फ्रॉम, एरिख : (२३ मार्च १९००–१८ मार्च १९८०). प्रसिद्ध जर्मन–अमेरिकन मनोविश्‍लेषणज्ञ व सामाजिक तत्वज्ञ. जन्म जर्मनीत फ्रँकपुर्ट येथे. हायडल्‌बर्ग विद्यापीठातून समाजशास्त्र व मानसशास्त्राचे एरिख फ्रॉमअध्ययन करून १९२२ मध्ये ते पीएच्. डी. झाले. नंतर त्यांनी म्यूनिक विद्यापीठात तसेच बर्लिन येथील ‘सायकोॲनालिटिक इन्स्टिट्यूट’ मध्ये काही काळ अध्ययन–अध्यापन केले. १९३४ मध्ये ते अमेरिकेत जाऊन स्थायिक झाले. तेथे त्यांनी मनोविश्‍लेषणज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय केला तसेच मनोविश्‍लेषणाचे प्राध्यापक म्हणून मेक्सिको, कोलंबिया, येल, मिशिगन इ. विद्यापीठांत व इतरही ख्यातनाम मानसशास्त्रीय संस्थांत अध्यापन केले. सामाजिक-सांस्कृतिक समस्यांच्या अभ्यासात व निराकरणात मनोविश्‍लेषणाचा आधार घेण्यात त्यांना रूची होती. स्वित्झर्लंडमध्ये त्यांचे निधन झाले.

त्यांची विशेष महत्वाची ग्रंथरचना पुढीलप्रमाणे : मॅन फॉर हिमसेल्फ (१९४७), सायकोॲनालिसिस ॲन्ड रिलिजन (१९५०) व द आर्ट ऑफ लिव्हिंग (१९५६). एरिख फ्रॉम यांचे नाव एस्केप फ्रॉम फ्रीडम (१९४१) आणि फिअर ऑफ फ्रीडम (१९४२) या दोन वेगळ्या नावांनी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांमुळे वैचारिक जगतात झाले. या पुस्तकांत त्यांनी अधिकारशाहीची (ऑथोरिटॅरिॲनिझम) मानसशास्त्रीय चिकित्सा केली आहे तसेच त्यांमध्ये त्यांनी मानवी ⇨ व्यक्तिमत्वाच्या रचनेबाबत एक व्यापक दृष्टिकोनही मांडला आहे.

फ्रॉम यांची वैचारिक बैठक ⇨ सिग्मंड फ्रॉइड (१८५६–१९३९) प्रणीत तत्वांनी, एक पुनर्विचाराची छाननी लावून, तयार झालेली दिसते. व्यक्ती आणि समाज याच्या संबंधाबाबत फ्रॉइडप्रणीत विचारांशी त्यांचे तीव्र मतभेद होते आणि व्यक्तिमत्वाच्या घडणीत फ्रॉइडने मांडलेले जैविक सहजप्रवृत्तींचे तत्त्वही त्यांना मान्य नव्हते.

विसाव्या शतकातील आधुनिक मानवी आयुष्यातील मूलभूत प्रश्‍नांना फ्रॉम सामोरे गेले. वैज्ञानिक विचारसाधनांमुळे प्राप्त झालेली दृष्टी त्यांनी मानसशास्त्राच्या मांडणीसाठी वापरली आणि एक चिंतनशील विचारांची चौकट निर्माण केली.

माणूस उत्क्रांतीमधील एक जीवजाती म्हणून निसर्गाचाच एक भाग असला, तरी त्याच्या उत्क्रांत शरीररचनेच्या कार्याचा पल्ला एवढा मोठा आहे, की तो इतरांपेक्षा वेगळा पडतो. स्वतः, इतर प्राणी आणि समग्र निसर्गक्रम याची संगती लावण्याचा त्याचा प्रयत्न, भूतकाळाची सांकेतिक जपणूक आणि भविष्याचे अंदाज वर्तवण्याची शक्ती व साधने, स्वानुभवाच्या मर्यादा उल्लंघून धावणारी कल्पनाशक्ती यांच्यामुळे माणसाचे जीवित फक्त आत्मरक्षण किंवा वंशरक्षण या हेतूंनी नियंत्रित होऊ शकत नाही. यामुळेच स्वतःचा जन्म आणि मृत्यू या दोन अटळ नियंत्रणापलीकडे असणाऱ्‍या टोकांच्या मधला काळ माणूस अनेक द्वंद्वांचा निरास करण्याच्या प्रयत्नात घालवतो. ही अस्तित्वाशीच निगडीत असणारी द्वंद्वे पुढील होत : (१) व्यक्तिचा जन्म आणि मृत्यू यांबाबतची निर्णयशक्ती व्यक्तीच्या स्वाधीन नसणे, (२) व्यक्तीचे आयुष्य इतिहासक्रमाचा अगदी लहानसा भाग असणे आणि (३) व्यक्ती ज्या कालखंडात जगत असेल, त्या काळातील संस्कृतीच्या मर्यादा ओलांडण्यास असमर्थ असणे.

माणसाच्या आयुष्यात जो अर्थपूर्णतेचा, मूल्याचा शोध चालू असतो, तो शोधच त्याच्या आयुष्याची अर्थपूर्णता ठरवीत असतो, अशी त्यांची भूमिका होती. परंतु मानवी संस्कृतीच्या इतिहासात प्रथम व्यक्ती, समाज आणि निसर्ग यांचा एकवट जीवनक्रम होता, त्यातून प्रथम माणूस स्वतः व निसर्ग यांच्यात भेद करू लागला व नंतर आपण व समाज यांच्यातही भेद करून व्यक्तिवादी बनला. या ऐतिहासिक प्रक्रियेमुळे व्यक्तिमत्त्वाच्या घडणीचे काही साचे त्या त्या काळात उत्पन्न झाले. या संपूर्ण प्रक्रियेत मनुष्य अधिकाधिक स्वतंत्र होत गेला परंतु त्यासाठी त्याला सुरक्षिततेच्या भावनेची किंमत मोजावी लागली. परंतु मानवी बुद्धी जशी जे समजत नाही त्याचा अर्थ लावण्याची सतत धडपड करते, त्याचप्रमाणे असुरक्षितता टाळण्यासाठीही माणूस धडपडत असतो. आर्थिक व राजकीय रचना यांच्यामधूनही वाढती जाणीव आणि त्यातून निर्माण होणारी ऐतिहासिक द्वंद्वे याचे दर्शन होते. समाजातील ऐतिहासिक प्रक्रिया ज्यांना अनुकूल असते, ते वर्ग ऐतिहासिक द्वंद्वे ही अस्तित्व–द्वंद्वेच असल्याचे भासवत असतात. मानसिक ताण आणि अनारोग्य हाही व्यक्ती व समाज यांच्या जाणिवांमधील घर्षणाचा परिणाम आहे. त्याचे वेगवेगळे घाट फ्रॉम यांनी मांडून दाखविले परंतु त्यांनी निराशेचे सूर मात्र लावले नाहीत.

सुदृढ माणसाच्या अंगी स्वतःवर आणि दुसऱ्‍यावर प्रेम करण्याची शक्ती असते. त्यातून एकमेकांची कदर, जबाबदारी, समजूत अशा संबंधाची जपणूक करण्याची धडपड उत्पन्न होत असते. या शक्तीच्या जोरावर उत्पादक श्रमांना अर्थ प्राप्त होत असतो आणि मानवाच्या भावी आशेचे आधारस्थानही तेच आहे.

फ्रॉम यांची विचारसरणी फ्रॉइडच्या विचारांपेक्षा वेगळी असली, तरी मनोविश्‍लेषणवादी विचारसरणीतील नवमतवादी म्हणूनच ते ओळखले जातात.

त्यांची इतर महत्वाची ग्रंथरचना अशी : द फरगॉटन लँग्वेज (१९५१), द सेन सोसायटी (१९५५), सिग्मंड फ्रॉइड्स मिशन : ॲन ॲनालिसिस ऑफ हिज पर्सनॅलिटी ॲन्ड इन्फ्लूअन्स (१९५९), मे मॅन प्रिव्हेल ? (१९६१), बियॉंड द चेन्स ऑफ इल्यूझन (१९६२), द हार्ट ऑफ मॅन (१९६४), सोशॅलिस्ट ह्यूमॅनिझम (१९६७), द रेव्होल्यूशन ऑफ होप (१९६८), द ॲनाटॉमी ऑफ ह्यूमन डिस्ट्रक्टिव्हनेस (१९७३), टू हॅव ऑर टू बी (१९७६) इत्यादी.

पहा : मनोविश्लेषण

संदर्भ : Evans, R. I. Dialogue with Erich Fromm, New York, 1966.

वनासरे, श्यामला