशा प्रकारची पुस्तके प्रसिद्ध होतात आणि त्यांना मागणीही विपुल असते. प्रेमप्रकरणांत गंतलेले लोक, जुगारी, राजकारणी अशा पुस्तकांचा सल्ला अनेकदा घेत असलेले दिसतात.

जागेपणीच्या अनुभवांचे प्रतिबिंब स्वप्नांमध्ये पडते, हा विचारही प्राचीन काळापासून काहींनी मांडलेला दिसतो. उदा., ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल (इ. स. पू. चौथे शतक) ह्याने आपल्या ‘ ऑन द सेन्सिस अँड देअर ऑब्जेक्ट्स ’ (इं. शी.) या ग्रंथात अशा प्रकारचा विचार मांडलेला आहे. स्वप्ने ही बाह्य चेतकांपासून उद्भवतात. त्या चेतकांनी निर्माण केलेल्या संस्कारांसह निजलेल्या व्यक्तीच्या अनुभवास येतात. विख्यात इंग्रज कवी सॅम्युएल टेलर कोलरिज याने लिहिलेली ‘ कुब्लाखान ’ ही प्रसिद्ध कविता त्याला पडलेल्या स्वप्नातून निर्माण झाली. मंगोल राजवंशाचा संस्थापक कुब्लाखान याच्याविषयी एक पुस्तक वाचत असताना कोलरिजला झोप लागली. ह्या स्वप्नात त्याची सर्जनशक्ती कार्यरत होती. जागेपणी त्याने आपली ‘ कुब्लाखान ’ ही स्वप्नातच रचलेली कविता लिहून काढली. सर्जनशील स्वप्नांचा हा एक नमुना म्हणता येईल.

सर्व मानसिक प्रक्रियांप्रमाणेच स्वप्नही मेंदू व त्याच्या क्रिया यांची निर्मिती असते. माणूस जागा असो वा निद्रिस्त मेंदू हा सतत विद्युत् तरंग निर्माण करीत असतो. विद्युत् मस्तिष्कालेख या साधनाच्या साहाय्याने  वैज्ञानिक या तरंगांचे मापन करू शकतात. निद्रावस्थेत बराच वेळ हे तरंग दीर्घ व मंदगती असतात परंतु कधीकधी ते छोटे व शीघ्रगती होतात. जेव्हा हे तरंग शीघ्रगती होतात, तेव्हा डोळ्यांची हालचालही शीघ्रतेने होऊ लागते आणि निद्रावस्थेला माणूस जणूकाही घटनांची एक मालिकाच पाहतो आहे, असे वाटते. निद्रेच्या या अवस्थेला ‘ डोळ्यांची शीघ्र चलनावस्था ’ (रॅपिड आय मूव्हमेंट) असे म्हटले जाते. या अवस्थेत माणसाला जाग आल्यास त्याला पडलेल्या स्वप्नाचे तपशील त्याला आठवण्याची शक्यता असते, तसेच या निद्रावस्थेत मेंदूकडून येणारे नसावेग स्नायूंकडे नेणारे मार्ग बंद झालेले असतात. त्यामुळे निजलेल्या माणसाची स्वप्नावस्थेत हालचाल  होत नाही.

स्वप्न आणि मनोविश्लेषण : विख्यात मानसशास्त्रज्ञ ⇨ सिग्मंड फ्रॉइड (१८५६—१९३९) याने मांडलेल्या मानवी मनाविषयीच्या सिद्धांतप्रणालीला आणि मानसोपचारपद्धतीला मनोविश्लेषण ही संज्ञा वापरली जाते. मनोविश्लेषण म्हणजे फ्रॉइडच्या सिद्धांतचौकटीला धरून केलेले मनाचे अन्वयन आणि स्पष्टीकरण होय. नंतर मनोविश्लेषणाचा एक संप्रदायच निर्माण झाला आणि या संप्रदायातही अनेक वळणे येऊन गेली.

फ्रॉइडने लिहिलेला द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स (१९००) हा ग्रंथ मनोविश्लेषक मानसोपचारतज्ज्ञांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. स्वप्नांविषयीची आपली प्रणाली त्याने ह्या ग्रंथात मांडली. स्वप्ने म्हणजे अबोध मनाकडे नेणारा राजरस्ता होय, असे फ्रॉइडचे मत होते. जागेपणातले अनुभव स्वप्नात प्रतिबिंबित होतात, असेही त्याचे प्रतिपादन होते. अनेकदा पडणाऱ्या स्वप्नांच्या विलक्षण, विक्षिप्त स्वरूपाबद्दल त्याने सैद्धांतिक स्पष्टीकरणही दिले होते आणि अर्थ समजून घेण्याची एक पद्धतही शोधून काढली होती. मानसिक व्यथांतून रुग्णांना मुक्त करण्याच्या स्वप्नांच्या अंतःशक्तींचे विस्तृत विवेचन केले होते. जागेपणी माणसांच्या इच्छा-वासनांवर अनेक सामाजिक निर्बंध येत असतात. त्यामुळे या इच्छा-वासना दडपाव्या लागतात. ह्या इच्छा — विशेषतः लैंगिकता, द्वेष, आक्रमणशीलता यांच्याशी निगडित असणाऱ्या — स्वप्नांमध्ये मोकळ्या होतात कारण जागेपणी मनावर असलेले निर्बंध निद्रावस्थेत सैलावतात. मूत्राशयावर येणारा ताण, आदल्या दिवशीच्या अनुभवांचे अवशेष आणि बालपणाशी साहचर्य असलेल्या स्मृती ह्यांसारख्या चेतकांतून स्वप्नांचा आशय निर्माण होतो. फ्रॉइडने असे सुचविले, की मनुष्य स्वप्नदर्शक निद्रेतून जागा होण्याचे टाळत असतो आणि दडपलेल्या इच्छांची अप्रिय जाणीव त्याला नको असते. त्यामुळे तो त्यांना विचित्र रूप देत असतो. जागेपणी ज्या आवेगांचे, वासनांचे समाधान करता येत नाही, ते आवेग स्वप्नांत इंद्रियगोचर प्रतिमांतून आणि दृश्यांतून प्रकट होतात. फ्रॉइडचे असेही प्रतिपादन आहे, की स्वप्नाशयाचा एखादा स्पष्ट दिसणारा पैलू काही सुप्त घटकांचा द्योतक असू शकतो. संक्षेपणाच्या (कंडेन्सेशन) एका प्रक्रियेतून हे घडते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीविषयीची वा वस्तूविषयीची स्वप्नदर्शकाची जी भाववृत्ती असते, तिचे स्वप्नात विस्थापन (डिस्प्लेसमेंट) होऊन तिथे दुसरी एखादी व्यक्ती वा वस्तू दिसू शकते किंवा कुणीच दिसत नाही. स्वप्नांचा सुप्त अर्थ समजावून घेण्यासाठी फ्रॉइड मुक्त साहचर्य पद्धतीचा अवलंब करीत असे. ह्या पद्धतीने त्याने स्वतःच्या स्वप्नांचेही विश्लेषण केले होते. स्वप्नविश्लेषणाच्या आपल्या अनुभवांच्या आधारे त्याने स्वप्नप्रतिमांचे प्रतीकात्मक अर्थही बसवले होते.


स्वप्नांचा सखोल विचार करणारा फ्रॉइडइतकाच महत्त्वाचा मानसशास्त्रज्ञ म्हणजे कार्ल युंग (१८७५—१९६१) हा होय. एरव्ही जेथे शिरता येणार नाही, अशा अबोध मनाच्या प्रदेशांचा शोध घेण्यासाठी युंगनेही फ्रॉइडप्रमाणेच आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या स्वप्नांचे विश्लेषण केले तथापि युंगच्या मते, स्वप्ने ही त्रुटिपूर्तिकारक (काँपेन्सेटरी) असतात. स्वप्नदर्शकाच्या जागेपणीच्या जीवनात त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या दुर्लक्षित राहिलेल्या पैलूंमुळे निर्माण होणारा असमतोल स्वप्नांच्या माध्यमातून दूर केला जात असतो पण व्यक्तीच्या स्वप्नांचा उगम तिच्या व्यक्तिगत अबोध मनात नसून तो सामूहिक अबोध मनात (कलेक्टिव्ह अन्कॉन्शस) असतो. स्वप्ने मूलबंधात्मकही असतात. ती मिथकात्मक प्रतिमासृष्टीने भरलेली असतात त्यामुळे त्यांचा प्रतीकार्थ उलगडण्यासाठी या प्रतिमांना समांतर अशा मिथ्यकथा, लोकविद्या यांची मदत होते. रुग्णाला अशी स्वप्ने समजावून घ्यायची असतील, तर ही मदत आवश्यकही ठरते. मूलबंधात्मक स्वप्नांतून जे मूलबंध प्रतीकात्मक रीत्या प्रकट होत असतात, त्यांचे स्वरूप स्वप्नाच्या आशयाने केलेल्या वेषांतरासारखे नसते. त्यांचे प्रकटन प्रतीकात्मक असते, कारण ते मूलबंध प्रतीकांतूनच व्यक्त होऊ शकतात. अबोध मनात जे असते, ते लपविण्यापेक्षा प्रकट करण्याचा स्वप्नांचा प्रयत्न असतो. मूलबंध हे स्वप्नांत परिपूर्णतेने साकार होत नसल्यामुळे मूलबंधात्मक प्रतिमांचे शक्य ते सर्व अर्थ शोधून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रतिमांचा खरा अर्थ जाणून घेण्यासाठी हे आवश्यक आहे.

ऑस्ट्रियन मानसोपचारतज्ज्ञ ॲल्फ्रेड ॲड्लर (१८७०—१९३७) याच्या मते स्वप्ने सहेतुक असतात विचारप्रक्रियेची ती अविभाज्य अंगे असतात. स्वप्नांचा संबंध व्यक्तीच्या जीवनशैलीशी संवादी असा असतो स्वप्नातून व्यक्तीचे खाजगी तर्कशास्त्र प्रतिबिंबित होत असते. स्वप्नदर्शकाचे जे भावविश्व त्याला त्याच्या जागेपणीच्या जीवनात पूर्णतः व्यक्त करता येत नाही, ते स्वप्नरचनेत सादृश्य, रूपक अशांचा समावेश करून केले जाते. एक प्रकारे ही प्रक्रिया काव्यनिर्मितीसारखी असते. स्वप्न हे स्वप्नदर्शकाला कवी बनवते. स्वप्नात अंतर्हित असलेली विचारप्रक्रिया न सुटलेल्या समस्यांशी निगडित असते. अशा समस्या तपासून पाहण्याचे, तसेच त्यांची उकल करण्यासाठी शक्य ते मार्ग अवलंबून पाहण्याचे स्वप्न हे एक साधन ठरते. ह्या गोष्टी जशा स्वप्नात करता येतात, तशा जागेपणीच्या जीवनात करण्यात असलेला धोका यामुळे टाळता येतो. स्वप्नामध्ये तथ्यांची वा वस्तुस्थितीची होणारी रचना जशी तार्किक असू शकते, तशीच ती विलक्षण वा विक्षिप्तही असू शकते. व्यक्तीची जीवनशैली आणि तिची ध्येये यांच्याशी सुसंगत अशा समस्येची उकल करण्यासाठी काय आवश्यकता आहे, ह्यावर हे अवलंबून राहते. आत्मवंचना हा स्वप्नाच्या उद्देशाचा एक भाग असतो कारण एखाद्याची खाजगी उद्दिष्टे वर्तमान वास्तवाशी जुळणारी नसतात.

स्वप्नाच्या आशयातून व्यक्तीचे खाजगी तर्कशास्त्र प्रतिबिंबित होत असल्यामुळे स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी सार्वत्रिक (यूनिव्हर्सल) प्रतीके प्रस्थापित करता येत नाहीत. प्रत्येक व्यक्ती जशी अनन्यसाधारण असते, तशीच तिची स्वप्नभाषाही तिच्या अनन्यसाधारण अशा जीवनशैलीशी जुळणारी असते. व्यक्ती जशी बदलते तशी तिची स्वप्नभाषाही बदलते. क्वचितच दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी एक स्वप्न पाहिल्याचे आढळते. त्यात एकसारखेपणा आढळत नाही. 

ॲड्लरच्या मते, स्वप्नातील जीवन हा जागेपणीच्या जीवनाचाच एक वेगळा प्रकार म्हणता येईल. दोन्ही प्रकारांत स्वप्नदर्शकाचा अहम् हा सुरक्षित राहायला हवा असतो. बाह्य वास्तवाच्या मागण्यांना आणि दडपणांना तोंड देणाऱ्या अहम्ला संरक्षण द्यायला हवेच असते. स्वतःचे व्यक्तिमत्त्व आणि आत्मसन्मान राखण्यात प्रत्येकाचे हितसंबंध असतात. स्वप्न ह्याच जाणिवेला बळकटी देण्याचा प्रयत्न करते आणि ते करीत असताना वास्तवाचे सुसंगत भान राखण्यापेक्षा व्यक्तीच्या खाजगी गरजांकडे पाहते, असे म्हणता येईल.

स्वप्नांचा अर्थ योग्य प्रकारे लावता आला पाहिजे. स्वप्नाच्या प्रत्येक पैलूचे स्वप्नदर्शकासाठी काय महत्त्व आहे, हे ठरवता आले पाहिजे. स्वप्नांचा आशय अनेकदा रूपकात्मक पद्धतीने व्यक्त होत असल्यामुळे त्याची रचना अर्थपूर्ण पद्धतीने करता आली पाहिजे. स्वप्न हे सर्वसामान्य ज्ञानाचे कायदे पाळत नसले, तरी स्वप्नाचा अर्थ लावताना ते पाळले पाहिजेत. व्यक्ती कसा विचार करते, तिच्या भावना काय आहेत, तिचे पूर्वग्रह काय आहेत, आपल्या खाजगी तर्कशास्त्रावर भर देत असताना तिच्याकडून कोणत्या चुका होत आहेत, यांवर स्वप्नार्थाने प्रकाश टाकला पाहिजे. स्वप्न हे उत्कट काव्यात्म रूपात वास्तव मांडत असते म्हणून व्यावहारिक दृष्टीने त्याचा अर्थ लावला पाहिजे. असे करण्यात मानसोपचार-तज्ज्ञाला रुग्ण व्यक्तीने सहकार्य दिले नाही, तर त्याच्या खाजगी तर्कशास्त्राचे अधिक विरूपण वा विकृतीकरण होत राहील. सहकार्य देण्यात दाखविलेली अनिच्छा म्हणजे न्यूनत्वाच्या भावनेवर मात करण्याचा चुकीचा प्रयत्न होय. स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी कौशल्य, संवेदनशीलता आणि सर्जनशील कल्पनाशक्तीची आवश्यकता आहे, असे ॲड्लरचे प्रतिपादन होते. ल्यूटव्हिख बिसवॅगनर आणि मेडार्ड बॉस ह्यांनी स्वतंत्रपणे स्वप्नांविषयी जे विचार मांडले, त्यांत त्यांनी स्वप्नांच्या कल्पकशक्तीवर भर दिला. स्वप्नांमधून स्वप्नदर्शक त्यांना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील वास्तवाकडे कल्पकतेने प्रक्षेपित करीत असतात.

स्वप्नवृत्तान्त : आपली खाजगी स्वप्ने प्रत्येक व्यक्तीला ठाऊक असल्याचे दिसत असले, तरी लोक स्वप्नाचा अनुभव कोणत्या पद्धतीने घेतात, हे थेट निरीक्षणाने आपल्याला कळू शकत नाही. स्वप्न हा प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिगत दस्तऐवज किंवा व्यक्तीने स्वतःच स्वतःला लिहिलेले पत्र असते, असे म्हटले जाते. व्यक्तीचे निरीक्षण करण्यासारखे जे वर्तन असते, त्याच्या आधारेच काही अनुमाने करावी लागतात परंतु निरीक्षणाच्या पद्धती आणि उद्देश यांचा स्वप्नांबाबतच्या अनुमानित निष्कर्षांवर परिणाम होतो. सकाळी आपल्या घरी जाग्या होणाऱ्या व्यक्तींच्या स्वप्नांचे वृत्तान्त पाहिले, तर त्यांच्या आशयात लैंगिकता आणि भावनात्मकता अधिक प्रमाणात दिसून येते.

प्रयोगशाळेत अभ्यासासाठी काही व्यक्तींकडून त्यांच्या स्वप्नांचे वृत्तान्त घेतले जातात. रात्री घेतलेल्या वृत्तान्तांपेक्षा सकाळी घेतलेले वृत्तान्त अधिक गुंतागुंतीचे असतात. स्वप्नातून जागे झाल्यावर स्वप्नदर्शका-कडून ताबडतोब घेतलेला स्वप्नवृत्तान्त आणि त्यानंतर स्वप्नदर्शक बराच वेळ जागा राहिल्यानंतर घेतलेला स्वप्नवृत्तान्त यांत फरक आढळतो. अशाही परिस्थितीत स्वप्नदर्शकांच्या स्वप्नांच्या वृत्तान्तांचा अभ्यास करून स्वप्नांची काही सर्वसामान्य वैशिष्ट्ये शोधून काढण्याचा अभ्यासकांचा प्रयत्न असतो.

प्रयोगशाळेत उत्स्फूर्तपणे दिलेले स्वप्नवृत्तान्त लहान असतात. अशा वृत्तान्तांपैकी जवळपास ९०% वृत्तान्त १५० हून कमी शब्दांचे असतात परंतु काही १००० शब्दांहूनही अधिक शब्दांचे होतात. स्वप्ने ही जितकी कल्पनासमृद्ध, विलक्षण, विक्षिप्त स्वरूपाची असतात, असे सामान्यतः मानले जाते, तेवढी ती नसतात, असे संशोधकांना आढळून आले आहे. उलट, जी स्वप्ने अगदीच लहान असतात, त्यांचा अपवाद वगळता बरीच स्वप्ने ही स्वप्नदर्शकाला परिचित असलेल्या सामान्य चौकटीत असतात. स्वप्नातली माणसे त्यांच्या ओळखीची असतात मात्र असे असले, तरी स्वप्ने कधी कधी काळाच्या अखंडतेला धक्का देतात. नेहमी पाहण्यात असलेल्या एका हॉलमध्ये आपण संगीत ऐकतो आहोत, असे स्वप्नदर्शक पाहत असताना अकस्मात तो देखावा बदलून तो एका मैदानात क्रिकेटचा सामना पाहत असल्याचे अनुभवतो. हे अचानक घडणारे संक्रमण स्वप्नदर्शकाला विचित्र वाटते. त्याचप्रमाणे अशी स्वप्ने स्वप्नदर्शकाला नीटशी आठवत नाहीत.

संदर्भ :  1. Boss, Medard, I dreamt Last Night …., New York, 1977.            2. Delaney, Gayle, Living Your Dreams, New York, 1979.            3. Freud, Sigmund, Trans., Strachey, James, The Interpretation of Dreams, London, 1950.            4. Hall, Calvin Soringer Vam de Castle, Robert L. The Content Analysis of Dreams, New York, 1966.            5. Jung, Carl, Trans., Hull, R. F. C. Dreams, N. J., 1974.            6. La Berge, Stephen, Lucid Dreaming, Los Angeles, 1985.            7. Mahrer, Alvin, Dream Work in Psychotherapy and Self-Change, 1989.

कुलकर्णी, अ. र.