थॉर्नडाइक, एडवर्ड ली : (३१ ऑगस्ट १८७४–९ ऑगस्ट १९४९). अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व शिक्षणशास्त्रज्ञ. मॅसॅचूसेट्स संस्थानातील विल्यम्सबर्ग येथे जन्म. वेस्लीयन, हार्व्हर्ड आणि कोलंबिया विद्यापीठांत त्याचे उच्च शिक्षण झाले. १८९७ मध्ये विल्यम जेम्सच्या मार्गदर्शनाखाली हार्व्हर्ड विद्यापीठातून तो एम्. ए. झाला. नंतर कोलंबिया विद्यापीठात त्याने ॲनिमल इंटेलिजन्स (१८९८) हा प्रबंध लिहून पीएच्.डी. मिळविली. १९०४ पासून १९४० मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत तो कोलंबिया विद्यापीठात शैक्षणिक मानसशास्त्राचा प्राध्यापक होता. त्याला अनेक बहुमान प्राप्त झाले व अनेक मानाची पदेही त्याने भूषविली. कोलंबिया विद्यापीठाने त्याला सर्वोच्च असे बटलर सुवर्णपदक दिले. माँट्रोझ, न्यूयॉर्क येथे तो निधन पावला.

एडवर्ड ली थॉर्नडाइक

सुरुवातीस त्याला प्राणिमानशास्त्राची विशेष आवड होती. लॉइड मॉर्गन (१८५२–१९३६) किंवा जी. जे. रोमानिज (१८४६–९४) यांसारख्या प्राणिमानसशास्त्रातील अधिकारी व्यक्तींना कल्पनाही नसेल अशा तऱ्‍हेच्या नियंत्रित प्रायोगिक पद्धती त्याने आपल्या प्रयोगांत वापरल्या. उदा., मांजरावर प्रयोग करण्यासाठी त्याने उपयोगात आणलेली कूटपेटिका. १९२२ ते ४० ह्या काळात तो कोलंबिया विद्यापीठातील शैक्षणिक संशोधन संस्थेच्या मानसशास्त्र विभागाचा संचालकही होता. तेथील त्याचे मानसशास्त्रातील व शिक्षणशास्त्रातील कार्य विशेष महत्त्वपूर्ण आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेच्या भूदलातील सैनिकमंडळे निवडणाऱ्या समितीचे अध्यक्षपद त्याने भूषविले. ह्या काळात त्याने भूदल–सैनिकांच्या निवडीसाठी उपयोजिलेली मानसशास्त्रीय पद्धती आणि परिमाणे पुढे नागरी जीवनातही उपयुक्त ठरून मान्यता पावली. मानसशास्त्राचा, विशेषतः मानवी ⇨ ज्ञानसंपादन–प्रक्रियेचा, शिक्षणशास्त्रातही खूपच उपयोग होऊ शकतो, हे त्याने साधार दाखवून दिले. मानसशास्त्रीय कसोट्या [⟶ मानसिक कसोट्या] व परिमाणे तसेच शालेय विषयांचे मानसशास्त्र यांबाबत त्याने मौलिक संशोधन व लेखन केले.

त्याने १९०३ मध्ये लिहिलेला एज्युकेशनल सायकॉलॉजी (३ खंड) हा ग्रंथ अमेरिकेत या विषयावरील एक प्रमाणभूत ग्रंथ म्हणून मान्यता पावला. १९०४ मध्ये त्याचा ॲन इंट्रोडक्शन टू मेंटल अँड सोशल मेझरमेंट्स व १९११ मध्ये ॲनिमल इंटेलिजन्स हे महत्त्वाचे ग्रंथ प्रसिद्ध झाले. गणितीय मानसशास्त्रावरही त्याने लेखन केले. शैक्षणिक सांख्यिकीवरील त्याचे कार्य दीर्घकाल अधिकृत मानले गेले. प्रस्तृत विषयावरील त्याच्या विविध लेखांनी मूलभूत स्वरूपाचे अनेक विवाद्य मुद्दे उपस्थित केले. नंतरच्या काळात त्याचे लक्ष शालोपयोगी शब्दकोश करण्याकडे वेधले गेले. १९३५ मध्ये त्याने मुलांसाठी व १९४१ मध्ये प्रौढांसाठी शब्दकोश प्रसिद्ध केले.

त्याने अनेक प्राण्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रयोग करून काढलेले निष्कर्ष व प्रस्थापित केलेले ज्ञानसंपादनप्रक्रियेबाबतचे सिद्धांत शिक्षणशास्त्रात महत्त्वपूर्ण मानले जातात. प्राण्यांच्या बुद्धिमत्तेवरील त्याच्या संशोधनाने १८९०च्या अखेरीस प्राणिमानसशास्त्राला [⟶ तुलनात्मक मानसशास्त्र] निसर्गविज्ञानाचा दर्जा प्राप्त करून दिला. त्याच्या संशोधनामुळे मानवी मनाच्या स्वरूपाविषयीच्या एका नवीन संकल्पनेचा प्रवेश मानसशास्त्रात झाला. अमेरिकेत सुरुवातीस मानसशास्त्राचा जो विकास झाला त्यात थॉर्नडाइक याचा वाटा मोठा आहे. त्याच्या संशोधनकार्यामुळेच अंकगणित, बीजगणित, हस्ताक्षर, वाचन, भाषा इ. विषयांच्या अध्यापनात मानसशास्त्राचा नव्यानेच उपयोग केला जाऊ लागला. थॉर्नडाइक हा मानसशास्त्रात त्याच्या बंध–सिद्धांतामुळे (बाँड थिअरी) विशेष प्रसिद्ध आहे. ⇨ साहचर्यवादी विचारसरणीचा खोल ठसा त्याच्या विचारांवर उमटलेला आहे. त्याचे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ पुढीलप्रमाणे: नोट्स ऑन चाइल्ड स्टडी (१९०१), द प्रिन्सिपल्स ऑफ टीचिंग बेस्ड ऑन सायकॉलॉजी (१९०६), एज्युकेशन: ए फर्स्ट बुक (१९१२), ह्यूमन लर्निंग (१९३१), फंडामेंटल्स ऑफ लर्निंग (१९३२), द टीचर्स वर्ड–बुक (१९२१, १९३१), थॉर्नडाइक–सेंचुरी जूनिअर डिक्शनरी (१९३५), अ हिस्टरी ऑफ सायकॉलॉजी इन ऑटोबायोग्राफी (३ खंड, १९३६), ह्यूमन नेचर अँड द सोशल ऑर्डर (१९४०), थॉर्नडाइक–सेंचरी सीनिअर डिक्शनरी (१९४१) इत्यादी.

संदर्भ: Gordon, H. H. Aspects of Thorndike’s Psychology in Their Relation to Educational Theory and Practice, Columbus, 1926.

सुर्वे, भा. ग.