चार्ल्स एडवर्ड स्पिअरमन

स्पिअरमन, चार्ल्स एडवर्ड : (१० सप्टेंबर १८६३ — १७ सप्टेंबर १९४५). इंग्रज मानसशास्त्रज्ञ. जन्म लंडन शहरी. ब्रिटिश लष्करातील पायदळात, मुख्यत: भारतामध्ये, त्याने अधिकारी म्हणून नोकरी केली तथापि त्याच्या किशोरवयापासूनच त्याला तत्त्वज्ञानीय विषयांची आवड होती. तत्त्वज्ञान व मानसशास्त्र ह्या विषयांवरील उत्तम ग्रंथ त्याच्या व्यक्तिगत ग्रंथालयात होते. शिवाय त्याच्या मनात अनुत्तरित असे अनेक तात्त्विक प्रश्न होते. परिणामत: वयाच्या ३४ व्या वर्षी त्याने लष्करातील नोकरी सोडली आणि आपल्या अकादमिक जीवनाला आरंभ केला. विख्यात जर्मन मानसशास्त्रज्ञ व्हिल्हेल्म व्हुंट ह्याच्या लाइप- सिक येथे असलेल्या प्रायोगिक मानसशास्त्राच्या प्रयोगशाळेत स्पिअरमनने मानसशास्त्राचे औप-चारिक शिक्षण घ्यावयास सुरुवात केली. लाइपसिक येथील विद्या- पीठातूनच त्याने पीएच्.डी मिळवली (१९०६). पुढच्याच वर्षी ‘ युनि- व्हर्सिटी कॉलेज , लंडन येथे तो अध्यापन करू लागला. ह्याच महा-विद्यालयातून १९३१ साली गुणश्री प्राध्यापक म्हणून तो सेवानिवृत्त झाला.स्पिअरमनच्या प्रभावातून तेथे मानसशास्त्राची ‘ लंडन स्कूल ’ ( संप्रदाय ) निर्माण झाली.

स्पिअरमनने १९०४ मध्ये मानवी बुद्धिक्षमतांचा अभ्यास करण्यासाठी सांख्यिकी, मानसमिती ह्यांवर आधारलेली ‘ द्विक्षमता प्रणाली ’ मांडली. ही प्रणाली थोडक्यात अशी : प्रत्येक क्षमतेचा एक अंश सर्वच वर्तनासाठी आवश्यक असा असतो. त्याचप्रमाणे क्षमतेचा एक अंश असाही असतो, की जो काही विशिष्ट वर्तनासाठी असतो. माणसाच्या सर्व वर्तनासाठी आवश्यक असणार्‍या अंशाला त्याने g ( जी ) असे नाव दिले. तसेच काही विशिष्ट वर्तनासाठी आवश्यक असलेल्या क्षमतेच्या अंशाला त्याने s (एस्) असे म्हटले. म्हणजे ‘ बुद्धिमत्ता = जी + एस् ’ असे त्याचे प्रतिपादन होते. सर्व वर्तनावश्यक क्षमतेचा अंश ज्यांच्यात अधिक प्रमाणात असतो त्या व्यक्ती अनेक विषयांचे ग्रहण करू शकतात, तर विशिष्ट वर्तनासाठी आवश्यक असलेल्या क्षमतेचा अंश अधिक असणार्‍या व्यक्ती काही ठराविक बाबतींतच बुद्धीची चमक दाखवू शकतात.

स्पिअरमनच्या ह्या प्रणालीवर बरीच टीका झाली. मानवी बुद्धीचे स्पष्टीकरण इतक्या सोप्या पद्धतीने देता येणार नाही, अशी टीका काही आक्षेपकांनी केली. ‘ जी ’ हा बौद्धिक क्षमतेचा अंश खरोखरी अस्तित्वात आहे काय, असा प्रश्नही उपस्थित केला गेला. स्पिअरमनने आपल्या प्रणालीच्या समर्थनार्थ केलेले गणिती युक्तिवाद अनेकांना पटले नाहीत. विसाव्या शतकाच्या तिसर्‍या दशकाच्या आरंभी ही साधीसुधी ‘ द्विक्षमता प्रणाली ’ मागे पडून बहुक्षमता प्रणाली पुढे येऊ लागल्या. एल्.एल्. थर्स्टन ह्याचे नाव ह्या संदर्भात विशेष उल्लेखनीय आहे. असे असले, तरी ह्या संदर्भात आरंभीचे काम करण्याचे श्रेय स्पिअरमनला दिले जाते.

‘द प्रूफ अँड मेझरमेंट ऑफ असोसिएशन बिट्वीन टू थिंग्ज ’ (१९०४) व ‘ जनरल इंटलिजन्स ऑब्जेक्टिव्हिटी डिटरमाइन्ड अँड मेझर्ड ’ (१९०४) हे त्याचे अमेरिकन जर्नल ऑफ सायकॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेले लेख त्याची भूमिका समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्याच्या ग्रंथांपैकी द नेचर ऑफ इंटलिजन्स अँड द प्रिन्सिपल्स ऑफ कॉग्निशन (१९२३), द ॲबिलिटीज् ऑफ मॅन, देअर नेचर अँड मेझरमेंट (१९२७), क्रिएटिव्ह माइंड (१९३०) आणि ह्यूमन ॲबिलिटी (१९५०) हे त्याचे ग्रंथ उल्लेखनीय आहेत.

लंडन येथे तो निधन पावला.

पहा : बुद्धिमत्ता.

संदर्भ : 1. Sheehy, Noel Chapman Antony J. Conroy, Wendy, Ed. Biographical Dictionary of Psychology, London, New York, 1997.

            2. Wolman, Benjamin B. International Encyclopedia of Psychiatry, Psychology, Psychoanalysis and Neurology, Vol. 10, New York, 1977.

कुलकर्णी, अ. र.