अपसामान्य मानसशास्त्र : सर्वसाधारणत: न आढळणारे ते ‘असाधारण’ या सदरात टाकले जाते. परंतु या व्यापक सदरामध्ये कर्तृत्वप्रधान असामान्यत्व ( ⇨लोकोत्तर बुद्धिमत्ता, प्रतिमा तसेच लोकोत्तर व प्रभावशाली चारित्र्यगुण ), त्याचप्रामाणे विकृतिदर्शक असामान्य या दोहोंचाही समावेश होऊ शकतो. विकृति -दर्शक असामान्यत्वास  ‘अपसामान्य’ अशी संज्ञा देता येते. अपसामान्य मानसशास्त्रात विकृतींचा अथवा विक्रियारूप प्रतिक्रियांचा अभ्यास करण्यात येतो म्हणून त्यास ‘विकृतिमानसशास्त्र’ अशीही संज्ञा वापरली जाते. विकृतींचे वर्गीकरण, प्रत्येक विकृतिप्रकाराची लक्षणे, विकृतींची सर्वसाधारण कारणमीमांसा, याचप्रमाणे प्रकारश: कारणमीमांसा, विकृतींचा परिहार करण्यासाठी योजले जाणारे उपाय अथवा चिकित्सांचे प्रकार, त्यांची युक्तायुक्तता, या बाबींचे विवेचन करणे हे अपसामान्य मानसशास्त्राचे प्रधान उद्दिष्ट आहे. या विवेचनाच्या अनुषंगाने निद्रा, स्वप्ने, दिवास्वप्ने, संमोहित अवस्था इ. सामान्य व असामान्य यांच्या सीमारेषेवरील प्रकारांचाही परामर्श हे शास्त्र घेते. शास्त्ररचनेसाठी आवश्यक ती सामग्री मिळविण्याच्या, विकृतींचे निकष ठरवण्याच्या, विकृतींची कारणमीमांसा करण्याच्या, तसेच विकृतिचिकित्सा (उपचार) करण्याच्या निमित्ताने सामान्य मानसशास्त्र, बालमानसशास्त्र, समाजशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, शिक्षणक्षेत्र, कायदा, वैद्यकशास्त्र, मनोविश्लेषण वगैरेंशी अपसामान्य मानसशास्त्राचा संबंध येतो. 

विकृतिविषयक मानसशास्त्रीय विचारसारणीचा इतिहास : आधुनिक काळात, विशेषत: औद्योगिक क्रांतीने घडून आलेल्या स्थित्यंतरांमुळे, तसेच बदलत्या जीवनमूल्यांमुळे, सर्वसाधारण व्यक्तीचे मानसिक जीवन अस्थिर व अशांत बनत आहे व प्रगत देशांमध्ये मानसिक विकृती जडलेल्यांची संख्या वाढत असल्यामुळे अपसामान्य मानसशास्त्राचे महत्त्व विशेषत्वाने पटू लागले आहे. हे जरी खरे असले, तरी मनोविकृती या काही नवीन नाहीत. पुरातन कालीही बहुधा प्रत्येक समाजात मनोविकृत व्यक्ती असतच व मनोविकृत व्यक्तींच्या वर्तनाविषयी काही ना काही उपपत्तीही लोक देत आलेले आहेत.

अश्मयुगामध्ये व नंतरही प्राचीन चीन, ईजिप्त, ग्रीस व भारत या देशांमध्ये भुतेखेते व दुष्ट वा सुष्ट पिशाचे यांचा संचार, देवदेवतांचा व पितरांचा कोप अथवा संचार, जादूटोणा व करणी इ. विज्ञानपूर्व लोकसमजुतींचा प्रभाव होता. त्यामुळे विकृत वर्तन-प्रकारांचे नेमके मानसिक स्वरूप व मर्म लोकांच्या लक्षात आलेले नव्हते. त्यामुळे प्रार्थना, मंत्रोच्चार, अंगारे-धुपारे, घंटा व नगाऱ्‍याचे निनाद, ‘संचार’लेल्या व्यक्तींना मारपीट इ. उपायांचा अवलंब केला जात असे. क्वचित प्रसंगी मात्र काही प्रमाणात मानसशास्त्रीय उपचारतंत्रे वापरली जात, असे दिसते.

विकृतींच्या संबंधात प्रकृतिक (नॅचरॅलिस्टिक) विचारणीचा प्रारंभ भारतामध्ये आयुर्वेदग्रंथकारांपासून व पाश्चिमात्या देशांत ग्रीसमधील प्रख्यात वैद्य ⇨हिपॉक्राटीझ (४६०–३५० इ.स.पू.) याच्यापासून झाला. आयुर्वेदग्रंथात ‘निज’ म्हणजे शरीरातील बिघाडामुळे, ‘आगंतु’ म्हणजे बाह्य कारणांमुळे आणि ‘मानस’ म्हणजे चित्तक्षोभामुळे व्याधी जडतात, असे म्हटले आहे.

हिपॉक्राटीझ याच्या मते रक्त, पित्त व कफ या शरीर-घटकांतील असमतोल व मेंदूतील दोष यांमुळे अपस्मार, उद्दीपनविकृती, खिन्नता, बुद्धिभ्रंश इ. व्याधी ऊद्भवतात. ॲरिस्टॉटल यानेही हेच मत स्वीकारले होते. पुढे ⇨गेलेन (इ.स. १३०–२००) या रोमन वैद्याने मात्र द्रव्यहानी, प्रेमभंग, भय, चिंता वगैरे मानसिक कारणांनीही मनोव्याधी निर्माण होतात, हा महत्त्वाचा विचार मांडला. पुढे ग्रीक-रोमन संस्कृतीची ऱ्हास व बर्बर जमातींचे हल्ले होऊन अज्ञानयुग आले व १५ व्या शतकाच्या अखेरपर्यंत पिशाचे, सुष्ट-दुष्ट आत्मे, देवतांचा कोप वगैरे कल्पनांची पक्कड बहुसंख्य लोकांच्या मनावर पुन: बसली. १६ व्या शतकात मात्र योहान व्हीअर व बर्टन यांनी व १७ व्या शतकात सिडनॅम यांनी मनोविकृतीच्या प्रकारांची वर्णने लिहिली. फ्रेंच वैद्य ⇨फिलीप पीनेल (१७४५–१८२६) याने हे कार्य तर चालू ठेवलेच, परंतु त्याबरोबरच ‘वेड’ हा ‘व्याधी’ असून पागल – खान्याचे कैदखान्याऐवजी रूग्णालयात रुपांतर केले पाहिजे, ही दयार्द्र भूमिका घेतली, विकृतींच्या लक्षणांचे गट नजरेसमोर ठेवून त्यांचे वर्गीकरण करण्याचे कार्य ग्रायसिंजर (१८१७–१८६८) याने केले. ⇨एमलि क्रेअपेलीन (१८५६–१९२६) यांचे वर्गीकरणाचे कार्य करून भूक, थकवा, औषधि-द्रव्यसेवन यांमुळे निर्माण होणाऱ्‍या मनोविकृतींचे प्रायोगिक संशोधनही केले.

पहिल्या महायुद्धापर्यंतच्या काळात भौतिक विज्ञानांच्या विचारसारणीचा प्रभाव होता काही काही मनोव्याधींवरील शारीरिक वैद्यकीय उपचारांना यश आलेले होते आणि काही मनोविकृतींच्या बाबतीत त्यांच्या मेंदूशी असलेल्या संबंधाचाही शोध लागला होता. या तीन गोष्टींमुळे मनोविकृतींची शरीरोद्भववादी कारण – मीमांसा बहुतांशी रूढ होऊन बसली होती. त्यामुळे, ज्यांचे मूळ शरीरात सापडत नसे, तक्रारींची बोळवण व उपेक्षा केवळ कार्यात्मक वा कार्यिक विकृती म्हणून केली जात असे किंवा शरीराच्या या ना त्या भागात त्या त्या विकृतीचे मूळ असले पाहिजे, या कल्पनेने शस्त्रक्रियांचा सर्रास अवलंबून करण्यात येत असे अथवा त्या विकृती म्हणजे केवळ रोगाची बतावणी आहे, असे समजले जात असे.

असे असले तरी मानसवादी कारणमीमांसेचा पायाही या काळातच घातला जात होता. ब्रेड (१७९५–१८६१) याने मेस्मरच्या उपचार-तंत्राची दखल घेतली होती व त्याला ‘संमोहन’ हे नाव देऊन त्या तंत्राचे रहस्य सूचन-प्रक्रियेत असते, हे दर्शवले होते. संमोहन-सूचनांद्वारा विकृतींची लक्षणे उत्पन्न करता येतात व घालवताही येतात, हे लायबो (१८२३–१९०४) व बर्नहाईम (१८४०–१९१९) यांनी दाखवले होते. पॅरिस येथे शार्को (१८२५–१८९३) याने उन्मादविकृतीवर यशस्वी मानसोपचार केले होते व जाणिवेच्या कक्षेबाहेरही मानसिक प्रक्रिया अबोधपणे चालत असतात, हे सिद्ध केले होते. त्याचा शिष्य ⇨प्येअर झाने (१८५९–१९४७) याने संशोधनद्वारा असा निष्कर्ष प्रस्तुत केला, की उन्मादविकृतीची अंगवध, अंगस्वाप, स्मृतिलोप, मूर्छा, इ. जी लक्षणे असतात, ती मानसिक शक्ती कमी पडल्यामुळे जे मानसिक वियोजन होते, त्यामुळे उद्भवतात. अशा रीतीने ‘मानसिक कारणांमुळेही विकृती उद्भवू शकतात’ ही उपपत्ती मूळ धरीत होती.

सिग्मंड फ्रॉइड (१८५६–१९३९) याने आरंभी संमोहनद्वारा परंतु नंतर नंतर मात्र रुग्णांच्या जागृता – वस्थेतच त्याला मुक्तपणे बोलायला लावून व त्याचे भावविरेचन घडवून आणून तसेच त्याच्या स्वप्नांची मीमांसा करून त्याला बरे करण्याची पद्धती अवलंबिली. तिच्या आधारे त्याने असे प्रतिपादन केले, की स्वत:च्या अप्रशस्त प्रेरणा व वासना व त्यांच्याशी संबंधित असलेल्या अनुभवांच्या व कृतींच्या लज्जास्पद स्मृती यांचे दमन अथवा निरोधन व्यक्ती करतात व या दाबा धरून राहिलेल्या प्रेरणा व वासनांची तृप्ती, संबंधित व्यक्ती विकृतिलक्षणांच्या रूपाने करून घेत असतात. ⇨पाव्हलॉव्ह (१८४९–१९३६) याने केलेल्या कुत्र्यां – वरील अभिसंधानविषयक प्रयोगांच्या निमित्ताने, मनावरील आत्यंतिक ताणापायी विकृत वर्तनाची लक्षणे द‍ृग्गोचर होऊ लागतात, ही गोष्ट उघडकीस आली. पहिल्या महायुद्धात रणांगणावरील सैनिकांच्या तात्कालिक परंतु गंभीर स्वरूपाच्या शारीरिक तक्रारींवर मानसिक उपचार यशस्वी ठरले व त्यामुळे ‘कार्यिक विकृती मानसिक कारणमूलक असतात’ ही उपपत्ती दृढमूल झाली.

पुढे अपसामान्य अथवा विकृति-मानसशास्त्रात समाजशास्त्रीय द‍ृष्टिकोनाचीही भर पडली कारण सामाजिक निर्बंध व तज्जन्य अतृप्ती व ताण यांचाही मनोविकृतींशी संबंध असतो असे आढळून आले.

सध्या अपसामान्य मानसशास्त्रात साकल्यवादी द‍ृष्टिकोन स्वीकारला गेला आहे, तो असा : व्यक्तीचे शारीरिक व मानसिक जीवन परस्पर-निगडित  असते व ती व्यक्ती परिसराने वेढलेली असते त्यामुळे व्यक्तीच्या विकृतींची कारणे व त्यांचे स्वरूप केवळ जैव किंवा केवळ मानसिक असे राहू शकत नाही. हा द‍ृष्टिकोन प्राचीन आयुर्वेदाच्या द‍ृष्टिकोनाला व ‘द्विविधो जायते व्याधि:, शारीरो मानसस्तथा परस्परं तयोर्जन्म, निर्द्वंद्वं नोपलभ्यते’, या महाभारतातील वचनाला धरून आहे.


विकृतीचे निकष :  अविकृत व विकृत असा भेद करण्यासाठी अनेक निकष सुचविले आणि वापरले जातात. एक निकष सांख्यिकीय द‍ृष्टिकोनानुसार सुचवला जातो, तो असा : एखाद्या व्यक्तिमत्त्वगुणाच्या बाबतीत किंवा वर्तन-प्रकाराच्या बाबतीत जे सरासरी प्रमाण असते ते मानदंड म्हणून घ्यावे आणि त्याहून बराच फरक असणे म्हणजे विकृती असे समजावे. अर्थातच सरासरीदर्शक रेषेच्या अवतीभोवती बहुसंख्य व्यक्ती आढळतील व बराच फरक असलेल्या व्यक्ती दूर राहतील परंतु हा सांख्यिकीय निकष सर्वतोपरी समाधानकारक ठरू शकत नाही. कारण व्यक्तिमत्त्वागुणांचे तसेच प्रतिक्रियांचे मोजमाप व त्यांचे सरासरी परिणाम काढता येणे शक्य आहे काय ? आणि कितपत फरक असला की विकृती मानायची ? आणि तितपतच फरक काय म्हणून व कोणी ठरवायचा ? असे प्रश्न उभे राहतात. शिवाय अविकृत आणि विकृत हा भेद केवळ परिमाणात्मक आहे की गुणात्मक आहे, हाही प्रश्न राहतोच.

सामान्यत: पुढील निकष लावून विकृत वर्तन ठरवले जाते. अर्थात त्यांपैकी कोणताही एकच एक निकष सर्वतोपरी परिपूर्ण म्हणून स्वीकारण्यात येत नसतो. हे निकष असे : (१) वर्तनात औचित्याचा अभाव, (२) प्रतिक्रियांमध्ये अतिरेक, (३) वर्तनाची अप्रशस्तता, (४) व्यक्तीचे स्वत:ला किंवा इतरांना हानिकारक वा उपद्रवकारक वर्तन, (५) व्यक्ती जीवन-परस्पराशी नीट समायोजित न होणे व तिच्या अंगच्या कार्यशक्तींचा खुरटलेपणा, (६) एकात्म व्यक्तिमत्त्वाचा अभाव इत्यादि. व्यक्तीचे तिच्या सामाजिक व सांस्कृतिक परिसराशी समायोजन, प्रसंगोचित वर्तन, प्रतिक्रियांचे यथायोग्य प्रमाण, स्वत:च्या जबाबदाऱ्यांची सक्रिय जाणीव, या सर्वांतून दिसून येणारी मानसिक परिपक्कता, समाजस्वास्थ्यास त्याचप्रमाणे स्वत:च्या हितास बाधक न ठरणारे वर्तन, समतोल, एकात्म व आत्मप्रकटीकरणात्मक विकासशील व्यक्तिमत्त्व ही अविकृतीची अर्थात मानसिक आरोग्याची लक्षणे होत. याउलट, अनुकूलनाचा वा समायोजनाचा अभाव, इतरांना उपद्रव वा हानिकारक तसेच स्वत:चे अहित करणारे वर्तन, विघटित व्यक्तिमत्त्व, स्वत:च्या अंगच्या क्षमतेच्या विकासाचा अभाव दर्शविणारी जीवनशैली ही विकृतीची (अपसामान्यत्त्वाची) लक्षणे होत.

विकृतींचे वर्गीकरण : पाश्चिमात्य देशांत मानसविकृतींचे वास्तवनिष्ठ द‍ृष्टीने वर्गीकरण करण्याचा प्रथम प्रयत्न ग्रायसिंजर याने केला. त्यानंतर क्रेअपेलीन यानेही बारकाईने वर्गीकरण केले व ते लोकप्रिय झाले. मात्र ते वर्गीकरण लक्षणानुसारी आहे, ही त्यातील उणीव आहे. केवळ लक्षणे लक्षात घेऊन मनोव्याधींचे केलेले प्रकार, अमुक विकृती कसकशी निष्पन्न होते व कोणकोणत्या अवस्थांतून जाते, या संप्रप्तिज्ञानाच्या द‍ृष्टीने उपयोगी पडत नाहीत. त्या त्या विकृतीची साध्यासाध्यता ठरवण्यासही, त्याचप्रमाणे उपचारास अथवा चिकित्सेस, तसेच प्रतिबंधक उपाययोजनेच्या द‍ृष्टीनेही ते मार्गदर्शक ठरत नाहीत. म्हणून विकृतींचे कारणा – नुसारी (इटिऑलॉजिकल) वर्गीकरणच प्रशस्त गणले जाते. ते स्थूल मानाने पुढीलप्रमाणे आहे :

या प्रत्येक प्रकाराचे उपप्रकार आहेत. ते पाहण्यापूर्वी चित्तविकृती (सायकॉसिस) व मनोमज्जाविकृती (सायकोन्यूरॉसिस) तसेच व्यक्तिमत्त्व-विकृती व बुद्धिदुर्बलता यांमधील भेद समजून घेतले पाहिजेत.

चित्तविकृतींचे स्वरूप गंभीर व तीव्र असते. व्यक्तीच्या विचार क्रियेत, प्रेरणात्मक वर्तनात, तसेच भावनात्मक प्रतिक्रियांमध्ये विस्कळितपणा असतो. दुष्कल्पना वा संभ्रम तसेच अवस्तुभ्रम होत असतात. व्यक्तिमत्त्वाची एरवीची एकात्मता नष्ट होऊन व्यक्तिमत्त्वाचे विघटन व ऱ्हास सुरू झालेला असतो. वास्तवाची यथायोग्य जाणीव हरपलेली असते, नैतिक विवेक राहिलेला नसतो विचारसरणीत भ्रमिष्टपणा, भावनिक प्रतिक्रियांत विचित्रपणा व वर्तनात विपरीतपणा असतो.

चित्तविकृत व्यक्तींकडून स्वत:चे व परिवाराचे अहित होण्याचा तसेच स्वत:च्या वा इतरांच्या मालमत्तेला वा जीविताला हानी पोचण्याचा संभव असतो. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवूनच त्यांच्यावर उपचार करणे इष्ट असते.

याउलट, मानसनसविकृतींचे (मनोमज्जाविकृतींचे) स्वरूप सौम्य असते. यात व्यक्तींचे आत्मभान शाबूत असते, वास्तविक परिसराची जाणीवही असते व एकंदर परिसराशी आपले अनुकूलन साधलेले नाही, हे त्यांना समजत असते आणि या गोष्टीची खंत वाटून बरे होण्याचा त्या प्रयत्नही करतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विघटन झालेले नसते त्यांच्याकडून आत्मघातकी, हिंसक वा घातक कृत्ये सहसा होत नाहीत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवण्याची तशी आवश्यकता नसते. प्रशामक औषधे, विश्रांती, परिसरात बदल व मानसोपचारांचे विविध प्रकार यांचा कौशल्यपूर्वक अवलंब केल्यास या व्यक्तींना संपूर्णपणे बरे करता येते.

मात्र हेही लक्षात ठेवले पाहिजे, की मानसनसविकृती व चित्तविकृती यांच्यात काटेकोर लक्ष्मणरेषा काढता येत नाही. नसविकृतींची परिणती चित्तविकृतीत होणे शक्य असते.

व्यक्तिमत्त्व-विकृत-व्यक्तींची बुद्धी शाबूत असते परंतु त्यांच्या भावना, सवयी व स्वभाव यांच्यात विकृती असते. औचित्य व सभ्यता सांभाळण्याची त्यांच्यात क्षमता नसते.

बुद्धिदुर्बल व्यक्तींच्या विचारात वा वर्तनात विकृती नसते तथापि त्यांची बौद्धिक वाढ अपुरी झालेली असते व त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया मंदावलेली असते. अप्रशस्त या अर्थाने बुद्धिदुर्बलतेची गणना विकृतीच्या सदरात करता येणार नाही परंतु सर्वसामान्य या सदरातही ती पडत नाही, म्हणून ती विकृतीत केली जाते.

(१) शरीरोद्भव चित्तविकृती : केंद्रीय नससंस्थेच्या, विशेषत: मेंदूच्या विक्रियेमुळे तसेच अंत:स्त्रावी ग्रंथींच्या विक्रियेमुळे उद्भवणाऱ्या चित्तविकृती या सदरात पडतात. त्यांचे पुढील प्रकार करण्यात आले आहेत : (अ) उपदंशरोगमूलक अवयवअपंगतायुक्त, (आ) मेंदूदाहमूलक निद्रारोग, (इ) जराजन्य बौद्धिक ऱ्हास, (ई) मस्तिष्करोहिणी-काठिन्यमूलक, (उ) ग्रंथिस्त्रावविक्रियामूलक, (ऊ) मस्तिष्काघातमूलक, (ए) अप – स्माराचे गुरू, लघू व अपस्मारसदृश हे तीन उपप्रकार.

शरीरोद्भव चित्तविकृती झालेल्या बऱ्या होण्याची आशा एकंदरीने कमी असते.

कार्यिक चित्तविकृती : ज्यांचे मूळ शारीरिक असल्याचे आढळत नाही, अशा चित्तविकृतींचा निराळा वर्ग कल्पावा लागतो. या सदरात खालील प्रकारांचा समावेश होतो :

(अ) छिन्नमानस-विकृती : ही प्राधान्येकरून वैचारिक वा बौद्धिक विकृती होय. वास्तवपराङ्‌मुखता  दर्शविणारे वर्तन विसंवादयुक्त मानसिक प्रतिक्रिया भावनिक प्रतिक्रियांचा उथळपणा वा अभाव व क्वचित उद्रेक तर्कनिष्ठ विचारक्रियेचा ऱ्हास दिवास्वप्नरती, प्रणालिसंभ्रम व अवस्तुभ्रम सहवासप्रियतेचा लोप गलिच्छ व विचित्र वर्तन अनिर्बंध बोलणे किंवा अगदीच न बोलणे ही तिची नेत्रवेधक लक्षणे होत. या विकृतीची सुरूवात मुख्यत्वेकरून किशोरावस्थेपासून होते. शिक्षा व टीका यांबद्दल बेपर्वाई विक्षिप्तपणा व्यवसायाच्या निवडीबाबत सतत चलबिचल क्वचित निर्लज्जपणे हस्तमैथुन यांवरून तिची चाहूल लागते. या विकृतीचे चार उपप्रकार आढळतात : (१) साधा, (२) मनोबाधिर्यप्रधान (हेबेफ्रेनिक), (३) गलितगात्रप्रधान (कॅटॅटोनिक), आणि (४) संभ्रमयुक्त. यांखेरीज बालवयीन, जीर्ण, तीव्र (ॲक्यूट) वगैरे प्रकारही करण्यात येतात. छिन्नमानसविकृती दूर करणे जरा जड जाते. तथापि त्यातल्या त्या गलितगात्रप्रधान व संभ्रमयुक्त हे प्रकार काहीसे सुसाध्य असतात [→छिन्नमानस].


(आ) प्रणालित संभ्रमविकृती (पॅरॅनोइआ) : ही देखील प्रामुख्याने वैचारिक वा बौद्धिक विकृती गणली जाते. साधारणत: मध्यमवयात होऊ शकणाऱ्‍या या विकृतीचे स्वरूपलक्षण म्हणजे स्वत:विषयीच्या तसेच इतरांच्या हेतूंसंबंधीच्या भ्रामक व संघटित बनलेल्या धारणा हे होय. स्वत: फार मोठे आहोत, पण इतरांना ते पाहवत नसल्याने त्यांचे सारे काही आपल्या विरूद्ध चालू आहे, अशा संभ्रमांमुळे अशा व्यक्ती संशयी वृत्तीने वागतात व तर्कबुद्धीचे साहाय्य घेऊन स्वत:च्या कल्पनांची यथार्थता पटवून देण्याचा सतत यत्न करतात. ही विकृती  सामान्यत: असाध्य गणली जाते.

(इ) उद्दीपन—अवसाद चित्तविकृती : ही विशेषत्वाने भावनिक विकृती होय. आत्यंतिक उत्साह व आत्यंतिक विषण्णता ही तिची दोन रूपे असून, एकानंतर दुसरे असा त्यांचा क्रम असतो म्हणून ‘चक्रगतिक वेड’ असेही तिचे वर्णन करण्यात येते. उद्दीपन-अवस्थेत मानसिक क्षुब्धता, अमाप आशावाद, ओसंडणारा उत्साह, अमर्याद आत्मविश्वास, अखंड कृतिव्यग्रता, आत्मगौरव वगैरे लक्षणे आढळतात. याउलट अवसाद-

-अवस्थेत विषण्णता, आत्मलुघत्वाची व एकाकीपणाची भावना, बोलण्याचालण्यात मंदता, असाध्य रोग जडल्याचा संभ्रम वगैरे लक्षणे आढळतात. विशेषत: २५ ते ६५ या वयात होऊ शकणारी व पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये विशेषत: उद्भवणारी ही विकृती असून ती साध्य गणली जाते[→  उद्दीपन-अवसाद चित्तविकृति].

(ई) वाधर्क्यजन्य खिन्नता : हीही भावनिक विकृतीच होय. ती उतारवयात उद्भवते. स्त्रियांत ४० ते ४५ या वयात व पुरुषांत ५० ते ६५ या वयात होऊ शकते. अशांत मन, किरकोळ गोष्टींबद्दल काळजी, आत्मनिर्भर्त्सना, व्याधिसंभ्रम, परिणामी एकाग्रतेचा अभाव, कशातच स्वारस्य न वाटणे, जगन्मिथ्यावाद, निद्रानाश, आत्म – हत्येचे विचार, अस्वस्थ हालचाली इ. तिची लक्षणे होत. विश्रांती, योग्य आहार, प्रोत्साहन, उत्तेजक औषधे व क्वचित मस्तिष्क-आघात-चिकित्सा व मस्तिष्क-शल्य-चिकित्सा यांच्या योगे, विशेषत: सुरूवातीस व बहिर्मुख वृत्तीच्या व्यक्तींच्या बाबतीत, ही विकृती बरीचशी साध्य असते [→ चित्तविकृति].

(२) मानसनसविकृती (मज्जाविकृती) : वर म्हटल्याप्रमाणे मानसनसविकृती सौम्य प्रकारच्या असून त्यांमध्ये व्यक्त्तिमत्त्वाचे विघटन झालेले नसते [→ मज्जाविकृति]. या सदरामध्ये खालील उपप्रकार येतात :

(अ) मज्जा-अथवा नस-अशक्ती : अल्पशा कामाने, अथवा काम करावयाचे आहे, या नुसत्या विचारानेही शिणल्यासारखे वाटणे व सारखे पडून राहणे हे या प्रकाराचे लक्षण होय.

(आ) चिंताकुलता अथवा आशंकाकुलता : काहीतरी आपत्ती येणार, मृत्यू येणार, वेड लागणार अशा प्रकारची किंवा अगदी अनामिक भीती व त्यामुळे शरीरकंप, हृदयाची धडधड, घाम, भोवळ ही या प्रकारची लक्षणे असतात.

(इ) चित्त-अशक्ती : उपटसुंभ विचार मनात येत राहणे एखादी गोष्ट पुन: पुन: करण्याची अदम्य प्रेरणा अंधार, पाणी, उंच जागा वगैरेंचे अवाजवी भय स्वत:च्या उणेपणाचा ग्रह ही या प्रकाराची लक्षणे होत.

(ई) उन्माद : ही विकृती वियोजन-मूलक असते, श्वासकृछ्र, अतिसार, वाचालोप, हसण्यारडण्याची वेडसर उबळ, अंगवध, अंगस्वाप, उन्माद-मूर्छा (अपस्मार-मूर्छेहून ही लक्षणत: भिन्न असते), आत्मविस्मृति-पूर्वक भ्रमण व व्यवहार, निद्राभ्रमण, द्विकेंद्री वा बहुकेंद्री व्यक्तिमत्त्व अथवा व्यक्तिमत्त्वांतर इ. विविध प्रकार या सदरात पडतात. व्यक्त्तिच्या अनुभवांचे व प्रेरणा-वासनांचे एकात्म संघटन होण्याऐवजी संघर्ष व दमन यांमुळे जर वियोजनात्मक प्रक्रिया घडून आली, तर तिच्या अंतरंगात जणू सवता सुभा निर्माण होतो व त्यामुळे ही लक्षणे निर्माण होतात [→  उन्माद].

(३) व्यक्तिमत्त्व-विकृती : व्यक्तिचे सामाजिक द‍ृष्ट्या संस्करणे अथवा सामाजीकरण योग्य रीतीने झाले नाही, तर तिच्या व्यक्तिमत्त्वास व अर्थातच वर्तनासही विकृत स्वरूप प्राप्त होते. व्यक्तिमत्त्व-विकृती या सदरात पुढील लक्षणांचा समावेश होतो : (अ) आत्मकेंद्रित स्वार्थी वृत्ती आणि सलोख्याच्या व इतरांच्या सुखसोयींची कदर करण्याच्या वृत्तीचा अभाव, (आ) नैतिक बेफिकिरी, (इ) सामाजिक जबाबदाऱ्यांच्या जाणिवेचा अभाव, (ई) समाजविरुद्ध (गुंडगिरी, देशद्रोह, खून, चोऱ्‍या वगैरे) वर्तन, (उ) विपरीत व अप्रशस्त लैंगिक वर्तन, (ऊ) मानसिक ताण व दु:ख-परिहाराच्या प्रयत्नांतून जडलेली मद्यासक्ती [→ व्यक्तिमत्त्व].

(४) बुद्धिदुर्बलता अथवा मनोदौर्बल्य : या सदरात, बुद्धिचाचण्यांच्या आधारे निघालेल्या बुद्धिगुणांकपरत्वे पडणारे बुद्धिमदतेचे पुढील तीन प्रकार येतात : (अ) निर्बुद्धता (२५ हून कमी बुद्धिगुणांक), (आ) अत्यल्पबुद्धिता (२५ ते ५० बुद्धिगुणांक) आणि (इ) मंदबुद्धिता (५० ते ७० बुद्धिगुणांक). बुद्धिदुर्बल व्यक्तींमध्ये, शरीराच्या व मस्तकाच्या आकारापरत्वे तसेच चेहरेपट्टीनुसार, खुजे जलशीर्षी, अल्पमस्तिष्क, बृहन्मस्तिष्क, मंगोलसद‍ृश वगैरे प्रकार आढळतात. अत्यल्पबुद्धी व मंदबुद्धी व्यक्तींकडून त्यांच्या कुवतीला अनुसरून अशी साधी कामे करून घेता येतात. गर्भाशयात वा प्रसुतिसमयी मेंदूस इजा, कंठस्थ ग्रंथीस्रावात आयोडिनची कमतरता वगैरे कारणांनी बुद्धिदुर्बलता येते व ती बालपणातच ध्यानात आली, तर थोडाफार उपाय करता येतो [→  मनोदौर्बल्य].

विकृतीची सर्वसामान्य कारणे : परिसराशी अनुकूलन वा समायोजन साधण्याचा प्रयत्न हा जीवमात्राचा धर्मच होय. व्यक्तिचा जीवनपरिसर भौगोलिक, सामाजिक व सांस्कृतिक असा तिहेरी असतो व त्यात राहून स्वत:च्या जैव पातळीवरच्या तसेच मानसिक पातळीवरच्या—क्षुधा, तृषा, समागम, सहवास, प्रेम, प्रतिष्ठा, वर्चस्व, आत्माभिव्यक्ती इ.— गरजांची व त्यांच्याशी निगडीत असलेल्या प्रेरणांची तृप्ती व्यक्तिला करून घ्यावयाची असते. परंतु तिच्या मार्गात अवरोध व प्रेरणासंघर्षाचे प्रसंगही उद्भवत असतात व अतृप्तीचा ताणही जाणवत असतो. तो घालवण्याचे, निदान सह्य होण्याइतका कमी करून घेण्याचे प्रयत्न व्यक्ति करते. कधी – कधी हा ताण सहनशक्तीच्या बाहेर जातो व अशा प्रसंगी स्वत:ची अस्मिता, अहंता वा आत्मकल्पना टिकवून धरण्यासाठी व स्वस्थता अनुभवण्यासाठी ती माघार, मिथ्या समर्थन, प्रक्षेपण, भावविस्थापन, दिवास्वप्न वगैरे स्वरक्षण प्रयुक्त्यांच्या अतिरेकी अवलंब करते  [→  अनुकूलन]. हेच विविध मानसनसविकृतींचे व चित्तविकृतींचे मूळ असते.

वर उल्लेखिलेल्या प्रेरणासंघर्ष-प्रसंगांची व अतृप्तीच्या ताणाच्या कारणांची तीन सदरे करता येतात :

(१) जैव, (२) मानसिक व (३) सामाजिक-सांस्कृतिक.

जैव कारणघटकांमध्ये व्यक्तीच्या ठिकाणी आनुवंशिक व्यंगे वा व्याधी, अंत:स्रावग्रंथींची विक्रिया, जन्मानंतर उत्पन्न झालेली व खंत वाटायला लावणारी व्यंगे वगैरेंचा समावेश होतो.

मानसिक कारकघटकांमध्ये सदोष मानसिक वाढ व तिच्यामुळे राहून जाणारी मानसिक अपरिपक्वता, आघातकारी अनुभवांमुळे निर्माण झालेला हळवेपणा, अनिष्ट अभिवृत्ती व वर्तनप्रबंध यांचा अंतर्भाव होतो. या सर्वांच्या मुळाशी मातृप्रेमाचा अभाव, अतिलाड, इतरांच्या अवास्तव अपेक्षांची दडपणे, मातापित्यांच्या अयोग्य वर्तनाचे आदर्श, चुकीचे ग्रह, कर्तव्यांबाबतचे संघर्षप्रसंग वगैरे गोष्टी असू शकतात.


सामाजिक कारणघटकांमध्ये युद्धे, बांधव-संक्षय, व्यावसायिक समस्या, वर्ण व जातिभेदप्रधान समाज – व्यवस्था, सामाजिक परिवर्तने, त्या त्या समाजाची बालसंगोपनाची रीत व जीवनपद्धती, मुलांच्या मनावर बिंबवली जाणारी मूल्ये, इत्यादिकांचा समावेश होतो.

विकृतींचे निदान व चिकित्सा : रुग्णाच्या विकृतीचे नेमके स्वरूप व तिची कारणे निश्चित करण्यासाठी रुग्णाविषयीची सर्व माहिती मिळवावी लागते. त्याचा अनुवंश त्याचा वैद्यकीय इतिहास, त्याचा जीवनवृत्तांत, त्याची वर्तमान जीवनपरिस्थिती या सर्वांचा त्या माहितीत समावेश होतो. खुद्द रुग्णाचे बोलणेचालणे, त्याची मुखचर्या वगैरेंचे निरीक्षण करून, त्याचप्रमाणे रुग्णाच्या मुलाखती घेऊन, योग्य त्या मानसशास्त्रीय चाचण्यांची मदत घेऊन, तसेच त्याच्या संबंधितांकडूनही ही माहिती मिळवावी लागते. या सर्व माहितीचा अन्वयार्थ लावून कोणत्या प्रकारची चिकित्सा अथवा उपचारयोजना करावयाची याचा निर्णय करावा लागतो.

चिकित्सेचे तीन प्रमुख प्रकार पडतात व विकृतीची कारणे कोणती आहेत, विकृती कोणत्या थरास गेली आहे, रुग्णाची बौद्धिक कुवत व सहकार्यवृत्ती कितपत आहे वगैरे गोष्टी लक्षात घेऊन चिकित्सेचा प्रकार ठरवावा लागतो व त्याला आवश्यकतेनुसार इतर प्रकारांची जोड द्यावी लागते. चिकित्सेचे मुख्य तीन वर्ग म्हणजे : (१) वैद्यकशास्त्रीय, (२) मानसिक, (३) सामाजिक.

वैद्यकशास्त्रीय चिकित्सा : या चिकित्सेत पुढील उपप्रकार आहेत : (अ) इन्शुलिन, मेट्रॅझॉल किंवा विद्युत्प्रवाह यांच्या द्वारा मेंदूला धक्के देऊन मूर्छा आणणे (आ) मेंदूच्या अग्रखंडावर शस्त्रक्रिया करणे आणि (इ) प्रशामके किंवा प्रोत्साहक रसायनद्रव्ये आवश्यकतेनुसार देणे. चित्तविकृतींच्या बाबतींत पहिल्या दोन उपप्रकारांचा जरी अवलंब करण्यात येत असला, तरी त्यांत काही प्रमाणात धोकाही असतो. प्रशामक किंवा प्रोत्साहक रसायनांचा उपयोग भावनिक प्रतिक्रियांमध्ये स्थिरता आणण्याच्या, तसेच चिंताकुल स्थिती कमी करण्याच्या द‍ृष्टीने होतो. तथापि नाक चोंदणे, झापड, कावीळ, आतड्यात रक्तस्राव वगैरे आनुषंगिक अनिष्ट परिणामांचेही त्यात भय असते. मानसनसविकृतींच्या बाबतीत रूग्णाच्या अभिवृत्ती व एकंदर व्यक्तिमत्त्वच सुधारणे आवश्यक असते त्यामुळे निवळ औषधि-चिकित्सेचा त्यात उपयोग होत नाही.

मानसिक चिकित्सा : ह्या चिकित्सेत मानसिक कारकघटकांवर भर दिला जातो. रुग्णाच्या लक्षात त्याच्या समस्यांचे स्वरूप आणून देणे, त्याच्या अबोध पातळीवरच्या भावनिक–वैचारिक प्रतिक्रिया त्याच्या जाणिवेच्या कक्षेत आणणे, त्याच्या स्वत:विषयीच्या तसेच इतरांविषयीच्या कल्पनांची अवास्तवता त्याच्या लक्षात आणून देणे, समायोजित जीवनाला बाधक ठरणारी त्याची वर्तनप्रणाली बदलवणे, त्याच्या ठिकाणी मानसिक परिपक्वता आणवून आत्मविश्वास निर्माण करणे इ. प्रकार यात येतात. सारांश, रुग्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे या प्रकारे पुनर्घटन घडवून आणणे, हे मानसिक चिकित्सेचे उद्दिष्ट असते.

पूर्वी साधे किंवा संमोहनपूर्वक सूचन, रुग्णाच्या इच्छाशक्तीस आवाहन, उपदेश, मनवळवणी इ. पद्धती वापरण्यात येत. परंतु त्या फलप्रद व कायमच्या गुणकारी ठरत नाहीत. हल्ली मनोविरेचन, संमोहनपूर्वक मनोविश्लेषण, फ्रॉइड-पद्धतीचे मनोविश्लेषण, रॉजर्झची अदिग्दर्शक उपचारपद्धती वगैरेंवर अधिक भिस्त आहे. अर्थात या पद्धती सर्वस्वी स्वतंत्र नाहीत.

रुग्णाचे मनोविरेचन त्याला बोलायला लावून करता येते. मनोनाट्य, चित्रनिर्मिती, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ वगैरे तंत्रे वापरूनही ते करता येते. संमोहनपूर्वक मनोविश्लेषण उन्मादविकृतीच्या बाबतीत विशेष उपयोगी पडते परंतु कायमचे उपयोगी पडतेच असे नाही. फ्रॉइडप्रणीत मनोविश्लेषण पद्धतीत रुग्णाला मुक्तपणे बोलायाला प्रोत्साहन दिले जाते व त्याच्या स्वप्नांचाही अर्थ लावला जातो. रॉजर्झच्या पद्धतीत रुग्णाने स्वत:चे स्वत:च मार्गदर्शन करण्यावर व आत्माविष्करणावर भर देण्यात येतो.

मानसिक चिकित्सा व्यक्तिश: करता येते अथवा समूहश:ही करता येते. विकृतीची मुळे खोलवर असली, तर व्यक्तिश: मानसिक चिकित्सा इष्ट असते. सामूहिक चिकित्सेमध्ये वेळ वाचतो व शिवाय आपल्यासारखे इतरही पुष्कळ आहेत, हे रुग्णांच्या लक्षात येते व त्यांच्याशी बोलत बोलत स्वत:च स्वत:चा व इतरांचाही मनोवैद्य बनण्याची संधी त्याला मिळते. अभिसंधान संकल्पनेवर भर देणारे मानसोपचारतज्ञ वार्तनिक चिकित्से -वर भिस्त ठेवतात व रुग्णाच्या सवयी बदलवण्याचा प्रयत्न करतात.

मानसिक चिकित्सेला साहाय्य म्हणून विश्रमण (रिलॅक्सेशन), विश्रांती, मनोरंजन, जलोपचार, कार्यमग्नता, इत्यादींचाही अवलंब करण्यात येतो [→ मानसोपचार मानसोपचारपद्धती].

सामाजिक चिकित्सा : ह्या चिकित्सेत रुग्णाच्या जीवन-परिसरातच बदल घडवून आणावा लागतो. त्याची आर्थिक स्थिती, त्याचे आप्तेष्टांशी व व्यावसायिक सहकाऱ्यांशी संबंध इत्यादींमध्येही त्याच्या मानसिक ताणाची मुळे असतात. त्यामुळे एका अर्थाने रुग्णाइतकाच त्याच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींवरही इलाज करावा लागतो व रुग्णाला समायोजनाचा प्रत्यय येईल असे वातावरण निर्माण करावे लागते.

पहा  : मनोविश्लेषण मानसिक आरोग्य.

संदर्भ : 1. Coleman, J. C. Abnormal Behaviour and Modern Life, Chicago, 1964.

         2. Coville, W. J. Costello, T. W. Rouke, F. L. Abnormal Psychology, New York, 1960.

         3. Dourcus, R. M. Shaffer, G. W. Textbook of Abnormal Psychology, Baltimore, 1950.

         4. Maslow, A. H. Mittelmann, B. Principles of Abnormal Psychology, London, 1960.

         5. McDougall, W. An Outline of Abnormal Psychology, London, 1960.

         6. London, P. Rosenhan, D. Ed. Foundations of  Abnormal Psychology, New York, 1968.

         7. Page, J. D. Abnormal Psychology, New York, 1947.

अकोलकर, व. वि.